दिवसभर लेखाचा विषय लिहून ठेवला, पण लिहिण्याचा आळसच आला. कधीकधी अशी मानसिकता होते की कोणी काही मागितलं नाही, काही डेडलाईन नाही तोपर्यंत एखादी गोष्ट करायचीच नाही. याला सहजरित्या आळसाचं नाव दिलं जातं. पण हा खरंच आळस असतो की थकवा असतो? बऱ्याचदा बराच निवांत वेळ घालवणाऱ्या माणसालादेखील काही गोष्टी पटकन करण्याचा हुरूप येत नाही. अशा माणसाला आपण आळशीच म्हणतो, पण त्यालादेखील मानसिक थकवा असेल कदाचित. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्तच धोकादायक. शरीराचा थकवा एखाद्या झोपेनंतर निघून जाऊ शकतो, पण मनाचा थकवा झोपही येऊ देत नाही.
आळशी म्हणजे थकवा नसलेले आणि खरोखर आळशी अशा लोकांचं एक बरं असतं, कोणतंच काम पार पाडण्याची यांना चिंताच नसते. बघू, करू यामध्ये यांना छान वेळ मारून नेता येते. मुळात आळशी माणसे कसलं दडपणच घेत नाहीत. यांना आयुष्याचं मोलाचं तत्त्व समजलेलं असतं आणि ते म्हणजे आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, पण काम काही झाल्यावाचून राहणार नाही. कोणीनाकोणी एखादी गोष्ट करणारच आहे तर आपण का कष्ट घ्या. आणि नाहीच झाल्या काही गोष्टी तरी यांना काही फरक पडत नाही. जगबुडी होत नाही, डोंगर कोसळत नाही.
बौद्धिक आळशी लोकांची अजून एक जमात असते, यांना शारीरिक चार कामे सांगा पण विचार करावा लागेल असलं काही सांगू नका. पुस्तक वाचायला सांगू नका, अभ्यास करायला सांगू नका, कोडी सोडवायला सांगू नका, काही लक्षात ठेवायला सांगू नका. थोडासा मेंदूला ताण पडायला लागला की ते विचारच सोडून देतात. इतर घरातले हुशार, विचारवंत बघून घेतील. आपलंच डोकं खपवलं पाहिजे असं काही नाही. खरंतर संगणक आणि एआय यांनी मारलेल्या मजलीमुळे आपण सगळेच बौद्धिक आळशी होत चाललो आहोत. सहज हाताच्या बोटांवर माहिती मिळते मग वाचन करून ज्ञान मेंदूमध्ये साठवून काय करायचंय?
त्यातून आळशी आणि निगरगट्ट हे जर समीकरण जुळून आलं तर अशा लोकांच्या सहवासात असणाऱ्यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कीवच केलेली बरी. यांना लहानपणापासूनच अशी सवय लागलेली असते की चार बोलणी खा पण काम वाचतंय ना मग बोलणी खाल्ल्याने काही शरीराला भोकं पडत नाहीत. बोला काय बोलायचं ते पण सांगितलेलं काम करणार नाही. एक मात्र छान असतं यांचं की त्यांना अहंकार वगैरे आजिबात नसतो. मत्सर नसतो, क्रोधही नसतो. निम्म्या षड्रिपूंवर इथेच विजय मिळवल्याने बाकीचे तीन सहज हाताळता येतात. शिवाय काही महत्त्वाकांक्षा नसल्याने डोक्यालाही कधी ताप नाही.
घरात टंगळमंगळ केली की ज्याला राहवत नाही असे ते काम करून टाकतात, ऑफिसात टंगळमंगळ केली पण निदान जुजबी दाखवता येत असेल तर ऑफिसमध्येही बाकीचेच काम ओढून नेतात, भले अप्रेजल थोडं कमी होईल पण डोक्याला ताप तर नाही. ठेविले अनंते तैसेचि राहावे ही उक्ती मात्र हे लोक तंतोतंत पाळतात. यांचं कधी बीपी हाय वगैरे होत नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्यांचं नक्कीच होऊ शकतं. तर तुमच्या सहवासात आहेत का अशी कूल माणसं, जी कूल असतात पण आपण त्यांना आळशी म्हणतो?
ज्या अवयवांचा मानवाला वापर आणि उपयोग नाही अशा गोष्टी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपोआप बोथट आणि नष्ट होत जातात. अशा या बौद्धिक आणि शारीरिक आळसाने होणार काय तर मेंदू आणि शरीर दोन्ही हळूहळू मानव गमावून बसेल. अशा या काहीही शिल्लक नसलेल्या माणसाला एआय आणि भविष्यातील प्रगत रोबो सहज हरवून मानव जमत नष्ट न होईल तरच नवल. आता हे रोचक असेल की कृत्रिम बुध्दीमत्तेकडून हरून माणूस नष्ट होईल, की नैसर्गिक आपत्तींनी नष्ट होईल, की आपापसात भांडत नष्ट होईल की उत्क्रांतीच्याच उलट्या गंगेने नष्ट होईल. असो आपण तर नसू बघायला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा