तुम्हाला कधी माणसांचं दडपण येतं का? म्हणजे आई समोर असेल तर मी अमुक पद्धतीने वागू शकत नाही पण मैत्रीण असेल तर वागू शकते प्रकारचं? किंवा घरचे आणि मित्र-मैत्रिणी हे फारच मोघम झालं. यामध्ये आपण वेगवेगळं वागतोच. पण घरच्यांमध्येही आईसमोर एक, बाबांसमोर एक, आजीआजोबांसोबत एक अशा प्रकारचं? किंवा आई - बाबांसमोर एक आणि भावंडासमोर एक? बऱ्याच लोकांचं उत्तर हो हेच असेल याची मला खात्री आहे. फार कमी जण समोर कोणीही येवो मी असा आहे आणि असाच वागेन किंवा हेच बोलेन अशा प्रकारचे असतात.
म्हणजे आपल्या सर्वांनाच अभिनय जमतो म्हणायचं की, या उलट जे सगळ्यांसमोर एकसारखेच असतात, समोरचा माणूस बघून जे आपलं वागणं बोलणं बदलत नाहीत त्यांनाच अभिनय येत नाही म्हणायला हवं. मग 'एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग' वगैरे फक्त इतरांना चिडवण्यात काय अर्थ आहे? किंवा जगात लोक मुखवटे घालून जगतात वगैरे जगाला का नावे ठेवायची, आपणही तेच करत असतो. घरामध्ये एक ऑफिसमध्ये एक असं आपल्याला वागावंच लागतं. असं असताना एखाद्याच्या चांगुलपणाची किंवा वर्तणुकीची खात्री कशी काय देता येते हा प्रश्नच आहे.
जरी आपण वेगवेगळ्या लोकांसमोर वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असलो तरी मूळ स्वभाव फार लपवता येत नाही. एकासमोर नम्र असलेला माणूस दुसऱ्या त्याच वयाच्या किंवा नात्याच्या व्यक्तीसमोर कदाचित उद्धट होणार नाही. एखादा मितभाषी कदाचित फक्त जवळच्या माणसांसमोरच बोलेल, इतर अनेक वेळी घोळक्यामध्ये तो शांत राहणेच पसंत करेल. मग मुखवटा किंवा खोटारडेपणा कधी येतो, तर जेव्हा आपण आपल्या एखाद्या स्वार्थासाठी लोकांशी वेगवेगळे वागतो. कधी सगळं काही करून आपण त्या गावचेच नाही असं दाखवतो. जे आपण नाहीच ते दाखवण्यासाठी लोकांसमोर खोटं खोटं वागतो.
पण कधीकधी असं होतं की मी एकटं असताना जितकं मोकळं ढाकळं वागेन तितकं इतरांसमोर वागू शकणार नाही. यामध्ये आपण आपली एखादी प्रतिमा लोकांसमोर तयार केलेली असते, आणि तसं वागलो नाही तर त्या प्रतिमेला तडा जाईल म्हणून आपण मन मारून काही गोष्टी करतो. जग काय म्हणेल किंवा अमुक व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल या दडपणाने आपण नैसर्गिक न वागता दडपण घेऊन वावरत असतो. कधी कधी कोणी आळशी समजू नये म्हणून कामच करत बसतो, कधीकधी एखादी गोष्ट आपण विसरूनही गेलो असतो पण आपल्याला कोणी गहाळ म्हणू नये म्हणून आठवणीने काही गोष्टी करतो.
एका मर्यादेपर्यंत असं दडपण असणे चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर सगळेच स्वैर वागले तर कुटुंब कुटुंब राहणार नाही. पण त्या दडपणाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडूनच टाकणे चुकीचे आहे. मग म्हणू देत मला काय म्हणायचं ते असंही होऊन दाखवता आलं पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा