बुधवार, ८ जुलै, २०२६

मळभ


सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाच्या रिमझिम धारा, टपोरे थेंब, हिरवाई, इंद्रधनू, वाफाळणारा चहा - कॉफी, पावसाळी भटकंती सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं असतं. पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो पण मळभ कोणालाच नको असतं. पाऊस म्हणजे सृजन पण मळभ म्हणजे नकारात्मकता. मळभ म्हणजे अंधार. मळभ म्हणजे नैराश्य. मळभ म्हणजे नकोशी गोष्ट. मन अंधारून आलं तरी त्याला मळभाची उपमा देतात. 

जेव्हा चाळीस-पंचेचाळीस तापमानातला सूर्य कोपलेला असतो, अंगाची लाही लाही होऊन निघालेली असते आणि उन्हाळा त्याच्या संपण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा मात्र याच काळ्या ढगांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. पण आपण चुकूनही असं म्हणत नाही की आम्ही मळभ येण्याची वाट पाहतोय. आपण पाऊस येण्याची वाट पाहत असतो. कसं असतं ना, आपल्या सर्वांना सुख हवं असतं पण ते येण्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागणारच ना. पावसाची वाट पाहताना मळभही येणारच हे आपण सोयीस्कररीत्या विसरून जातो.

प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते म्हणतात. उन्हाच्या काहिलीमध्ये तो काळा ढग बरसला तरच त्या सोनेरी किनारीचं लख्ख प्रकाशात होणारं रूपांतर आपल्याला हवंहवंसं वाटतं, तो जर पुढे निघून गेला तर मिळणारा प्रकाश हे सुख वाटत नाही. सुखाचा पाऊसही हवाय आणि लख्ख प्रकाशही हवाय तर थोडं मळभ सहन करावंच लागणार. इप्सित साध्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि कष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मळभच असतात. फक्त ते मळभ सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे.

आपल्याला माहिती असतं की मळभ ही कधीच कायमस्वरूपी स्थिती नसते म्ह्णूनच आपण ते सहन करतो, जाण्याची वाट पाहतो. मनाचं मळभही एखाद्या नात्याबद्दल किंवा प्रसंगाबद्दल आपल्याला काहीतरी शिकवूनच जातं. आयुष्यातही कठीण प्रसंग आले की मळभ समजून ते जाण्याची वाट पाहायची. कारण मळभ कधीच रित्या हाती जात नाही, ते नेहमी सुखाच्या धारा बरसवूनच जातं. फक्त मळभ दूर होणं महत्त्वाचं!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा