गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

विस्मरण...

         काका, माझे पणजोबा माझी सर्वात आवडती अन लाडकी व्यक्ती. ते माझे आदर्श, मार्गदर्शक, मित्र सर्वच काही होते. त्यांचं वय बरंच होतं तरीही त्यांनी तब्येत चांगली ठेवली होती. पण पिकलं पान कधीतरी गळणारच! मी दहावीत असताना ते गेले. तेव्हा वाटलं मी आता कोणाशी इतकं बोलणार. माझे लाड कोण करणार, मला समजावून कोण सांगणार? खूप खूप रडू आलं. काकांची आठवण आली की रडू यायचं. पण हळूहळू ते कमी होत गेलं. अजूनही आठवण येते पण आता परिस्थिती स्वीकारली गेली आहे.

        मानवी मनाला विस्मरण हे मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. एखाद्या दु:खद घटनेची तीव्रता, त्यामुळे होणारा मानसिक त्रास हा कालौघात आपोआप कमी होत जातो, अगदी कितीही मोठा आघात असला तरीही. 
"काळ" हे सर्वात मोठं औषध आहे म्हणतात ते खरंच. हे विस्मरणाचं  वरदान माणसाला मिळालं नसतं तर जगातली किती दु:ख घेऊन त्याला गोंजारत बसावं लागलं असतं. खरं तर जे शरीराचं तेच मनाचं! नंतरही कधीतरी झालेल्या घटना आठवतात पण जखमा जुन्या झाल्याने त्यांची खूण फक्त उरते क्वचित कधी एखादी कोच पडते वा टाक्यांचे व्रण राहतात, पण वेदना कधीच नाहीशा झालेल्या असतात. जे लोक आत्महत्या वगैरे करतात ते तर मला अगदीच आततायी वाटतात. स्वत:ला थोडा वेळ दिला की अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी विसरली जाणार नाही, किंवा जिच्यावर इलाज मिळणार नाही.

         आपल्यापासून दूर जाणाऱ्या माणसांना आपण म्हणतो तू मला विसरशील. किती खरं असतं ते! शाळेमध्ये, होस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कायम बरोबर असणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला किंवा एखाद्या खास मित्र मैत्रिणीलाही त्यांच्यापासून दूर गेल्यावर आपण विसरून जातो. विसरतो म्हणण्यापेक्षा तेव्हा जसं रोजच ते आपल्याला गप्पा मारण्यासाठी हवे असायचे तसे आता नसले तरी चालतात. सुरुवातीला आपण त्यांना दर आठवड्याला फोन करतो, नंतर महिन्यातून एकदा, नंतर तर असंच जमलं तर. आणि त्याहीनंतर नाहीच जमत बऱ्याचदा. विस्मरणच होतं आपल्याला त्यांचं.

        कोणाशी झालेलं भांडण असो, परीक्षेत नापास होणं असो, कोणी कधी विनाकारण केलेला अपमान असो, कोणामुळे होणारा त्रास असो, प्रेमभंग असो की कोणाचा मृत्यू असो यातील एकही गोष्ट अशी नाही की जी आयुष्यभर सल देईल, थोडं स्वत:ला सावरलं तर "विस्मरण" ही मात्रा तिचं काम चोख बजावते. माणसाने जसं काही गोष्टी लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे तसंच काही गोष्टी प्रयत्नपूर्वक विसरायलाही शिकलंच पाहिजे. एक मात्र आहे की विस्मरण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आज घडलेली गोष्ट उद्या तर लगेच विसरता येत नाही, पण काही काळाने का होईना ती येते हेच खूप झालं. तोपर्यंत मनाला कसं समजवायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं!

१६ टिप्पण्या:

  1. दुसऱ्या परिच्छेदात मूळ विषय काय अगदी समेवर आला! छान...
    विषय आणि पोस्ट आवडली!
    आठवणी रहातात, त्यांची दुख्ख बोथट होत जातात. सल मात्र बऱ्याच वेळा कायम रहातो. व्यवहार संपला तरी काही प्रकरणांत प्रतिशोध, मरेपर्यंत कायम रहातो. जीवनाच्या उत्पत्ती मध्ये सूड, मत्सर ह्या सारख्या षड् रिपुंच काय प्रयोजन असाव असा प्रश्न पडून रहातो मग मला...
    विस्मरण म्हटलं की मला हा नितांत सुंदर चित्रपट आठवतो!(50 First Dates - http://www.imdb.com/title/tt0343660/). कधी मिळाला तर जरूर बघणे.

    उत्तर द्याहटवा
  2. खरंय सूड, मत्सर नसते तर किती बरं झालं असतं. त्याने कोणाचंच भलं होत नाही. पण हे रीपुही सूड पूर्ण झालेल्या व्यक्तीला समाधान देतात, हे विशेष.
    हा चित्रपट नक्की पाहीन. कधीकधी तर वाटता जितकी कमी मेमरी तितकं जास्त चांगलं. आपल्याला आपली काळजी घेता नाही आली तर बाकीचे आहेत की :)
    खूप धन्यवाद अभिषेक.

    उत्तर द्याहटवा
  3. प्राची खूप सुंदर विषय निवडलास, तुझ्या एका गोष्टीवरून मला माझ्या विस्मरणात अडकलेल्या सर्व गोष्टींचे एका मागून एक स्मरण झालेले... पणजोबांच्या मांडीवर बसून त्यांच्या लाडाचे भागीदार होणे म्हणजे अत्यंत भाग्यशाली गोष्ट, आणि खरच व्यक्तीची बुद्धी कुठल्या क्षणी कुठल्या गोष्टींचा विचार करायला लावेल हे ती व्यक्ती सुद्धा ठरवू सकट नसावी. आणि अभिषेक च्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे मी सुद्धा वेळ मिळाल्यास पाहीन हा चित्रपट......... प्राची अत्यंत सुंदर खूपच मस्त.

    उत्तर द्याहटवा
  4. कल्पेश, काही गोष्टी खरंच अशा असतात की ज्यांचं कधीही विस्मरण होऊ नये असं आपल्याला वाटतं. तरीही त्यापण विस्मरणात जातात. वाईट गोष्टी तर विस्मरणात जाणच चांगलं. पण तू म्हणतोस तसं विचारांवर आपला ताबा नसतो. वाईट घटनेनंतर मनाला कितीही वळवण्याचा प्रयत्न केला तरी मन त्याच गोष्टींचा विचार करत राहतं.
    Thank you so much कल्पेश :)

    उत्तर द्याहटवा
  5. इंद्रधनू छान लिहिले आहेस...
    आपले कोणी जवळचे अगदी खूप महत्वाचे आपल्यासाठी,अशी व्यक्ती देवाघरी जाणे,किंवा आपल्या आयुष्यातून निघून जाणे ह्या गोष्टींमुळे त्रास होतो पण तू जे म्हंटले आहेस कि काळ हा औषध आहे,,,,,ते विस्मरण मदत करते,ती सल हळू हळू कमी होते ते दुखः बोथट होते..
    पण शेवटी मनावर आहे,काही लोक अश्या धक्क्यातून सावरून जातात काहींना मात्र जमत नाही...बाप्पाने आपल्या सर्वांना खरेतर मनाची शक्ती दिली आहे.....हि शक्ती जितके रडवते तितकेच हसवते पण.....
    तुला तुझ्या पणजोबांचा प्रेमळ सहवास लाभला,खरच खूप नशीबवान आहेस तू! माझी पणजी आजी पण आठवते चांगली नव्वदी पर्यंत ठणठणीत आणि खूप बोलकी,हसवयाची पण खूप...खूप चांगल्या गोष्टी शिकले मी....तिने आजीला केलेले संस्कार तिथून आईकडे आणि मग आमच्याकडे....चांगल्या स्मृती नेहमी राहाव्यात सोबत असे वाटते....

    उत्तर द्याहटवा
  6. @श्रियाताई विस्मरण होईपर्यंत मनाची शक्तीच माणसाला साथ देते. खूप चांगल्या-वाईट आठवणी असतात. वाईट आठवणी आसू आणतात तर चांगल्या आठवणी हसू. पण वाईट आठवायचं की चांगलं हेही आपल्या हातात नसतं. मनाला जेव्हा जे वाटेल तेव्हा तिकडे ते धावत जातं. आणि तेव्हाही मनाची शक्तीच सावरायला मदत करते.
    माझीही पणजी आजी आहे अजून. नव्वदीतच आहे आता. अगदी तुम्ही सांगितलत तशीच आहे ती पण. तिने तर शंभरी गाठावी अशी खूप इच्छा आहे आम्हा सर्वांची.
    खूप धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  7. Good one !
    >>> स्वत:ला थोडा वेळ दिला की अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी विसरली जाणार नाही, किंवा जिच्यावर इलाज मिळणार नाही...
    Frankly speaking, स्वताला वेळ देणं म्हणजे either स्वताला गुंतवून घेणं किंवा स्वतामध्ये गुरफटून राहणं, घट्ट कोष विणून स्वताभोवतीच !! त्यामुळे निसरडी आहे ही वाट !! पण खरय देवाची देणगी आहे ऋणानुबंधांचा स्मरण आणि दुखांच विस्मरण !!

    उत्तर द्याहटवा
  8. >>त्यामुळे निसरडी आहे ही वाट
    स्वत:ला गुंतवून घेतलं तर ठीक आहे, पण स्वत:मध्ये गुरफटून जाऊ नये.
    आणि विस्मरण होण्यापुरतं गुरफटून गेलं तरी नंतर बाहेरही येता आलं पाहिजे.
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद Shabd गौरव आणि ब्लॉगवर स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  9. यालाच जीवन हे नाव आहे. विचार चांगला आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. खरंय अतुल. आयुष्यात चांगले वाईट अनुभव आणि आठवणी येतच राहणार.
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद आणि ब्लोगवर स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  11. मंदार :)
    सब मोह माया है, तसं सगळंच विस्मरणीय आहे :))

    उत्तर द्याहटवा
  12. छान लिहलं आहे. बरचसं पटलं. काळ हे औषध आहे हे खरं पण काही काही वेदना इतक्या खोलवर असतात की त्या नाहीशा झालेल्या असतात असं आपल्याला वाटत असतं, पण कुठेतरी, कधीतरी त्या व्रणाला अचानक धक्का बसतो आणि पुन्हा भळभळून वहायला लागतात असं नाही का वाटत?

    उत्तर द्याहटवा
  13. हो मोहनाजी (जी म्हणू की ताई म्हणू? संभ्रम आहे), अगदी खरंय. वर वर जखम बरी वाटत असली तरी कधीतरी बांध फुटतो, किंवा त्याचा काहीतरी परिणाम तर नक्कीच झालेला असतो, काही जणांचा तर स्वभावच बदलून गेलेला असतो. अशा वेदना कोणालाही न मिळोत...
    ब्लॉगवर तुमचं स्वागत आणि धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  14. फक्त मोहनाच म्हटलेलं आवडेल, पण जड जात असेल तर मोहनाताई :-)

    उत्तर द्याहटवा