सोमवार, ६ जुलै, २०२६

संकुचित

संकुचित मनोवृत्ती म्हणजे काय असते? डबक्यातले विचार वगैरे ठीकच पण रोजच्या आयुष्यात समजा मला कोणी काही अप्रिय बोललं, तर मी ते जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे का, आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्य आहे का याचा विचार करण्यापेक्षा सर्वांत पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे मला कसे काय हे बोलतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे चुका होतात, गैरसमज होतात पण ते दुसऱ्यांनी मुद्दामच केले अशी धारणा ठेवणे. एखाद्या व्यक्तीचा तसा वारंवार अनुभव आला तर गोष्ट वेगळी आहे, पण अशा व्यक्तीकडूनही नेहमीच मुद्दाम केलं जात नसेल ना.

तर माझीसुद्धा अशीच संकुचित मनोवृत्तीच होती पूर्वी. मी काही लहान नव्हते, पण सज्ञान कोणाला म्हणावं हे अठरा या वयावरून ठरण्याइतकं सोपं नक्कीच नाही. मानसिकरीत्या तर नाहीच नाही. तर मी सुद्धा काही लहान नव्हते पण संकुचित होते. कोणी एखादा शब्द अप्रिय बोलला की मला असे कसे म्हणाले, आणि असं का झालं याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा सबबी देत बसणे यामध्ये धन्यता वाटायची. जणू आपलं कधी काही चुकतच नाही असाच नेहमी अविर्भाव असायचा. कोणी बोलल्यावरच कशाला, कधी कुठे आलेल्या अपयशाला सुद्धा सबबीच पुढे असायच्या.

मग आयुष्याच्या एका सुंदर वळणावर तो भेटला. त्याला कोणी काही बोललं, कुठे काही चुकलं की तो आधी त्याच्याकडून काय करता आलं असतं याचा विचार करायचा. मी कधी म्हणाले ते तुला असं असं म्हणाले तर न चिडता ठीक आहे, त्यातला एवढा भाग तर खरा आहे ना असं म्हणून शांत असायचा. कोणत्याही अपमानाला अपयशाला त्याची विक्षिप्त प्रतिक्रिया कधीच नसायची. भले कोणी मुद्दाम त्याच्याशी चुकीचं वागलेलं असू देत. पण त्यातून तो ते माझ्याशी असे वागलेपेक्षा त्यांच्याकडून असं का झालं असावं अशा दृष्टीने विचार करायचा. आणि असं असतानाही लोकांना अशा स्वभावाचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. पण त्यामुळे त्याचं आयुष्य किती सोपं, सुटसुटीत आणि सुंदर आहे हे मला उमगत गेलं.

माझा पटकन प्रतिक्रिया देणारा स्वभावदेखील मग हळू हळू बदलत गेला. ज्यांना मुद्दाम वागायचं ते त्यांच्यापाशी. आपण त्यातून त्यांची काय अगतिकता असेल म्हणून ते असे वागले असतील हाच विचार करायचा. गैरसमज असतील तर आपण म्हणतो माझीच बाजू खरी ते ठीके, पण दुसऱ्याचीही काही बाजू असेलच, ती काय असेल ते पण बघू, समजावून घेऊ असा बदल होत गेला. त्याचा मला आयुष्यात सगळीकडेच फायदा होतो. कुटुंबातील सगळ्या व्यक्तींमध्ये वावरताना, ऑफिसातील लोकांमध्ये काम करताना, मैत्रीमध्ये आणि सगळीकडेच. राग येतच नाही असं नाही. पण तो धुमसत राहण्यापेक्षा शांत होत जातो. स्पष्ट बोलल्याने गैरसमज दूर होत जातात. 

एखाद्याच्या सहवासाने आपलं आयुष्य बदलते असं म्हणतात ना. अशी आपलं आयुष्य सुंदर करणारी माणसं माझ्याप्रमाणेच सर्वांना त्यांच्या आयुष्यात लाभू देत हीच देवाकडे प्रार्थना!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा