सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

कोपरा

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..

पूर्वी घराच्या भिंतींमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कप्प्या-कोपऱ्यांना आता फार महत्त्व राहिलं नाहीये. कोपरा म्हटलं डोळ्यांपुढे येते एखादी आजिबात सहज लक्ष न जाणारी किंवा अतिशय कमी महत्त्वाची जागा. आपल्याला न लागणारी एखादी गोष्ट कोपऱ्यात पडून असते तसंच घरातली एखादी व्यक्ती रुसलेली असली की आपोआपच ती कोपऱ्यात असल्यासारखा भास होतो. काही लहानशी वस्तू सापडत नसेल तर उगीच वाटतं कोपऱ्यात पडली असेल कुठेतरी. 

घरी कोणी येणारं कोणी ठरलेली वेळ होऊन गेल्यावरही आलं नसेल तर आई म्हणायची, जा जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून ये. गुंड लोक एखाद्याला धडा शिकवायला त्याला 'कोपऱ्यात' घेतात, वृत्तपत्रातही एखादी कमी महत्त्वाची बातमी किंवा निवेदनं कुठेतरी कोपऱ्यात असतात, तर एखाद्या वेबसाईटवर पण लॉगआऊट वगैरे कुठेतरी कोपऱ्यात असतं. थोडक्यात काय जिथे तुम्ही फार वेळ घालवू  नयेत अशा गोष्टी नेहमी कोपऱ्यात असतात. तर असा हा घरात बाहेर कुठेही सामावून जाणारा कोपरा. 

पण सगळेच कोपरे असे दुर्लक्षित आणि सोडून देण्यासारखे नसतात ना? तसे असते तर मनाच्या कोपऱ्यात काही खास बाबींना स्थान मिळालं नसतं. रोजची धावपळ, कर्तव्यं आणि वेळापत्रकं सोडून कधीतरीच निवांत क्षणी वर येणारे असतात ते असतात मनाचे कोपरे. प्रत्येक जणच आपल्या मनात असे हळवे कोपरे जपून असतो, ज्यांना धक्का लावण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचा स्वतःचाच असतो. इतरांना आपल्या या कोपऱ्यांबद्दल कोणीच कधीच सहज कळू देत नाही! म्हणायला तो मनाचा कोपरा असतो एवढासा, पण काय नाही सामावू शकत त्यात? कधी ते एखादं सुंदर संगीत असेल, कधी असेल एखादं सुबक चित्र, कधी असेल कोणती कलाकृती, कधी असेल एखादा प्रसंग, तर कधी असते एखादी व्यक्ती.

आपण फक्त या कोपऱ्यात डोकावायचा अवकाश, की हळूच उघडतो तो मनाचा कोपरा आणि त्यातून पटापट बाहेर येत जातात सगळ्या आठवणी, अत्तराचं झाकण उघडल्यावर हळुवार सुगंध पसरावा तशा! खरंच इतकं काय काय मावतं त्या एवढ्याशा जागेत? काळ, वेळ, मिती, वेग सगळ्यांची आकडेमोड चुकवणारा असा असतो हा मनाचा कोपरा. अगदी दोन सेकंदांसाठी का होईना हरवून जातो आपण या कोपऱ्यात आणि मग कोणीतरी भानावर आणून आपल्याला विचारतं, आपण कुठे हरवलो ते. आणि आपण काही नाही म्हणून तंद्रीतून बाहेर येऊन, कोपऱ्याला कोपऱ्यातच ठेवून परत येतो नेहमीच्या विस्तीर्ण अवकाशात!



५ टिप्पण्या: