शनिवार, ४ जुलै, २०२६

लहर

तुम्ही लहरी व्यक्ती आहात की अगदी शिस्तशीर आणि कर्तव्यदक्ष आहात? मी तर अगदीच लहरी असल्याने कर्तव्यदक्ष लोकांबाबत मला खूपच आदर आहे. अगदी मनाचा चंग बांधून वगैरे फार कमीच गोष्टी होतात माझ्याच्याने. किंवा मग आता अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हाच लहर पळून जाते. आणि एखादं काम जेव्हा करण्याची लहर येते तेव्हा मात्र मी एवढं त्याच्या हात धुवून मागे लागेन की तसं काम कधी कोणी केलंच नसेल. शाळेत अभ्यासही असाच लहर असेल तेव्हा केला, पण परीक्षा आली की मग मात्र त्या विषयाच्या हात धुवून मागे. पण या आयत्या वेळी ताण घेण्याच्या सवयीमुळे होतं काय की अजूनही अधून मधून अशी स्वप्नं पडतात की उद्या वेगळाच पेपर आहे आणि मी वेगळाच अभ्यास केलाय. किंवा परीक्षा एका केंद्रावर आहे आणि मी भलत्याच केंद्रावर, आणि मग नंतर स्वप्नच आहे समजलं आणि आता नाही बाबा कोणती परीक्षा द्यायचीये असं लक्षात आलं की हायसं वाटतं.

लहर हे खरं तर स्वच्छंदी असण्याचं लक्षण आहे. समुद्राच्या लाटांना उगीच का लहरी म्हणतात. त्या त्यांना हव्या तशा येतात आणि त्यांना हव्या तशा जातात. पण त्यानेच समुद्राचं सौंदर्य आहे ना. कल्पना करा की प्रत्येक लाट अगदी शिस्तीने पुढे येतेय, एवढे मीटर अंतर ठेवून, ताशी एवढ्याच गतीने वगैरे, तर आपल्याला समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल का. एखाद्या छानशा फुलझाडाला रोज एकाच आकाराचं फूल येत नसतं ना. ऋतूसुद्धा वर्षभरात त्याच्या तीन वेगवेगळ्या लहरी आपल्याला दाखवतो. सूर्याचा रोज पसरणारा संधिप्रकाश रोज वेगवेगळा भासतो, आकाशातल्या प्रत्येक नभाचा आकार वेगवेगळा असतो.  एवढंच का देव कुठे आपल्या प्रत्येक माणसाला एकसारखं बनवतो. निसर्गामध्येच इतकी लहर आहे, तर माणसाने तरी इतकी शिस्त आणायची कुठून. जो माणूस निसर्गाला जवळचं मानत असेल तो लहरीच असणार.  

पण हे असं लहरी असण्याचे खूप तोटे आहेत. तुमच्याइतकीच कुवत असलेली पण जास्त शिस्त असलेली माणसं तुमच्या खूप पुढे निघून जातात. कारण ते लहरीला नाही तर कर्तव्याला महत्त्व देतात. लहानपणी आजीने एखादं काम सांगितलं आणि मी म्हटलं की मूड नाहीये किंवा बोअर झालंय की ती ओरडायची. कसला तुमचा मूड आणि कसला तुमचा बोअर, आमच्या वेळी नव्हतं असलं काही. पण जसजसं वय वाढत जातं, जबाबदाऱ्या येत जातात, तशी लहरीला मुरड घालावीच लागते. कदाचित सगळं जग जिंकण्याइतके नाही आपण पुढे जाणार पण स्वतःचं कुटुंब आणि त्यांचा जिव्हाळा जिंकण्याइतकी शिस्त स्वतःला लावावीच लागते. लहर आणि शिस्तीचा तराजू सांभाळत स्वतःला पुढे न्यावं लागतं. 

मनाला लहरच जवळची वाटते पण हेच मन देवाने इतर प्राण्यांपेक्षा जास्तीचं दिलंय माणसाला देवाने. इतर निसर्ग आणि प्राणी लहरी असतात, पण ही लहर आहे हे समजणारं मनच त्यांच्याकडे नसतं. या लहरी मनाला आवरण्यासाठी मग साधूसंतांना अभंग ओव्या रचाव्या लागतात, रामदास स्वामींना मनाचे श्लोक लिहावे लागतात. आणि आपल्यालाही आपली लहर संधी मिळेल तशीच सांभाळावी लागते.  मग होते सवय हळू हळू आणि उमगून जातं की उनाड दिवस एखादाच असू शकतो, रोज रोज नाही. 


#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा