सहज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

आळस

(Post is available HERE to read in English)

दिवसभर लेखाचा विषय लिहून ठेवला, पण लिहिण्याचा आळसच आला. कधीकधी अशी मानसिकता होते की कोणी काही मागितलं नाही, काही डेडलाईन नाही तोपर्यंत एखादी गोष्ट करायचीच नाही. याला सहजरित्या आळसाचं नाव दिलं जातं. पण हा खरंच आळस असतो की थकवा असतो? बऱ्याचदा बराच निवांत वेळ घालवणाऱ्या माणसालादेखील काही गोष्टी पटकन करण्याचा हुरूप येत नाही. अशा माणसाला आपण आळशीच म्हणतो, पण त्यालादेखील मानसिक थकवा असेल कदाचित. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्तच धोकादायक. शरीराचा थकवा एखाद्या झोपेनंतर निघून जाऊ शकतो, पण मनाचा थकवा झोपही येऊ देत नाही.

आळशी म्हणजे थकवा नसलेले आणि खरोखर आळशी अशा लोकांचं एक बरं असतं, कोणतंच काम पार पाडण्याची यांना चिंताच नसते. बघू, करू यामध्ये यांना छान वेळ मारून नेता येते. मुळात आळशी माणसे कसलं दडपणच घेत नाहीत. यांना आयुष्याचं मोलाचं तत्त्व समजलेलं असतं आणि ते म्हणजे आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, पण काम काही झाल्यावाचून राहणार नाही. कोणीनाकोणी एखादी गोष्ट करणारच आहे तर आपण का कष्ट घ्या. आणि नाहीच झाल्या काही गोष्टी तरी यांना काही फरक पडत नाही. जगबुडी होत नाही, डोंगर कोसळत नाही.

बौद्धिक आळशी लोकांची अजून एक जमात असते, यांना शारीरिक चार कामे सांगा पण विचार करावा लागेल असलं काही सांगू नका. पुस्तक वाचायला सांगू नका, अभ्यास करायला सांगू नका, कोडी सोडवायला सांगू नका, काही लक्षात ठेवायला सांगू नका. थोडासा मेंदूला ताण पडायला लागला की ते विचारच सोडून देतात. इतर घरातले हुशार, विचारवंत बघून घेतील. आपलंच डोकं खपवलं पाहिजे असं काही नाही. खरंतर संगणक आणि एआय यांनी मारलेल्या मजलीमुळे आपण सगळेच बौद्धिक आळशी होत चाललो आहोत. सहज हाताच्या बोटांवर माहिती मिळते मग वाचन करून ज्ञान मेंदूमध्ये साठवून काय करायचंय?

त्यातून आळशी आणि निगरगट्ट हे जर समीकरण जुळून आलं तर अशा लोकांच्या सहवासात असणाऱ्यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कीवच केलेली बरी. यांना लहानपणापासूनच अशी सवय लागलेली असते की चार बोलणी  खा पण काम वाचतंय ना मग बोलणी खाल्ल्याने काही शरीराला भोकं पडत नाहीत. बोला काय बोलायचं ते पण सांगितलेलं काम करणार नाही. एक मात्र छान असतं यांचं की त्यांना अहंकार वगैरे आजिबात नसतो. मत्सर नसतो, क्रोधही नसतो. निम्म्या षड्रिपूंवर इथेच विजय मिळवल्याने बाकीचे तीन सहज हाताळता येतात. शिवाय काही महत्त्वाकांक्षा नसल्याने डोक्यालाही कधी ताप नाही.

घरात टंगळमंगळ केली की ज्याला राहवत नाही असे ते काम करून टाकतात, ऑफिसात टंगळमंगळ केली पण निदान जुजबी दाखवता येत असेल तर ऑफिसमध्येही बाकीचेच काम ओढून नेतात, भले अप्रेजल थोडं कमी होईल पण डोक्याला ताप तर नाही. ठेविले अनंते तैसेचि राहावे ही उक्ती मात्र हे लोक तंतोतंत पाळतात. यांचं कधी बीपी हाय वगैरे होत नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्यांचं नक्कीच होऊ शकतं. तर तुमच्या सहवासात आहेत का अशी कूल माणसं, जी कूल असतात पण आपण त्यांना आळशी म्हणतो? 

ज्या अवयवांचा मानवाला वापर आणि उपयोग नाही अशा गोष्टी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपोआप बोथट आणि नष्ट होत जातात. अशा या बौद्धिक आणि शारीरिक आळसाने होणार काय तर मेंदू आणि शरीर दोन्ही हळूहळू मानव गमावून बसेल. अशा या काहीही शिल्लक नसलेल्या माणसाला एआय आणि भविष्यातील प्रगत रोबो सहज हरवून मानव जमत नष्ट न होईल तरच नवल. आता हे रोचक असेल की कृत्रिम बुध्दीमत्तेकडून हरून माणूस नष्ट होईल, की नैसर्गिक आपत्तींनी नष्ट होईल, की आपापसात भांडत नष्ट होईल की उत्क्रांतीच्याच उलट्या गंगेने नष्ट होईल. असो आपण तर नसू बघायला. 

शनिवार, ४ जुलै, २०२६

लहर


तुम्ही लहरी व्यक्ती आहात की अगदी शिस्तशीर आणि कर्तव्यदक्ष आहात? मी तर अगदीच लहरी असल्याने कर्तव्यदक्ष लोकांबाबत मला खूपच आदर आहे. अगदी मनाचा चंग बांधून वगैरे फार कमीच गोष्टी होतात माझ्याच्याने. किंवा मग आता अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हाच लहर पळून जाते. आणि एखादं काम जेव्हा करण्याची लहर येते तेव्हा मात्र मी एवढं त्याच्या हात धुवून मागे लागेन की तसं काम कधी कोणी केलंच नसेल. शाळेत अभ्यासही असाच लहर असेल तेव्हा केला, पण परीक्षा आली की मग मात्र त्या विषयाच्या हात धुवून मागे. पण या आयत्या वेळी ताण घेण्याच्या सवयीमुळे होतं काय की अजूनही अधून मधून अशी स्वप्नं पडतात की उद्या वेगळाच पेपर आहे आणि मी वेगळाच अभ्यास केलाय. किंवा परीक्षा एका केंद्रावर आहे आणि मी भलत्याच केंद्रावर, आणि मग नंतर स्वप्नच आहे समजलं आणि आता नाही बाबा कोणती परीक्षा द्यायचीये असं लक्षात आलं की हायसं वाटतं.

लहर हे खरं तर स्वच्छंदी असण्याचं लक्षण आहे. समुद्राच्या लाटांना उगीच का लहरी म्हणतात. त्या त्यांना हव्या तशा येतात आणि त्यांना हव्या तशा जातात. पण त्यानेच समुद्राचं सौंदर्य आहे ना. कल्पना करा की प्रत्येक लाट अगदी शिस्तीने पुढे येतेय, एवढे मीटर अंतर ठेवून, ताशी एवढ्याच गतीने वगैरे, तर आपल्याला समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल का. एखाद्या छानशा फुलझाडाला रोज एकाच आकाराचं फूल येत नसतं ना. ऋतूसुद्धा वर्षभरात त्याच्या तीन वेगवेगळ्या लहरी आपल्याला दाखवतो. सूर्याचा रोज पसरणारा संधिप्रकाश रोज वेगवेगळा भासतो, आकाशातल्या प्रत्येक नभाचा आकार वेगवेगळा असतो.  एवढंच का देव कुठे आपल्या प्रत्येक माणसाला एकसारखं बनवतो. निसर्गामध्येच इतकी लहर आहे, तर माणसाने तरी इतकी शिस्त आणायची कुठून. जो माणूस निसर्गाला जवळचं मानत असेल तो लहरीच असणार.  

पण हे असं लहरी असण्याचे खूप तोटे आहेत. तुमच्याइतकीच कुवत असलेली पण जास्त शिस्त असलेली माणसं तुमच्या खूप पुढे निघून जातात. कारण ते लहरीला नाही तर कर्तव्याला महत्त्व देतात. लहानपणी आजीने एखादं काम सांगितलं आणि मी म्हटलं की मूड नाहीये किंवा बोअर झालंय की ती ओरडायची. कसला तुमचा मूड आणि कसला तुमचा बोअर, आमच्या वेळी नव्हतं असलं काही. पण जसजसं वय वाढत जातं, जबाबदाऱ्या येत जातात, तशी लहरीला मुरड घालावीच लागते. कदाचित सगळं जग जिंकण्याइतके नाही आपण पुढे जाणार पण स्वतःचं कुटुंब आणि त्यांचा जिव्हाळा जिंकण्याइतकी शिस्त स्वतःला लावावीच लागते. लहर आणि शिस्तीचा तराजू सांभाळत स्वतःला पुढे न्यावं लागतं. 

मनाला लहरच जवळची वाटते पण हेच मन देवाने इतर प्राण्यांपेक्षा जास्तीचं दिलंय माणसाला देवाने. इतर निसर्ग आणि प्राणी लहरी असतात, पण ही लहर आहे हे समजणारं मनच त्यांच्याकडे नसतं. या लहरी मनाला आवरण्यासाठी मग साधूसंतांना अभंग ओव्या रचाव्या लागतात, रामदास स्वामींना मनाचे श्लोक लिहावे लागतात. आणि आपल्यालाही आपली लहर संधी मिळेल तशीच सांभाळावी लागते. मग होते सवय हळू हळू आणि उमगून जातं की उनाड दिवस एखादाच असू शकतो, रोज रोज नाही. 


#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

सुखान्त

एखादी कथा-कादंबरी असो वा नाटक-चित्रपट, तुम्हाला सुखांत पाहायला आवडतो की शोकांतिका? शक्यतो सुखांतच ना? कथा नायक-नायिकेच्या आयुष्यात कितीही हेलकावे आले, त्यांच्यावर अन्याय झाला, पण शेवटी त्यांना न्याय मिळाला की आपल्याला तो सुखांत वाटतो आणि बरं वाटतं. बरं शोकांतिका आपल्याला अगदीच आवडत नाहीत असंही नाही. ते पाहूनही आपण हळहळ व्यक्त करतोच; असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण खरं सांगा, सुखांत असला की ते "नाटक" वाटतं आणि शोकांतिका असली की खरी नसली तरी "that's life" असं वाटतं ना? 

आयुष्यात प्रत्येकाचा पदोपदी काही ना काही संघर्ष चालूच असतो, म्हणून तर निदान पडद्यावर, पुस्तकांमध्ये तरी सुखांत वाचून-बघून मनाला कुठेतरी समाधान मिळत असावं. प्रत्येकाचंच मन 'हे काय खोटं आहे' म्हणून तटस्थपणे सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. आपणही त्या कथेतील पात्रांच्या गोष्टीत नकळतपणे गुंतले जातो. कथा-अभिनय-दिग्दर्शन खूपच परिणामकारक असेल तर पाहिलेल्या गोष्टीचा परिणामही पुष्कळ दिवस टिकतो. आणि हे सगळं उथळ असेल तर तेवढ्यापुरतं बघून आपण सोडून देऊ शकतो. आपलं आयुष्यही सुखांतच असावं असं कोणालाही वाटतंच.

पूर्ण आयुष्य तर द्या सोडून; पण जगत असताना कितीतरी छोटे छोटे प्रसंग येतात की ते सुखांतच असावेत अशी कोणाचीही इच्छा असते. शालेय जीवनापासूनच हा खेळ सुरु होतो. परीक्षेचा सुखांत - चांगले गुण मिळवणे, महाविद्यालयाचा सुखांत - चांगली नोकरी मिळणे, नोकरीसाठी मुलाखती दिल्या - चांगलं पॅकेज मिळून नोकरीचा होकार येणे, व्यवसाय करायचा झाला तर नफा होण्यास सुरुवात होणे. घर बांधायला काढलं, किंवा सदनिका खरेदी केली, त्याचं बांधकाम मनासारखं पूर्ण होणे. लग्न करायचं म्हटलं तर प्रेमविवाहात काय किंवा ठरवून केलेल्या विवाहात काय आवडलेल्या जोडीदाराने होकार देणे. गरोदरपणाचा सुखांत - सुदृढ बाळ जन्माला येणे, अचानक काही आजार उद्भवला - त्या आजाराला हरवून पुन्हा उभे राहणे. बापरे अजून खूपच मोठी यादी होईल ही.

खरं सांगू का, सुखांत बघायला आपल्याला आवडतो सगळ्यांना, पण वरच्या या सगळ्या गोष्टी, आणि इतरही अनेक समस्या आयुष्यात असतात की आपल्या मनासारखं नाही होत सगळं. किंबहुना अगदी मूठभर थोड्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. बाकी इतर अनेक गोष्टी "that's life" म्हणून आपल्याला सोडून द्याव्या लागतात. प्रत्येक गोष्ट सुखांत किंवा शोकांतिका यांच्या साच्यात न बसवता, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, याचा अर्थ ती शोकांतिकाच आहे असा नाही. आपल्या मनाने ती गोष्ट कशी स्वीकारली यावर तो सुखांत की ती शोकांतिका हे ठरेल हे बिंबवणं जास्त महत्त्वाचं आहे ना! आणि आत्ता एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली म्हणून आपल्याला वाईट वाटेल, पण काही काळ जाऊन दिल्यावर कदाचित समजेल की तेव्हा जे मनासारखं नाही झालं त्यामुळे आता त्याचा सुखांत होणार आहे असंही होऊ शकतं ना!




गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

पितृ पक्ष

सध्या पितृपक्ष चालू आहे, भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष. कोणाचा यावर विश्वास असतो तर कोणाचा नाही. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांनी इहलोक सोडला, त्या तिथीला त्यांच्यासाठी श्राद्ध विधी करतात. तसं तर या नैवेद्यामध्ये भरपूर पदार्थ केले जातात. आणि ते कसेही केले तरी चविष्टच होतात. पण लोकांमध्ये या नैवेद्याबाबत बरीच मतमतांतरे आहेत.

कोणी म्हणते की हे जेवण दुःखाचे असते त्यामुळे आपण ते इतर वेळी ताव मारून, 'वा काय छान झालंय' असं म्हणून खातो तसं खाऊ नये, तर कोणी म्हणते हे जेवण पितरे येऊन जेवून जातात आणि समाधानी होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तर आपणही जेवताना समाधानी, आनंदी असावे.

जसे जेवणाबद्दल तसेच इतर काही गोष्टींबद्दलही असेच उलटसुलट समज आहेत. कोणी म्हणते या काळात शुभ कार्य करू नये. सोने, घर, वाहन इत्यादी खरेदी करू नये, थोडक्यात आनंददायी काहीही करू नये. नवीन काही सुरु करू नये. तेच कोणी म्हणते की या काळात नवीन सुरुवात किंवा खरेदी केल्याने पूर्वजांनाही आनंदच वाटेल आणि ते आशीर्वादच देतील, तर देवाबरोबरच पूर्वजांचेही आपल्याला आशीर्वाद मिळतील.

तसं तर हे नंतरचे सगळे विधी आपण करूच, पण जिवंतपणी कोणाचीही काळजी घेणे जास्त महत्वाचं आहे ना. नाहीतर असंही पाहिलं आहे की घरातील एखादी व्यक्ती जराजर्जर होऊन मरण पावल्यानंतर घरातल्यांकडे त्यांचा सध्याचा फोटो सुद्धा नसतो, तो कोणाकडे मिळतो तर त्यांची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीकडे! आई - बापांना मरण येते वृद्धाश्रमामध्ये! ते काय आपल्या वंशजांना आशीर्वाद देणार?

जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच. तसंच हे आपलेच पूर्वज, तर त्यांचे स्वभाव आपल्यालाच माहिती असणार ना. "आमच्या वेळी असं नव्हतं" ही एक प्रसिद्ध उक्ती आहे. काही लोक असे असतात की माझं बालपण असं गेलं, आम्ही असे राहिलो तर तुम्हीही तसेच रहा. तर कोणाचं असं असतं की आमच्या वेळी असं नव्हतं पण तुम्हाला मिळतंय ना मग तुम्ही त्याचा आनंद घ्या. आपल्या १ -२ पिढ्या आधीच्या लोकांमध्ये जिवंतपणीच मोठ्यांचा इतका धाक असायचा की पितरांचा धाक नक्कीच असणार! पण आपण गेल्यावर आपली पित्रे घातली जातील (?) तेव्हा नक्कीच आपले वंशज अशा धाकामध्ये नसणार.  

आपले पूर्वज यापैकी कोणत्याही प्रकारातले असले तरी आपण आदरपूर्वक त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना नक्कीच आवडत असेल. समजा हे सगळं खोटंच असेल, पण त्या निमित्ताने होणारा दानधर्म कोणाला तरी नक्कीच उपकारक ठरत असेल. पितृपक्षात तुळस, आंबा, पिंपळ इत्यादी काही झाडे लावावीत म्हणतात, ते देखील आपल्याला उपकारकच नाही का! नैवेद्य वगैरे काहीच जमत नसेल तर दानधर्म करणं आणि ते होते म्हणून आपण आहोत ही कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या आठवणींमध्ये थोडा काळ रमणं आपल्याच मनाला मोठं समाधान देऊन जाणारं आहे ना.




गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

पावसाळा






तुमचा आवडता ऋतू कोणता असा प्रश्न कधी ना कधी कोणीतरी विचारलाच असेल ना तुम्हाला?

माझा नावडता ऋतू नक्कीच उन्हाळा आहे, आणि आवडता पावसाळा! 

थोडं लहान असताना पावसाळ्यात काही-बाही लिहायला वगैरे सुचायचं, उन्हाळ्याच्या लाहीनंतर सगळीकडे वातावरण प्रसन्न झाल्यामुळे असेल कदाचित पण मनही प्रसन्न व्हायचं.
तसं पण पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्र्या आणि बेडकांची ओरड चालू होतेच नाही का! 

पावसाळी ट्रेक्स असायचे, गेल्या वर्षीपर्यंत कितीही भिजलं तरी सर्दी-खोकला-ताप वगैरे हे काय असतं माहिती नव्हतं.

या वर्षी मात्र पावसाळ्याने की पावसाने (विचार करणारा ईमोजी) अगदी उबग आणलाय. 
मे महिन्यात जे सुरु झालाय ते जायचं काही नावच नाही. 
ऐन गौरी-गणपतीमध्ये हे धो-धो चालूच. थोडी रिमझिम असतेच दर वर्षी, पण यंदासारखा अगदी निरुत्साही वाटावं असा आठवत नाही कधी झालेला.

एक तर अजून गम्मतच झाली, ऑगस्ट मध्ये कोकणात ट्रिप काढलेली, १५ ऑगस्ट आणि सप्ताहांत जोडून येत होते. मग काय यावं फिरून म्हटलं. आणि राखीपौर्णिमा होऊन गेलेली त्यामुळे तर पाऊस जास्त नसेल असा अंदाज घेऊन बुकिंग केलं होतं. पण १५ ऑगस्टला तिकडे पोहोचताच प्रॉपर्टीवाल्यांनी सांगितलं की गेले पाच दिवस सतत पाऊस चालू आहे. एकतर कोकणातला पाऊस आणि  वातावरण तर असं की प्रॉपर्टीच्या बाहेर पडायची इच्छा होईना. त्यात त्यांनी अजून एक बॉम्ब टाकला १६ ऑगस्टला दहीहंडी होती, तर प्रॉपर्टीमध्ये जेवण मिळणार नव्हतं, कामाला कोणी माणसंच येणार नाहीत म्हणे. म्हणजे पावसाने बाहेर जाता येईना आणि आत थांबून जेवणही नाही मिळणार. हे खरं तर त्या लोकांनी बुकिंग घेतानाच सांगितलं पाहिजे ना. कोकणाबद्दल ही गोष्ट एवढी गुपित कशी काय राहिली देव जाणे. मग काय १६ ऑगस्टलाच तिकडून काढता पाय घेतला आणि आलो पुण्यात परत! 

तर असा हा २ ० २ ५ चा पावसाळा! 
खरं सांगू का, आत्ता या वर्षीपर्यंत माझा आवडता ऋतू पावसाळाच होता! हो "होता"च :D





शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

अर्ध्या वाटेवर


घरातून निघताना आपल्याला कुठे जायचंय हे माहिती नाही असं नसतंच ना! अगदीच डोकं भिरभिरलंय आणि काय करावं सुचत नाही असा एखादा आणि तेही क्वचितच निघत असेल घरातून कुठे जायचंय हे न ठरवता, किंवा वाटेतच ठरवत असेल कुठे जायचं ते. काहीजण प्रवासाची जागेवर पोहोचण्यापेक्षा जास्त मजा लुटतात तर काही इच्छित स्थळी पोहोचण्यावर जास्त लक्ष देतात आणि प्रवासाला कंटाळवाणं मानतात. 

प्रवासाची मजा लुटता येईल नक्कीच पण रोजच्याच प्रवासाचा आनंद कोणी घेतो का? ऑफिस दहा किलोमीटरवर आहे आणि ट्रॅफिकमुळे रोज पोहोचायला दीड दीड तास लागत असेल तर तो काय बिचारा प्रवासाची मजा घेणार? त्याच्यासाठी तर कधी एकदा ऑफिसला किंवा घरी पोहोचतो असंच होणार ना. मग कोणी कितीही सांगितलं की "the journey is always better than the destination" तरी काय फरक पडतो!

आयुष्य हा प्रवासच आहे असं सगळेच म्हणतात, पण असा प्रवास की ज्याचं खरंखुरं गंतव्यस्थळ कोणालाच नको आहे. रोजचाच झालाय हाही प्रवास. कधी आपण जागेवर पोहोचलो असं वाटतच नाही. आज काही मिळालं तर उद्या आपला जीव दुसरं काहीतरी मिळवण्याच्या मागे. शांत, निवांत कधी वाटतच नाही. आपण कायमच आपले कोणत्यातरी गोष्टीच्या अर्ध्या वाटेवरच !

आयुष्य हा प्रवास आहे म्हणण्यापेक्षा आपला प्रत्येक दिवस हेच आपलं destination आहे असं मानलं तर कदाचित हे अर्ध्या वाटेवरचं जीव टांगणीला लागणं थोडं कमी होईल का ?



सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

चर्चा

चर्चा म्हटलं की त्यापुढे आपोआपच 'निरर्थक' हा शब्द मनात येतो. माझ्यासारख्या फार बोलक्या नसणाऱ्या व्यक्तींना तर कोणत्याही चर्चेचा मनस्वी कंटाळा येतो. सहभागी होणारी सगळीच माणसे जर समजूतदार असतील आणि तर्काला धरून विचार करणारी असतील तर चर्चा करण्यात काहीतरी अर्थ तरी आहे. पण दुसरा कितीही तर्कशुद्ध बोलत असेल तरी माझंच खरं म्हणणाऱ्यांशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे? 

चर्चेचे pros आणि cons काय असावेत? जर काही ज्ञानी लोकांमध्ये एखादा अज्ञानी मनुष्य बसला असेल तर त्यांची चर्चा ऐकून एखाद्याच्या ज्ञानात भर पडू शकते. पण सगळेच ज्ञानी किंवा सगळेच अज्ञानी असतील तर नुसतेच वादविवाद होतात. घरातील मोठ्यांच्या चर्चा लहानांनी ऐकल्या तर काहीतरी विचारधारा तयार व्हायला मदत होते. भले ती घरच्यांच्या बाजूने असेल किंवा विरुद्ध असेल! आपण खरंच निर्णय घेण्यामध्ये कुठे अडकलो असू तर चर्चेने प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. पण येणारी परिस्थिती कशी असेल याचा काहीच अंदाज नसेल तर मात्र त्याबद्दल चर्चा करणं व्यर्थ आहे. हापिसात वगैरे चर्चांचा उपयोग होतो कारण तिथे प्रत्येक विषयात वेगळे तज्ञ असतात, एकाला दुसऱ्याच्या तांत्रिक विषयांमध्ये तितकं ज्ञान असेलंच असं नसतं पण तिथेही कितीतरी वेळा चर्चा भरकटतातच!

आज वेगवेगळ्या बातम्यांच्या वाहिन्यांवर रोज कसल्या ना कसल्या चर्चा चालू असतात. पण त्यातून कोणाला काही ज्ञान मिळण्याऐवजी, कोण आपलीच भूमिका कशा पद्धतीने पुढे रेटतोय हेच पाहायला मिळतं. त्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही पण प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे आणायला सरसावलेला असतो. पटत तर कोणालाच कोणाचंच नाही, दुसऱ्याचं म्हणणं बरोबर असलं तरी खोडून काढणं, इतका एकच या चर्चांचा उद्देश असतो. असल्या चर्चांचा 'वेळ फुकट जाणे' याशिवाय काय उपयोग? सोशल मीडियावरही राजकारण इत्यादी  विषयांवर चर्चा चालू असतात आणि त्या चर्चेचं भांडणात कधी रूपांतर होतं हे कळतही नाही. एका ठराविक वय आणि अनुभवानंतर प्रत्येक जण आपापल्या मतांशी बऱ्यापैकी ठाम झालेला असतो. विरुद्ध विचारधारेतही काही तथ्य असू शकतं हे मान्य करण्याइतकी लवचिकता राहिलेली नसते. 

थोडक्यात काय तर एखाद्याला खरंच एखाद्या बाबतीत दुसऱ्याचं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त माहिती असलेल्या व्यक्तीचं ऐकून काही निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा उपयोगी ठरते, पण आधीच मनात एखादा निर्णय झालेला आहे आणि तोच दुसऱ्यांवर लादायचा आहे असं असेल तर चर्चा निरर्थक ठरते. चर्चेच्या शेवटी काही निर्णय झाला आणि त्यात सगळे खुश असतील असं होण्याची शक्यता फारच कमी असते. राजकारण, बॉलिवूड आणि क्रिकेट इत्यादी मला हमखास "निरर्थक" चर्चेचे विषय वाटतात. या प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी मुरब्बी माणूस सगळे निर्णय घ्यायला बसलेला असतो आणि आम्ही मात्र उगीच आमच्या तोंडाची वाफ दवडतो. तुम्ही चर्चा केलीत म्हणून विराटच्या ऐवजी रोहितला कप्तान करणार आहेत का? किंवा तुम्ही चर्चा केलीत म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का?

तर अशा या चर्चा, चर्वितचर्वणं आणि चऱ्हाटांवर कोणी किती अवलंबून राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण प्रत्येकाला शेवटी स्वत:ची लढाई स्वत:च लढायची असल्याने चर्चांवर विसंबून राहणारा माणूस आयुष्यात फार पुढे जात नसावा, हे माझं वैयक्तिक मत!

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिला दिन

महिला दिनाच्या शुभेच्छा येतात त्यातून अजून जाणवतं की आपण कोणीतरी दुय्यम आहोत म्हणून या शुभेच्छा आपल्याला दिल्या जात आहेत. समाजातला जो घटक स्वत:ला दुय्यम मानतो त्याच्यासाठी असे दिवस बनवायची वेळ येते. निदान भारतीय महिलांवर तरी ती यायला नको होती. "प्राणी दिवस" , "पर्यावरण दिवस" असेल तर आपण समजू शकतो, कारण मानव स्वत:ला श्रेष्ठ प्राणी मानतो.

जोपर्यंत तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज असेल, जोपर्यंत तुम्ही शोषित असाल तोपर्यंत सक्षम होण्यासाठी तुम्हाला तुमचं महत्त्व इतरांनी पटवून देणं ठीक आहे. आजही काही महिलांना त्याची गरज आहे, पण माझ्यासारख्या काहींना नक्कीच नाही. तुम्ही सक्षम आहात की नाही हा प्रश्न नसतो, तुम्ही स्वत:ला सक्षम मानता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.

महिला म्हटलं की ती "working lady" असते किंवा "housewife" तरी असते. गृहिणी असणं ही खरं तर फार मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत स्त्रिया गृहिणी होत्या तोपर्यंत समाजस्वास्थ्य इतकं बिघडलेलं नव्हतं. या "गृहिणी"पणाला योग्य ते "ग्लॅमर" मिळालं असतं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्त्रीने पुरुषांप्रमाणे वागण्याचा हव्यास धरला नसता. स्त्री घरात लक्ष देते, घरासाठी जे काही करते ते पुरुष बाहेरून कमवून आणतो यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली असती तर आज भारतात "महिला दिन" साजरे करण्याची वेळ आली नसती.

तुम्ही अविवाहित आहात, विवाहित आहात, घटस्फोटित आहात की विधवा आहात? तुम्ही गृहिणी आहात की कमावण्यासाठी बाहेर पडता? तुम्ही नोकरी सांभाळून घर सांभाळता की घर सांभाळून काही कमावण्यास हातभार लावता? तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम आहात की तुम्ही घराच्या बॉस आहात  या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही जे करता त्यात सुखी-समाधानी आहात का हे जास्त महत्त्वाचं आहे ना?

ज्या दिवशी महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या लागणार नाहीत त्या दिवशी महिला खरोखर सक्षम झाल्या आहेत असं म्हणता येईल. 

सोमवार, ५ मार्च, २०१८

बोली मराठी भाषा

"शास्त्री रस्त्याला लागल्यावर जो पहिला थांबा येतो ना तिथे उतरायचं आहे. " मी वाहकाला सांगितलं. 

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस होता. तसं मी नेहमी मराठीतच बोलते, मारवाडी दुकानदार आणि बिहारी भाजीवाल्यांशीसुद्धा! पण म्हटलं आज इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठी बोलून पहावं. 

तर पुमपमलि च्या बसने चालले होते. जिथे उतरायचं ते ठिकाण माहिती होतं पण थांब्याचं नाव माहिती नव्हतं. मी शास्त्री 'रोड' न म्हणता 'रस्ता' म्हणाल्याने आणि 'स्टॉप' न म्हणता 'थांबा' म्हणाल्याने फार फरक पडलाय असं मला आजिबात वाटलं नव्हतं. तरी त्याने दोन सेकंद थोडं स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहिलं. बसला गर्दी नसल्याने तो पण निवांत होता. त्याने मला विचारलं तुम्ही संस्कृत "टीचर" आहात का? 

म्हणजे आता शुद्ध मराठी बोललं तरी संस्कृत वाटायला लागलंय तर!

तळटीप: बस आणि तिकीट यासाठी मराठी शब्द मला माहिती नाहीत. शक्य तितकं मराठी बोललं तरी इंग्रजी शब्द अजिबातच नकोत हे होणं शक्य नाही. बोलणं सहज वाटण्यासाठी ते आवश्यक आहे, टेबलाला मेज म्हणणं वगैरे बोली भाषेत शक्य होईल असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? 

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

फुलं...

फुलं आणि आपण यांचं न सांगता येणारं काही नातं आहे. प्रत्येक भावना मग ते प्रेम असो, दुःख असो, शुभेच्छा वा भक्ती ते व्यक्त करण्याचं साधन आणि माध्यम ही फुलं असतात. फुलं कोणाला आवडत नाहीत? आनंदात असू तर तो ही फुलं द्विगुणित करतात आणि दुःखात असू तर मन प्रसन्न करायला हातभार लावतात. झाडावर डोलणारी, दवबिंदूत न्हाऊन निघालेली आणि फुलपाखरांना खुणावणारी फुलं सगळ्यांत सुंदर दिसतात ना? अशीच काही मन प्रसन्न करणारी फुलांची मला टिपता आलेली छायाचित्रं!

काही कळ्या आणि पाने 





घरचा मोगरा, माठात घालून याचं पाणी प्यायला मिळणं हे उन्हाळ्यातलं एक सुख आहे. 






चाफा नेहमीच आपल्याशी काहीतरी बोलणारा... 

चंदीगडची गुलाबबाग 










केरळातली काही फुलं 












दांडेली इथली काही फुलं. 














गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

चेहेरा आणि नेहेमी

तसंही मराठी शुद्धलेखनाला काही महत्त्व राहिलेलं नाहीये. आणि भाषा दर काही वर्षांनी बदलतच जाते. तरी पण मराठी मालिकांमध्ये "तू मला मदत करशील का?" च्या ऐवजी "तू माझी मदत करशील का?" हे कानांना खटकतंच! "प्रश्न" ला "प्रष्ण" म्हटलेलं ऐकलं की त्रास होतो. आपण ज्या भाषेसाठी व्यावसायिक लेखन करतो, ते बरोबर आहे की नाही याचा थोडासा अभ्यास करावा इतकी माफक अपेक्षा आहे.

जाहिरातींच्या अनुवादाबद्दल तर न बोललेलंच बरं! उदाहरणच द्यायचं झालं तर "आपण असं नको का करायला?" च्या ऐवजी "तर मग का नाही आपण असं करूयात?" वगैरे काहीही हिंदीतल्या शब्दांचं जसंच्या तसं भाषांतर केलेलं असतं, वाक्यरचना गेली खड्ड्यात!

जालीय लेखनात "मी आले, मी गेले" ला "मी आली, मी गेली" असं लिहिलेलं पण वाचलंय. अजून काही वाचताना खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे "चेहरा आणि नेहमी" ला हल्ली सगळे सर्रास "चेहेरा आणि नेहेमी" लिहितात. हे म्हणजे हिंदीतल्या "बहुत" ला "बहोत" लिहिण्यासारखं आहे. सारखं हे वाचून वाचून आताशा तर माझाच गोंधळ व्हायला लागलाय की चेहेरा आणि नेहेमीच बरोबर आहे की काय?

तूर्तास तरी इतकंच आठवतंय, असो तर माझ्याही लेखनात काही शुद्धलेखनाच्या चुका वाटल्या तर मला आवर्जून सांगा!


गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

बंदी आणि बहिष्कार...


कसं आहे ना, काही करायची वेळ आली की ते नेहमी दुसऱ्याने करायला पाहिजे.

एक भिकारडा सिनेमा बघायचा नाही म्हटलं तर आम्हाला जमत नाही.

सरकारने विसा नाकारायला पाहिजे, सरकारने पाक-चीन बरोबरचे सगळे उद्योग धंदे बंद करायला पाहिजेत, पण असहकार नावाची काही गोष्ट असते की नाही? सरकारला विविध करारांमध्ये गुंतल्याने ते शक्य होत नसेल पण तुम्हा-आम्हाला तर शक्य आहे ना! 

एक युक्तिवाद असा आहे की सिनेमा बनवून तयार आहे तर त्यात नुकसान भारतीय व्यक्तींचंच होणार. 
हेच जेव्हा सिनेमा तुम्हाला आवडत नाही म्हणून डब्यात जातो तेव्हा त्याच भारतीय व्यक्तींचं नुकसान होत नाही का? आणि होऊदेच नुकसान म्हणजे पुढच्या वेळी ताकही फुंकून पीतील.

सर्वप्रथम कला आणि क्रीडा क्षेत्राला टार्गेट केलं जातं असं म्हणता, कला म्हणजे बॉलीवूड आणि क्रीडा म्हणजे क्रिकेट. पण सगळ्यात जास्त ग्लॅमर पण यांनाच मिळतं ना? जेव्हा लोकांनी डोक्यावर घेतलेलं असतं तेव्हा बरे म्हणत नाहीत की या देशात सर्वात जास्त प्रेम लोक कलेवर करतात म्हणून? तेव्हा मग ते त्यांचं स्वकर्तृत्व असतं!

हेच बुद्धीजीवी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा असते तर म्हणाले असते सरकारनेच भारत देश सोडून जायला पाहिजे, आम्ही का स्वातंत्र्य लढा पुकारायचा?

एखाद्या गोष्टीला बंदी होऊ शकत नसेल पण आपण त्यावर बहिष्कार तर टाकू शकतो ना?

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

गणपती बाप्पा मोरया


पाच-सहा वर्षांपूर्वी सहज वाटलं की या वर्षी आपण घरी गणेश मूर्ती तयार करून बघू, आणि प्रयत्न केला. पहिल्या वर्षी बाप्पा करायला घेतला तेव्हा फार टेन्शन आलं होतं, म्हटलं करायला घेतला गणपती आणि झाला मारुती असं काही तर नाही होणार ना. पण मूर्ती खूप सुबक झाली नसली तरी तो गणपतीच वाटत होता :)

२०१० पासून आतापर्यंत घरीच मूर्ती करत आहे, अपवाद फक्त २०१५ साल. मागच्या वर्षी मूर्ती विकत घेतली तेव्हा आठ इंच गणपतीची मूर्ती ६०० रुपयांना होती. मूर्ती इतक्या महाग झाल्या आहेत हे पाहून फारच आश्चर्य वाटलं. असो पण स्वत: घरी मूर्ती तयार करून ती रंगवण्याचं समाधान काही औरच आहे.

२०१०

२०१०

२०११

२०१२

२०१३

२०१४

२०१६

२०१६

२०१८

२०१८

२०१८

२०१९

२०१९



२०२० 

२०२३