आपल्या वाट्याला सुख आलेलं असू देत वा दुःख, आपल्याला नेहमी ते कोणाबरोबर तरी वाटून घ्यायचं असतं. सुख आपल्याला भरपूर लोकांसोबत वाटून घेण्याची इच्छा असते, तर दुःख जवळच्या वाटणाऱ्या लोकांबरोबर आपण हलकं करू शकतो. कुठे कोडकौतुक झालं तरी कधी एकदा जगाला सांगतोय असं वाटतं. आणि जगाला सांगण्यासाठी हल्ली तर भरपूर व्यासपीठे उपलब्ध आहेत. व्यक्त होणं माणसासाठी किती महत्त्वाचं आहे.
पूर्वी असं म्हणायचे की सुख जगाला सांगावं आणि दुःख आपल्यापुरतं ठेवावं. पण हल्ली जग असं बदलतंय की दुःखाचा बाजार मांडला की भरपूर सहानुभूती मिळून पैसे प्रसिद्धीही मिळते. रिऍलिटी शोमध्ये पूर्वी गुणवत्ता वगैरे बघत, निदान आपल्याला प्रेक्षकांना तरी तसं वाटे. पण मध्यंतरी एक कल असा सुरु झाला की सहभागी प्रतिस्पर्धी किती दुर्दैवी, किती कमनशिबी. मग प्रेक्षकांच्या मतदानामध्ये साहजिकच त्यांना सहानुभूतीने भरपूर मते मिळत. एखादी कला ही निव्वळ कला म्हणून सादर करा ना, त्यातून ठरू देत कोण सर्वोत्कृष्ठ आहे ते. अजूनही हा कल चालू आहे का ते रिऍलिटी शो पाहणे बंद केल्याने काही कल्पना नाही.
आपण दु:खी असणे ही अशी मिरवण्याची गोष्ट आहे का? मी दुःखी आहे ही खरं तर माझी दुर्बलता आहे, त्यामध्ये मिरवण्यापेक्षा लाज जास्त वाटली पाहिजे की आपण परिस्थितीवर मात करू शकत नाही. त्या परिस्थितीवर एकदा मात केली की मग जगाला ओरडून सांगा तुम्ही नक्कीच की तुम्ही यशस्वी कसे झालात. त्याने शेकडो अशा परिस्थितीतल्या होतकरू लोकांना प्रेरणा मिळेल. पण दुःखाचा बाजार मांडण्यात काय पुरुषार्थ आहे? तीच गोष्ट जे करू नये ते करून बघा आम्ही कसे बिनधास्त आहोत हे दाखवणे, संस्कारांची राखरांगोळी केली, टिंगल उडवली की सोशल मीडियामध्ये अजून जास्त प्रसिद्धी.
माणूस हा शक्य तितक्या सोप्या मार्गाने सर्व गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. मग पुरुषार्थ गाजवण्यापेक्षा सहानुभूती मिळवणे नक्कीच सोपे आहे ना. कष्टाने नाव कमावण्यापेक्षा सवंग प्रसिद्धी नक्कीच सोपी आहे. लहानपणी ज्या गोष्टी मूल्ये म्हणून शिकलो त्याच्या सगळं विरुद्ध सध्या पाहायला मिळते. माणसाची जडणघडण अशी झाली पाहिजे की मला काहीही करून परिस्थिती बदलायची आहे. पण तो हे बघत आला की स्वतः काही करण्यापेक्षा रडे राहून, जे करू नये ते करून सर्व साध्य आहे तर का कोणी कष्टाच्या मागे लागेल.
अशा बदलत्या संस्कारांमध्ये, बदलत्या जगरहाटीमध्ये मला खात्री आहे की आजही लाचारीचा मार्ग न अवलंबता स्वतःला सिद्ध करणारी माणसे नक्कीच असतील. आज आहेतच पण उद्याही असतील. सोप्या मार्गांमधला फोलपणा लवकरच लोकांच्या लक्षात येईल. जग आहे म्हटल्यावर त्यामध्ये नानाविध प्रकारचे स्वभाव असणारच. आपण कोणाला प्रसिद्धी देतो आणि त्यातून कोणता कल स्थापित करतो ते आपल्या हाती आहे.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा