शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

पनू...

प्रिय पनू,

साधारण अडीच दशकांपूर्वी उद्याच्या दिवशी काळोख्या रात्री अचानक जाग आली. आजूबाजूला पाहिलं तर घरात मी आणि आजी दोघीच होतो. आजी गाढ झोपलेली मग मी पण डोळे घट्ट मिटून घेतले आई-बाबा घरात का नाहीत याचा विचार करत. मग सकाळी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तर आईच्या शेजारी एक छानसं गोंडस बाळ झोपलेलं होतं. मला सगळ्यांनी सांगितलं की ती तुझी लहान बहीण आहे आणि तू तिची ताई आहेस. मला तुला पाहून खूप म्हणजे खूप आनंद झाला.

मी पहिलीत होते तेव्हा तू एक वर्षाची वगैरे होतीस. शाळेत जाताना तुझ्याशी खेळून जायचं आणि शाळेतून आल्यावरही पहिल्यांदा तू काय करत आहेस ते पाहायचं हाच माझा दिनक्रम होता. तू सगळ्यांचीच लाडकी होतीस. बाबांची जरा जास्तच. ते तुला बबडा, म्हमद्या वगैरे बऱ्याच काय काय नावांनी हाक मारायचे. पणजी आजी म्हणायची की हा खरंतर मुलगाच होता पण चुकून शेवटच्या क्षणी मुलगी झाली म्हणून तू मुलांसारखी वागतेस. 

छोटीशी होतीस तेव्हा सगळीकडे माझ्यामागे दुडूदुडू पळत यायचीस. मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत असताना तू असायचीस लिंबूटिंबू म्हणून आणि मला आउट करवून द्यायचीस. कधी लपाछपी खेळताना लपलेलं असताना मध्येच तुला मला काहीतरी मोठ्याने सांगायचं असायचं तर कधी शिवणापाणी खेळताना तू धडपडली की मला लगेच तुला उचलून घ्यायचं असायचं. कधी तुला साडी नेसवायची म्हणून मी साडीचा तुझ्या अंगावर बोंगा करून ठेवायचे तर कधी तुझे केस विंचरायचे म्हणून त्यात अजून गुंता करून ठेवायचे.

दुपारच्या वेळी आई आपल्याला शेजारी घेऊन झोपायची. आपल्याला तर काही झोप आलेली नसायची. मग आई तिची झोपमोड होतेय म्हणून आपल्याला ओरडायची. ती जितकं ओरडेल तितकं आपल्याला अजून कायकाय सुचून हसू यायचं मग आपण फ्रॉकचा बोळा करून तोंडात कोंबून आवाज न करता हसायचो ते आठवतं का तुला? मला लहान झाले म्हणून तू घातलेले माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटायचं आणि आता आपलं माप एकच आहे आणि अजूनही माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटतं. तुझे मशरूमकट वाले मान हलवली की उडणारे दाट केस मला खूप आवडायचे. आणि तुझं गोड हसू आणि काळेभोर डोळेसुद्धा!

तुला सगळे चिडवायचे की तुला वैदिणीकडून अर्ध्या भाकरीवर घेतलंय, म्हणून ताई सगळ्यांची लाडकी आहे आणि तू नाहीस. एकदा सुया-बिब्बे विकणारी बाई बाहेर ओरडत चालली होती तर तुला इतका आनंद झाला आणि तू पळतच घरात येउन सांगू लागलीस की आई ते बघ माझी आई चाललीये. खूप हसलो होतो आम्ही तेव्हा. बाहेर कोणताही फेरीवाला चालला की तू घरात येउन आपल्याला ते घ्यायचय का म्हणून विचारायचीस. एकदा असंच आपल्याला सुकट-बोंबील घ्यायचय का म्हणून विचारत आली होतीस. आणि सगळ्यांनी नाकाला हात लावला होता. "फुलों का तारो का" हे तुझं आवडतं गाणं, त्यातल्या "सारी उमर हमें संग रहना है" मुळे ताईचं  लग्न ठरत नाहीये असं आई गमतीने म्हणायची.

एका दिवाळीत फुलबाज्या उडवताना एक पेटती फुलबाजी तू तुझ्या पायाजवळ टाकलीस आणि तुझ्या फ्रॉकने पेट घेतला. आपण दोघीच होतो तिथे आणि क्षणभर मला समजेनाच काय करावं. मग पटकन तुला बाजूला ओढून मी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि बाबांनी येउन फ्रॉकला लागलेली आग विझवली. खूप घाबरले होते मी तेव्हा, तुला काही झालं असतं तर… तरीपण तुझा उद्योगीपणा चालूच राहिला पुढेही!

मी ताई आहे म्हणून मला इगो आहे मोठं असल्याचा. त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला की सरळ सांगण्याऐवजी मी चिडचिड करत बसते. पण तू कधीही मनावर न घेता काय झालं ते शोधून काढतेस. खूप मनमिळाऊ, समजूतदार आणि परिपक्व विचारांची आहेस तू. लहान असूनही कधीकधी माझी मोठी बहीण होतेस. माझ्या मैत्रिणीदेखील सगळ्या माझ्यापेक्षा तुझ्याच जास्त जवळच्या आहेत. आणि आपल्याला एकमेकींची सगळी सिक्रेट्स माहिती आहेत.

माझं लग्न झाल्यापासून थोडं दूर गेलोय आपण. पण मनाने एकमेकांशी  बांधल्या गेलेल्या आपण कधी दूर आहोत असं मला मुळीच वाटत नाही. "बहीण" हे जगातलं मला सगळ्यात जास्त उमगलेलं, सगळ्यात जास्त प्रेम मिळालेलं आणि मी सगळ्यात जास्त अनुभवलेलं नातं आहे. तुझ्या असण्याने या नात्याला पुरेपूर न्याय मिळाला असं मला वाटतं. कोणाहीपेक्षा जास्त तू मला जवळची आहेस आणि नेहमीच राहशील. खूप काही लिहायचं राहिलं असेल, ते आता पुन्हा कधीतरी… औक्षवंत हो आणि नेहमी सुखी राहा… १२-१२ ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तुझी ताई…

छायाचित्र आंतरजालावरून



१० टिप्पण्या:

  1. खरंच तेव्हा "तुला अर्ध्या भाकरीवर घेतलंय" हे सांगणं इतकं common होतं की त्याचे प्रत्येक घरात बरेच किस्से असतील... :)
    धन्यवाद गजानन...

    उत्तर द्याहटवा
  2. छान गं. आमच्याकडे पण लहान बहिण कचर्‍यातून आणली होती. आणि आता माझी लहान मुलगी सुद्धा कचर्‍यातून आलेली आहे. तिचा भाऊ सारखा तिला कचरापेटीत परत करु म्हणून चिडवत असतो.

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद मोहनाताई...
    >>तिला कचरापेटीत परत करु :D :D हे आवडलं

    उत्तर द्याहटवा
  4. Kiti chhan lihile aahe ! mazi lahan bahin aahe. aamchyat 2 varshache antar aahe, lahanpani bhandaycho, pan mothepani sarv kahi ekmekina sangaycho. bahiniche naate kharach khup chhaan aste na !

    उत्तर द्याहटवा
  5. अगदी खरं रोहिणीताई, ज्यांना बहीण असते ते खरंच भाग्यवान असतात, आपल्यासारखे :)

    उत्तर द्याहटवा