टाईमपास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
टाईमपास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ जुलै, २०२६

रुबाब

आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यातली काही अशी असतात की मी म्हणजे कोणीतरी आहे. माझे सर्वांनी लाड करा. मला सर्वांनी महत्त्व द्या. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काही जण प्रसिद्ध व्यक्ती वगैरे झाल्यावर असे होऊ शकतात, तर काहीजण काहीही कुवत नसतानाही असे असतात. ज्यांना असं घेणं माहिती असतं त्यांना अवतीभवती माणसेही अशीच भेटतात जी त्यांना देतच जातात. स्वतःचे लाड, हट्ट पुरवून घेणं छान जमतं त्यांना. शिवाय केलेल्या छोटाशा गोष्टीचे श्रेय घेणेही छान जमते त्यांना.

अशी व्यक्ती जर प्रसिद्धीच्या झोतात आली, तर ती स्वतःचा रुबाब अगदी छान मिरवू शकते. मिळणारा मानमरातब आपला हक्कच आहे अशीच धारणा तिथे दिसते. त्यांना नेम - फेम मिळालं की स्वतःचं महत्त्व अधिकच चांगल्या रीतीने अधोरेखित करता येतं. त्यांचा जन्मच राजा म्हणून जगण्यासाठी झालेला असतो. राजासारखेच कोणी मागितली तर मदतीलाही पुढे असतात पण त्यामध्ये मला मी केलेल्या मदतीचे पूर्ण श्रेय द्या ही भावना असते. आणि जरी ही व्यक्ती सामान्य माणूस म्हणूनच राहिली तरीदेखील ती राजा म्हणूनच जगते, स्वतःचं मन वगैरे मारून जगत नाही. रुबाब करण्यासाठी माणसाने श्रीमंत किंवा प्रसिद्धच असावं असं काही नाही, ते ज्यांना जमतं त्यांनाच जमतं.

याविरुद्ध असे काही असतात की यांच्यासाठी कोणी काही साधी गोष्ट जरी केली तरी त्यांना ती खूप मोठी वाटते, कोणी काही साधीशीच मदत केली असेल, तेही सहज शक्य होतं म्हणून तर त्याचे यांना फार मोठे उपकार वाटतात. स्वतःहून कोणाला काही काम सांगणं तर लांबच राहिलं, कोणी स्वतःहून यांचं काम करत असेल तरी त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. मी म्हणजे कोण यत्किंचित प्राणी, माझ्यासाठी कशाला कोणी काही करेल, आणि करत असेल तरी माझ्यासाठी कोणी काही करूच नये. हट्ट आणि लाड हे शब्दही त्यांच्या गावी नसतात.

आता अशी व्यक्ती जर प्रसिद्ध नामांकित कोणी झाली तर पहिल्यांदा त्यांना स्वतःलाच विश्वास नसतो की लोक आपल्याला इतकं ओळखतात आणि इतकं मानतात. कोणी केलेला आदरसत्कार घेणं देखील त्यांना अवघडलेपणाचंच वाटतं. का माझ्यासाठी इतकं करतात, मी कोणी नाही असे काहीसे भाव दिसतात. रुबाब आणि मिरवून घेणं असलं काही यांना जमत नसतं. नेम - फेम मिळूनही हे साधे ते साधेच राहतात. मग लोक त्यांना डाऊन-टू-अर्थ वगैरे म्हणतात. आणि काहीजण प्रसिद्ध नाही झाले तरी ते सर्वांसाठी करतच जातात, तेही कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता.

आपण मात्र  प्रसंगानुरूप या दोघांच्या मध्ये कुठेतरी असतो. कधीतरी सगळ्यांनी कौतुक केलेलं आपल्याला आवडतं, कधीतरी आपणही कोणाला न मागता काही मदत करतो. कधी कोणासमोर आपण रुबाबाने वागतो तर कधी एकदम साधे होऊन जातो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलीत का अशी दोन टोकाची माणसे? किंवा तुम्ही स्वतः आहात का यापैकी एक? पहिला झाला राजा प्रकारचा माणूस. राजाच्या विरुद्धार्थी नेहमी रंक असेल असं काही नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रकारच्या देतच जाणाऱ्या आणि तरीही राजा नसणाऱ्या माणसांना काय नाव द्यायचं? 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

सिनेमा-सिनेमा


"मुंबई-पुणे-मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही बघायचेच होते. तसा प्रेम-रतन…. देखील त्याच दिवशी झाला पण पहायच्या यादीत तो दूर-दूर पर्यंत नाही. अगदी television वर येईल तेव्हाही… 

आधी आवडलेल्या चित्रपटाबद्दल बोलूयात अर्थात कट्यार! चित्रपट त्यातल्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न या सगळ्यासाठीच चित्रपट आवडला. सुबोध भावेचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न असेल असं मुळीच वाटत नाही. तल्लीन होऊन चित्रपट पाहणे म्हणजे काय याचा अनुभव हा चित्रपट पाहताना घेतला. कोणीही प्रत्यक्ष समोर गात नसताना, कोणतंही live संगीत नसतानादेखील आपण नकळत तल्लीन होऊन जातो. असंच बालगंधर्वच्या वेळी देखील झालं होतं. 

सर्वच गाणी/पदे अप्रतिम! थोड्याफार उणीवा नक्कीच आहेत. जसं की सदाशिवचा सांगीतिक संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. घराण्याच्या अभिमानाचं महत्त्व लक्षात येत नाही पण चित्रपटगृह सोडताना आपली प्रतिक्रिया असते वाह, काय सुंदर कलाकृती होती. अर्थात ज्यांना या प्रकारच्या संगीतात अजिबातच रुची नाही त्यांना चित्रपट कंटाळवाणा होऊ शकतो. पण मी तर बुवा पुन्हा एकदा आणि चित्रपटगृहात जाऊनही पुन्हा एकदा पहायला नक्कीच तयार आहे. तुम्हीही नक्की पहा! आणि हो,  महागुरू सचिन यांचं खास अभिनंदन ;) . एकदम भारी चित्रपट… 

आता मुंबई-पुणे-मुंबई २. मनापासून पटण्यासारख्या फार थोड्या गोष्टी चित्रपटात होत्या. एकतर दुसराच सीन वोडकाचा पाहून तिथूनच चित्रपटाशी disconnect व्हायला सुरुवात झाली. हल्ली ही फार common गोष्ट असेलही, पण एखादी मुलगी आधुनिक आहे, तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि ती professionally यशस्वी आहे हे ठसवण्यासाठी तिने दारू कशाला प्यायली पाहिजे? तिचा smartness तिच्या विचारांमधून समजायला हवा जो  मुंबई-पुणे-१ मध्ये दिसला होता. चित्रपटात अशा गोष्टी दाखवून लोकांना प्रोत्साहन द्यावं का हा वादाचा मुद्दा आहे. चित्रपट मनोरंजन करण्यासाठी असतात आणि लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी नाही असाही मतप्रवाह आहे आणि चित्रपटांना सामाजिक भान असायला हवं असं मानणारा देखील एक वर्ग आहे, मी अर्थातच दुसऱ्या वर्गात (कुठल्या जमान्यात राहतेस तू असं म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा!). 

गौरी (मुक्ता बर्वे) उगीचच confused दाखवली आणि त्याचा अतिरेक केलाय. शेवटी शेवटी तर तिच्याशी सहमत होण्यापेक्षा तिच्यावर हसूच येतं. खऱ्या आयुष्यात कोणाच्या बाबतीत same situation आली तर कोणीही कदाचित अर्णवची निवड करेल. पण केवळ आपल्या चित्रपटाचा नायक गौतम असल्याने त्याची निवड तिने केली असं वाटलं. चित्रपटात जाहिराती घुसडण्यासाठी गौतमचं profession बेमालूमपणे बदललं. आणि पिक्चरच्या तिकिटात आम्हांला जाहिरातीही पहाव्या लागल्या. एकंदर एकाही पात्राशी स्वत:ला relate करता आलं नाही. फक्त प्रशांत दामलेंमुळे जरा काहीतरी जान आली.

तमाशा देखील बघायचाय. मला ज्या प्रकारचे सिनेमे आवडतात त्या प्रकारचे सिनेमे न आवडणाऱ्याना हा चित्रपट आवडला नाही म्हणजे मला नक्कीच आवडेल (हुश्श). आपल्या type चा वाटतोय तमाशा, बघू लवकरच!

छायाचित्र आंतरजालावरून


सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

पाकीट...



गिफ्ट म्हणून 'वस्तू द्यायची' की 'पैसेच द्यावेत' हा तसा नेहमीच सतावणारा प्रश्न. समोरच्याची आवड-निवड ठाऊक असेल आणि आपला choice त्याला आवडत असेल तर वस्तू घ्यायला छान वाटतं. खरं तर दर वेळेस वेगळं आणि उपयुक्त असं काय घ्यावं हाही प्रश्न असतोच, पण काही लोकांना दुसऱ्याचा choice आजिबात म्हणजे आजिबातच आवडत नाही.  त्यांना स्यमंतक जरी आणून दिला तरी म्हणतील निळा का आणला? डाळींबी कित्ती छान दिसला असता. असो!

माझे भाऊ मला कधी वस्तू देतात तर कधी पाकीट. आपल्याला तर बाबा काहीही दिलेलं आवडतं.
choice वगैरे पण फार भानगड नाही म्हणून त्यांनाही कधी टेन्शन येत नाही. 
तर 'तो' सुद्धा दर राखी पौर्णिमेला त्याच्या बहिणींना पाकीटात पैसे घालूनच देतो. तसेच या वेळीही देणार होता. नेहमीप्रमाणेच ती आधीच तयार न ठेवता अगदी ऐन वेळी भरणार होता. 
पाकिटांचा विषय निघाला म्हणून मी त्याला म्हटलं, या वेळी मलाही हवंय पाकीट.
तर तो म्हणे, अगं काही नाही अगदी साधंच आहे पाकीट, एकदम पांढरं, आपली बँकेची वगैरे कागदपत्रं ज्यात येतात ना तसं.  
असे कसे असतात हे नवरे लोक? त्याला खरंच समजलं नाही का, की म्हणजे मलाही पैसे हवेत असं म्हणायचंय? आता इतकं सरळ बोलायला कसं शिकायचं?  



बुधवार, १८ मार्च, २०१५

लघुकोन

ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा निरोगी व्यक्तीला अंथरुणावर पडल्यानंतर दहा मिनिटात झोप यायला पाहीजे असं म्हणतात. मला मात्र अंथरुणावर पडलं की स्वत:शी किती बोलू अन किती नको असं होऊन जातं. दिवसभर तर अनेक कामांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही, मग स्वत:शी बोलायचं तरी कधी? फार ठरवून किंवा गहन असं काही बोललं जात नाही पण खूप जास्त विचार करून झाल्याशिवाय अंतर्मनातून झोपण्याची परवानगीच मिळत नाही. 

उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कामांची priority काय असावी, अमूक एक task वेळेत पूर्ण होईल ना, बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही पोस्ट नाही केलं पण लिहू तरी काय. हल्ली तर काही विषयही सुचत नाही. "बेला के फूल" ऐकावं का थोडा वेळ? नको परत छान झोप यायला लागली तर रेडीओ बंद करण्यासाठी जागं राहायचं टेन्शन! उद्या काहीही करून व्यायाम करायचाच आहे. फार दुर्लक्ष होतंय तब्येतीकडे. अंक मोजायला सुरु करावेत म्हणजे पटकन झोप येईल. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस

फोर-व्हीलरचा क्लास लावायला एक महिन्यानंतरची appointment मिळालीये learning licence साठी. जमेल का मला चालवायला? चालवलीच तर महिन्याचा पेट्रोलचा खर्च साधारण किती येईल? औरंगजेब वाचून पूर्ण करायचंय पण आज डोळे फारच दुखत होते. इतिहासाला खरंच काही अर्थ असतो का? इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो म्हणतात. आज माझ्यासमोर ज्या राजकीय, सामाजिक घटना घडतात त्यादेखील इतक्या बदलून माझ्यापर्यंत पोहोचतात मग इतिहासातलं कोण बघायला गेलंय? असो जास्त विचार नाही करायचा. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस-बत्तीस-------त्र्याहत्तर-चौऱ्याहत्तर-पंच्याहत्तर

गुरुवारी दादा-पोता match आहे अशा प्रकारचा मेसेज आलाय एक. पण बांग्लादेश सुद्धा काही कमी नाही. ही match जिंकून नंतर पाकिस्तानशी match झाली आणि ती हरलो तर??? नको नको एकतर दोन्ही matches जिंका किंवा बांग्लादेश बरोबरच हरा. काय होईल काय माहीती पण कळेलच की येत्या आठवड्यात! एक-दोन-तीन-चार--------चव्वेचाळीस-पंचेचाळीस-सेहेचाळीस-------एकसष्ठ-बासष्ठ 

मनाच्या केंद्रबिंदूपासून एक एक कोन तयार होत जातो विचारांचा, वीस बावीस अंशापासून सुरुवात होऊन ३६० अंशांकडे हळू हळू सरकत विचारांचे असंख्य कोन तयार होतात. आणि शेवटी मग एक दोन अंशांचा लघुकोन तयार होतो तुझ्या विचारांचा. आणि मग वर्तुळ पूर्ण होतं. एक-दोन-तीन-चार--------वीस-बावीस-----एक्क्यावन्न -बारवन्न-त्रेसष्ठपन्न-चोमपन्न-पंचरपन्न-छत्तरपन्न ---------------------------------------------------------

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

विस्कळीत...

             खूप दिवसांनी लिहिल्यावर तसंही ते विस्कळीतच असणार आहे. त्यापेक्षा म्हटलं विस्कळीतच काहीतरी लिहावं. सकाळी उठायचं, थोडंफार काम करायचं, ऑफिसला जायचं, तिथंही थोडंफार काम करायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. हिवाळा सुरु झाल्यापासून रोज ठरवायचं उद्यापासून व्यायाम करू पण एक दिवसही लवकर उठायचं नाही. या वीकेंडला करू पुढच्या वीकेंडला करू म्हणून पडून राहिलेल्या कामांची यादी वाढतच चाललेली. 

                  आतापर्यंत काही मिळवलं नाही, इथून पुढे आयुष्यात काय करायचंय माहिती नाही. काही ठरवलंच तर कष्ट करायची तयारी नाही. मी एक आळशी गोळा किंवा दगड म्हणू फारतर. दगडाला कुठे माहिती असतं त्याला कुठे जायचंय. कोणी शेंदूर फासला तर देवळात जाउन बसतो कोणी लाथाडला तर तिकडे जाउन पडतो. माझं ध्येय काय मला माहिती नाही. माझ्या धर्मातील समजुतीप्रमाणे देवाने कोणालाच पृथ्वीवर उगीचच पाठवलेलं नाही, प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. मग त्याने मला कशाला पाठवलंय तेच मला सापडत नाही.
                  
                मानवच म्हणायचं झालं तर मी एक यंत्रमानव, मन नावाचं रसायन उगीचच त्यात ओतलेला. नको असलेल्या संगतीमध्ये तोंडदेखलं हसायचं, formality म्हणून विचारपूस करायची आणि हव्या असलेल्या जिवलगांना वेळ देता येत नाही, भेटता येत नाही. नको असलेली ओझी फेकून देता येत नाहीत या मनामुळे. आमचा समाज काय म्हणेल हेच का आमचे संस्कार, लाख लफडी या मनामुळे. काय होतं थोडं बेफिकीर व्हायला या मनाला, आयुष्य म्हणजेच एक ओझं बनवून टाकलंय पठ्ठ्याने, झेपेल की नाही याचा जराही विचार न करता. चक्रव्यूह भेदता येतील की नाही याचा विचार न करता त्यामध्ये उतरणारं आणि मग बाहेर येण्यासाठी केविलवाणी धडपड करणारं मन.

                 खूप वाटतं करण्यासारखं बरंच काही आहे. छान वाटतं, एखादं पुस्तक वाचून संपवलं की, टेकडीवरून फेरफटका मारून आलं की, एखादी छोटीशी पिकनिक करून आलं की, सुंदरसा सिनेमा पाहीला की. म्हटलं तर तसं सुरक्षित आयुष्य. पण त्यानंतर पुन्हा मनात एक न भरून येणारी पोकळी, एक रिकामी जागा, माहिती नाही कशासाठी, कोणासाठी…



सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

दृष्टीकोन



तुझे आणि माझे अनेकदा वाद व्हायचे.
विषयांची काही कमी नसायची. विषय काहीही पुरायचा आपल्याला.

कधी राजकारण, कधी पैसा, कधी देश, कधी धर्म, कधी कोणती पुस्तकं, कधी चित्रपट तर कधी काही गाणीसुद्धा.... हे तर फारच 'कारणपुरवू' विषय झाले वादांसाठी, पण कधी एखादी व्यक्ती किंवा फेसबुक पोस्ट यांसारख्या साध्या साध्या गोष्टीतही वाद घालायचो आपण...

मला कधीच माझा मुद्दा धडपणे पटवून देता यायचा नाही. आणि तुला कधीच तुझी बाजू खाली पाडता आली नाही.
पण तुला माझा मुद्दा नाही समजला तरी मला तो व्यवस्थित माहित असायचा...
पण तू कधीच "हा विषय वादाचा आहे आणि आपण यावर बोलुयाच नको" असं म्हटल्याचं मला आठवत नाही...
कधी मी तुझं म्हणणं ऐकलं नाही किंवा मला पटलं नाही म्हणून चिडचिड सुद्धा केली नाहीस....

सुरुवात तर माझ्याकडूनच व्हायची नेहमी, तू तुझं साधं मत व्यक्त केलंस तरी मला वाटायचं तू त्याकडे "broader way" ने पाहूच शकत नाहीस म्हणूनच तू असा विचार केलास...
आणि मग त्याच गोष्टीवर माझं आधी काहीच मत नसलं तरी तुझ्या विरोधात एखादं बनवून ते मांडायला आवडायचं मला....

माझं म्हणणं तुला पटलं नाही की माझ्या मनात विचार यायचा, तू माझ्यासारखा विचार का करू शकत नाहीस? कधीच तुला का समजत नाही की मला नक्की काय म्हणायचंय ते?  किती संकुचित दृष्टीकोन आहे तुझा सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा....

आणि असंच वाद घालता घालता, भांडता भांडता नंतर विचार केल्यावर अचानक एक दिवस समजलं की, "संकुचित" तर माझाच तुझ्या विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता...
आणि आता तुझी तक्रार आहे की, मी आता कोणतीही गोष्ट तुला माझ्या दृष्टीकोनातून सांगायला जात नाही....

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

उपजत...

          रविवारी सुटीचा दिवस म्हणून माझे दोन छोटे दोस्त साक्षी आणि साई माझ्याबरोबर खेळायला घरी आलेले. ही दोघे चुलत भावंडं. वय साधारण साडेतीन चार वर्षांच्या आसपास असेल दोघांचंही. त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळत नाही. साक्षीकडे गोष्टींचं पुस्तक होतं, त्यात बऱ्याच प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे होती. त्यांच्याशी त्यातल्या गोष्टींबद्दल बोलताना साई म्हणाला,

"आम्ही हे प्राणी पाहायला बागेत जाणारे".

मीही त्याला सहज म्हणाले,
"तुम्ही बागेत जाणार तर मला पण न्या ना..."

साई थोडा विचार करून... 
"अगं पण आमच्याकडे तर दोनच गाड्या आहेत. एका गाडीवर मी, आई आणि बाबा आणि दुसऱ्या गाडीवर साक्षी, काका आणि काकू. मग तू कुठे बसणार? आम्ही नाही नेणार तुला...."

मग मी हाताच्या मुठी वळवून त्या डोळ्यांसमोर फिरवत म्हणाले,
"उं उं उं मला नेणार नाही तुम्ही? मग मी रडणार..."

साईचा इवलासा चेहरा अजूनही विचारातच दिसत होता...

तेवढ्यात साक्षी माझा हात बाजूला करत म्हणाली,
"ताई तू रडू नकोस, मी थोड्याच जागेवर बसेन, मम्माला पण थोड्याच जागेवर बसायला सांगू...  मग तुला बसायला जागा होईल आणि तुला पण नेऊ,  पण तू रडू नकोस...."

तेव्हा वाटलं... उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional  असतात का? 

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

Sketches tried so far.....