Thursday, January 27, 2011

नेट भेट ते थेट भेट

      भेट म्हटलं कि पूर्वी व्हायची ती प्रत्यक्ष भेट, किंवा पत्र भेट नाहीतर तिकडे जाणारी माणसे शोधून निरोपांची देवाण घेवाण.. आपल्या माणसांशी बोलण्यासाठी दिवसोंदिवसांची प्रतीक्षा...नंतर दूरध्वनी आले आणि भेट जरा सोपी झाली. पण हा दूरध्वनी सर्वांनाच परवडेबल नसल्याने शेजारी पाजारी निरोप ठेवणेही आलेच. त्वरित संपर्कासाठी हि सोय फारच छान होती... आणि असाच अचानक तंत्रज्ञानाने सर्वांच्याच आयुष्यात प्रवेश केला आणि होऊ लागली भ्रमण भेट व नेट भेट.....

     नेट भेटीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नवीन माणसे जोडली जाणे. अनेकांशी एकाच वेळी संपर्क होऊनही   इकडच्या कानाची तिकडच्या कानाला खबर नाही, आणि मुद्दामहून खबर होऊ द्यायची असेल तर ग्रुप चाट आहेच. ग्रुप चाटचा फायदा म्हणाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार :) प्रत्यक्ष बोलताना एक वेळ तुमचे म्हणणे कदाचित दुर्लक्षले जाईल. पण ग्रुप मधल्या कॉमेंट्स या वाचल्या जातातच, शिवाय तुम्ही विचार करूनही बोलू शकता, आणि बोललेले बदलूही शकता (वाह हे तर फारच छान.....). इथे तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा तुमच्या लिखाणाची ताकद जास्त असते. शिवाय समोरच्याच्या  बोलण्याची  लकब, आवाज हे काहीच माहिती नसल्याने आपण त्याने बोललेले वाक्य आपल्या मनाने ऐकतो. त्यामुळे सगळेच फार जवळचे वाटतात (काही अगदीच उद्धट लोक सोडून...)

      पण कितीही झाले तरी प्रत्यक्ष भेटीची सर नेट भेटीला नाही. नेटवर कितीही दिवसांपासून ओळखीची असणारी काही माणसे समोर आल्यावर परकी वाटू शकतात.. तर प्रत्यक्ष भेटणारी बसमधील ५ मिनिटांची ओळख असली तरी गाढ मैत्री होऊ शकते.

     आम्हा बझ्झकर्यांचीही काल २६ जानेवारीला समोरासमोर भेट झाली, अन इतके दिवस टिप्पण्यानमधून  बोलणारे आम्ही खरंच भेटलो. भेटीचा अनुभव तर छान होताच, पण जी गोष्ट नेटवर कळत नाही ते म्हणजे वागणे... सर्वांचे वागणे समजले, आणि नेटभेटीवरचे भेटणे प्रत्यक्षात परके वाटते हा समज दूर झाला...

मग तुमचा काही वेगळा अनुभव नेटवरील भेटीच्या थेट भेटीनंतर?9 comments: