गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

महालक्ष्मी

"महालक्षुम्या आल्या", "कशाच्या पायी?", "सुख समृद्धीच्या पायी"!

महालक्षुम्यांना घरात घेताना तुळशीपासून ताम्हणात हळद-चुना मिसळलेल्या पाण्यात एकीने हाताचे तळवे बुडवून हात उमटवायचे, दुसरीने मुखवटे हातात घेतलेलं ताट त्यावर ठेवायचं आणि महालक्षुम्या कशाच्या पायी आल्या आहेत ते सांगत राहायचं. देवघरापाशी, तुळशीपाशी "देवाधर्माच्या पायी", कपाटापाशी "सोन्यारूप्याच्या पायी" "हिऱ्या माणकाच्या पायी", स्वयंपाकघरात "धनधान्याच्या पायी" असं करत करत शेवटी त्यांना स्थानापन्न करण्याच्या जागी आणलं की सुखसमृद्धीच्या पायी त्या तेथे विसावत!


गौरी-गणपती म्हणजे आठदहा दिवस आधीच लगबग सुरु. घराची स्वच्छता, फराळाची तयारी. मी शाळेत असताना सजावटीसाठी काहीतरी नवीन वस्तू घरी बनवत असे. पितळेचे मुखवटे घासून लख्ख करून त्यांना भुवया, डोळे, ओठ, गंध काढत असे. पूर्वी आमच्याकडे गौरींचे धातूचे तीन पाय असलेले स्टॅन्ड होते. त्यामध्ये सर्वात खाली एक मोठा डबा, त्यावर एक लहान डबा आणि त्यावर गडवा असे ठेवायचे. त्यावर स्टँड बसवून त्याला साड्या नेसवून गडव्यावर मुखवटा बसवायचा. डब्यांमध्ये धान्य, बदाम, सुपारी, हळकुंड, रुपया, खारीक असं सवाष्णीची ओटी भरताना ठेवतात ते साहित्य ठेवलं जाई. एका डब्यात फराळ केलेल्यातले गोड पदार्थ लाडू करंज्या वगैरे ठेवलं जात असे. मला स्वतःला पूर्वीपासूनच गोड आवडत नसे आणि आई सांगे या गौरी म्हणजे माहेरी आलेल्या लेकी असतात. तेव्हा मी आईला म्हणे अगं मग त्यामध्ये लाडू करंजी ऐवजी चकली चिवडा भर. आई म्हणे तू बसवशील तेव्हा कर तसं, मला बाई गोडाचंच देऊदेत. आता त्या स्टॅन्ड ऐवजी तयार फायबरचे पाय आणि मुखवटे आईने आणले आहेत. फराळ सगळा पोटात जाण्याऐवजी समोर असतो. आईचं हे एक मला आवडतं. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलायचं तरी मनी भाव तोच. उगीच कर्मकांडाला चिकटून बसायचं नाही.

पूर्वी घरातलं आवरणे, गौरींसाठी मागची आरास वगैरे यात वेळ जात असल्याने आई संध्याकाळी गौरींना आणायची. दुपारी आवरून झालं असलं तरी भर उन्हात नको त्यांना आणायला, संध्याकाळचं येऊदेत म्हणायची. मी खूप लहान असताना आई एकटीच दोन्ही गौरींचं आवरायची. एकदा मी तिला एका गौरीला या वेळेस मी साडी नेसवते म्हणाले आणि छान जमली तेव्हापासून एक गौर ती आणि एक मी तयार करतो. आत्ता मुखवटे असणाऱ्या गौरी साक्षात देवीचं रूप धारण करतात, त्यांच्या हातांवर हळदीकुंकवाचे करंडे दिल्या बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जिवंत होतात. बहुतेक घरात मध्ये गणपती आणि पुढे बाजूला दोन गौरी असतात, पण आमच्याकडे आजी म्हणायची गौरींच्या मध्ये गणपती बसवू नये, कारण माहिती नाही पण आमच्याकडे गणपती बाजूला असतो. पहिल्या दिवशी आमच्याकडे मेथीची भाजी, बाजरीची भाकरी आणि वरण भात हा नैवेद्य असतो.
 
दुसऱ्या दिवशी गौरींना पुरणाचा नैवेद्य असतो. आजी होती तेव्हा सोळा भाज्यांचा असायचा, आता पाच भाज्यांचा असतो. लहान असताना नुसत्या सजावटीची जबाबदारी घेणारी मी स्वयंपाकात कधी मदत करायला लागले समजलंच नाही. आता पाच भाज्या, तिखट पंचामृत, कढी, पाच चटण्या कोशिंबिरी यांची जबाबदारी माझी, पुरणपोळ्या आमटी मात्र अजूनही आईच बनवते. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्णी जेवू घालते. म्हणायचं सवाष्णी पण लहान, मोठे, म्हातारे असे सगळेच असतात त्यात. जेवणाच्या पंगती अजून आहेत तोवरच हळदीकुंकवासाठी गौरींच्या आराशीची तयारी सुरु होते. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायका आईने कोणती गौर केली आणि मी कोणती केली ते ओळखतात. माझ्या लग्नानंतर नवऱ्याला पण हे कोडं घातलं, इतक्या दोन्ही गौरी एकसारख्या दिसून पण तोदेखील दर वेळेस बरोबर ओळखतो. हा दुसरा दिवस फारच लगबगीचा असतो. मी एक वेळ दमून जाते पण आई अजूनही हा लगबगीचा दिवस कसा न दमता पार पाडते याचं कौतुकच वाटतं.
 
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असतं. दही-साखर-भात आणि कानवल्यांचा नैवेद्य दाखवून आई मुखवटे थोडे हलवून ठेवते. पण तसं केल्याबरोबर त्या मूर्तींचे जिवंत भाव नाहीसे होतात. खूप भक्तिभावाने आईने प्रतिकूल परिस्थितीत देखील गौरींचं कधी काही कमी नाही पडू दिलं, आज त्यांनी तिला काही कमी ठेवलेलं नाही. आदल्या दिवशी रात्री आईने कुंकवाचे सपाट करंडे झाकण लावून देवींच्या पुढे ठेवलेले असतात. दुसऱ्या दिवशी ती ते उघडून त्यामध्ये बोटे उमटली आहेत का ते बघते. त्या करंड्यांमध्ये पुसटशा रेषा दिसतात तिला समाधान वाटते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा