शुक्रवार, २७ मे, २०११

राउळी... मंदिरी...

              देऊळ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते एक अशी वास्तू जिथे मनाला शांतता मिळेल, त्या शांततेत ईश्वराशी एकरूप होऊन आपण स्वत:शी संवाद साधू शकू, जिथून आल्यानंतर मन अगदी हलकं असेल. मला आठवतंय आमच्या गावी अशीच मंदिरे असायची त्यातलं एक होतं नदीच्या काठावर. लहानसंच मंदिर, शेजारी चिंचेचं मोठ्ठं झाड, आणि मंदिराच्या आवारात त्या सावलीचा गारवा. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली नदीकडे जाणारी पाउलवाट. काय प्रसन्न वाटायचं तिथे गेलं की. गावात अजून एक मंदिर, हे मंदिर मात्र भरवस्तीत, गावात यात्रा असते त्या ग्रामदेवतेचं! त्यामुळे इथे कायमच कडेकोट बंदोबस्त, आणि देव आत कुलुपात बंद. पुजाऱ्याच्या वेळेत गेलं तरच तिथे देवाचं दर्शन मिळणार.

            हा फरक का?तर गावातला देव श्रीमंत आणि नदीकाठचा गरीब. गावातल्या देवाच्या गाभाऱ्यात चांदीचं मखर, आणि नदीकाठच्या मंदिरात फक्त एक साधी मूर्ती. हल्ली तर सगळेच देव असे श्रीमंत होऊ लागले आहेत. श्रीमंत देवांना भेट देणाऱ्यांच्या रांगाही मोठ्या, भेट देणारेही मोठे, त्यांच्या दिमतीला असणाऱ्यांची संख्याही मोठी अन त्यांना येणाऱ्या भेटवस्तूही भव्य. कोणी यांच्या हुंडीत सोन्याचे, हिऱ्याचे दागिने टाकतो, कोणी पैशांची पुडकीच्या पुडकी टाकतो, कोणी उंची वस्त्रे टाकतो. इथे सामान्य भाविक चार तासांपासून ते दोन-दोन दिवसांच्या रांगेत तिष्ठत थांबतो आणि दर्शनाची वेळ झाली की त्याला डोळाभरून ज्याच्यासाठी आला त्याला पाहताही येत नाही. यातून किती जणांना देवदर्शनाचे समाधान मिळते माहिती नाही, पण मला तर नक्कीच मिळणार नाही. उलट तिथला रांगेच्या लवकरच्या क्रमांकापासून ते अभिषेकापर्यंत आणि देवाला वाहण्याच्या उदबत्तीपासून ते  मिळणाऱ्या प्रसादापर्यंत प्रत्येक गोष्टीतला भ्रष्टाचार पाहून मन विषण्ण होतं.

             अशा मंदिरांना भेट दिली की एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या बाजारात गेल्यासारखंच वाटतं. यापेक्षा एखादं  दुर्लक्षिलं गेलेलं मंदिर असेल तर तिथे जाऊन पाच मिनिटे बसण्यानेसुद्धा खरंच मंदिरात गेल्यासारखं वाटतं. कळत नाही आपण का आपल्याच देवांना आपल्यापासून दूर लोटतोय? आपण का त्यांना VIP बनवतोय? आपलंच देवाला भेटणं आपणच का महाग करतोय? अजून किती देवस्थानांना पंचतारांकित व्हायचे वेध लागणार आहेत माहिती नाही, पण तिथे काहीच समाधान मिळणार नाही हे खरंच.

              नास्तिक लोकांसाठी ही पोस्त नाही, आस्तिक असूनही मूर्तीपूजा न मानणाऱ्यांसाठीही नाही. बरेचसे लोक वास्तुशास्त्राचे नमुने किंवा केवळ मूर्ती पाहण्यासाठीही मंदिरांमध्ये जातात. पण या सर्वांना सुद्धा मंदिराचं वातावरण भारावून टाकतं. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर देवळात जाणे म्हणजे केवळ औपचारिकताच राहील.



छायाचित्रे आंतरजालावरून

१३ टिप्पण्या:

  1. मला नास्तिक आणि आस्तिक हा प्रकार कळत नाही. माझ्या मते देवावरील श्रद्धा म्हणजे मनासारख घडाव अशी इच्छाशक्ति नव्हे तर मनासारख न घडल्याच दू:ख सहन करण्याची शक्ति होय. आमच्या उरण मध्ये असे एक ठिकाण आहे जीवन मुक्त स्वामीचा आश्रम त्याला "मठी" म्हणतो तीअकडे जाऊन खूप शांत वाटत. तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत.

    उत्तर द्याहटवा
  2. तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत.
    sooo true... :)
    धन्यवाद निवी.....

    उत्तर द्याहटवा
  3. तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत.... वाह निवी! अचूक मारलास

    उत्तर द्याहटवा
  4. इंद्रधनू पोस्ट छान झाली आहे.
    देऊळ म्हंटले कि साधेपणा हवा.हा साधेपणा कोण ठरवणार तर आपणच सगळे,भाविक,भक्त.
    दिखाऊपणा,श्रीमंती,देवळाच्या वर ह्याचा परिणाम दिसू लागला.देणग्या, थाटमाट ह्याने देव पावला असता तर आज सगळीकडे अंधाधुंदीच असती.
    गरीबाचा देव,श्रीमंताचा देव अस नसते न,सर्वांना आपल्या छत्राखाली घेणारा बाप्पा असतो तो.
    पण बदलत जाणाऱ्या समाजाला कोण थोपवणार?भक्ती किती उरली आहे ?देवळाची पायरी चढताना खरच देवाला भेटायला किती लोक येतात?निर्व्याजपणे?
    काहीतरी दिले कि काहीतरी मिळणार अश्या अपेक्षा ठेवूनच भक्तीचा व्यवहार मांडला आहे.कुठेतरी बदल हवाच.

    उत्तर द्याहटवा
  5. तुमचा लेख आवडला.

    अनेक ठिकाणीं 'देव पावतो' म्हणूनही गर्दी होते. अशा ठिकाणी लोक त्या ठिकाणाच्या शान्ततेचा आनन्द घ्यायला ज़ात नाहीत, तर भेटीची लाच द्‌यायला ज़ातात. या गोष्टींना माझा आक्षेप नाही. स्थानाचा महिमा वाढला की तिथे भ्रष्टाचार, बकालपणा वाढणारच. अगदी कन्याकुमारीला त्या ॐ वाल्या खोलीत फार गर्दी असेल तर शान्ती कमी मिळते. त्याला इलाज़ नाही.

    आणि सध्या सगळ्यांज़वळच तुलनेनी पैसा जास्त आहे. त्यातला काही भाग गेला पुजार्‍याच्या वा आमदाराच्या खिशात, तर काय बिघडतंय? ज्यांना मन:शान्ती हवी असेल त्यांनी ती जिथे मिळेल ते मन्दिर शोधावं.

    उत्तर द्याहटवा
  6. ज्या मन्दिरात जाताच क्षणी एक गारगार वातावरण जाणवतं ना, ती मंदिरे माझी मन:शांती करायला संप्रेरक म्हणून काम करतात असं माझ्या लक्षात आलंय. पुण्यात खुन्या मुरलीधराचे किंवा पु.वि.ग्रुहाजवळ असलेले मंदीर, किंवा मंगळवारात एका वडाच्या बुंध्याशी एक छोटेखानी गणेश मंदीर आहे तिथे गेले की मन आपोआप एकवटते. अश्या काही जागा असतात ना की तिथे गेल्यावर शुन्याची अनुभुती मिळते. अशी मंदिरे सोडून माणूस दुसरीकडे पळतोय.

    व्यावसायिकांच्या मंदिरात मनुष्य देव हरवून बसला आहे हे नक्की.

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद श्रिया :)
    पण बदलत जाणाऱ्या समाजाला कोण थोपवणार?
    अगदी खरं, काहीतरी हवंय म्हणून देवाकडे जायचं असंच दिसतं हल्ली सगळीकडे

    उत्तर द्याहटवा
  8. Naniwadekar ji, आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार, ब्लोगवर स्वागत :)
    >>लोक त्या ठिकाणाच्या शान्ततेचा आनन्द घ्यायला ज़ात नाहीत, तर भेटीची लाच द्‌यायला ज़ातात
    तुमचा सर्वच म्हणणं अगदी पटतंय.. आणि हा प्रकार आता थांबण्यापलीकडे गेलाय असं वाटतंय..

    उत्तर द्याहटवा
  9. धन्यवाद अर्जुन...
    >>व्यावसायिकांच्या मंदिरात मनुष्य देव हरवून बसला आहे हे नक्की..
    :((

    उत्तर द्याहटवा
  10. इन्द्रधनूबाई : पूर्वतरंग म्हणजे काय?

    आणि 'धन्यवाद निवी' + 'निविकडून धन्यवाद' म्हणजे इथे दोन nivi आहेत की काय, एक दीर्घ आणि एक र्‍हस्व.

    > काहीतरी हवंय म्हणून देवाकडे जायचं असंच दिसतं हल्ली सगळीकडे
    >---

    आधीही असाच प्रकार होता. देव भीतीपोटी की भावापोटी, असा एक लेख कोणीतरी लिहिला होता. तुमचा-आमचा देव बहुतांश भीतीपोटी असतो, तेव्हा लाच देणं आणि त्याच्यासाठी खिशात मनी बाळगणं आलंच. एखादी मीराबाई, एखादा तुकारामबोवा हेच काय तो अस्सल भाव मनी बाळगतात. उपासतापास हीदेखील देहताडनाद्‌वारे दिलेली लाच असू शकते.

    तुमच्या लेखाच्या मुळाशी भाविकता विरुद्ध स्वार्थ हा लढा नाही, तर शान्तता वि भपका हे द्‌वंद्‌व आहे असं मला वाटतं. आणि शान्तता वि अमिताभ बच्चनच्या सिनेमातला अर्थशून्य कोलाहल या लढ्यात मर्ढेकर आणि योगी बेरॅच्या (Yogi Berra) पद्‌धतींत सांगायचं झाल्यास ९९ टक्के लोक ९९ टक्के वेळा 'मनात आले तर बच्चनजी' असा कौल देतात.

    (Yogi Berra's quote is normally given as: 'Baseball is 90% mental, the other half is physical.' But I had first read it as: '90% of Baseball is 90% mental', and that's a better one.)

    - Naniwadekar

    उत्तर द्याहटवा
  11. Naniwadekar ji,
    >>पूर्वतरंग म्हणजे काय?
    हा प्रश्न विचारण्यामागचे कारण समजले तर बरे होईल. उत्तर द्यायला सोपे पडेल

    >>आणि 'धन्यवाद निवी' + 'निविकडून धन्यवाद' म्हणजे इथे दोन nivi आहेत की काय, एक दीर्घ आणि एक र्‍हस्व
    हे दोन्ही ज्यांना आणि ज्यांच्या संदर्भात आले आहे, त्यांना ते समजले आहे.

    >>शान्तता वि भपका
    हो असाच काहीसं चालू होतं मनात लिहिलं तेव्हा. मी जास्त विचार करून लिहित नाही. जे मनात येईल ते लिहिते.

    तुमच्या कमेंट्सवरून तुम्ही चांगलं लिहित असाल असं वाटतंय. तुमच्या ब्लॉगची लिंक मिळेल का?

    उत्तर द्याहटवा
  12. >>पूर्वतरंग म्हणजे काय?
    > हा प्रश्न विचारण्यामागचे कारण समजले तर बरे होईल. उत्तर द्यायला सोपे पडेल.
    >---

    काहीही कारण नाही. कारण काय असणार? 'व्यंकटी' म्हणजे काय, propinquity म्हणजे काय, 'हिंपुटी' म्हणजे काय, 'स्वतोक' म्हणजे काय हे प्रश्न ज़से पडतात तसाच एक प्रश्न. (झालो वियोगे हिंपुटी - तुकाराम.) इथे तर 'तरंग' वगैरे शब्दाचे उपभाग नित्यपरिचयाचे आहेत, पण त्यांची ज़ोडी कधी पाहिलेली नाही.

    माझा ब्लॉग नाही. ज़े काही लिहिलं आहे (मराठीत फार कमी, इंग्रजीत जास्त) त्यातला बहुतांश भाग नेटवर शोधल्यास सहज़ मिळतो.

    उत्तर द्याहटवा