दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..
आपण जन्माला येतो तेव्हा आपल्यापाशी अगदी मर्यादीत नाती असतात. आई-बाबा, आजी-आजोबा, भावंडं, काका, मामा, आत्या, मावशी इतकंच आपलं जग असतं. मग जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी या नात्यांमध्ये भर पडत जाते. मैत्रीची, प्रेमाची आणि आपुलकीची नाती जोडली जाऊ लागतात. लग्नानंतर तर बऱ्याच नात्यांची अचानक भर पडते. आणि कुटुंबात नव-नवीन सदस्यांच्या आगमनाने अनेक नाती निर्माण होतात. एखाद्याला आपण तो किंवा ती माझी अमुक अमुक आहे म्हणतो, हे 'अमुक अमुक' म्हणजे त्या नात्याचं सर्वमान्य असं नाव!

प्रत्येकाने एकमेकांशी नात्याच्या नावाला शोभेल असं वागणं अपेक्षित असतं, पण तसं प्रत्येक वेळी जमेलच असं सांगता येत नाही. शिवाय नात्याचं नाव आणि प्रत्यक्ष ते नातं हे नेहमी एकच असेल असंही नाही. कधी आपली बहीणच आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते तर कधी एखादी जवळची मैत्रीण आपली बहीण होऊन गेलेली असते. कधी नातं नावापुरतंच असतं आणि बंध जुळलेलेच नसतात, तर कधी एकाच व्यक्तीशी आपण अनेक नात्यांनी गुंफलेले असतो. हा नात्यांचा रुमाल बनवून पाहिला तर कोणाचाच परिपूर्ण नसतो, काही ठिकाणी असतात घट्ट बंध तर काही ठिकाणी असतात विस्कळलेले टाके.
काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. हे काही मुद्दाम ठरवून होत नसतं. ज्या नात्याशी जसा ऋणानुबंध जुळला असेल तसं आपल्याकडून वागलं जातं. काही नात्यांमध्ये सहजपणा असतो तर काहींमध्ये अवघडलेपण असतं. या अवघडलेल्या नात्यांमध्येही आपण केवळ बांधले गेलोय म्हणून, अगदी वरवर, उगीच असायचं म्हणून असतो आणि हसायचं म्हणून हसतो एकमेकांकडे बघून, एकमेकांमध्ये एक न दिसणारा पडदा ठेवून, औपचारिकता म्हणून.
आपण जुळलेले ऋणानुबंध जपण्याचा मनापासून प्रयत्न करायचा. पण मुद्दाम प्रयत्न करून टिकवून ठेवावं लागत असेल तर ते नातं नसतंच, असतं ते फक्त एक दडपण. या दडपणाखाली किती काळ घालवायचा, कायमच राहायचं की ते झुगारून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि इतकं सगळं नियमांच्या चौकटीत बसवूनही काही नाती अशी उरतातच ना की काय नाव द्यावं हेच समजत नाही? मनाला सुखावणारी, आयुष्यातल्या सगळ्या चिंता, काळज्या विसरायला लावणारी, आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी, आणि जगण्याचं बळ देणारी असतात तीच खरी नाती,आणि सगळ्यांनाच हवे असतात हे बंध रेशमाचे!
👌🏻
उत्तर द्याहटवा