सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

फोटो

खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

कलागुण

प्रत्येक माणसामध्ये काहीतरी खास असतं कधीकधी ते ज्याचं त्याला माहिती असतं तर कधीकधी आपल्यामध्ये काय कलागुण आहेत हे आपलं आपल्यालाच माहिती नसतं. नशिबाने काहींना त्यांच्यामध्ये जे सर्वोत्तम असतं ते आयुष्यात खूप लहान वयातच गवसतं आणि मग ते त्यामध्ये जगात सर्वोत्तम बनतात. उदाहरणार्थ भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. मग काही मधल्या फळीतले कलाकार असतात. खूप मोठ्या जनसमुदायासमोर कदाचित त्यांची ओळख नसते पण निदान त्यांच्या राज्यात त्यांचं खूप मोठं नाव असेल. काहींना आपल्या शहरातच ओळखतात तर काहींना केवळ आंतर शाळा-कॉलेज इत्यादींमध्येच चमकता येतं, पुढे सगळं मागे पडत जातं.

कधीकधी आपल्याला ज्याची आवड असते त्यातच आपली कारकीर्द निश्चित करता येते तर कधीकधी एखाद्या क्षेत्रात उतरल्यानंतर आवड निर्माण होते. या दोन्ही बाबी चांगल्याच आहेत, पण काहींना दुर्दैवाने नावडत्या क्षेत्रात काम करावे लागते किंवा आधी आवडणाऱ्या क्षेत्रात नंतर तेचतेच करून नावडतेपणा निर्माण होऊ शकतो. पण जबाबदाऱ्या इतक्या असतात की स्वतःला ओढतताणत पैसे कमावण्यासाठी नावडते कामदेखील लक्षपूर्वक करावंच लागतं. कधी आपल्यातल्या कलागुणांचा आणि करिअरचा काहीही संबंध नसतो. आणि कधीकाळी शाळा कॉलेजात, राज्यात ज्यात चार लोक ओळखत असतील ते कलागुण मागे पडून जातात.

हल्ली सोशल मीडियामुळे आपले कलागुण जगासमोर आणणे सोपे झाले आहे. कितीतरी वेळा असे कंटेन्ट डोळ्यांसमोर येते की असं वाटतं हे किती सुमार आहे, पण तेही आवडणारे लाखोंच्या घरात असतात. यापूर्वी असं असायचं जो सर्वोत्तम त्यालाच संधी मिळण्याची शक्यता जास्त असायची. कारण त्यांना निवडणारा कोणी ना कोणी पारखी असायचा, जो त्यातल्या त्यात चांगलं निवडायचा. पण आता कोणीही आपली प्रतिभा जगासमोर आणू शकतो आणि जगामध्ये तर प्रत्येक प्रकारची अभिरुची असणारे लोक असणारच. कितीतरी व्हिडीओ किंवा ब्लॉग्स असे असतात की हे किती सामान्य आहे आणि यापेक्षा हे चांगलं करणाऱ्या अमक्यामक्याला आपण ओळखतो, पण तो अमका सोशल मीडियावर पोस्ट करत नसल्याने कोणाला माहिती पडत नाही.

IQ नुसारच बघायचं ठरलं तरी अगदी कमी हुशार, मध्यमपेक्षा थोडे कमी, मध्यम, मध्यमपेक्षा थोडे जास्त आणि सर्वोत्तम असे गट पडतात. हीन अभिरुची, मध्यम अभिरुची आणि उच्च अभिरुची असेही गट पडू शकतात. पूर्वी यातल्या कोणाला प्रसिद्धी मिळेल ते माध्यमांच्या हाती असायचं आणि शक्यतो उच्च अभिरुचीकडे त्यांचा कल असायचा. पण आता जे गट आहेत यातल्या कोणत्याही गटाने काही कंटेन्ट बनवलं तर ते इतर गटातल्या लोकांना एकतर आवडणार नाही किंवा झेपणार नाही, पण त्यांच्या त्यांच्या गटामध्ये ते पाहिलं आणि आवडलं जाणारच. सोशल मीडियाचा साधा हिशोब आहे, जे जास्त बघितलं जाईल ते जास्त प्रसिद्ध होईल. त्यामुळे ज्या गटाची जितकी संख्या जास्त तो गट तितका जास्त प्रसिद्ध. आणि जगात या सगळ्याच गटातले लोक असणारच.

"The whole problem with the world is that fools are full of confidence and wiser people are full of doubts." या न्यायाने ज्याच्यामध्ये खरंच काही गुण असतात त्यांना शंका असते की मला तर फारच कमी येतंय, यामध्ये आणखी महारथ मिळवली पाहिजे, तोपर्यंत त्यामध्ये अगदीच सामान्य असलेला माणूस आपले कलागुण जगापुढे आणून मोकळा होतो. कधी कधी अशाही गोष्टींना प्रसिद्धी मिळते की यांना गुण म्हणावं का असाही प्रश्न पडतो. पूर्वी उच्च अभिरुचीच समोर येत असल्याने आपण सुमार किंवा मध्यम असू तरी सर्वोत्तम म्हणजे काय असते ते ज्याला प्रसिद्धी मिळाली असेल त्याच्याकडे बघून समजायचे. सध्याच्या जे जास्त पाहिलं जाईल ते जास्त चांगलं  या व्याख्येमुळे अभिरुचीची व्याख्या मात्र नक्कीच बदलत चालली आहे. 

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

दडपण

तुम्हाला कधी माणसांचं दडपण येतं का? म्हणजे आई समोर असेल तर मी अमुक पद्धतीने वागू शकत नाही पण मैत्रीण असेल तर वागू शकते प्रकारचं? किंवा घरचे आणि मित्र-मैत्रिणी हे फारच मोघम झालं. यामध्ये आपण वेगवेगळं वागतोच. पण घरच्यांमध्येही आईसमोर एक, बाबांसमोर एक, आजीआजोबांसोबत एक अशा प्रकारचं? किंवा आई - बाबांसमोर एक आणि भावंडासमोर एक? बऱ्याच लोकांचं उत्तर हो हेच असेल याची मला खात्री आहे. फार कमी जण समोर कोणीही येवो मी असा आहे आणि असाच वागेन किंवा हेच बोलेन अशा प्रकारचे असतात.


सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

षड्रिपु-मत्सर

षड्रिपुंपैकी सहावा शत्रू हा मत्सर होय. हा अतिशय सुप्त असा रिपु आपल्यामध्ये दडलेला असतो हे आपलं आपल्यालाच माहिती नसते. सहज म्हणून आपली नकळत इतरांशी तुलना होत असते. जर ही तुलना मनाला त्रास करून घेणारी नसेल तर काहीच हरकत नाही. पण त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही, एखाद्याला आपणच आपल्यापेक्षा कमी लायक समजत असू आणि अशा व्यक्तीने आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली की मत्सर जास्तच उफाळून येतो. मी जास्त लायक असून हे त्याला कसं मिळालं हा भाव आपलंच मन खात असतो. जोवर मत्सराला इतर रिपुंची साथ नाही तोवर तो फक्त आपलं मानसिक नुकसान करत असतो.

कधी कधी मत्सर हा भावंडांमध्येही बघायला मिळतो, शेजाऱ्यांबद्दल असू शकतो, इतर नातेवाईकांबद्दल असू शकतो, मित्रमैत्रीणींबद्दल असू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा न टाळता येणारा मत्सर हा ऑफिस सहकारी आणि व्यवसाय असेल तर इतर व्यावसायिक यांच्याबद्दल असतो. कारण यामध्ये थेट आपली प्रतिष्ठा कमी जास्त होत असते. समान पदावर काम करणाऱ्या दोन सहकार्यांपैकी एकाला बढती किंवा जास्त पगार मिळू लागला की दुसरा आपोआपच कमी लायक ठरतो आणि ही गोष्ट बहुधा कोणालाच सहज घेता येत नाही. कधी याचा फायदा असाही होऊ शकतो की मग ती नोकरी बदलून आपण इतर ठिकाणी जास्त पद-पगाराची नोकरी शोधतो.

अशा प्रकारे आपण आपल्या प्रगतीसाठी मत्सराचा वापर केला तर तो वाईट नाही. पण अशक्य गोष्टींमध्ये तुलना करून आपल्या मनाला त्रास देणे, किंवा क्रोध आणि मद हेही उत्पन्न होऊन आपल्याला ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो त्याला त्रास देणे गुन्हा असते. लोभ आणि मोहामुळे तर मत्सर निर्माण होतोच पण कामामुळेही मत्सर निर्माण होऊ शकतो अमुक व्यक्तीला इतर कोणी दुसरी व्यक्ती आवडतेय, मी का नाही हा तो मत्सर असू शकतो.

रावणाने रामाचा योद्धा म्हणून मत्सर केला आणि मोक्षप्राप्ती करवून घेतली. आपण इतरांचा मत्सर करतो की नाही, तुलना करतो की नाही हे आपलं आपल्याला माहिती असतं. मत्सर सोडून देऊन निखळ मनाने इतरांचं कौतुक करता येणं हे निरोगी मनाचं लक्षण आहे. आणि असं निरोगी मन आपल्याजवळ असेल तर इतरांकडे भौतिकदृष्ट्या आपल्यापेक्षा जास्त गोष्टी असतील तरी निरोगी मनाचं समाधान त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

षड्रिपु-मद

माणसाला चांगल्या गोष्टींचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या अभिमानाचा उन्माद झाला किंवा अहंकार झाला की तो मद असतो. माणसाकडे सत्ता असेल तर तो मदांध होणे खूप सोपे असते. एकदा एखाद्याला समजलं की काही ना काही कारणाने कोणी त्याचा विरोध करू शकत नाही की अशा माणसाला मद उत्पन्न होतो. मग इतरांशी वागताना सारासार विचार राहत नाही. ज्यांना गरज असेल त्यांची आणखी पिळवणूक करण्याची वृत्ती निर्माण होते.

धन-संपत्ती-सत्ता प्राप्त होऊनही ज्यांना मद उत्पन्न होत नाही त्यांच्यावर खरोखर चांगले संस्कार प्राप्त झालेले असतात. कधीकधी काहीजण उन्मत्तपणा उघड दाखवतात तरी काहींना मंद असतो पण ते आपली प्रतिमा एवढी संपत्ती-सत्ता असूनही आमचे पाय मातीचेच आहेत अशी करण्यात यशस्वी झालेले असतात. उघड काही दाखवण्यापेक्षा सत्तेचा छुपा वापर करणे त्यांना साधलेले असते. अशा वेळी माणसाची प्रतिमा मालिन होत नाही पण चुकून असलेली सत्ता गेली तर त्यांच्या मदाचा पूर्ण निचरा होतो. 

जर आपण शून्यातून उभे राहिलेले असू तर आज आपल्याकडे संपत्ती आहे म्हणून मदोन्मत्त होऊ नये. जरी आपण आपल्या बळावर ते कमावलेलं असलं तरी कालच्या पायावर हा आज उभा आहे हे कायम लक्षात असू द्यावे. आज आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून अहंकार करू नये. मला माझ्या संपत्तीचा अहंकार असेल, तर जगात माझ्यापेक्षा श्रीमंत लोकही असतील, आज नसतील तर उद्या निर्माण होतील. आज माझ्याकडे सत्ता असेल तर उद्या कदाचित नसेल. आज मला ज्ञानी असल्याचा अहंकार असेल तर चांगदेवांना मुक्ताई भेटायला वेळ लागत नाही. सौंदर्याचा अहंकार असेल तर उद्या वृद्धत्व येणार आहे हे विसरू नये. 

मदोन्मत्त माणसाला काम-क्रोध-लोभ-मोह आणि मत्सर हे इतर षड्रिपु आपोआप येऊन मिळतात. यातला एक एक शत्रूच इतका घातक आहे की अहंकाराने हे सगळे शत्रू आपल्या ठायी जमा झाले तर माणसाची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेले बरे. रावण हा सर्वज्ञ असूनही मदोन्मत्त झाल्यामुळे त्याला काम पूर्ण करण्यासाठी इतरांच्या स्त्रीया पळविण्याची दुर्बुद्धी झाली, सर्व देवांवर विजय मिळवण्याचा लोभ निर्माण झाला, प्रभू श्रीरामांनी आव्हान दिले असता क्रोध उत्पन्न झाला, सीतामातेला स्वतःजवळच ठेवण्याचा मोह झाला आणि श्रीरामांबद्दल एक योद्धा म्हणून मत्सर निर्माण होऊन त्यातच त्याचा नायनाट झाला. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, ३० जुलै, २०२६

षड्रिपु-मोह

मोह आणि लोभ हे एकच वाटू शकतात पण तसे नाही. मोह हा क्षणिक देखील असू शकतो पण लोभ हा स्वभावाचाच एक भाग बनून जातो. मोहासाठी एक क्षण पुरतो म्हणतात, पण तो एकच क्षण इतका भयानक असू शकतो की आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू उचलावी की उचलू नये, उचलली तर कोणाची आहे शोधून ज्याची त्याला परत द्यावी की आपल्याजवळच ठेवण्याचा मोह बाळगावा. यामध्ये मोह सारासार विवेकबुद्धीवर भारी पडू शकतो.

मोह एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या क्षणी एखाद्या प्रकारे वागण्याचाच असेल असं नाही. मोह हा नात्यांचादेखील असतो. कधीकधी आपल्या मोहपाशाने आपण आपल्या जवळच्या लोकांना मोकळं न सोडल्याने त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. वस्तू, वास्तू आणि माणसे यांपैकी कशाचाच मोह नाही असा निर्मोही माणूस सापडणे कठीण आहे. काहींना खाण्यावर नियंत्रण राहत नाही. आवडीचा पदार्थ समोर आला आणि पथ्यामुळे तो वर्ज्य असेल तरी तो खाण्याचा मोह बऱ्याच लोकांना आवरता येत नाही. त्यामुळेच काटेकोर पथ्य पाळणारी माणसे फार कमी दिसतात.

जर मनाचा निग्रह मोठा असेल तर माणूस मोहाला दूर सारू शकतो. मोह न होण्यामागे नैतिकता तर क्षणाची असते पण मनाचा निग्रह फार कठोर असावा लागतो. नाहीतर खरेदीला गेलं आणि काही घ्यायचं नसेल, आवश्यकता नसेल तरी आवडलं म्हणून घेणं, चटपटीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारणे या गोष्टींचा मोह आवरता आवरत नाही. मार्केटिंगवाले आपल्याला मोहात अडकवण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात. व्यसनाधीन माणसाला रोज मनाचा निश्चय करूनही रोज व्यसनाचा मोह होतो. व्यसन हे मोहाचं चक्र आहे अशा चक्रातून बाहेर पडता न आल्यास मोह हा माणसाचा मोठा शत्रू होऊन जातो.

मोहापायी जमवलेल्या वस्तुंनी घरही अपुरं पडायला लागतं. एखादी वस्तू खूप जुनी झाली तरी त्याचाही मोह आपल्याला सुटत नाही, काहींमध्ये आपल्या आठवणी लपलेल्या असतात, तर काही येतील उपयोगी या मोहाने जमवून ठेवलेल्या असतात. कुठे चार दिवस बाहेर गेलो की बदल म्हणून बरे वाटते आणि परत मनाला घराची ओढ लागते, हा आपल्याला आपल्या घराबद्दल असलेला मोह असतो, त्या घरातल्या माणसांबद्दल असलेला मोह असतो. हौसेने प्राणी पाळले तर त्यांचाही लळा लागतो. हा कोणाचा लळा लागणेही मोहच आहे. थोड्या प्रमाणात मोह असणे वाईट नाही, पण मोहाने माणूस अंध होणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट त्याज्य करायची वेळ आली तर तिचा मोह पटकन सोडता आला पाहिजे.

मोहवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी अनेक प्रलोभने आपल्या सतत समोर येत असतात, पण क्षणभरच मोहरून जाऊन मोहामध्ये न अडकता स्वतःला त्या मोहजालातून वेळीच बाहेर काढणे ज्याला जमते तोच मोहावर विजय मिळवू शकतो. रामायणातही मोहाचा उत्तम वापर करून घेतलेला आहे, कैकेयीला पुत्रमोह आणि सीतामातेला सुवर्णमृगाचा मोह झाला नसता तर रामायण ना घडते!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, २९ जुलै, २०२६

षड्रिपु-लोभ

लोभ म्हणजे अतिरिक्त मिळण्याचा हव्यास. आपल्याला हवं तेवढं अर्जित करूनही जास्तीत जास्त कसं मिळेल याचाच सतत विचार. एकदा का माणूस लोभामध्ये पडला की कोणतीच गोष्ट त्याला पुरेशी वाटत नाही. आणि लोभाचा विशेष म्हणजे कष्टाने मिळवण्यापेक्षा माणूस अनैतिक मार्गाने कमावण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसाचा लोभ इतका वाढलेला असतो की नैतिक मार्गाने एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस जितकं कमावू शकतो तितकं त्याला पुरेसंच पडत नाही. आणि एकदा कोणतीही गोष्ट मिळवण्याचे चुकीचे पण सोपे मार्ग ठाऊक झाले की माणसाचा लोभ अधिकाधिक वाढत जातो.

सरकारी नोकरी किंवा राजकारण हे अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याचे खात्रीचे मार्ग आहेत. हे सोडून इतर मार्गांमध्ये माणसाला थोडा तरी धोका आणि कष्ट जास्त असतात. पण जे त्या व्यवस्थेमध्ये नसतात त्यांनाच जास्त लोभ असतो, आणि म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी असे लोकच व्यवस्थेला भ्रष्ट होण्यात मदत करतात. पेपर विकत घेणाराच कोणी नसेल तर पेपर कशाला लीक होईल? पण लोभाने माणूस भ्रष्टाचारी बनतो. मग देणारे आणि घेणारे दोन्ही प्रकारची माणसे तयार होताना दिसतात. पाच सहा हजार आय ए एस ऑफिसर्स मध्ये एकच तुकाराम मुंढे का असतात?

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, एका माणसाला देव वर देतो की या जमिनीवरून तू धावत जा आणि तेवढी जमीन तुझी होईल, आत फक्त एकच आहे की सूर्यास्त होईपर्यंत तू जिथून सुरुवात केलीस तिथे पुन्हा परतला पाहिजेस, नाहीतर तुला काहीच मिळणार नाही आणि तो माणूस लोभाने सूर्यास्त होईपर्यंत मी आता परत जाईन अजून एवढी जमीन मिळू देत नंतर परत जाईन असे करत मागे फिरतच नाही आणि सूर्यास्त होतो तेव्हा जिथे पोहोचतो तिथेच थकून जाऊन कोसळतो. दुसरी एक सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट, माणूस सगळी अंडी एकदम मिळवण्यासाठी त्या कोंबडीलाच मारून टाकतो आणि त्याला ती कोंबडी मारून जाऊन त्याच्या हाती नंतर काहीच उरत नाही.

ऐकायला छान गोष्टी आहेत. पण बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात, तसं निरागस असू तोवरच या गोष्टींचं महत्त्व असतं. एकदा माणसाला भ्रष्ट वागून जास्त मोबदला मिळण्याची संधी मिळत असेल तर तो ती सोडत नाही. आपण बातम्या ऐकतो एवढ्या कोटींचा घोटाळा, अमक्याच्या घरी गाद्या, बाथरूमचे छत अशा ठिकाणांहून नोटांची बंडले सापडली वगैरे तर आपण डोळे विस्फारून ते पाहत राहतो, आणि आपल्या मध्यमवर्गीय मनात विचार येतो, अमुक एका मर्यादेनंतर यांना थांबावंसं का नसेल वाटलं? 

असं काय मोठं लागतं जगण्यासाठी? पण ते आपण मध्यमवर्गीयांना. तरी एवढे पैसे एका कुटुंबासाठी काय काय ऐषोआराम केला तर अपुरे पडतील हा विचार करण्याची तेवढी विचारांची उंचीच पोहोचत नाही. किती पिढ्यांसाठी कमावून ठेवलं तर त्यांना पुरेसं वाटत असेल याचा थांग लागत नाही. आणि जेव्हा एखाद्याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तेव्हाच हे भ्रष्टाचार उघडकीस येतात. 

जोपर्यंत जग आहे तोवर हाही षड्रिपु लोभ राहणारच. काहींचा लोभीपणा उघडकीस येईल, काहींना त्यातल्या अनैतिकतेसाठी शिक्षा होईल, काहींचा उघडकीस येणार नाही. आपण मात्र प्रयत्न करू की कळावे लोभ असावा मधलाच लोभ फक्त आपल्या सोबत राहील.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


मंगळवार, २८ जुलै, २०२६

षड्रिपु-काम

षड्रिपूंपैकी आणखी एक रिपु म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अनिवार शारीरिक इच्छा किंवा कोणताही गोष्टीचा हव्यास. क्रोधाप्रमाणेच अतिकाम देखील आरोग्याला हानी पोहोचवणारा रिपु आहे. काम अनावर झाला की त्यातूनही क्रोध निर्माण होतो. मग माणसाचे एकातून दोन शत्रू तयार होतात. असेच सहाही रिपु एकमेकांशी संलग्न आहेत. कामाला आवर न घालता येण्याचे प्रकार आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतच आहोत.

एप्सटिन फाईल्स असेल, अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी भांडणे, मारामाऱ्या आणि खून असतील, किंवा लहान बालक बालिकांवरचे अत्याचार असतील किंवा असंख्य प्रमाणात वाढलेल्या बलात्काराच्या केसेस असतील. हे सगळे काम नियंत्रित न ठेवल्याने दिसणारे दुष्परिणाम आहेत. माणसाच्या एका क्षणाच्या वासनेचे गंभीर दुष्परिणाम इतरांनाही भोगावे लागतात. ज्याचा नैतिक पाया उत्तम असतो त्याला कामवासनेला आवर घालणे कठीण जात नाही.

आज जग जवळ आल्याने आणि मुलं मुलींची लग्नाची वये वाढल्याने तरुण उमलत्या वयात या षड्रीपुसाठी मुले वाहवत जाताना दिसतात. मग लग्नाचे आमिष दाखवून फसवले अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळतात. पण लग्नाचे आमिष दाखवले असेल तर लग्न होईपर्यंत संबंध न ठेवणे त्यातल्या मुलीलाही जमलेले नसते, हा तिच्यातल्या काम रिपुचा विजय असतो. किंवा ऑनलाईन ओळख होऊन एखाद्या मुलीने मुलांकडून लाखो रुपये वारंवार उकळले असे समजते ते त्या मुलाला काम रिपुला नियंत्रणात न ठेवता आल्याने झालेले असते. पुराणकाळातील गोष्टींमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांनी विशिष्ट हेतूने अनेक ऋषींची तपस्या भंग केल्याचे विविध कथांमधून आपल्याला माहिती आहे. हे त्या ऋषींना इतर सर्व रिपुंवर विजय मिळवूनही कामवासनेवर विजय मिळवता न आल्याने शक्य होते. हनी ट्रॅप मध्ये भले भले लोक फसलेले आपल्याला दिसतात. 

काम आणि एका व्यक्तीशी एकनिष्ठ असणे हे आपल्या समाजात आदर्श मानले जाते. हिंदूंसाठी एका पत्नीशी किंवा पतीशी घटस्फोट घेतल्याशिवाय व्यक्ती इतरांशी संबंध ठेवू शकत नाही, दुसरे लग्न करू शकत नाही. तसे केल्यास त्यास अनैतिक समजले जाते. भारतीय समाजात काम या गोष्टीचा एकनिष्ठतेशी असा घनिष्ठ संबंध आहे. माणूस इतर कोणत्याही रिपुपेक्षा कामवासनेने लिप्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वात जास्त नाचक्की होते. स्त्रीने स्त्रीशी किंवा पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवणे हेदेखील वहिवाटीबाहेरचं मानलं गेलं आहे. कारण निसर्गाने प्राण्यांना काम दिला त्याचा मूळ हेतू आहे प्रजनन जो समलिंगी संबंधांनी साध्य होत नाही.

प्रजनन होण्यासाठी काम महत्त्वाचा आहे, पण काम आणि नैतिकता हे एकमेकांसोबत गुंफलेले असतील तरच तो समाजमान्य आहे. अन्यथा प्रत्येक जीवाची ती मूलभूत गरज असूनही स्वैरपणा केल्यास तो आपला शत्रू ठरतो.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, २७ जुलै, २०२६

षड्रिपु-क्रोध

षड्रिपुंपैकी एक असलेला क्रोध म्हणजेच राग! मनाचा राग फार वाईट, तो आपले इतरांसोबतचे संबंध तर बिघडवतोच शिवाय आपल्याही आरोग्यावर वाईट परिणाम करतो. आणि असं असूनही जाऊदेत या रंगाचे इतके तोटे असतात तर नको आपण रागवायला असं होत नाही. सगळ्या षड्रिपूंपैकी राग हा सर्वात जास्त सामान्यतः आढळणारा षड्रिपू आहे. रागाच्या भरात माणसे काय काय करून बसतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. भरपूर साधना, ध्यानधारणा करूनही रागावर नियंत्रण मिळवलंय असा माणूस सापडणे विरळाच.

एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे बोलली नाही आपल्याशी वाद घातला की आपल्याला राग येतो. आपली ज्या गोष्टींवरून चिडचिड होते त्याच गोष्टी सतत करत असेल, आपल्याला जे अप्रिय असेल तेच सतत बोलत असेल तर आपण रागाला आवर घालू शकत नाही. कोणी आपला अपमान केला तर आपल्याला राग येतो. कोणी आपल्याला कमी लेखले किंवा विनाकारण चिडवले, डिवचले की आपल्याला राग येतो.

पुराणकाळात असं म्हणतात की कोपगृहे असत. जिला राग आलाय अशी व्यक्ती त्या कोपगृहात जाऊन बसत असे, मग इतरांनी समजून जायचं असायचं की तिला राग आलाय आणि मग तिथे जाऊन त्या व्यक्तीची समजूत काढणे अपेक्षित असे. जिला राग आलाय ती व्यक्तीही नक्कीच तितकी महत्त्वाची असली पाहिजे, नाहीतर आपल्याला कधी कधी राग येतो, पण कोणाला काळातही नाही की आपण रागावलोय. काहींना स्वतःचा राग म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट वाटते, आपण रागावलो की सगळे कसे घाबरतात, सगळे आपल्या कसे धाकात आहेत याने काहींना समाधान मिळते, पण ही एक विकृतीच म्हटली पाहिजे.

काही व्यक्ती रागावतात तेव्हा आकांडतांडव करतात, इतरांना शिवीगाळ, मारहाणही करू शकतात, तर काही व्यक्ती फक्त मनातून रागावतात, फक्त धुसफूस करतात, त्या रागावल्या आहेत हे इतरांना कळतही नाही असा त्यांचा राग असतो. असं म्हणतात की राग आला की तो व्यक्त करून टाकणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले असते, पण नाती सांभाळताना असे वागणे नक्कीच त्रासदायी ठरू शकते. आणि मनात राग ठेवण्याने नात्यांमधले  वादविवाद टळले तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

काहींना रागात कोणाला काही बोललं तरी नंतर ते नातं सांभाळून घेता येते तर काहींना अगदी असह्य झाल्यावरच इतरांना रागात काही बोलले असतील तरी आपण असे का व्यक्त झालो, ज्याला बोललो त्याला किती वाईट वाटले असेल असं वाटून स्वतःलाच अपराधगंड येतो. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. त्यामुळे आपण कोणाला रागामुळे दुखावत असू तर राग आवरण्यासाठीचे उपाय शोधणे कधीही चांगले.

रागीट असणे हा एक प्रकारचा स्वभाव आहे, आणि स्वभावाला औषध नसते म्हणतात. पण ज्यांना मनापासून चुकीच्या स्वभावात बदल करण्याची इच्छा असते ते त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतात. मग राग आलाय असे वाटताना आकडे मोजणे असो, वा मौन राहणे असो वा थ्री इडियट्स मधल्या व्हायरससारखे राग आला की मुद्दाम उलट क्रिया म्हणजे हसणे असो ज्यांना बदलायचंय ते काही ना काही उपाय करून पाहतात.         

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, २६ जुलै, २०२६

मर्यादा

कोणत्याही गोष्टीला एखादी सीमा असते, आणि ती ओलांडू नये असा शिष्टाचार आहे. तर हे जे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करणे असते ती त्या गोष्टीची मर्यादा असते. खाण्याची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, पोषाखातली मर्यादा, वागण्याची मर्यादा, नात्यांमध्ये अपेक्षित असलेली मर्यादा, एक सुसंकृत माणूस म्हणून अशा अनेक मर्यादा आपण पाळणे अपेक्षित असते. तेच एखादी व्यक्ती सुसंस्कृत नसेल तर त्याच्याकडून आपण मर्यादांची अपेक्षा करत नाही. उलट समजून घेतो की अमुक अपरिहार्यतेमुळे ही व्यक्ती अशीच वागेल, तर आपणच सावध रहावे हे बरे.

जसजसे जग वृद्धत्वाकडे झुकत आहे, माणसाची प्रगती होत चालली आहे, आणि जगाचा वेग वाढला आहे, तसतशी मर्यादा मात्र कमी कमी होत चालली आहे. पूर्वी व्यसनेच न करणे ही मर्यादा होती. आता प्रमाणात व्यसने करावीत ही मर्यादा आहे. पूर्वी मोठ्यांना उलट बोलणे मर्यादाभंग समजले जाई. आता कोणत्याही बाबीचा मोठ्यांनाही जाब विचारणे मर्यादेत मानले जाऊ लागले आहे. पूर्वी असं मानत असतील कदाचित की मोठे अनुभवावरून सांगतात तर आपल्या भल्याचे असेल, आणि बऱ्याचदा ते तसे असायचे देखील.

आता माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध असल्याने वयाने लहान व्यक्तीदेखील मुबलक प्रमाणात ज्ञानी असतात. पण तांत्रिक ज्ञान वेगळे आणि आयुष्य कोळून प्यायल्याने भावनिकदृष्ट्या काय योग्य असेल याचे ज्ञान वेगळे. जेव्हा एखादा भावनिक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तिथे अनुभवी माणसाच्या सल्ल्याची गरज असते, तंत्रज्ञानाची नाही. पण काही गोष्टीत आपल्याला मोठ्यांपेक्षा जास्त समजते म्हणून मोठ्यांना काहीच समजत नाही असे नसते. फक्त एका क्षेत्राची तुलना आयुष्यभराच्या अनुभवाशी, आणि सारासार विचार करण्याची बुद्धी जी अनुभवाने प्राप्त झाली आहे तिच्याशी होऊ शकत नाही.

सोशल मीडियामुळे आणि ओटीटी मुळे तारुण्याच्या बहरात असलेल्या मुलांना तेच जग वाटतं पण तसं नसतं. मग मर्यादा ओलांडली गेली की कधीकधी नसती लचांडेही मागे लागू शकतात. सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती इतकी सोपी झाली आहे की एखाद्याला एखादी अपमानास्पद गोष्ट समोर बोलण्याचे धाडस एखादी व्यक्ती करू शकणार नाही तीच ते सहज लिहून जाते. वयाचा वगैरेही विचार राहत नाही. वादविवाद साधे न राहता हमरीतुमरी आणि शिवीगाळ भाषेवर घसरतात. हेच आपण समोरासमोर असतो तर एखाद्याला पटकन असे बोललो असतो का हा विचार कोणीच करत नाही. आणि हे केवळ प्रतिसादाची मर्यादा न संभाळल्याने होते.

पोषाखातली मर्यादा फक्त स्त्रीच्या बाबतीतच बदलत चालली आहे. पुरुषांचे पोशाख वर्षानुवर्षे बदलत चालले तरी त्यामध्ये ज्या भागात जितके अंग झाकले जाईल असे पोशाख असत त्या भागांमध्ये तेवढेच कपडे अजूनही घातले जातात. धोतराऐवजी पँट आली असेल, अर्ध्या लुंगीऐवजी बर्मुडा आली असेल. गंजीच्या जागी शर्ट असेल पण कापडाची लांबीरुंदी कमी झालेली नाही. पण स्त्रिया कपड्यांना कात्री लावण्याच्या नवनवीन मर्यादा पार करताना दिसतात अर्थातच कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

खाण्याच्या मर्यादा सोडल्या की वेगवेगळे आजार मागे लागतात, आणि ही वैयक्तिक समस्या असल्याने ती मर्यादा देखील ज्याची त्यानेच ठरवायची असते. नात्यांशी प्रामाणिक राहणे, मोठ्यांशी आदराने वागणे या काही कौटुंबिक मर्यादा आहेत तर उघड्यावर रस्त्यावर न थुंकणे, लघुशंका न करणे, वाहतूक शिस्त पाळणे या काही सामाजिक मर्यादा आहेत. पण हल्ली मर्यादा सांभाळणे ही जबाबदारीची किंवा अभिमानाची गोष्ट राहिली नसून ते एक बंधन वाटते. बोलू नये ते बोलणे, वागू नये तसे वागणे या स्वैराचाराला मात्र स्वातंत्र्य किंवा आधुनिकता समजले जाते.      

प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतात कारण त्यांनी मानव देह धारण करून त्या रूपामध्ये एक सर्वोत्तम मुलगा, पती आणि राजा म्हणून सर्व मर्यादांचे पालन केले. आपण म्हणतो एखाद्या माणसाच्या बोलावरून त्यांनी सीतामातेला वनवासी धाडायला नको होते, पण जनरेट्यापुढे सत्ता किती हतबल असते हे आपण पाहतोच आहोत. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


शनिवार, २५ जुलै, २०२६

उद्या

पूर्वी दुकानांवर पाटी असायची, अजूनही असते, 'आज रोख उद्या उधार'. उद्या कधी उगवतच नाही म्हणतात, पण आज रात्रीच्या बारानंतरच हा उद्या उगवणार असतो. आणि या उद्याच्या आशेवर आपण सगळे जगत असतो. रात्रीच्या गर्भातून पहाट उगवते म्हणतात. पण उद्याचं तसं नसतं. उद्या मी हे करेन उद्या मी ते करेन असं आपण खूप काय काय ठरवतो.  उद्या हा शब्दच किती आशावादी आहे. आज एखादं काम नीट नाही झालं तर उद्या नक्की होईल असं वाटतं. एखादा मनुष्य वाईट परिस्थितीमधून जात असेल तर आज ना उद्या सगळं ठीक होईल असं म्हणतात. आज ना, म्हणजे जे आज ठीक नाही ते, उद्या नक्की ठीक होईल. 

हा उद्या आपण पाहणार आहोत की नाही हे आपल्यालाही माहिती नसतं. पण मनात एकदम खात्री असते की उद्या तर उगवणारच! म्हणून रोज सकाळी काल ज्याला आपण उद्या म्हणालो होतो तो आजचा दिवस दाखवल्याबद्दल देवाचे आभारही मानतो. उद्या एखादी परीक्षा असेल तर त्याचा ताण आजवरच असतो. एखाद्या गोष्टीबाबत चालढकल करायची असली की आपण उद्या करू उद्या करू असं म्हणून टाळत असतो. पण काहीकाही गोष्टी अशा असतात की कोणत्या तरी उद्याला त्या कराव्याच लागतात.

उद्या हा भविष्यार्थी शब्द कोणीच नाकारात्मकतेने वापरत नाही, पण उद्याची चिंता मात्र सगळ्यांनाच असते. एखादी महत्त्वाची मीटिंग नीट होईल का, एखादी नोकरीची मुलाखत नीट पार पडेल का, एखादा व्यवसाय असेल तर उद्याही नफा होईल का, हातावर पोट असेल तर उद्याची भाकरी मिळेल का अशी या आशावादी उद्याची काळजीही सर्वांनाच असते. पण या काळजीतही तोच आशावाद आहे की उद्या तर मी बघणारच!

एका वयापर्यंत आपण उद्या काय होईल, भविष्य कसं असेल या उत्सुकतेमध्ये जगतो, तर थोडं जास्त ज्येष्ठ झालो की उद्या काय होईल पेक्षा काल काय झालं यामध्ये मन जास्त रमते. या काल आणि उद्या मध्ये जो आज असतो त्याला मात्र दोघांचंही ओझं वागवावं लागतं. पण त्यालाही काल कसा गेला होता यापेक्षा उद्या छानच असेल हे ओझं वागवायला नक्कीच आवडत असणार. तरीही या बेभरवशाच्या उद्याला असं म्हणावसं वाटतं.
"हर पल यहाँ जी भर जियो, जो है समाँ कल हो न हो" - जावेद अख्तर.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


धक्का


एखाद्याने माशाला झाडावर राहण्याची सक्ती केली तर काय होईल?
गरुडाला आकाशात विहरण्याऐवजी  पाण्यातच वास्तव्य करावयास सांगितले तर त्याला कसं वाटेल?
सिंहाला फक्त गवत खाऊ घातले तर त्याची कशी प्रतिक्रिया असेल?
हरीण किंवा गाय-बकरीला मांस खायला पुढ्यात दिले आणि गवत दिलेच नाही तर ते काय करतील?
नारळाला वाळवंटात आणून लावले आणि खजुराला किनारपट्टीवर तर त्यांची वाढ कोणत्या प्रकारे होईल?
घुबडाला दिवसा फिरून रात्री झोपायला लावले तर त्याला जमेल?

सांस्कृतिक धक्के, कल्चरल शॉक्स कधी ना कधी आपल्याला बसत असतात. पण एखाद्याला त्यातच आयुष्य काढावं लागणार असेल तर तो त्याची सवय करून घेईल की त्याची घुसमट होऊन जगेल? असा माणूस होईल की नंतर वाटणार पण नाही की अमुक गोष्ट याच्यासाठी धक्का होती पण आता इतका मुरलाय की कोणाला खरं पण वाटणार नाही. आधी पूर्ण शाकाहारी असलेला माणूस पट्टीचा मांसाहारी झाला. किंवा आधी रोजच्या सामिष जेवणाची सवय असणारी व्यक्ती पूर्ण सात्विक जेवणाकडे वळाली. अशी उदाहरणे आपल्याला दिसतात.

कोणाला लग्नानंतर, तर कोणाला देशांतर केल्याने सांस्कृतिक धक्के सहन करावे लागू शकतात. आता जग जवळ आलंय. माणसेही पूर्वीसारखी विशिष्ट समाज वगैरे पाळून राहताना दिसत नाहीत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतरभाषिक आणि आंतरराष्ट्रीय विवाह आता सर्रास होताना दिसतात. त्यात सुरुवातीला नक्कीच दोन्ही बाजूंना सांस्कृतिक धक्के बसतच असणार.

काही सांस्कृतिक धक्के वयातील, पिढ्यांमधील अंतरामुळे वेगळ्या पिढीवर झालेल्या वेगळ्या संस्कारांमुळे एकाच घरामध्ये राहूनही मिळू शकतात. आताआता म्हणजे मागच्या पिढीपर्यंत एका घराचे एक विशिष्ट नियम असायचे, मोठ्यांच्या ठरवलेल्या नियमांच्या बाहेर घरातील कोणी जात नसे, त्यांच्यावर तेवढा विश्वास होता की हे असं चालत आलंय तर ते आपल्या भल्यासाठी असेल. पण आता जनरेशन गॅप काय काय धक्के सहन करायला लावेल ते कल्पना करण्यापलीकडचे आहे.

पूर्वी जगात काय वाईट गोष्टी चालायच्या ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे खूप कमी पर्याय उपलब्ध होते, त्यामुळे अज्ञानात सुख होतं की जग सगळं चांगलं आहे. सामाजिक दबावामुळे एखाद्याचं वाकडं पाऊल पाडण्याचं प्रमाण कमी होतं. अगदी चुकीची संगत चुकून लागली असेल तरच कोणी चुकीच्या मार्गाला जायचा. सध्या असा काळ आहे की जगात काय काय चाललंय आणि चुकीचंसुद्धा हे सहज पाहण्यासाठी, माहिती करून घेण्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हे केलं तर काय बिघडलं असं वाटून नकळत्या वयात मुलांकडून अशी चुकीची वर्तणूक होऊ शकते जी घरच्यांसाठी कल्चरल शॉक असू शकते.

जर बदल स्वतः काहीतरी मनाशी ठरवून केला असेल तर माणूस त्या धक्क्यावर मात करू शकतो, पण परिस्थितीमुळे, नाईलाजाने जर एखाद्याला सांस्कृतिक धक्का पचवण्याची जबाबदारी येऊन पडली तर त्या माणसाची नक्कीच वर उदाहरणे दिली आहेत त्यांच्यासारखी गत होईल. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, २३ जुलै, २०२६

चक्रव्यूह


चक्रव्यूह हा एक सापळा होता. त्यामध्ये एकदा योद्धा ते तोडण्यासाठी आत गेला की बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडत नसे कारण चक्रव्यूहाची रचना योद्धा आत गेल्यानंतरही गोल गोल फिरत राही. मग लक्षात ठेवणे अवघड असे की बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. कधीकधी वाटतं आपलं आयुष्यदेखील असंच चक्रव्यूह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याशी लढणारे योद्धे नसतात या चक्रव्युहामध्ये, पण आपण आपलं दैनंदिन जीवन जगणं हाच एक  चक्रव्यूह आहे. कधीकधी एखाद्या प्रसंगातून असं वाटतं आपण कधी बाहेर पडणार. मग बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने आपण त्यातून बाहेर आलो की समजतं हा तर चक्रव्यूहाचा एक छोटासा भाग होता ज्यातून आपण बाहेर आलो, खरं चक्रव्यूह तर भेदलंच नाही अजून.


कधी कोणाची न आवडणारी साथसंगत असेल, कधी रोजचं ऑफिसचं रुटीन असेल, कधी मागे लागलेलं; गळ्यात पडलेलं एखादं काम असेल, किंवा कधी आपणच हौसेने मागून घेतलेली एखादी जबाबदारी असेल, कधीतरी असा काळ येतोच की मला यातून मुक्त करा. मला हे नाही करायचं. मला बदल हवाय. मग बदल म्हणून कधी आपण हिंडून-फिरून येतो, पण ती चक्रव्यूहातून मिळालेली छोटीशी सूट असते. त्यानंतर पुन्हा आपलं रुटीनसोबत युद्ध चालू होतं.

कधी आपल्या एकदम जवळचं एखादं माणूस असतं ज्याच्या वागण्याने आपण एकदम वैतागलेले असतो, पण त्याला सोडून द्यावं इतकीही वाईट परिस्थिती नसते किंवा असंच सोडून देऊ शकत नाही. मग ते अजून एक चक्रव्यूह असते, हे कधी बदलेल, याचं वागणं कधी सुधारेल. समजा तसं झालं तर पुढे दुसरं काहीतरी अजून वाढून ठेवलेलं असतं. असं काहीतरी की ज्याचा आपल्याला कंटाळा येऊन आपण म्हणतो की सगळं सोडून कुठेतरी पळून जावं असं वाटतं.

काहींचं आयुष्य आपल्याला समोर दिसत असते की त्यांना काय काय संकटांना सामोरे जावे लागते. पण आपलं चक्रव्यूह मात्र कोणालाच दिसत नसतं. कारण ती मनाची एक अवस्था असते फक्त. खरंच फार मोठं संकट वगैरे आलं तर छान लढतो आपण त्याच्याशी. पण रोजची न सांगता येणारी मरगळ, रुटीनचा कंटाळा हा खरं संकट नसतोच पण ते एक चक्रव्यूह नक्कीच असतं ज्यात आपण पुरते अडकलेले असतो. चक्र शब्द आलाय म्हणजेच समजून जायचं की या फेऱ्यांमध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकणार.

आजूबाजूची माणसं बदलली, जागा बदलली किंवा नोकरी बदलली म्हणून आपण चक्रव्यूहातून बाहेर येणार नसतो, चक्रव्यूह फिरून आपण फक्त त्याच्या दुसऱ्या एखाद्या परिघात पोहोचणार असतो. प्रत्येक मनुष्याला देवाने त्याच्या जन्मासोबतच एका अभेद्य अशा चक्रव्यूहाची भेट देऊन पाठवलेलं असतं. आणि शेवटपर्यंत ज्याचं त्याला ते चक्रव्यूह भेदत लढत राहायचं असतं.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, २२ जुलै, २०२६

वाचन



वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.

सध्या ऑडिओ बुक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना वाचन आवडत किंवा जमत नाही अशांसाठी निदान कोणी काही लिहिलेले ऑडिओ बुक्स मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचते. शाळा कॉलेजमध्ये असताना सक्तीने अभ्यास म्हणून वाचन करावेच लागते. ज्याला वाचनाचा कंटाळा असेल त्याला गुणही कमीच मिळणार. अशा प्रकारे वाचनाचा संबंध हुशारीशी देखील आहे. काही जण वाचतच नाहीत, या पुढची पायरी म्हणजे काहीजण वाचतात पण वाचलेल्याचं आकलन होत नाही.

माझीदेखील अशी अवस्था होते बऱ्याचदा. डोळे तर अक्षरांवरुन फिरत असतात, पण मेंदूमध्ये काहीच शिरत नसते. आणि कॉलेजला असताना तर खुपदाच व्हायचं असं. एकतर सगळे किचकट विषय आणि पूर्ण सेमिस्टर मध्ये न केलेला अभ्यास किंवा कमी पडलेला वेळ यांच्यामुळे अचानक परीक्षा जवळ आल्यावर नवीन काही वाचायला घेतलं की नुसतेच अक्षरांवरुन डोळे फिरायचे. त्यात ते लक्षात ठेवण्यासाठी वेळेचं बंधन असायचं मग अजूनच मेधाशक्ती मंदावायची. खूपदा ठरवलं की आपण खूप आधीच अभ्यास तयार ठेवायचा म्हणजे ऐन परीक्षेवेळी असं होणार नाही. पण दर वेळेस ये रे माझ्या मागल्या.

वाचनासाठी सुद्धा एक मूड असावा लागतो, किंवा कधीकधी उलटही होते. काही वाचताना लगेच विषयामध्ये मुग्ध झालो तर मूड आपोआप बनतो. तेच जे वाचतोय तो विषय क्लिष्ट असला आणि त्यातून मूडही नसला की अजूनही नुसतेच डोळे फिरतात, आकलन होत नाही. आणि कधीकधी काही लिखाण असं असते की नुसते डोळे फिरवले आणि शब्द न शब्द नाही वाचला तरी विषयाचे आकलन होते.

पाठांतर हा वाचनाचा आणखी एक पैलू आहे. अनेकदा वाचलं की आपोआपच ते पाठ होते. ज्याचं पाठांतर खूप उत्तम असेल अशा एकपाठी माणसाचे नुसते डोळे जरी अक्षरांवर फिरले तरी आकलन न होताही त्यांना वाचलेले तोंडपाठ होऊ शकते. माझ्यासारख्यांना वाचून आकलन झाल्याशिवाय एखादी गोष्ट पाठ होत नाही. द्रुक की श्राव्य हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ठरणारा प्रकार आहे. लहानपणी आई म्हणायची सिनेमाची गाणी बरी एकदा ऐकली तरी पाठ होतात.

तेव्हा असं वाटायचं ऐकलेलं वाचलेल्यापेक्षा लवकर पाठ होते. पण आता मला एखादे पुस्तक वगैरे असेल तर ऐकण्यापेक्षा वाचायलाच जास्त आवडते. ऐकून आपल्या कल्पनाशक्तीला आपण थोडं सीमित करतो. जो वाचतोय त्या लयीप्रमाणे आपण ऐकतोय त्याचा अर्थ लावतो. पण आपण वाचत असू तर ती लय आपल्याला वाचून काय आकलन झाले त्याप्रमाणे वेगळी असू शकते. वयाप्रमाणे कोणाची दृष्टी अधू होते तर कोणाची श्रवणशक्ती. माझी देवाकडे प्रार्थना आहे, निदान वाचत राहता येईल एवढी माझी दृष्टी शेवटपर्यंत निरोगी ठेव.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, २१ जुलै, २०२६

भीती


जगातल्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. हा आता दाखवत नसतील काहीजण पण कसली ना कसली भीती तर प्रत्येकालाच असते. कोणाला पाण्याची, कोणाला उंचीची, कोणाला विदयुत उपकरणांची, कोणाला गर्दीची, कोणाला गाडी चालवण्याची, कोणाला एकटेपणाची! खरं तर हे खूपच ढोबळ प्रकार झाले. अमका फोबिया तमका फोबिया असं आपण ऐकत असतो. पण खरंच प्रत्येक प्रकारच्या भीतीला एखाद्या फोबियाचं नाव देणं इतकं अशक्य आहे की ती यादी अगणित संख्यांची होईल.

लोकांना अंघोळीची सुद्धा भीती असू शकते, एखाद्या रंगाची भीती असू शकते, कोणाशी बोलण्याची, इतरांमध्ये मिसळण्याची, नोकरीसाठी मुलाखती देण्याची, अंधाराची, अमानवीय शक्तींची आणि कशाकशाची नाही. भीती वाटत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार करूनही इतका घाबरतो की प्रयत्न करून पाहणे तर फारच लांब राहिलं. कोणत्याही एखाद्या बाबतीत आत्मविश्वास कमी असला की त्याची भीती वाटू लागते.

कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी अनभिज्ञ असते की त्यामुळे काय वाढून ठेवले असेल म्हणून भीती वाटते, तर कधी एखादी गोष्ट बऱ्याचदा प्रयत्न करूनही जमली नाही म्हणून त्याची भीती निर्माण होते. कधीकधी एखाद्या गोष्टीची नुसतीच इतरांना भीती वाटते म्हणून आपल्यालाही भीती वाटते. काही प्रकारच्या भीती अगदीच अनाकलनीय असतात, एखाद्याला अमकी भीती का आहे हे ती व्यक्ती स्वतःदेखील सांगू शकत नाही, कदाचित ती भीती गुणसूत्रांमधून किंवा पालकांचं , घरातल्या इतरांचं वागणं पाहून येत असावी.

कातरवेळी माणसाचं मन बऱ्याचदा उदास, खिन्न होते, किंवा प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर आठवण येते. किंवा जुन्या आठवणी मनात उचंबळून येऊन मनाचीही कातर अवस्था होते. एकटं एकांतात असू तर संधिप्रकाश अजूनच उदासीन करून जातो. संध्याछाया भिवविती मना अशी अवस्था बहुतेक जणांची असते. एकतर दिवस संपून रात्र सुरु होणार आहे याची ही चाहूल असते. पूर्ण उजेड आणि पूर्ण अंधार या दोहोंच्या मधली ही वेळ असते.

या भीतीचं मूळ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासून आलं आहे. जंगलांमध्ये राहताना संध्याकाळी अंधार झाल्यावर शिकार करणाऱ्या श्वापदांची भीती वाढत असे. ही अंधारात हिंस्र किंवा विषारी प्राण्यांची वाढलेली भीती, आणि यातून एखादा हिंस्र प्राणी मागे लागला तर जीव मुठीत घेऊन पलायन करणे, यांमुळे आजही संधिप्रकाश पसरला की प्रत्येक मानवाला हुरहूर दाटून येते. आजही अंधाराची भीती वाटते, आणि आजही दिवसा रम्य भासणार निसर्ग, समुद्र, पर्वत, नद्या, जंगले रात्री भयाण वाटतात. त्यामुळे संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोति म्हणणे या गोष्टी करून आपण मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

तर तुम्हाला कोणत्या एखाद्या किंवा अनेक गोष्टींची अशी भीती होती किंवा आहे, आणि त्यावर तुम्ही मात केलीत की करण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा असं आहे की ही भीती राहू देत अशीच मला याचं काहीच करायचं नाही. भीतीवर जिद्दीने मात करणारी माणसेच आयुष्यात काही मिळवू शकतात. आजकाल ते काहीतरी म्हणतात ना 'डर के आगे जीत है'. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, २० जुलै, २०२६

पिच्छा


मराठीतला पिच्छा हा शब्द हिंदीतल्या पीछा वरून आलेला असावा. पण पिच्छा मध्ये जो हट्ट आणि वैताग आहे तो काही पीछा मध्ये वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणाऱ्या माणसाला आयुष्यात हवं तसं यश नक्कीच मिळतं. काही जण काही गोष्टींचा पिच्छा पुरवतात तर काही जण माणसांचा पिच्छा पुरवतात. एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवणे माणसांचा पिच्छा पुरवण्यापेक्षा नक्कीच सोपं असेल असं वाटतं.

सर्वांनाच जिद्दीने पिच्छा पुरवणं जमत नाही. माणसांचा पिच्छा पुरवायचा म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सारखं सारखं भंडावून सोडायचं. उदाहरणार्थ जसे आपल्याला सध्या काही बँकांचे किंवा वित्तीय कंपन्यांचे नकोसे कॉल्स सारखे येत असतात. मार्केटिंग, विमा आणि अशा अनेक जाहिरातबाजीवाल्या लोकांना इतर लोकांचा पिच्छा पुरवावाच लागतो. शंभर लोकांपैकी दोन जण जरी त्यांच्या गळाला लागले तरी त्यांचा उद्देश सफलच होणारा असतो.

मला स्वतःला मात्र माणसांचा पिच्छा मुळीच पुरवता येत नाही. आणि आपली घरगुती काही व्यवसाय कौशल्य आधारित कामे असतात, ती आजकाल पिच्छा पुरवल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. एखाद्याचा पिच्छा न पुरवल्यास माणसे त्यांची कामे प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत. अपवाद असतातच. एखाद्याला आपण एखाद्या कामाचा ते मागतील तेवढा मोबदला देत असू तर त्यांचा पिच्छा का पुरवावा लागला पाहिजे? पण त्याशिवाय मनासारखं काम होत नाही. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का.

काहीजण एखाद्या जोडीदारासाठी त्या व्यक्तीचा तर कधी त्या व्यक्तीसाठी इतरांचा पिच्छा पुरवतात, आणि हवा तोच जोडीदार मिळवतात. नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पुढे काय होत असेल ती वेगळी गोष्ट आहे. काही जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर पाहून असं वाटतं यासाठीच का इतका अट्टाहास केला होता यांनी. एखादी गोष्ट असो वा व्यक्ती ती मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप पिच्छा पुरवून ती एकदा मिळाली कि मग मात्र तो केलेला पिच्छा विस्मृतीमध्ये जातो.

पण सगळेच जण पिच्छा पुरवताना केलेल्या कष्टांना विसरून जाणाऱ्यांपैकी नसतात. बऱ्याच जणांना आधी केलेल्या कष्टाची जाणीव कायम राहते. आणि पिच्छा पुरवणे नक्कीच आकर्षणाच्या नियमांपैकीच एक असावे असे मला नेहमी वाटते. 
 
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


रविवार, १९ जुलै, २०२६

सख्खा


आपल्या जन्मापासून काही सख्खी नाती आपल्याला लाभतात. आणि काही जोडलेली नाती लाभतात. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, आत्या त्यांची मुलं हे सगळे आपले सख्खे नातेवाईक असतात. मामाचं लग्न होऊन मामी आली, काकाचं लग्न होऊन काकू आली तर त्यांच्याबरोबर येतात ती जोडलेली नाती. सख्खी नाती नेहमी आपली पक्की असतात असं आपल्याला वाटत असतं.

कधी कधी सख्खे दोन भाऊ वा बहिणी यांच्यामध्ये इतकं साम्य असते की हा त्याचा/तिचा भाऊ आहे किंवा ही बहीण आहे असं सांगण्याचीसुद्धा गरज पडत नाही. आणि कधी इतके वेगळे असतात की ते सख्खे आहेत यावर सांगूनही विश्वास बसत नाही. सवयीचंदेखील तसंच जरी सख्खी भावंडं असतील तरी साध्या साध्या सवयीसुद्धा त्यांच्या एकमेकांसारख्या नसतात, किंवा कधी विचार खूप वेगळे असतात की हे एकाच घरातल्या माणसांचे विचार असतील असं खरं वाटत नाही.

जोडलेल्या नात्यांमध्ये थोडी औपचारिकता असते. जोपर्यंत एकमेकांना चांगलं ओळखत नाही तोपर्यंत थोडा कमी मोकळेढाकळेपणा असतो. जोडलेल्या नात्यांमध्येही आपल्याला आपला नातेसंग्रह संपन्न करणारी माणसेही भेटतात. एकसारखे विचार जुळले तर यांच्याबरोबर आपलं नातं वयाच्या बऱ्याच काळानंतर जोडलं गेलंय हे लक्षातदेखील राहत नाही. जरी विचार जुळणं मने जुळण्यासाठी महत्त्वाचं असतं तरी सख्ख्याला आपण जितकी संधी देतो तितकी कधी कधी जोडलेल्याना देत नाही.

कधी काही सख्खी नाती अशी पण दिसतात की इवल्याशा मतभेदाने एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. नात्यापेक्षा अहंकाराला जास्त कुरवाळले जाते. सख्खेपणाचा लवलेशही त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. छोटंसं निमित्त आणि एकमेकांमध्ये कायमचा दुरावा आलेला असतो. मला वाटत नाही नुसत्या अहंकाराने सख्ख्यांपासून इतकं तोडून वागता येत असेल. खरं कारण तर हे असेल की त्यांचे एकमेकांशी सख्ख्यांप्रमाणे कधी बंधच जुळले नाहीत. सख्खी असोत वा जोडलेली नाती आपल्याला निभावून न्यावीच लागतात. 

बाकी मनाने गुंफलेली नाती असतात काही, त्यामध्ये सखा किंवा सखी असते, सख्खा किंवा सख्खी यासारखेच असणारे म्हणून त्यांना सखा वा सखी म्हणत असावेत नक्कीच. काही काही गोष्टी आपण सख्ख्यांना आपण सांगू शकत नाही, पण सख्यांना सांगून आपलं मन मोकळं करू शकतो. या नात्यामध्ये कोणतंच बंधन नसते. कोणताच मानपान नसतो, कोणतीच अपेक्षा नसते. फक्त निखळ मैत्री असते. म्हणूनच कवि योगेश म्हणतात,

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

शनिवार, १८ जुलै, २०२६

वाढदिवस


कोणालाही आपला वाढदिवस म्हणजे मोठा आनंदाचा दिवस असतो. एक काळ असायचा, ज्या काळात मुलांना शाळेत घालण्याच्या वेळेस सगळ्या मुलांची जन्मतारीख ही एक जूनच असायची. कधीकधी जनसालही लक्षात नसे. डोक्यावरून हात पलीकडच्या कानाला लागला की मूल शाळेत घालण्याच्या वयाचे झालेले असे.
आजी-पणजीच्या काळात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी असे त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवलेले असायचे. आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणताही महिना त्यामध्ये एक तरी उल्लेखनीय सण किंवा घटना असल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांची पद्धतही चांगलीच म्हणायची.

आताचा एक काळ आहे की पालक बाळाची जन्मतारीख-वार-महिना  जन्मवेळ मिलिसेकंदासहित नोंद करून ठेवतात. अशा वेळी वाढदिवसाचे महत्त्व वाढले नसेल तरच नवल. माझ्या लहानपणी काही ठराविक वर्षांचे होईपर्यंत हौस म्हणून लहान मुलांचे वाढदिवस केले जात. त्यातही फार मोठा सोहळा वगैरे नसे. घराजवळचीच थोडीफार बच्चेकंपनी बोलावून त्यांना केक-चॉकलेट आणि थोडा खाऊ दिला जाई. त्या दिवशी उत्सवमूर्ती असल्याने असेल कदाचित, वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असं  लहानपणापासून मनावर बिंबलं जातं.

पण माझ्यासारखे काहीजण असतात ज्यांना आपला वाढदिवस म्हणजे विशेष काही न वाटता इतर दिवसांप्रमाणे एक सामान्य दिवस वाटतो. काही माणसे पाहण्यात आहेत की कितीही वय झालं तरी अमक्यातमक्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून रुसून बसतात. मला तर याच्या अगदी उलट वाटतं. कोणी शुभेच्छा नाही देऊ शकले तर विशेष काय आहे त्यात एवढे. इतरांसाठी तर तोसुद्धा इतर अनेक दिवसांसारखाच आणखी एक दिवस असतो. मार्केटिंगसाठी आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आपल्याला इमेल किंवा मेसेजवर शुभेच्छा पाठवतात.

कोणाच्या शुभेच्छा आलेल्या आवडत नाहीत असं नाही, एखाद्याने आपण इतके महत्त्वाचे नसतानाही आठवून फोन किंवा मेसेज केला तर नक्कीच छान वाटते. पंतप्रधानांची एक साईट आहे. बहुतेक तिकडे रजिस्टर केलं असेल तर तिथूनही शुभेच्छांचं एक पत्र इमेलवर प्राप्त होते. पंतप्रधान या पदावर व्यक्ती कोणीही असो पद देशातील सर्वांत मोठ्या पदांपैकी एक आहे. आणि एखाद्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसताना त्यांचा द्वेष वा जवळचे समजणारे आपण कोण. तर हे पत्र ऑटोमेटेड आहे हे पूर्णपणे माहीती असूनही ते मिळाल्याचाही आनंद होतो. पण खूप थाटमाट करावा आणि भरपूर लोकांना बोलावून आपलं कौतुक करून घ्यावं इतका महत्त्वाचा हा दिवस मला नक्कीच वाटत नाही.

बरेच जण वाढदिवशी अनाथाश्रमांना दान करणे, धार्मिक दानधर्म करणे, वृक्षारोपण करणे, सामाजिक उपक्रम राबवणे वगैरे चांगल्या प्रकारे आपला दिवस व्यतित करतात. खूप गोतावळा न आवडणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना उत्सवमूर्ती व्हायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि अगदी काहीच न करणे हादेखील पर्याय आहेच.      

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

व्यक्त


मी, माझे, मला सर्वप्रथम आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर अशी कोणाची वृत्ती दिसली तर त्यांना आपण स्वार्थी म्हणतो. पण खरं बघायचं तर सगळीकडे सगळेजण असाच विचार करताना दिसतात. अगदी विरळ प्रमाणात दुसऱ्यांचा विचार आधी करतात असे काहीजण दिसतात. पण अशा लोकांना त्रासच जास्त होताना दिसतो. स्वार्थी असलं की त्रास कमी असतो, त्यामुळे खरं तर स्वार्थी असणं हे कोणाच्याही सोयीचं आहे. स्वार्थी माणसाला कधीच मनाला मुरड घालावी लागत नाही, आणि कोणालाही मनाप्रमाणे वागायला मिळालं की तणावही कमी असतो.

मला वैयक्तिकरित्या कोणालाच नाही म्हणता येत नाही. आता हा अवगुण समजला जातो, पण आमच्यावर संस्कार झाले तेव्हा शक्य तेवढी आपण इतरांना मदत करावी असेच संस्कार झाले. त्याही पुढे जाऊन जर आपल्या आवाक्यात नसेल आणि कोणाला नाही म्हणावं लागलं तर त्याचा चक्क अपराधगंड येतो. आजूबाजूला कोणाला फटकन काहीही बोलणारी माणसं दिसतात, पण मी मात्र कोणाला लागेल असं बोलू शकत नाही. आणि समजा अगदी ठरवून बोललंच कधी तर जे सहज इतरांना बोलतात आणि विसरून जातात तसं होत नाही. आपण असं उगीच बोललो का, थोडं सौम्य काही म्हणायला हवं होतं का, त्याला/तिला काय वाटलं असेल असलंच कितीही वेळ वाटत राहतं.

काय म्हणावं या स्वभावाला, फटकन बोलून मोकळे होणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये काही साचून तणाव निर्माण होत नसावेत, पण असे अनेक जण असतात की ते बोलू न शकल्याने मनामध्ये गोष्टी साचून ताण घेतात किंवा कधी बोलून मोकळे झालेच तर आपण असे का बोललो याचाही ताण घेतात, म्हणजे मानसिक ताणापासून बोलून काय किंवा न बोलून काय सुटका नाहीच. राशींप्रमाणे माणसाचे तसे तसे स्वभाव आणि भोग असतात म्हणतात, ते ढोबळमानाने नक्कीच खरं असावं. नाहीतर जगात सगळी माणसे एकसारखीच भांडकुदळ किंवा एकसारखीच शांत नक्कीच दिसली असती.

कोणाला काही बोलू न शकणाऱ्या किंवा मदतही जमली नाही म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांमध्ये मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझी प्रतिमा सगळ्यांपुढे एक चांगला माणूस म्हणून उभी रहावी ही अपेक्षा असेल का, की एखाद्याला खरंच मनापासून कोणालाच दुखवायला आवडत नसेल? मग आपल्याला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट? अंतर्मुख लोकांना कोणाला काही बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त सोयीचं वाटतं. मुळात बोलण्याचेच कष्ट वाटतात. मग हळू हळू ते कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणं, कोणी वाईट वागलं तर त्याला ते बोलूनच दाखवणं यापेक्षा बोलण्याचे कष्ट न घेणं जास्त पसंत करतात, आणि त्याचा ताणही घेणं सवयीने कमी होत जात असेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुख्यत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


बुधवार, १५ जुलै, २०२६

राहणी


प्रत्येकाचं एक ठरलेलं राहणीमान असते, जे कालांतराने बदलत पण जाते. कधी राहणीमान समाज, भौगोलिक प्रदेश, पंथ, संप्रदाय याप्रमाणेदेखील बदलत जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक स्तर. आर्थिक स्तराप्रमाणेही राहणीमान बदलत जाते. पेहराव बदलत जातो. आपल्या मराठी मनाने नेहमीच "साधी राहणी, उच्च विचारसरणी" यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला शिकवलंच असं जातं की नीटनेटकं, स्वच्छ राहावं पण साधंच राहावं. संत चोखामेळा यांनीही म्हणून ठेवलंय "का रे भुललासी वरलिया रंगा"!

यामागे असा विचार नक्कीच असेल की पैसा आज आहे उद्या नाही, महागड्या जीवनशैलीची सवय लावून घेऊन उद्या दिवाळखोरीची पाळी आली तरी कर्जबाजारी न होता तग धरून राहता आलं पाहिजे. आपण मराठी माणसं तशी मध्यमवर्गीयच. आहे त्यात समाधान मानून घेणे वगैरे आपल्या रक्तातच असते. सवय म्हणून हे खरंच चांगलं आहे, त्याने भरपूर व्याप कमी होतात, सुखाने राहता येते. पण काहीजण असे असतात की ज्यांची स्वप्नं मोठी असतात.

एकतर आता आपण ग्लोबल झालो आहोत, पूर्ण जगाशी आपला संपर्क येतो. त्यामुळे कोणाचीही समोरच्यावर पहिली छाप पडते ती दिसण्यातून पडते, पेहरावातून पडते. त्यामुळे ज्या त्या क्षेत्राला साजेसा पेहराव करणे ही आजची चैन नसून गरज आहे. वरल्या रंगालाच भुलण्याचा जमाना आहे. एकदा आपण कोणीतरी बनलो की मग मात्र आपण स्वतः काही कल स्थापित करू शकतो. आजही पहा, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये भरपूर मराठी माणसे दिसतील, पण जग त्यांना किती साधा माणूस असं म्हणूनच ओळखतात.  

या साध्या संस्कारांमुळे पाय जमिनीवर ठेवून राहणं मराठी माणसाला छान जमतं. साधा माणूस असतो तो कशाचाही बडेजाव, ढोंग करत नाही. पण यामुळे कदाचित थोडी महत्त्वाकांक्षा कमीदेखील पडते. आपल्याला एवढं पुरतंय तेवढं बास झालं हीच वृत्ती तयार होणं साहजिक आहे. स्वतःची जाहिरातबाजी कमी पडते. यामध्ये छक्के-पंजे वाले पुढे निघून जातात. आणि साध्या माणसाचं मात्र कौशल्य मागे पडून साधा म्हणूनच कौतुक होत राहतं.

जग बदलतंय तसं होतं काय आहे, की गरजेपुरतं ऐटीत पॉश राहाणं तर ठीक आहे, पण समारंभ भलतेच विनाकारण महागडे होत चालले आहेत. तिकडे दिखावा करावा अशी गरज साध्या साध्या लोकांनाही पडू लागली आहे, त्यासाठी लोकं कर्जबाजारीही होत आहेत. त्या बाबतीत मात्र मी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" याचाच पुरस्कार करेन. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, १४ जुलै, २०२६

माहेर


"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"

असं भोंडल्याच्या गाण्यांमध्ये लहानपणी म्हणताना मजा यायची. कोणत्याही विवाहित स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. भले आजकाल शेजारी का माहेर असेना पण माहेर ते माहेर. तसं तर आता कोंडून मारणारी सासरे क्वचितच कुठे असतील. पण तरीही मुलीचा खूप दिवस माहेरी जायला मिळालं नाही की कोंडमारा होतोच. माहेरचं कौतुक करताना कोणतीही मुलगी कधीच थकत नाही. एवढंच का पण माहेरची उणीदुणी असतील तर ती झाकून ठेवते आणि कौतुक मात्र वारेमाप करते.

पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी जायचं म्हटलं तर माहेराशी निगडित सणांची वाट बघावी लागायची. खूप महिन्यांनी आणि कधी कधी तर खूप वर्षांनी माहेरी जायला मिळायचं. शारीरिक मानसिक सगळे कष्ट सहन करून बिचारी दमून थकून जायची. आता शारीरिक छळ वगैरे नसला तरी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मानसिक थकवा येतोच. सासरी सगळे प्रेमाने वागणारे सगळे असतील तरी माहेरची माया आणि ओढ वेगळीच असते. सासरी भरपूर ऐश्वर्य असेल आणि माहेरी गरीबी असेल तरी त्याही मुलीला माहेर हवंच असतं.

पूर्वी माहेरी जाणाऱ्या मुलीला अनेक भाऊ भावजयाही असत. आईचे लाड तर वेगळेच पण त्यांच्याकडूनही कोडकौतुक होत असे. हल्ली बऱ्याच मुलींना भाऊ नसतो, अशा काही मुलींना सासरी सगळं सांभाळून माहेरही लक्ष द्यावं लागतं तरीसुद्धा ती अतिरिक्त जबाबदारी न मानता त्या ते आनंदाने करतात. लहानपणापासून आपण जिथे राहीलो त्या घराशी आणि जागेशीही आपली भावनिक जवळीक असते. शेजारीपाजारी देखील प्रेमाने विचारणारी माणसे असतात. पण खऱ्या अर्थाने जोवर आई माहेरी असते तोवरच माहेर हे महेर वाटतं.

लहानपणी आई तिच्या माहेरी जायची म्हणजेच आपण आपल्या आजोळी जायचो ती मजादेखील वेगळीच असायची, आईच्या लाडांमुळे तिच्याबरोबर आपलेही लाड व्हायचे. पण माहेरी आलो आता राहा निवांत असं कोणतीच मुलगी करत नाही. तेव्हा आईला माहेरी गेली तरी आजीची काळजी घेताना पाहिलं, आता माहेरी जाऊन नुसताच आराम करण्यापेक्षा आईला काय हवं नको ते बघताना एका ठराविक वयानंतर माहेरी जाऊनही आई आजीची काळजी घ्यायची ते आपसूकच आठवतं.

सासरी जरी सगळं छान असेल पण त्यात एक व्यावहारिकपणा दिसतोच, आपल्याला स्त्रियांना तो जाणवतो. मग व्यवहारांची, कर्तव्याची लोढणी सोडून मायेची फुंकर मिळवण्यासाठी मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते. माहेर म्हणजे औपचारिकता सोडून आपलेपणाने केलेली विचारपूस, स्नेहाचा वाहणारा झरा. माहेर या शब्दातच किती जिव्हाळा, माया, प्रेम, काळजी आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माहेरासाठी आसुसलेल्यांसाठी आपल्यालाही कोणाचं माहेर होऊन राहता आलं तर ते किती छान असेल.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, १३ जुलै, २०२६

नियोजन


नियोजन यासाठी सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे प्लॅन/प्लॅनिंग. काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही कसं प्लॅनिंग प्रमाणे ठरवून चाललेलं असतं. एखादं नियोजन बनवणं आणि ते पूर्णत्वास नेणं ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ऑफिसमध्ये तर प्लॅन्स बनवून त्याप्रमाणे कामे तडीस न्यावीच लागतात. आणि त्याची आपल्याला सवयही होऊन जाते. पण आयुष्य म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्या कामाच्या वाट्याला जितके पैलू आलेले असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पैलू आयुष्याला असतात.

अमुक शाखेतच शिक्षण घेणे, अमुक वयातच लग्न करणे, अमुक वयात मनासारखं घर घेऊन ते मनाप्रमाणे सजवणे, अमुक वयात आणि अमुक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलांना जन्म देणे, मुलांचे संगोपन ठराविक प्लॅनिंगनेच करणे, हे फारच कमी लोकांना जमत असणार. पहिली सुरुवातच करिअर पासून होते. काही जणांना कितीही मोठं होऊनही आपला कल नक्की कुठे आहे तेच समजत नाही. मग वेगळंच शिक्षण घेऊन आयुष्यभर मनाविरुद्ध काम करत बसणं वाट्यास येतं.

कोणाकोणाला मनासारखा जोडीदार मिळत नाही, मग पुढच्या प्लॅनिंगऐवजी घटस्फोट वगैरे गोष्टींमध्ये पडणं किंवा आहे ते सहन करणं अशा गोष्टी कोणाच्याच नियोजनामध्ये नसतात. इच्छा असूनही सर्वांनाच ठराविक वयात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये मूल होईलच असं सांगता येत नाही. न सांगता येणारी आजारपणं, ज्येष्ठांचे वेगळे प्रश्न हे सगळं हाताळण्यामध्ये नियोजन कुठे ना कुठे कोलमडतेच. पण तेच एखादा सण-समारंभ साजरा करणे असेल तर त्याचं नियोजन करूनच आपण ते तडीस नेऊ शकतो. अशा वेळी मात्र नियोजन न करण्याने सगळा गलथान कारभार होऊन जाऊ शकतो. 

सणा-समारंभाचं नियोजन करणे आणि पूर्ण आयुष्याचं नियोजन करणे यात खूपच फरक आहे. समारंभ वगैरे आपल्याला एका दिवशी पूर्णत्वास न्यायचा असतो त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण उत्साहाने प्लॅनिंग करून ते पारही पाडतो. पण समारंभाचा जसा शेवटचा दिवस किंवा साजरा होण्याचा दिवस आपल्याला माहिती असतो तसं आयुष्याचं नसते ना.  त्यामुळे आयुष्याचे छोटे छोटे भाग बनवून छोटं छोटं प्लॅनिंग पार पाडणं केव्हाही उत्तम! 

आयुष्याच्या बाबतीत मला तर नेहमी असं वाटतं की नियोजन करून त्याप्रमाणेच वागणाऱ्या लोकांमध्ये नशिबाचाच भाग जास्त असावा. त्यामुळेच वूडी ऍलन चा हा सुविचार माझ्या खूपच जवळचा आहे.

“If you want to make God laugh, tell Him about your plans.” 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, १२ जुलै, २०२६

कौशल्य


प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.

प्रत्येक कौशल्य पैसे मिळवण्यासाठीच असावे असे काही नाही, काही कौशल्ये आपण मनाच्या समाधानासाठी देखील शिकतो किंवा उपजत असेल तर त्यामध्ये गोडी वाढवतो. मात्र आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्याविषयी अनभिज्ञ असणे, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याची कदर नसणे हे मात्र खरोखर दुर्दैवी आहे. काही स्वतः अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला अशी माणसे मिळतात की त्यांना त्याबद्दल जाणीव करून देतील. आपल्या आजूबाजूला असे पारखी लोकं मिळणेही भाग्याचेच आहे.  

काही वर्षांपूर्वीपर्यंत सहज वाटणाऱ्या गोष्टी, आधीच्या पिढीतले लोक सहज करत होते अशा काही गोष्टीही हल्ली कौशल्य झाल्या आहेत. उत्तम स्वयंपाक, छान रांगोळ्या, कलाकुसर, भरतकाम, विणकाम, शिवणकाम हे पूर्वीच्या स्त्रियांना सहज जमत असे, एवढेच का त्या गोष्टी इतक्या सहज मानल्या जायच्या की हे कौशल्य आहे असं करणाऱ्यांनाही माहिती नसे आणि पाहणाऱ्यांनाही. याउलट एखाद्या स्त्रीमध्ये ही कौशल्ये नसतील किंवा काही कमी असतील तर तिला स्त्री म्हणून कमी हुशार समजले जाई.

त्याच स्त्रिया आजच्या पिढीकडे पाहत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टींचे क्लासेस पाहून आणि वरीलपैकी एखादी गोष्ट जरी छान जमत असेल तर होणारे वारेमाप कौतुक बघून निश्चितच त्यांना हेवा वाटत असेल. मुळात भारतीय समाजात काही गोष्टी म्हणजे कौशल्ये आहेत हेच खूप उशिरा रुजले. आपण सहज मानतो त्या गोष्टी म्हणजे कौशल्ये असू शकतात हेच आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो आहोत, त्यामुळे कौशल्यांचे मार्केटिंग तर दूरच राहीले.

व्यक्ती जितकी निम्न स्तरातील असेल, मध्यमवर्गीय असेल, तितकी आजही तिच्यामध्ये जास्त कौशल्ये असतात त्याउलट उच्चवर्गीय लोकांमध्ये सगळं आयतं मिळत गेल्याने असेल, कमी कौशल्ये असतात. किंवा जी गोष्ट मध्यमवर्गीयाला सहज वाटत असेल ते उच्चवर्गीयाला कौशल्य वाटू शकते. हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, कदाचित चुकीचेही असेल. आणि उच्चवर्गीयाला स्वतः कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा मोबदला देऊन ज्याच्याकडे कौशल्ये आहेत त्यांच्याकडून हवे ते साध्य करता येणार असेल तर तसेही त्याला स्वतःला ती कौशल्ये शिकण्याचे कारणच नाही.   

काही वर्षांपूर्वी आपल्या घरी एखादा सुतार काम करत असे त्यामध्ये जे बारकावे तो बघत असे, तसे काम आज आपल्याला खूप पिच्छा पुरवल्याशिवाय करून मिळत नाही. पूर्वी एखाद्या गोष्टीला मोबदला देऊन जशी कामे करून मिळत तशी कोणत्याच क्षेत्रात आज करून मिळत नाहीत. कामातला प्रामाणिकपणा कधीच लोप पावला आहे. मोबदला देऊन काम करून घेण्यामध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष दिले नाही तर निकृष्ट दर्जाचे काम पदरी पाडून घ्यावे लागते. किंवा मग त्यासाठी जास्त मोबदला मोजावा लागतो. चांगली कामे करणारी माणसे मिळणे अवघड होत चालले आहे.
  
जेव्हा आपण मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा असे जाणवते की काही वर्षांपूर्वीचा मानव आजच्या माणसापेक्षा जास्त कुशल होता. काही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या हजारो वर्षांपूर्वी माणसाने सहज करून ठेवल्या त्या आज तंत्रज्ञान वापरूनही शक्य नाहीत. कौशल्य विकसित करणे आणि ते वापरून अजरामर कलाकृती करून ठेवणे यासाठी लागणारा संयम आता माणसामध्ये राहिलेला नाही. जगाने इतका वेग पकडला आहे की कौशल्य शिकायचं तेही पैसे मिळवण्यासाठीच. अन्यथा तो वेळेचा अपव्यय ठरतो. त्यामुळे अशी इच्छा आहे की कधीतरी जगाचा वेग कमी व्हावा आणि प्रत्येकालाच आपल्या कौशल्यामध्ये मनापासून रमण्याची संधी मिळावी.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६