शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

नातं

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..

आपण जन्माला येतो तेव्हा आपल्यापाशी अगदी मर्यादीत नाती असतात. आई-बाबा, आजी-आजोबा, भावंडं, काका, मामा, आत्या, मावशी इतकंच आपलं जग असतं. मग जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी या नात्यांमध्ये भर पडत जाते. मैत्रीची, प्रेमाची आणि आपुलकीची नाती जोडली जाऊ लागतात. लग्नानंतर तर बऱ्याच नात्यांची अचानक भर पडते. आणि कुटुंबात नव-नवीन सदस्यांच्या आगमनाने अनेक नाती निर्माण होतात. एखाद्याला आपण तो किंवा ती माझी अमुक अमुक आहे म्हणतो, हे 'अमुक अमुक' म्हणजे त्या नात्याचं सर्वमान्य असं नाव! 

प्रत्येकाने एकमेकांशी नात्याच्या नावाला शोभेल असं वागणं अपेक्षित असतं, पण तसं प्रत्येक वेळी जमेलच असं सांगता येत नाही. शिवाय नात्याचं नाव आणि प्रत्यक्ष ते नातं हे नेहमी एकच असेल असंही नाही. कधी आपली बहीणच आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते तर कधी एखादी जवळची मैत्रीण आपली बहीण होऊन गेलेली असते. कधी नातं नावापुरतंच असतं आणि बंध जुळलेलेच नसतात, तर कधी एकाच व्यक्तीशी आपण अनेक नात्यांनी गुंफलेले असतो. हा नात्यांचा रुमाल बनवून पाहिला तर कोणाचाच परिपूर्ण नसतो, काही ठिकाणी असतात घट्ट बंध तर काही ठिकाणी असतात विस्कळलेले टाके. 

काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. हे काही मुद्दाम ठरवून होत नसतं. ज्या नात्याशी जसा ऋणानुबंध जुळला असेल तसं आपल्याकडून वागलं जातं. काही नात्यांमध्ये सहजपणा असतो तर काहींमध्ये अवघडलेपण असतं. या अवघडलेल्या नात्यांमध्येही आपण केवळ बांधले गेलोय म्हणून, अगदी वरवर, उगीच असायचं म्हणून असतो आणि हसायचं म्हणून हसतो एकमेकांकडे बघून, एकमेकांमध्ये एक न दिसणारा पडदा ठेवून, औपचारिकता म्हणून.

आपण जुळलेले ऋणानुबंध जपण्याचा मनापासून  प्रयत्न  करायचा. पण मुद्दाम प्रयत्न करून टिकवून ठेवावं लागत असेल तर ते नातं नसतंच, असतं ते फक्त एक दडपण. या दडपणाखाली किती काळ घालवायचा, कायमच राहायचं की ते झुगारून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि इतकं सगळं नियमांच्या चौकटीत बसवूनही काही नाती अशी उरतातच ना की काय नाव द्यावं हेच समजत नाही?  मनाला सुखावणारी, आयुष्यातल्या सगळ्या चिंता, काळज्या विसरायला लावणारी, आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी, आणि जगण्याचं बळ देणारी असतात तीच खरी नाती,आणि सगळ्यांनाच हवे असतात हे बंध रेशमाचे!



सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

कोपरा

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..

पूर्वी घराच्या भिंतींमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कप्प्या-कोपऱ्यांना आता फार महत्त्व राहिलं नाहीये. कोपरा म्हटलं डोळ्यांपुढे येते एखादी आजिबात सहज लक्ष न जाणारी किंवा अतिशय कमी महत्त्वाची जागा. आपल्याला न लागणारी एखादी गोष्ट कोपऱ्यात पडून असते तसंच घरातली एखादी व्यक्ती रुसलेली असली की आपोआपच ती कोपऱ्यात असल्यासारखा भास होतो. काही लहानशी वस्तू सापडत नसेल तर उगीच वाटतं कोपऱ्यात पडली असेल कुठेतरी. 

घरी कोणी येणारं कोणी ठरलेली वेळ होऊन गेल्यावरही आलं नसेल तर आई म्हणायची, जा जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून ये. गुंड लोक एखाद्याला धडा शिकवायला त्याला 'कोपऱ्यात' घेतात, वृत्तपत्रातही एखादी कमी महत्त्वाची बातमी किंवा निवेदनं कुठेतरी कोपऱ्यात असतात, तर एखाद्या वेबसाईटवर पण लॉगआऊट वगैरे कुठेतरी कोपऱ्यात असतं. थोडक्यात काय जिथे तुम्ही फार वेळ घालवू  नयेत अशा गोष्टी नेहमी कोपऱ्यात असतात. तर असा हा घरात बाहेर कुठेही सामावून जाणारा कोपरा. 

पण सगळेच कोपरे असे दुर्लक्षित आणि सोडून देण्यासारखे नसतात ना? तसे असते तर मनाच्या कोपऱ्यात काही खास बाबींना स्थान मिळालं नसतं. रोजची धावपळ, कर्तव्यं आणि वेळापत्रकं सोडून कधीतरीच निवांत क्षणी वर येणारे असतात ते असतात मनाचे कोपरे. प्रत्येक जणच आपल्या मनात असे हळवे कोपरे जपून असतो, ज्यांना धक्का लावण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचा स्वतःचाच असतो. इतरांना आपल्या या कोपऱ्यांबद्दल कोणीच कधीच सहज कळू देत नाही! म्हणायला तो मनाचा कोपरा असतो एवढासा, पण काय नाही सामावू शकत त्यात? कधी ते एखादं सुंदर संगीत असेल, कधी असेल एखादं सुबक चित्र, कधी असेल कोणती कलाकृती, कधी असेल एखादा प्रसंग, तर कधी असते एखादी व्यक्ती.

आपण फक्त या कोपऱ्यात डोकावायचा अवकाश, की हळूच उघडतो तो मनाचा कोपरा आणि त्यातून पटापट बाहेर येत जातात सगळ्या आठवणी, अत्तराचं झाकण उघडल्यावर हळुवार सुगंध पसरावा तशा! खरंच इतकं काय काय मावतं त्या एवढ्याशा जागेत? काळ, वेळ, मिती, वेग सगळ्यांची आकडेमोड चुकवणारा असा असतो हा मनाचा कोपरा. अगदी दोन सेकंदांसाठी का होईना हरवून जातो आपण या कोपऱ्यात आणि मग कोणीतरी भानावर आणून आपल्याला विचारतं, आपण कुठे हरवलो ते. आणि आपण काही नाही म्हणून तंद्रीतून बाहेर येऊन, कोपऱ्याला कोपऱ्यातच ठेवून परत येतो नेहमीच्या विस्तीर्ण अवकाशात!



सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

चर्चा

चर्चा म्हटलं की त्यापुढे आपोआपच 'निरर्थक' हा शब्द मनात येतो. माझ्यासारख्या फार बोलक्या नसणाऱ्या व्यक्तींना तर कोणत्याही चर्चेचा मनस्वी कंटाळा येतो. सहभागी होणारी सगळीच माणसे जर समजूतदार असतील आणि तर्काला धरून विचार करणारी असतील तर चर्चा करण्यात काहीतरी अर्थ तरी आहे. पण दुसरा कितीही तर्कशुद्ध बोलत असेल तरी माझंच खरं म्हणणाऱ्यांशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे? 

चर्चेचे pros आणि cons काय असावेत? जर काही ज्ञानी लोकांमध्ये एखादा अज्ञानी मनुष्य बसला असेल तर त्यांची चर्चा ऐकून एखाद्याच्या ज्ञानात भर पडू शकते. पण सगळेच ज्ञानी किंवा सगळेच अज्ञानी असतील तर नुसतेच वादविवाद होतात. घरातील मोठ्यांच्या चर्चा लहानांनी ऐकल्या तर काहीतरी विचारधारा तयार व्हायला मदत होते. भले ती घरच्यांच्या बाजूने असेल किंवा विरुद्ध असेल! आपण खरंच निर्णय घेण्यामध्ये कुठे अडकलो असू तर चर्चेने प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. पण येणारी परिस्थिती कशी असेल याचा काहीच अंदाज नसेल तर मात्र त्याबद्दल चर्चा करणं व्यर्थ आहे. हापिसात वगैरे चर्चांचा उपयोग होतो कारण तिथे प्रत्येक विषयात वेगळे तज्ञ असतात, एकाला दुसऱ्याच्या तांत्रिक विषयांमध्ये तितकं ज्ञान असेलंच असं नसतं पण तिथेही कितीतरी वेळा चर्चा भरकटतातच!

आज वेगवेगळ्या बातम्यांच्या वाहिन्यांवर रोज कसल्या ना कसल्या चर्चा चालू असतात. पण त्यातून कोणाला काही ज्ञान मिळण्याऐवजी, कोण आपलीच भूमिका कशा पद्धतीने पुढे रेटतोय हेच पाहायला मिळतं. त्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही पण प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे आणायला सरसावलेला असतो. पटत तर कोणालाच कोणाचंच नाही, दुसऱ्याचं म्हणणं बरोबर असलं तरी खोडून काढणं, इतका एकच या चर्चांचा उद्देश असतो. असल्या चर्चांचा 'वेळ फुकट जाणे' याशिवाय काय उपयोग? सोशल मीडियावरही राजकारण इत्यादी  विषयांवर चर्चा चालू असतात आणि त्या चर्चेचं भांडणात कधी रूपांतर होतं हे कळतही नाही. एका ठराविक वय आणि अनुभवानंतर प्रत्येक जण आपापल्या मतांशी बऱ्यापैकी ठाम झालेला असतो. विरुद्ध विचारधारेतही काही तथ्य असू शकतं हे मान्य करण्याइतकी लवचिकता राहिलेली नसते. 

थोडक्यात काय तर एखाद्याला खरंच एखाद्या बाबतीत दुसऱ्याचं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त माहिती असलेल्या व्यक्तीचं ऐकून काही निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा उपयोगी ठरते, पण आधीच मनात एखादा निर्णय झालेला आहे आणि तोच दुसऱ्यांवर लादायचा आहे असं असेल तर चर्चा निरर्थक ठरते. चर्चेच्या शेवटी काही निर्णय झाला आणि त्यात सगळे खुश असतील असं होण्याची शक्यता फारच कमी असते. राजकारण, बॉलिवूड आणि क्रिकेट इत्यादी मला हमखास "निरर्थक" चर्चेचे विषय वाटतात. या प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी मुरब्बी माणूस सगळे निर्णय घ्यायला बसलेला असतो आणि आम्ही मात्र उगीच आमच्या तोंडाची वाफ दवडतो. तुम्ही चर्चा केलीत म्हणून विराटच्या ऐवजी रोहितला कप्तान करणार आहेत का? किंवा तुम्ही चर्चा केलीत म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का?

तर अशा या चर्चा, चर्वितचर्वणं आणि चऱ्हाटांवर कोणी किती अवलंबून राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण प्रत्येकाला शेवटी स्वत:ची लढाई स्वत:च लढायची असल्याने चर्चांवर विसंबून राहणारा माणूस आयुष्यात फार पुढे जात नसावा, हे माझं वैयक्तिक मत!

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिला दिन

महिला दिनाच्या शुभेच्छा येतात त्यातून अजून जाणवतं की आपण कोणीतरी दुय्यम आहोत म्हणून या शुभेच्छा आपल्याला दिल्या जात आहेत. समाजातला जो घटक स्वत:ला दुय्यम मानतो त्याच्यासाठी असे दिवस बनवायची वेळ येते. निदान भारतीय महिलांवर तरी ती यायला नको होती. "प्राणी दिवस" , "पर्यावरण दिवस" असेल तर आपण समजू शकतो, कारण मानव स्वत:ला श्रेष्ठ प्राणी मानतो.

जोपर्यंत तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज असेल, जोपर्यंत तुम्ही शोषित असाल तोपर्यंत सक्षम होण्यासाठी तुम्हाला तुमचं महत्त्व इतरांनी पटवून देणं ठीक आहे. आजही काही महिलांना त्याची गरज आहे, पण माझ्यासारख्या काहींना नक्कीच नाही. तुम्ही सक्षम आहात की नाही हा प्रश्न नसतो, तुम्ही स्वत:ला सक्षम मानता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.

महिला म्हटलं की ती "working lady" असते किंवा "housewife" तरी असते. गृहिणी असणं ही खरं तर फार मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत स्त्रिया गृहिणी होत्या तोपर्यंत समाजस्वास्थ्य इतकं बिघडलेलं नव्हतं. या "गृहिणी"पणाला योग्य ते "ग्लॅमर" मिळालं असतं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्त्रीने पुरुषांप्रमाणे वागण्याचा हव्यास धरला नसता. स्त्री घरात लक्ष देते, घरासाठी जे काही करते ते पुरुष बाहेरून कमवून आणतो यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली असती तर आज भारतात "महिला दिन" साजरे करण्याची वेळ आली नसती.

तुम्ही अविवाहित आहात, विवाहित आहात, घटस्फोटित आहात की विधवा आहात? तुम्ही गृहिणी आहात की कमावण्यासाठी बाहेर पडता? तुम्ही नोकरी सांभाळून घर सांभाळता की घर सांभाळून काही कमावण्यास हातभार लावता? तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम आहात की तुम्ही घराच्या बॉस आहात  या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही जे करता त्यात सुखी-समाधानी आहात का हे जास्त महत्त्वाचं आहे ना?

ज्या दिवशी महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या लागणार नाहीत त्या दिवशी महिला खरोखर सक्षम झाल्या आहेत असं म्हणता येईल. 

सोमवार, ५ मार्च, २०१८

बोली मराठी भाषा

"शास्त्री रस्त्याला लागल्यावर जो पहिला थांबा येतो ना तिथे उतरायचं आहे. " मी वाहकाला सांगितलं. 

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस होता. तसं मी नेहमी मराठीतच बोलते, मारवाडी दुकानदार आणि बिहारी भाजीवाल्यांशीसुद्धा! पण म्हटलं आज इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठी बोलून पहावं. 

तर पुमपमलि च्या बसने चालले होते. जिथे उतरायचं ते ठिकाण माहिती होतं पण थांब्याचं नाव माहिती नव्हतं. मी शास्त्री 'रोड' न म्हणता 'रस्ता' म्हणाल्याने आणि 'स्टॉप' न म्हणता 'थांबा' म्हणाल्याने फार फरक पडलाय असं मला आजिबात वाटलं नव्हतं. तरी त्याने दोन सेकंद थोडं स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहिलं. बसला गर्दी नसल्याने तो पण निवांत होता. त्याने मला विचारलं तुम्ही संस्कृत "टीचर" आहात का? 

म्हणजे आता शुद्ध मराठी बोललं तरी संस्कृत वाटायला लागलंय तर!

तळटीप: बस आणि तिकीट यासाठी मराठी शब्द मला माहिती नाहीत. शक्य तितकं मराठी बोललं तरी इंग्रजी शब्द अजिबातच नकोत हे होणं शक्य नाही. बोलणं सहज वाटण्यासाठी ते आवश्यक आहे, टेबलाला मेज म्हणणं वगैरे बोली भाषेत शक्य होईल असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? 

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

फुलं...

फुलं आणि आपण यांचं न सांगता येणारं काही नातं आहे. प्रत्येक भावना मग ते प्रेम असो, दुःख असो, शुभेच्छा वा भक्ती ते व्यक्त करण्याचं साधन आणि माध्यम ही फुलं असतात. फुलं कोणाला आवडत नाहीत? आनंदात असू तर तो ही फुलं द्विगुणित करतात आणि दुःखात असू तर मन प्रसन्न करायला हातभार लावतात. झाडावर डोलणारी, दवबिंदूत न्हाऊन निघालेली आणि फुलपाखरांना खुणावणारी फुलं सगळ्यांत सुंदर दिसतात ना? अशीच काही मन प्रसन्न करणारी फुलांची मला टिपता आलेली छायाचित्रं!

काही कळ्या आणि पाने 





घरचा मोगरा, माठात घालून याचं पाणी प्यायला मिळणं हे उन्हाळ्यातलं एक सुख आहे. 






चाफा नेहमीच आपल्याशी काहीतरी बोलणारा... 

चंदीगडची गुलाबबाग 










केरळातली काही फुलं 












दांडेली इथली काही फुलं. 














गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

चव्हाण सर

मी शाळेत असताना आमचे आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक "श्री एकनाथ चव्हाण" सर होते. तीस जानेवारीला त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी जाग्या झाल्या त्यातलीच पुढील एक.

आम्ही तेव्हा दहावीला होतो. शाळेतलं शेवटचं वर्ष म्हणून आम्हाला शिंगं फुटली होती. गॅदरिंग आणि गेम्सचे दिवस चालू होते, त्यामुळे वर्गात विशेष शिकवणं चालू नव्हतं. एके दिवशी समजलं की बरेच शिक्षक त्या दिवशी रजेवर आहेत, आणि मधल्या सुटीनंतर फक्त एकच तास होणार आहे तेव्हा वर्गातल्या आम्ही काही जणांनी सुटीमध्ये घरी पळून जायचा प्लॅन केला. सुटी सुरु झाली आणि आम्ही डबे खाण्याऐवजी आपापल्या घोळक्याने गेटबाहेर जाऊ लागलो. दप्तर घेऊन सुखरूप शाळेबाहेर आल्याने आम्हाला अगदी हिमालय सर केल्याचा अभिमान वाटत होता. बाहेर तास-दीड तास वेळ घालवून सगळे मजेत घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी शाळेत पहिल्या तासाला आमचं स्वागत दामले काकांनी केलं. सर्वांना वर्गात बसवून ते खूप ओरडले,  तुम्हाला सर्वांना भारतरत्न द्यायचं का आता वगैरे बरीच बडबड केली. तेव्हाही आम्हाला त्याचं गांभीर्य नव्हतं. पण नंतर वर्गात नोटीस आली की चव्हाण सरांनी उद्या आमच्या पालकांना शाळेत भेटायला बोलावलंय तेव्हा मात्र धाबे दणाणले.

घरी बाबांना सगळा झालेला प्रकार सांगितला, आईला सांगू नका प्लिज म्हटलं. मला बाबांची भीती नव्हती म्हणून काही वाटलं नाही, ज्यांना असेल त्यांचं काय झालं असेल याची कल्पना करवत नाही. दुसऱ्या दिवशी सरांच्या ऑफिसमध्ये आमचे पालक गेले. बाहेर भीतीने सगळ्यांची गाळण उडाली होती. बऱ्याच जणांनी घरी; सरांनी बोलावलंय यापेक्षा जास्त काहीच सांगितलं नव्हतं. आता प्रत्येकजण बाहेर आल्यावर आपला पालक आपली सगळ्यांसमोर बिनपाण्याने कशी करेल या धास्तीमध्ये होता. 

बराच वेळ गेला आणि पालक बाहेर येत असल्याची चाहूल लागली आणि आम्ही सगळे जण सावरून उभे राहिलो. आणि बघतो तर काय सगळ्यांचे पालक हास्यविनोद करत छान रमतगमत बाहेर येत होते. आम्हाला काहीच समजेना. मग बाबा दिसले त्यांना विचारलं काय झालं आतमध्ये, सर काय म्हणाले? तर ते म्हणाले काही नाही आम्हाला सगळ्यांना चहा-बिस्किटं दिली आणि मुलं दहावीला आहेत तर आता त्यांचा कसा अभ्यास घ्या वगैरे असं मार्गदर्शन केलं. मी म्हटलं आणि काल झालेल्या प्रकारचं काय? तर ते म्हणाले त्यांनी तो विषयदेखील काढला नाही.

सरांबद्दल फारच आदर वाटला तेव्हा, किती कौशल्याने त्यांनी आम्हाला धडा शिकवला शिवाय आमच्या पालकांची भेटही घेतली. असे आमचे चव्हाण सर, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!


गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

चेहेरा आणि नेहेमी

तसंही मराठी शुद्धलेखनाला काही महत्त्व राहिलेलं नाहीये. आणि भाषा दर काही वर्षांनी बदलतच जाते. तरी पण मराठी मालिकांमध्ये "तू मला मदत करशील का?" च्या ऐवजी "तू माझी मदत करशील का?" हे कानांना खटकतंच! "प्रश्न" ला "प्रष्ण" म्हटलेलं ऐकलं की त्रास होतो. आपण ज्या भाषेसाठी व्यावसायिक लेखन करतो, ते बरोबर आहे की नाही याचा थोडासा अभ्यास करावा इतकी माफक अपेक्षा आहे.

जाहिरातींच्या अनुवादाबद्दल तर न बोललेलंच बरं! उदाहरणच द्यायचं झालं तर "आपण असं नको का करायला?" च्या ऐवजी "तर मग का नाही आपण असं करूयात?" वगैरे काहीही हिंदीतल्या शब्दांचं जसंच्या तसं भाषांतर केलेलं असतं, वाक्यरचना गेली खड्ड्यात!

जालीय लेखनात "मी आले, मी गेले" ला "मी आली, मी गेली" असं लिहिलेलं पण वाचलंय. अजून काही वाचताना खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे "चेहरा आणि नेहमी" ला हल्ली सगळे सर्रास "चेहेरा आणि नेहेमी" लिहितात. हे म्हणजे हिंदीतल्या "बहुत" ला "बहोत" लिहिण्यासारखं आहे. सारखं हे वाचून वाचून आताशा तर माझाच गोंधळ व्हायला लागलाय की चेहेरा आणि नेहेमीच बरोबर आहे की काय?

तूर्तास तरी इतकंच आठवतंय, असो तर माझ्याही लेखनात काही शुद्धलेखनाच्या चुका वाटल्या तर मला आवर्जून सांगा!