गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

विस्मरण...

         काका, माझे पणजोबा माझी सर्वात आवडती अन लाडकी व्यक्ती. ते माझे आदर्श, मार्गदर्शक, मित्र सर्वच काही होते. त्यांचं वय बरंच होतं तरीही त्यांनी तब्येत चांगली ठेवली होती. पण पिकलं पान कधीतरी गळणारच! मी दहावीत असताना ते गेले. तेव्हा वाटलं मी आता कोणाशी इतकं बोलणार. माझे लाड कोण करणार, मला समजावून कोण सांगणार? खूप खूप रडू आलं. काकांची आठवण आली की रडू यायचं. पण हळूहळू ते कमी होत गेलं. अजूनही आठवण येते पण आता परिस्थिती स्वीकारली गेली आहे.

        मानवी मनाला विस्मरण हे मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. एखाद्या दु:खद घटनेची तीव्रता, त्यामुळे होणारा मानसिक त्रास हा कालौघात आपोआप कमी होत जातो, अगदी कितीही मोठा आघात असला तरीही. 
"काळ" हे सर्वात मोठं औषध आहे म्हणतात ते खरंच. हे विस्मरणाचं  वरदान माणसाला मिळालं नसतं तर जगातली किती दु:ख घेऊन त्याला गोंजारत बसावं लागलं असतं. खरं तर जे शरीराचं तेच मनाचं! नंतरही कधीतरी झालेल्या घटना आठवतात पण जखमा जुन्या झाल्याने त्यांची खूण फक्त उरते क्वचित कधी एखादी कोच पडते वा टाक्यांचे व्रण राहतात, पण वेदना कधीच नाहीशा झालेल्या असतात. जे लोक आत्महत्या वगैरे करतात ते तर मला अगदीच आततायी वाटतात. स्वत:ला थोडा वेळ दिला की अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी विसरली जाणार नाही, किंवा जिच्यावर इलाज मिळणार नाही.

         आपल्यापासून दूर जाणाऱ्या माणसांना आपण म्हणतो तू मला विसरशील. किती खरं असतं ते! शाळेमध्ये, होस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कायम बरोबर असणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला किंवा एखाद्या खास मित्र मैत्रिणीलाही त्यांच्यापासून दूर गेल्यावर आपण विसरून जातो. विसरतो म्हणण्यापेक्षा तेव्हा जसं रोजच ते आपल्याला गप्पा मारण्यासाठी हवे असायचे तसे आता नसले तरी चालतात. सुरुवातीला आपण त्यांना दर आठवड्याला फोन करतो, नंतर महिन्यातून एकदा, नंतर तर असंच जमलं तर. आणि त्याहीनंतर नाहीच जमत बऱ्याचदा. विस्मरणच होतं आपल्याला त्यांचं.

        कोणाशी झालेलं भांडण असो, परीक्षेत नापास होणं असो, कोणी कधी विनाकारण केलेला अपमान असो, कोणामुळे होणारा त्रास असो, प्रेमभंग असो की कोणाचा मृत्यू असो यातील एकही गोष्ट अशी नाही की जी आयुष्यभर सल देईल, थोडं स्वत:ला सावरलं तर "विस्मरण" ही मात्रा तिचं काम चोख बजावते. माणसाने जसं काही गोष्टी लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे तसंच काही गोष्टी प्रयत्नपूर्वक विसरायलाही शिकलंच पाहिजे. एक मात्र आहे की विस्मरण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आज घडलेली गोष्ट उद्या तर लगेच विसरता येत नाही, पण काही काळाने का होईना ती येते हेच खूप झालं. तोपर्यंत मनाला कसं समजवायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं!

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

सुख...

          ययातिला म्हणे त्याचं भविष्य सांगितलं होतं कोणी, की तुला जगातली सगळी सुखं मिळतील पण तरीही तू सुखी होणार नाहीस. लहानपणी हे त्याने ऐकलं तेव्हा त्याचं त्यालाही हसू आलं. सुख मानण्यात आहे म्हणतात. मग सगळेच का सुखी होत नाहीत?

            तोही असाच सुखाच्या शोधात होता. तसा लहानपणापासून ओळखीचा. गरीब पण स्वाभिमानी कुटुंबात जन्मलेला. लहानपणी वडिलांचे बेताल वागणे आणि त्यामुळे आईला होणारा मनस्ताप उघड्या डोळ्यांनी पाहणारा. पैशासाठी कुटुंबाची होणारी वणवण आणि त्याचे चटके सोसलेला. तेव्हाच त्याने ठरवलं, मी माझं कुटुंब याच परिस्थितीत राहू देणार नाही. हे सगळं मी बदलेन. पैसा आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटायचं त्याला! माझ्या आईला मी एक दिवस सुखी करेन. नकळत्या, खेळण्या बागडण्याच्या वयात त्याच्या मनाने दडपण घेतलं. बालपण कोमेजून गेलं. १०-१२ व्या वर्षापासूनच पेपर टाक, दूध लाईन टाक ही कामं त्याने सुरु केली.

             अभ्यासात तर हुशार होताच. दर वर्षी चांगल्या गुणांनी पास व्हायचा. जिद्द अजूनही संपली नव्हती. जे कमवेल ते आईकडे द्यायचा. बसलाही पैसा खर्च होऊ नये म्हणून चालत शाळेत जायचा. काम करत करतच खूप शिकला. चांगली नोकरीही मिळाली. घराला आधार मिळाला. पैशाच्या चिंता तर मिटल्या. त्याला वाटलं आता आपली आई सुखी असेल.

            गरिबीमुळे आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे दूर गेलेले नातेवाईक, लोकांची बोलणी यांचा मारा आपण कणखरपणे सहन केलाय असं तिला वाटायचं पण... पण एव्हाना आईचा स्वभावच बदलला होता.  वागणं संशयी झालं होतं. आधीच रागीट असलेला स्वभाव जास्तच हेकेखोर झाला होता. घरच्यांचा ती सारखा पाणउतारा करू लागली होती. अगदी त्याचासुद्धा. त्याने आईचे हाल पाहिले होते त्यामुळे आईला कधी काही बोलायचं नाही असं त्याने ठरवलेलं. पण आता पाणी डोक्यावरून चाललं होतं. त्याला त्याचं प्रेम असलेल्या मुलीशी लग्न करणंही आईच्या अशा वागण्याने अशक्य होऊन बसलं आहे. आईची लहानसहान गोष्टींवरून चिडचिड, आदळआपट.

              आता पैसा तर भरपूर होता पण घराची शांतता नष्ट झालेली. आईला मानसोपचार तज्ञाची गरज आहे पण हे तिला सांगण्याची ना त्याची हिम्मत ना वडिलांची! घरात लग्न करून तिच्यासाठी सून आणावी तर आई तिच्याशीही पटवून घेणार नाही हे त्याला पक्कं माहितीये. त्याला आईला दु:ख होईल असं काही करायचं नाही कारण मुलाला जन्म देताना आईला किती यातना होतात याची त्याला जाणीव आहे. त्याचा   समजूतदारपणाच  त्याला आता नको झालाय. देव करो आणि तो आधीच्याच खंबीरपणे या सर्वांतूनही लवकर बाहेर येवो.
            

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

तेव्हाची दिवाळी...

            आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी... शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव जाणे, पुढच्या वर्षी ते परत घ्यायलाच लागायचे. आणि मग हुर्ये...... सुरु व्हायची दिवाळीची सुटी!

             सुटी सुरु झाली की आईला साफसफाईमध्ये मदत करायला सुरुवात करायची. दोन-तीन वर्षाआड घराला रंग देण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा पसारा आवरायला काढला की त्यात खूप वर्षांपूर्वी हरवलेले पेन, पेन्सिली, कंपास पेट्या असं बरंच काय काय सापडायचं, फराळाचं खायला मिळाल्यावर होणार नाही इतका आनंद त्या जुन्या वस्तू सापडल्यावर व्हायचा! आणि रंग देऊन झाला की घर एकदम नवीन नवीन होऊन जायचं. आणि मग सगळी आवराआवरी, नवीन पडदे, नवीन बेडशीट, तोरणं...

               त्यानंतर लगबग सुरु व्हायची किल्ला बनवायची, जरा लवकरच बनवायचा कारण दिवाळीच्या मुख्य दिवसांपर्यंत धान्य उगवायला पाहिजे ना. किल्ला बनवायचा म्हणजे जाम धमाल यायची, दिवसभर नुसतं चिखलात खेळायचं. दगड, विटा माती, आणि बाडदानं वापरून सुंदरसा किल्ला तयार करायचा. एकीकडे भेटकार्ड करायला घ्यायची! शिक्षकांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी... मी कधी मिकी वगैरेची भेटकार्ड नाही बनवली. एकतर पानंफुलं, टिकल्या-आरसे चिकटवून किंवा जुनी घरी आलेली पणत्या वगैरे यांची चित्र पाहून तशी काढायची. मग आकाशकंदील तयार करायचा, दर वर्षी वेगळ्या डिझाईनचा! आणि घरात एव्हाना फराळाची तयारीही सुरु झालेली असायची. मग तिथे गरम गरम फराळ खायला मिळण्यासाठी मदत करायचं नाटक करून निम्मा फराळ फस्त करायचा. आणि जोडीला आईचं ओरडणं.

"आत्ताच संपवू नका, अजून दिवाळीत खायचंय, चार घरी द्यायचाय..."

पण ऐकतंय कोण. एके दिवशी मग बाबांना वेळ असेल तेव्हा लक्ष्मी रोडला जाऊन कपडे खरेदी करायचे. शक्यतो आईच्याच पसंतीचे. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता, तरी २-४ जण  आपल्या पुढे कपडे खरेदी साठी असतील तर असं वाटायचं किती गर्दी आहे!

              पहिला दिवा आजी एकादशीला लावायची, पण खरी दिवाळी सुरु व्हायची धनत्रयोदशीला. आणि मग तीन चार दिवस छान  छान रांगोळ्या, उटण्याची अंघोळ, रेडिओवर पहाटे पहाटे लागणारं कीर्तन, आणि दुपारच्या वेळी विशेष कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री किल्ल्यावर चित्र मांडायची, पणत्या लावायच्या, पूजा करायची आणि छान छान कपडे घालून फटाके उडवायचे. आणि दिवाळी संपली की मग शाळेत दिलेले सहामाहीचे प्रकल्प करायचे! दिवाळी येऊन गेली की मूड एकदम फ्रेश होऊन जायचा.

              आताही यातल्या काही गोष्टी अजूनही आहेत, पण प्रत्येक गोष्टीत मनाच्या समाधानापेक्षा दिखाऊपणा जास्त वाढलाय असं वाटतं. साधेपणा हरवलाय. फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हते, तरी भेटकार्डामधून पोहोचलेल्या शुभेच्छांची गोडी जास्त वाटायची. असो.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाणारच, आपण मात्र जुन्या आठवणी मनात ठेवून नवीन प्रकारे आनंद लुटायला शिकायचं!  :)