मी खूप लहान असताना बाबांनी एक मांजरीचं पिल्लू कुठूनसं आणलं होतं. मी आणि माझी बहीणही लहानच होतो. त्या पिलासोबत खेळायला, त्याला काय हवं नको ते बघायला आम्हाला खूप आवडू लागलं. तिचं फार मोठं वेगळं नाव वगैरे आम्ही ठेवलं नव्हतं, तिला आम्ही मनीच म्हणायचो. तर मांजर हा फार लाघवी प्राणी. स्वतःचे लाड कसे करून घ्यायचे ते तिला छान जमायचं. आमचं घर खालीच होतं, घरसमोर बाग वगैरे होती. तर ती मनी तिचे विधी त्या बागेतल्या मातीमध्ये जाऊन उरकायची.
ती तिला हवं तेव्हा भटकायला जायची आणि तिला हवं तेव्हा घरी यायची. मनी मोठी होत गेली तशी तिचे निरागस निळसर डोळे करारी हिरव्या डोळ्यांमध्ये रूपांतरित झाले, पण लाडिकपणा मात्र तोच राहिला. मग एकदा असं समजलं की तिला पिल्ले होणार आहेत. तिला ४ पिल्ले झाली. पिल्ले झाली की मनी त्यांना सात जागी फिरवते. आम्ही मोजलं नाही कधी पण थोड्या थोड्या दिवसांनी मनी त्यांची जागा बदलायची खरी. अंगणात आंब्याचं झाड होतं, स्वतः त्यावर जाऊन बसायची आणि खाली पिल्लाना आवाज देत बसायची. झाडाच्या खोडाला पिलांना पुढच्या पायांच्या नखांना धार लावायला शिकवायची. पिल्ले आपलीच शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत खेळत ते बघायला खूप मौज वाटे.
आधी मनी उंदीर कुठे कधी खायची आम्हाला कधी समजलं नाही, पण पिलांसाठी दोनतीनदा तिने अर्धमेले उंदीर आणले होते. घरामध्ये त्याची घाण मात्र ठेवली नाही. तिच्या पिलांना शी करायला कुठे जायचं ते आम्ही बाहेर मातीमध्ये ठेवून शिकवायचो. तिला शेवग्याच्या शेंगा आणि उडदाचे तळलेले पापडही खूप आवडायचे. आम्ही शाकाहारी असल्याने आमच्याकडून मात्र तिला फक्त दूध-पोळीच मिळायची. मांसाहारासाठी ती स्वतःवरच पूर्णपणे अवलंबून होती. सकाळी आमचे दूधवाले आले की त्यांच्या मापट्याने तिच्या बशीत पण थोडं दूध ओतायचे.
तिच्या पिलांपैकी दोन थोडी मोठी झाल्यावर आम्ही सोडून आलो, दोन घरातच थांबली. त्यातीलही एक बोका होता तो नंतर घर सोडून निघून गेला. मनीची पिल्ले आल्यानंतर आम्ही पुन्हा पिलांशी खेळण्यात दंग होऊन गेलो. अशी मनीला बऱ्याचदा पिल्ले झाली. त्यातली बरीचशी घरात राहीली काही निघून गेली, बहुतेक करून बोके होते ते निघून गेले. काही आम्ही सोडून आलो. पिल्ले जास्त मोठी झाल्यावर सोडली तर कुठेही अगदी गाडीवर जाऊन त्यांना सोडून आलो असलो तरी ती काही दिवसांनी घरी परतत असत, त्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटे.
एकदा एक पिल्लू खूपच सुंदर झालं होतं मनीला तिचं नाव आम्ही ऐश्वर्या ठेवलं होतं. आतपर्यंत जितक्या मांजरी झाल्या त्यात खरोखर ती खूपच देखणी होती. ती आजिबात घराबाहेरच पडत नसे, बरीच मोठी झाली तरी ती कधीच घराबाहेर गेली नाही. तिचा स्वभाव खूपच भेदरट होता. कुठून काही पडल्याचा आवाज आला तरी ती घाबरून मांडीवर येऊन बसत असे. हिचं कसं होणार अशी आम्हालाच चिंता लागून होती. एकदाच पहिल्यांदा ती घराबाहेर गेली आणि नंतर घरी पुन्हा कधी आलीच नाही. ती इतकी घाबरट होती की तिला कदाचित रस्ताही ओलांडता येत नसेल आणि मांजर घरी परततेच तेव्हा तिचं काही बरंवाईट झालं असेल असा आमचा आम्हीच समज करून घेतला आणि वाईट वाटून घेतलं.
तर मनीपासून सुरु झालेला हा प्रवास, मनी म्हातारी होऊन गेली तरी तिची वंशवेल आमच्याकडे चालूच राहीली होती. काही पिल्ले कधी घरातच दगावत तेव्हा त्यांना टेकडीवर जाऊन आम्ही पुरून येत असू. खूप वाईट वाटे. अनेकदा मन्यांची नवजात पिल्ले बोक्यांनी येऊन पळवली. खूप आश्चर्य वाटायचं. मग ते समजल्यावर तीही खबरदारी घेऊ लागलो. पण नंतर नंतर काही पिलांचं घरात असताना मरून जाणं, पिल्ले नवीन असताना मांजरीने घरात उंदरे आणणं त्याची घाण होणं, बोक्यांनी पिल्ले पळवून नेणं या गोष्टींचा त्रास होऊ लागला.
आमच्याकडे शेवटची मांजर राहिली होती तिला जरा जास्तच वर्षे पिल्ले झाली. म्हणजे आम्हाला वाटायचं ही म्हातारी झाली आहे, कधीही जाईल. पण काही दिवसांतच तिचं पोट फुगलेलं दिसायचं. खूप जास्त वयात पिल्ले झाल्याने की काय पण ती पहिलीच अशी मांजर निघाली जिने शेवटी शेवटी स्वतःचीच पिल्ले खाल्ली, बोक्यांनी तर नेलीच काही. नंतर नंतर ती खूप घाणेरडीही राहू लागली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नेमकी चतुर्थी-एकादशीलाच घरात उंदरे-पक्षी मारून आणायची, ती पूर्ण न खाता त्यांचे अवशेष घरात सोडून द्यायची. एकदा देवघरातच मेलेला उंदीर ठेवून गेली होती.
या शेवटच्या अनुभवांनंतर मात्र आम्ही मांजरी पाळणं बंद केलं, तरी साधारण पंधरा ते वीस वर्षे आम्ही मांजरींच्या सहवासात राहीलो, त्याही आमचं कुटुंबच होत्या. त्यांच्या सहवासात ताणतणाव खरंच जाणवत नसतील पण तेव्हा तशी जाणीव नव्हती. आता फ्लॅट सिस्टीममुळे मांजर काय कोणताच प्राणी पाळणं मला शक्य वाटत नाही. आणि इतकी वर्षे त्यांच्या संगतीमध्ये राहून मन भरलं असेल कदाचित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा