गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

असंच...


                मुसळधार पाऊस कोसळतोय बाहेर. माझं गाणी ऐकता ऐकता काम चालू होतं. पण पाऊस ऐकायचा होता म्हणून गाणी बंद केली. पावसाचा मस्त सरसर सरसर लहान मोठा होत जाणारा आवाज.... मधेच गडगडणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा... अंधारलेला आसमंत आणि परिसर... वाटलं आता आपली पाऊसगाणी ऐकावीत.... पण कानाला इअरफोन लावला तर पावसाचा आवाज गुडूप आणि नाही लावावा तर एकेका अशा गाण्याची आठवण येतेय की ते अशा पावसात ऐकायलाच हवं... पण काय करणार हापिसात आहे ना मी.... कान पावसासाठी ठेवून मोठ्याने गाणी लावू शकत नाहीये :(  त्यातल्या त्यात इअरफोन एकाच कानाला लावून दुसऱ्या कानाने पाऊस ऐकते आहे. बरं झालं देवा दोन कान दिलेस ते.....

             खिडकी उघडताच एसीच्या हवेपेक्षा खूपच आल्हाददायक गार हवेचा झोत आत आला. बाहेर नजर टाकली तर वाऱ्याच्या शिळेला साद देत झाडं चिंब भिजत त्यावर डोलत होती, पारव्यांचे थवे मस्त भिजून इथल्या इमारतीच्या आश्रयाला आलेले; ते ही जोडीजोडीनेच, आधीच पावसानेच साचलेल्या पाण्यात थेंबांचं नक्षीकाम चाललेलं... एका थेंबाने पडून स्वत:भोवती रिंगण तयार केलं लगेच शेजारी दुसरा थेंब आला, त्याने स्वत:चं वेगळं रिंगण तयार केलं पण दोन रिंगणं पाहता पाहता कधी एकमेकांत मिसळून गेली समजलंही नाही... रस्ते नद्या झालेले, चहाच्या नद्या.... चहा...? हो चहा तर हवाच अशा मस्त पावसात... लगेच चहाही आला... थोड्या तडजोडीने का होईना सगळंच तर झालं मनासारखं... कमी राहिली ती एकच... सोबतीला फक्त तू हवा होतास...
            

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

गोडबोले बाई


            "पाय अस्वच्छ होऊ नयेत म्हणून जितका जपतोस तसंच मन अस्वच्छ होऊ नये म्हणूनही जप हो बाळ, मनाला नेहमी निर्मळ ठेव!" हे चौथीत असताना निबंध लिहिताना श्यामच्या आईच्या तोंडी घातलेलं वाक्य. बाईंनी ते वाचलं आणि ते वाचून त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं ते फक्त कौतुक. बाई म्हणाल्या "अगं एवढीशी चौथीतली मुलगी तू, तुला हे 'जप हो बाळ' सुचलं तरी कसं?" मला खरंच माहिती नाही कसं सुचलं तेव्हा. बाई जसं बोलायच्या जशा वागायच्या त्याचीच तर कॉपी करायचो आम्ही. आमच्या सर्वांच्या लाडक्या गोडबोले बाई. 

            घर बदलल्याने चौथीत लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या "शारदा विद्या मंदिर" मध्ये प्रवेश घेतला. बाबांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव दिलं आणि गोडबोले बाईंच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य लाभलं. सकाळी ७ ते १२ शाळा असायची. नंतर १ पर्यंत शिष्यवृत्तीचा तास असायचा आणि हा तास झाला की बाई आम्हा निवडक सहा जणांना त्यांच्या घरी घेऊन जायच्या. आपटे रस्ता ते सदाशिव पेठ पुढे बाई आणि मागे आम्ही सहा जण. जाताना अधूनमधून ऊन लागायचं तर मधूनच झाडांची सावलीही लाभायची. उन्हातून चालायला लागलो की आम्ही सगळे ढेपाळून जायचो. मग बाई म्हणायच्या उन्हातून नेहमी भरभर चालायचं म्हणजे ते जाणवत नाही, आणि सावली आली की सावकाश चालायचं. तेव्हा या वाक्याचा अर्थ फक्त चालण्यापुरताच लक्षात आला होता...

            बाईंनी एकदा कुठल्याशा वक्तृत्व स्पर्धेत माझं नाव दिलं होतं. लोकमान्य टिळकांवर भाषण लिहून दिलं होतं आणि  ते पाठ करायला सांगितलं होतं. ते पाठ झाल्यावर मी आईला ते म्हणून दाखवलं. बरं दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणून दाखवावं; तर मी सारखंच दर दहा मिनिटांनी ऐकण्यासाठी आईच्या मागे लागे. आई एकदा वैतागली आणि म्हणाली, "झालंय आता छान पाठ, आता शाळेत एकदा म्हणतेस ते पुरे आहे". तर मी आईला म्हणाले, "अगं असं कसं बाईंच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा होईल ना". आईने हे ऐकलं आणि हसतच सुटली. बाई एकदा म्हणी शिकवत होत्या. म्हण होती "भरवशाच्या म्हशीला टोणगा". बाईंनी उदाहरण दिलं , "समजा मला तुम्हाला कुठल्या स्पर्धेत पाठवायचं असेल, आणि मी ठरवलं की चला कोणी नाही बक्षीस मिळवलं तरी प्राची मिळवेलच बरं का... आणि ऐन स्पर्धेच्या दिवशी प्राची पुढे स्टेजवर गेली आणि तिला अगदी पहिलंही वाक्य आठवलं नाही तर झाला ना माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा..." तेव्हा 'भरवशाच्या', 'टोणगा' म्हणजे नक्की काय हे ही माहिती नव्हतं पण म्हण आणि अर्थ अगदी लक्षात राहिले.

            पाढे, वर्ग, अवघड गणितं हे सगळं बाईंच्या गणितातल्या युक्त्यांमुळे अगदीच सोपं होऊन गेलं. आणि ते आजतागायत उपयोगी पडतंय. "लॉजिक" म्हणजे काय, किंवा लॉजिकली विचार कसा करावा हे बाईंनी शिकवलं. कॉलेजमध्ये असताना कँपसला जेव्हा इतरांना "apti" चा अभ्यास किंवा तयारी करताना बघायचे तेव्हा फार आश्चर्य वाटायचं. असं वाटायचं की हे एकतर चौथीला scholarship ला बसले नसावेत किंवा यांना शिकवायला गोडबोले बाई तरी नसाव्यात.

            आमच्या सहा जणांपैकी मी तशी अभ्यासात साधारणच होते. एकदा बाईंच्या घरी मुख्याध्यापिका आल्या होत्या, त्यांनी बाईंना विचारलं हीच सहा मुलं का? बाईंनी प्रत्येकाबद्दल एक गुणविशेष सांगितला, त्यात दोघांना हे खूप हुशार आहेत असं सांगितलं, एकाचं गणित खूप चांगलं आहे असं सांगितलं, आणि माझ्याबद्दल सांगितलं होतं की ही मुलगी खूप जिद्दीची आहे. त्या एका वाक्यामुळे आजही काही चढउतार आले की मला प्रेरणा मिळते. त्या वर्षात आमच्या सहाजणांपैकी फक्त धनंजयला शिष्यवृत्ती मिळाली. मला नेहमी गणित आणि बुद्धिमत्तेपेक्षा मराठी अवघड जायचं आणि मराठीमुळेच शिष्यवृत्ती हुकली. तेव्हा फार मनात आलं होतं बाईंना विचारावं की तुमच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला ना म्हणून, पण नाही विचारलं.

            शिष्यवृत्ती नाही मिळाली पण खडतर परिस्थितीत आजपर्यंत जे काही मिळालं ते फक्त गोडबोले बाईंमुळे. बाईंच्या बद्दल जितकं लिहीन तितकं कमीच आहे, आजही कित्येक छोट्यामोठ्या प्रसंगात त्यांची आठवण येते, की गोडबोले बाईंनी असं सांगितलं होतं. बाबा सांगत होते बाईंच्या वाड्याच्या जागी आता मोठी इमारत झालीये. वाईट वाटलं तेव्हा, आम्ही जिथे अभ्यासाला बसायचो ती खोली, तहान लागली की आत पाणी आणायला जायला आम्ही घाबरायचो ते स्वयंपाक घर, जिथे आम्ही रोज नंबर लावून आतून तांब्याभर पाणी आणायचो. ज्या दिवशी ज्याचा नंबर असेल तो एकदम शूर. बाईंचे "सर" गुरुवारी घरी असायचे, त्यांच्या दाढीमुळे आणि ते आमच्याशी कधी बोलत नसल्याने आम्ही त्यांनाही खूप घाबरायचो. बाईंनी प्रेमाने खाऊ घातलेले स्वत: बनवलेले पदार्थ, त्यातही कवठाच्या काचवड्या बाई एकदम भारी बनवत. सगळं आठवलं तेव्हा. शिक्षक म्हणण्यापेक्षा त्यांना गुरु म्हणणेच जास्त योग्य ठरेल. बाईंना भेटण्याची फार इच्छा होते आहे. पण हे सगळं मी त्यांना समोर नाही सांगू शकणार. बाईंना शतश: प्रणाम! शिक्षक असावेत तर असेच.....

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

जादुगार...

"इनमिनाती बबलाबू 
कर दे रुमाल को पंछी तू..."

"हा हा हा... हे पहा कबुतर...."

आणि असं म्हणून त्याने ते कबुतर आकाशात सोडून दिलं. 

एकामागून एक तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या जादू समोर साकार होत होत्या. आणि समोर बसलेली लहान-मोठी मुलं तर सोडाच, पण मोठी माणसंही अचंबित झाल्यासारखी पाहत होती. एकेका जादुनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि भाबड्या डोळ्यांमधून ओसंडणारा आश्चर्यमिश्रीत आनंद.

कार्यक्रम संपला. मुलांसाठी तर सगळं वातावरण भारल्यासारखंच झालं होतं. व्यवस्थापकांनी जाहीर केलं की आता कार्यक्रम संपला, आता जादुगार काका थोड्या वेळाने इथून निघतील. तरीही कोणाला त्यांना भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये या. 

"खरंच तू आमच्यासाठी आलास फार बरं वाटलं" व्यवस्थापक म्हणाले, यावर जादूगाराचं उत्तर.. "अरे मित्रासाठी आणि मुलांसाठी इतकंही नाही करणार मी?" असं बोलत बोलत ते ऑफिसकडे वळाले.

-------------------------------------------------------------------------------

"दीदी, जादुगार काका काहीही करू शकतात का गं?" बबलीने विचारलं.

"हो गं बबली, आपण आता पाहिलं ना, त्यांनी कायकाय जादू केल्या. मला तर वाटतंय की ते काहीही करू शकतात. अगदी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं...." बबलीच्या त्या दीदीने आपल्याला फार समजल्यासारखं तिला सांगितलं.

"होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं?" बबलीने पुन्हा विचारलं.

"नाहीतर काय. हवं तर ऑफिसमध्ये भेटून विचार त्यांना..."

"हो, मी मुळी जाणारच आहे त्यांना भेटायला. मला फार आवडले जादुगार काका"

आणि बबली दीदीचा हात सोडून ऑफिसकडे उड्या मारत पळाली.

ऑफिसमध्ये जादुगार काकांची निघण्याची लगबग चालू होती. बबली जरा घाबरतच त्यांच्याकडे गेली.

थोडा वेळ त्यांच्याकडे पहातच राहीली. जादुगार काकांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पिशवी आवरतच ते बबलीला म्हणाले
"बोल बाळ..."

"जादुगार काका जादुगार काका, तुम्ही काहीही जादू करू शकता?" बबलीने विचारले.

आता काय उत्तर द्यावं ते त्यांना कळेना. पण लहान मुलाची निरागसता राखण्यासाठी ते म्हणाले
"हो बाळ, तुला अजून दुसरी जादू पहायची असेल तर मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा करून दाखवीन हं..."

"काका, पुढच्या वेळेस नको, मला आत्ता करून दाखवाल?" बबलीने धिटाईनं विचारलं.

"आत्ता? बरं तुला काय जादू पहायची ते सांग पाहू..."

"मला इथे येऊन थोडेच दिवस झाले, सगळे म्हणतात माझ्या आई-बाबांना अपघात झाला म्हणून ते देवाघरी गेले, त्यांना देवाच्या घरून परत आमच्या घरी आणाल?......"