Thursday, 24 May 2018

पंधरा लाख

प्रिय पंतप्रधान किंवा प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी,

आम्हाला तुमची पाच वर्षं पूर्ण होण्याआधी पंधरा लाख रुपये मिळालेच पाहिजेत. प्रत्येक भारतीयाच्या व्यक्तिगत खात्यामध्ये तुम्ही पंधरा लाख रुपये जमा करणार होतात म्हणे, त्याचं काय झालं?  हा प्रश्न सोशल मीडिया, वाचक पत्रव्यवहार, इतर वेळी सहज गप्पांमध्ये अजूनही चघळला जातो. आजच्याच लोकमत मध्ये एकाने तसं नमूद केलंय आणि छापणारेही छापतात. 

तुमचं विधान पुढीलप्रमाणे होतं "अगर एक बार ये जो चोर-लुटेरोंके पैसे विदेशी बैंकोंमे जमा हैं ना ...., इतने भी हम रुपये ले आये ना तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफत में १५-२० लाख रुपये यूँ ही मिल जायेंगे इतने रुपये हैं| "

तर माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की या देशात तुमच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या IQ ला झेपतील अशी विधाने तुम्ही करावीत. आता वर तुम्ही कुठे म्हटलं आहे का, की मी तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करेन म्हणून? पण ज्यांच्या IQ ला झेपत नाही ते तसा अर्थ काढतात. एखाद्याच्या बोलण्याचा उगीचच विपर्यास करणाऱ्याचा IQ कमी आहे असंच म्हणावं लागेल ना? तर अशा IQ वाल्यांसाठी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

"माझ्याकडे शंभर लोकांना जेवू घालण्याइतका पैसा आहे" असं म्हटलं तर मी शंभर लोकांना जेवायला घालण्याची प्रतिज्ञा केलीये का?
"माझ्याकडे दहा कुटुंबे राहू शकतील इतकी जमीन आहे" असं कोणी म्हटलं तर तो दहा कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करेल असा त्याचा अर्थ होतो का?
"माझ्याकडे हजार लोकांचं भागेल इतकं धान्य उत्पादन होणारी शेती आहे" असं एखाद्याने म्हटलं तर त्याने हजार लोकांना लगेच फुकट धान्य वाटप करावं का?

स्वाक्षरी,
कोणत्याही विशिष्ठ पक्षाची समर्थक नसलेली, पण सध्या तुम्हीच एक पर्याय आहात असं वाटणारी व्यक्ती!

No comments:

Post a Comment