गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

सुखान्त

एखादी कथा-कादंबरी असो वा नाटक-चित्रपट, तुम्हाला सुखांत पाहायला आवडतो की शोकांतिका? शक्यतो सुखांतच ना? कथा नायक-नायिकेच्या आयुष्यात कितीही हेलकावे आले, त्यांच्यावर अन्याय झाला, पण शेवटी त्यांना न्याय मिळाला की आपल्याला तो सुखांत वाटतो आणि बरं वाटतं. बरं शोकांतिका आपल्याला अगदीच आवडत नाहीत असंही नाही. ते पाहूनही आपण हळहळ व्यक्त करतोच; असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण खरं सांगा, सुखांत असला की ते "नाटक" वाटतं आणि शोकांतिका असली की खरी नसली तरी "that's life" असं वाटतं ना? 

आयुष्यात प्रत्येकाचा पदोपदी काही ना काही संघर्ष चालूच असतो, म्हणून तर निदान पडद्यावर, पुस्तकांमध्ये तरी सुखांत वाचून-बघून मनाला कुठेतरी समाधान मिळत असावं. प्रत्येकाचंच मन 'हे काय खोटं आहे' म्हणून तटस्थपणे सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. आपणही त्या कथेतील पात्रांच्या गोष्टीत नकळतपणे गुंतले जातो. कथा-अभिनय-दिग्दर्शन खूपच परिणामकारक असेल तर पाहिलेल्या गोष्टीचा परिणामही पुष्कळ दिवस टिकतो. आणि हे सगळं उथळ असेल तर तेवढ्यापुरतं बघून आपण सोडून देऊ शकतो. आपलं आयुष्यही सुखांतच असावं असं कोणालाही वाटतंच.

पूर्ण आयुष्य तर द्या सोडून; पण जगत असताना कितीतरी छोटे छोटे प्रसंग येतात की ते सुखांतच असावेत अशी कोणाचीही इच्छा असते. शालेय जीवनापासूनच हा खेळ सुरु होतो. परीक्षेचा सुखांत - चांगले गुण मिळवणे, महाविद्यालयाचा सुखांत - चांगली नोकरी मिळणे, नोकरीसाठी मुलाखती दिल्या - चांगलं पॅकेज मिळून नोकरीचा होकार येणे, व्यवसाय करायचा झाला तर नफा होण्यास सुरुवात होणे. घर बांधायला काढलं, किंवा सदनिका खरेदी केली, त्याचं बांधकाम मनासारखं पूर्ण होणे. लग्न करायचं म्हटलं तर प्रेमविवाहात काय किंवा ठरवून केलेल्या विवाहात काय आवडलेल्या जोडीदाराने होकार देणे. गरोदरपणाचा सुखांत - सुदृढ बाळ जन्माला येणे, अचानक काही आजार उद्भवला - त्या आजाराला हरवून पुन्हा उभे राहणे. बापरे अजून खूपच मोठी यादी होईल ही.

खरं सांगू का, सुखांत बघायला आपल्याला आवडतो सगळ्यांना, पण वरच्या या सगळ्या गोष्टी, आणि इतरही अनेक समस्या आयुष्यात असतात की आपल्या मनासारखं नाही होत सगळं. किंबहुना अगदी मूठभर थोड्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. बाकी इतर अनेक गोष्टी "that's life" म्हणून आपल्याला सोडून द्याव्या लागतात. प्रत्येक गोष्ट सुखांत किंवा शोकांतिका यांच्या साच्यात न बसवता, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, याचा अर्थ ती शोकांतिकाच आहे असा नाही. आपल्या मनाने ती गोष्ट कशी स्वीकारली यावर तो सुखांत की ती शोकांतिका हे ठरेल हे बिंबवणं जास्त महत्त्वाचं आहे ना! आणि आत्ता एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली म्हणून आपल्याला वाईट वाटेल, पण काही काळ जाऊन दिल्यावर कदाचित समजेल की तेव्हा जे मनासारखं नाही झालं त्यामुळे आता त्याचा सुखांत होणार आहे असंही होऊ शकतं ना!




गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

विहीर

"अच्छा ९३ ? ठीक आहे मग."

ठीक आहे? एखादी व्यक्ती या जगातून गेली तर ते ठीक असतं का, तिचं वय ९३ आहे म्हणून?

काही वर्षांपूर्वी आजी गेल्यानंतर विचारपूस करताना बाहेर कोणाशीतरी झालेलं हे संभाषण चांगलंच डोक्यात बसलंय. आणि ती आजी नसून खरं तर माझी पणजी आजी होती हे समजलं असतं तर अजूनच जास्त ठीक होतं ना. मला खरं तर तिच्या आठवणीने हुंदका अनावर होत होता, पण समोरून अशी प्रतिक्रिया आल्यावर काय पुढे बोलणार?

किती तरी वेळा 'गेलेल्या' व्यक्तीशी आपलं काय नातं आहे यावर पण सांत्वन अवलंबून असतं. नात्याने ती व्यक्ती समजा लांबची कोणी असेल पण आपल्या आयुष्यावर तिचा खूप प्रभाव असेल, किंवा रोजची उठबस, मानसिक जवळीक असेल तर त्या व्यक्तीशी 'जवळचं नातं नाही' म्हणून आपल्याला ती गेल्याचं वाईट नाही वाटणार? पण हे तुम्ही कोणाला सांगायला गेलात तर ते नक्कीच म्हणतील, अच्छा मावस आजोबा किंवा चुलत आजी काय, मग 'ठीक' आहे. हाच अनुभव आजेसासूबाई गेल्या तेव्हा आला. एकांनी विचारलं अच्छा नवऱ्याची आजी का, मग तो ओके आहे ना आता? हो त्याला नक्कीच दु:ख झालं पण माझीही त्यांच्याशी तेवढीच जवळीक होती. त्याच्यानंतर तरी विचारा की मी पण ओके आहे का? 

घरातला सगळ्यात पहिला मृत्यू पाहिला तेव्हा मी आठवी-नववीला असेन. तसं तर अगदी न कळतं वय नव्हतं पण मनाच्या हळवेपणाचं वय खूप लहान होतं. एखादी व्यक्ती अचानक आता आपल्यामध्ये नसणार आणि ते आपण प्रत्यक्ष अनुभवायचं हा विचारही नकोसा झाला होता. पहिले दहापेक्षाही जास्त दिवस मी फक्त रडूनच काढले. शाळेच्या सुट्ट्या चालू होत्या. घरातली मोठी माणसं रडत नाहीयेत, त्यांना माझ्यासारखी, माझ्याइतकी आठवण येत नाहीये, किंवा ते ती दाखवत नाहीयेत म्हणजे त्यांना माझ्याइतकं दु:ख झालंच नाहीये असं वाटायचं.

नंतर काही वर्षांनी 'विहीर' चित्रपट आला, आणि वाटलं हेच ते! हीच माझी भावना कोणाला तरी समजली आहे. आणि माझ्यासारखे असे अनेक असणार जगामध्ये, म्हणून तर त्या विषयावर चित्रपट निघाला ना! खरं सांगू का गेलेल्या व्यक्तींचं दुःख तर असतेच पण आपली भावना कोणाला तरी समजली यामुळे तो चित्रपट पाहून खरंच खूप समाधान वाटलं होतं तेव्हा! लहान वयात, किंवा हळवं असण्याच्या वयात आपल्या जवळचं कोणी जग सोडून जाऊ नये हेच खरं.

आता विहीर पाहून पण बरीच वर्षे झाली आणि मनाच्या हळवेपणाचं वयही वाढलं आहे. त्यानंतर दोन व्यक्ती गेल्या जवळच्या. आणि मला सतत दहा-बारा दिवस नाही रडू आलं. आठवण येतच होती. पण त्यापुढे काहीतरी होतं, इतर कामं, इतर व्याप पुढे आणि आठवण त्यांच्या मागच्या थराला होती. काहींना खूप लहान वयात हे जमतं काहींना बरंच मोठं व्हावं लागतं आणि काहींना कधीच जमत नाही. कधीच न जमण्यापेक्षा सध्याची स्थिती बरी आहे, नाहीतरी रामदास स्वामी म्हणूनच गेले आहेत "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे।।"

आपल्या जवळचं कोणी गेलं तर समोरच्याने कशी प्रतिक्रिया द्यावी हे आपल्या हातात नसतं पण आपण किती लवकर सावरावं हे मात्र आपल्याच हातात असतं. जितकं लवकर इतर कामांना लागू तितकं जास्त चांगलं, म्हणून कधी कधी वाटतं वर दिली तशी प्रतिक्रिया देणारीच माणसं जास्त भेटली पाहिजेत.





गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

पितृ पक्ष

सध्या पितृपक्ष चालू आहे, भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष. कोणाचा यावर विश्वास असतो तर कोणाचा नाही. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांनी इहलोक सोडला, त्या तिथीला त्यांच्यासाठी श्राद्ध विधी करतात. तसं तर या नैवेद्यामध्ये भरपूर पदार्थ केले जातात. आणि ते कसेही केले तरी चविष्टच होतात. पण लोकांमध्ये या नैवेद्याबाबत बरीच मतमतांतरे आहेत.

कोणी म्हणते की हे जेवण दुःखाचे असते त्यामुळे आपण ते इतर वेळी ताव मारून, 'वा काय छान झालंय' असं म्हणून खातो तसं खाऊ नये, तर कोणी म्हणते हे जेवण पितरे येऊन जेवून जातात आणि समाधानी होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तर आपणही जेवताना समाधानी, आनंदी असावे.

जसे जेवणाबद्दल तसेच इतर काही गोष्टींबद्दलही असेच उलटसुलट समज आहेत. कोणी म्हणते या काळात शुभ कार्य करू नये. सोने, घर, वाहन इत्यादी खरेदी करू नये, थोडक्यात आनंददायी काहीही करू नये. नवीन काही सुरु करू नये. तेच कोणी म्हणते की या काळात नवीन सुरुवात किंवा खरेदी केल्याने पूर्वजांनाही आनंदच वाटेल आणि ते आशीर्वादच देतील, तर देवाबरोबरच पूर्वजांचेही आपल्याला आशीर्वाद मिळतील.

तसं तर हे नंतरचे सगळे विधी आपण करूच, पण जिवंतपणी कोणाचीही काळजी घेणे जास्त महत्वाचं आहे ना. नाहीतर असंही पाहिलं आहे की घरातील एखादी व्यक्ती जराजर्जर होऊन मरण पावल्यानंतर घरातल्यांकडे त्यांचा सध्याचा फोटो सुद्धा नसतो, तो कोणाकडे मिळतो तर त्यांची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीकडे! आई - बापांना मरण येते वृद्धाश्रमामध्ये! ते काय आपल्या वंशजांना आशीर्वाद देणार?

जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच. तसंच हे आपलेच पूर्वज, तर त्यांचे स्वभाव आपल्यालाच माहिती असणार ना. "आमच्या वेळी असं नव्हतं" ही एक प्रसिद्ध उक्ती आहे. काही लोक असे असतात की माझं बालपण असं गेलं, आम्ही असे राहिलो तर तुम्हीही तसेच रहा. तर कोणाचं असं असतं की आमच्या वेळी असं नव्हतं पण तुम्हाला मिळतंय ना मग तुम्ही त्याचा आनंद घ्या. आपल्या १ -२ पिढ्या आधीच्या लोकांमध्ये जिवंतपणीच मोठ्यांचा इतका धाक असायचा की पितरांचा धाक नक्कीच असणार! पण आपण गेल्यावर आपली पित्रे घातली जातील (?) तेव्हा नक्कीच आपले वंशज अशा धाकामध्ये नसणार.  

आपले पूर्वज यापैकी कोणत्याही प्रकारातले असले तरी आपण आदरपूर्वक त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना नक्कीच आवडत असेल. समजा हे सगळं खोटंच असेल, पण त्या निमित्ताने होणारा दानधर्म कोणाला तरी नक्कीच उपकारक ठरत असेल. पितृपक्षात तुळस, आंबा, पिंपळ इत्यादी काही झाडे लावावीत म्हणतात, ते देखील आपल्याला उपकारकच नाही का! नैवेद्य वगैरे काहीच जमत नसेल तर दानधर्म करणं आणि ते होते म्हणून आपण आहोत ही कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या आठवणींमध्ये थोडा काळ रमणं आपल्याच मनाला मोठं समाधान देऊन जाणारं आहे ना.