काल सत्यमेव जयते पूर्ण पाहिला नाही पण जातीभेदावर आधारित होता. त्यातला धर्माधिकारींचा भाग तेवढा पूर्ण
पाहिला. नंतर त्यावर विचार केल्यावर वाटलं, भारतातून जातीभेद नष्ट होणे खरंच शक्य आहे का? माझं स्वत:चं मला मिळालेलं उत्तर आहे नाही, भारतातून जातीभेद नष्ट होणे शक्य नाही. फारतर हल्ली आपण एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करत नाही, मित्रांमध्ये असताना किंवा मैत्री करताना "जात" कधी आड येत नाही. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर टोकाचे जातीभेद सध्या फारसे कुठे दिसत नाहीत. काही अपवाद असतात, पण निदान पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी शाळेत, कार्यालयात सर्व जाती-धर्मांचे लोक मैत्रीपूर्वक एकत्र दिसतात. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्या देशातून जातीभेद नष्ट झाले आहेत?
जात नष्ट होईल अशी परिस्थितीच आपल्या देशात नाही तर ती नष्ट कशी होईल? मुलाला शाळेत प्रवेश घेताना फॉर्म भरायचा तर त्यावर जात-पोटजात असते. ती पुढे दर वर्षी प्रगती-पुस्तकावरही मिरवली जाते. वर्गात दर वर्षी "ओपन" कोण, "ओबीसी" कोण, "एसटी", "एनटी" कोण? हे जाहीररीत्या विचारले जाते. कोणतेही सरकारी कागदपत्र असो, त्यावर "जात" अनिवार्य असते. जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही, आणि सरकारी वा कोणत्याही "फॉर्म"वर जात विचारणे बंद होणार नाही, तोपर्यंत या देशातून जात नष्ट होणार नाही. सर्वांना जर समान दर्जा हवा तर रिझर्वेशन सुद्धा आर्थिक निकषांवर हवे. अन्यथा ज्यांची ना टक्केवारी चांगली, ना आर्थिक परिस्थिती खराब अशा कोणाला योग्यता नसताना प्रवेश मिळतो, पण "ओपन" या एका कारणामुळे उच्च जातीयाला तो मिळत नाही, तेव्हा तेढ निर्माण होणे सहाजिक आहे.
कौटुंबिक स्तरावर पाहायचे झाले तर जात म्हणजे लग्न जमवताना सर्वात महत्त्वाचा निकष असतो. कितीही उच्च विचार असले, इतरांबद्दल कळवळा असला तरी अपत्याचे लग्न जमवताना मात्र येथे जातीचे पाहिजे. कोणी स्वत:चा जोडीदार स्वत: निवडला असेल तरी घरून पहिला प्रश्न येतो "आपल्यातली"/"आपल्यातला" आहे का? याचे मुख्य कारण असे मानले की प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात, तरी प्रश्न असा उरतो की आपल्याकडे मुळात प्रत्येकासाठी वेगळ्या चालीरीती का आहेत? आणि दुसरा प्रश्न, हल्ली अशा काही चालीरीती उरल्या आहेत का? आणि समजा एखाद्याला दुसऱ्याच्या चालीरीती माहिती नसतील, तर त्या शिकायला असा कितीसा वेळ लागणार आहे?
अशा प्रकारे जातीव्यवस्था ना सरकारी पातळीवर संपुष्टात येऊ शकते ना वैयक्तिक पातळीवर. वेद सांगतात वर्ण कर्माने ठरतो, जन्माने नव्हे. पण हे लक्षात न घेता जात जन्मानेच ठरवली जाते, कर्माने नव्हे. आपल्या देशाची आणि धर्माची शोकांतिका म्हणजे आपले ग्रंथ काय सांगतात यापेक्षा प्रचलित काय आहे तेच ग्राह्य धरले जाते, आणि कर्माने जात मानण्यापेक्षा जन्माने मानणे हाही अगदी हाडामासात मुरलेला प्रचलित प्रकार आहे, जो सध्या तरी नष्ट होणे संभव दिसत नाही.