Friday, May 27, 2011

राउळी... मंदिरी...

              देऊळ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते एक अशी वास्तू जिथे मनाला शांतता मिळेल, त्या शांततेत ईश्वराशी एकरूप होऊन आपण स्वत:शी संवाद साधू शकू, जिथून आल्यानंतर मन अगदी हलकं असेल. मला आठवतंय आमच्या गावी अशीच मंदिरे असायची त्यातलं एक होतं नदीच्या काठावर. लहानसंच मंदिर, शेजारी चिंचेचं मोठ्ठं झाड, आणि मंदिराच्या आवारात त्या सावलीचा गारवा. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली नदीकडे जाणारी पाउलवाट. काय प्रसन्न वाटायचं तिथे गेलं की. गावात अजून एक मंदिर, हे मंदिर मात्र भरवस्तीत, गावात यात्रा असते त्या ग्रामदेवतेचं! त्यामुळे इथे कायमच कडेकोट बंदोबस्त, आणि देव आत कुलुपात बंद. पुजाऱ्याच्या वेळेत गेलं तरच तिथे देवाचं दर्शन मिळणार.

            हा फरक का?तर गावातला देव श्रीमंत आणि नदीकाठचा गरीब. गावातल्या देवाच्या गाभाऱ्यात चांदीचं मखर, आणि नदीकाठच्या मंदिरात फक्त एक साधी मूर्ती. हल्ली तर सगळेच देव असे श्रीमंत होऊ लागले आहेत. श्रीमंत देवांना भेट देणाऱ्यांच्या रांगाही मोठ्या, भेट देणारेही मोठे, त्यांच्या दिमतीला असणाऱ्यांची संख्याही मोठी अन त्यांना येणाऱ्या भेटवस्तूही भव्य. कोणी यांच्या हुंडीत सोन्याचे, हिऱ्याचे दागिने टाकतो, कोणी पैशांची पुडकीच्या पुडकी टाकतो, कोणी उंची वस्त्रे टाकतो. इथे सामान्य भाविक चार तासांपासून ते दोन-दोन दिवसांच्या रांगेत तिष्ठत थांबतो आणि दर्शनाची वेळ झाली की त्याला डोळाभरून ज्याच्यासाठी आला त्याला पाहताही येत नाही. यातून किती जणांना देवदर्शनाचे समाधान मिळते माहिती नाही, पण मला तर नक्कीच मिळणार नाही. उलट तिथला रांगेच्या लवकरच्या क्रमांकापासून ते अभिषेकापर्यंत आणि देवाला वाहण्याच्या उदबत्तीपासून ते  मिळणाऱ्या प्रसादापर्यंत प्रत्येक गोष्टीतला भ्रष्टाचार पाहून मन विषण्ण होतं.

             अशा मंदिरांना भेट दिली की एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या बाजारात गेल्यासारखंच वाटतं. यापेक्षा एखादं  दुर्लक्षिलं गेलेलं मंदिर असेल तर तिथे जाऊन पाच मिनिटे बसण्यानेसुद्धा खरंच मंदिरात गेल्यासारखं वाटतं. कळत नाही आपण का आपल्याच देवांना आपल्यापासून दूर लोटतोय? आपण का त्यांना VIP बनवतोय? आपलंच देवाला भेटणं आपणच का महाग करतोय? अजून किती देवस्थानांना पंचतारांकित व्हायचे वेध लागणार आहेत माहिती नाही, पण तिथे काहीच समाधान मिळणार नाही हे खरंच.

              नास्तिक लोकांसाठी ही पोस्त नाही, आस्तिक असूनही मूर्तीपूजा न मानणाऱ्यांसाठीही नाही. बरेचसे लोक वास्तुशास्त्राचे नमुने किंवा केवळ मूर्ती पाहण्यासाठीही मंदिरांमध्ये जातात. पण या सर्वांना सुद्धा मंदिराचं वातावरण भारावून टाकतं. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर देवळात जाणे म्हणजे केवळ औपचारिकताच राहील.छायाचित्रे आंतरजालावरून

Saturday, May 7, 2011

बालगंधर्व

          चित्रपटाबद्दल आधीच खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, आणि प्रेक्षागृह "house full" सुद्धा होते. अगदी जन्मापासूनची कथा नसली तरी "अरे हा तर बालगंधर्व" या सुंदर वाक्याने पहिला प्रसंग संपतो. आणि मग सुबोध भावेची  एन्ट्री! या एन्ट्रीला चित्रपटातल्या प्रेक्षागृहाबरोबरच प्रत्यक्ष प्रेक्षगृहातही टाळ्या येतात.

         तो काळ, तेव्हाचे नाटक कंपन्यांचे वातावरण अगदी हुबेहूब सादर झाले आहे. (हे मला मागच्या सीटवर एक ऐंशी-नव्वदीचे आजोबा बसले होते त्यांच्याकडून समजले, त्यांनी बालगंधर्वांचे प्रत्यक्ष नाटक पाहिले होते). एक मनस्वी कलाकार किंवा एक कलाकार मनस्वी कसा असतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे "नारायण श्रीपाद राजहंस"! आणि तो मनस्वीपणा चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचतो. सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनीत असणारे बालगंधर्व नंतर काही मतभेदाने आणि पंडितच्या मध्यस्तीने स्वत:ची गंधर्व कंपनी सुरु करतात. नंतर या कंपनीने पाहिलेले वैभव, रसिकांवर गाजवलेले अधिराज्य, आणि बालगंधर्वांची नेहमीच "रसिका तुझ्याचसाठी" ही भूमिका... आणि बोलपट आल्यानंतरची कंपनीला लागलेली उतरती कळा, सर्वच अप्रतिम साकार झालंय.

         भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा यांच्या पदांसाठी रंगमंचावर येताना उजवा हात पुढे करून, मान जराशी तिरकी ठेवून, झरझर चालत, आलाप घेत रंगमंचावर येणे सुबोधने हुबेहूब साकारले आहे. आणि आलाप गाताना जिभेची सुद्धा होणारी हालचाल दाखवण्याइतकं डीटेलिंग! "नाही मी बोलत नाथा" च्या वेळी हृदय हेलावून जाते. रसिक देऊ करत असलेल्या मदतीला नकार देणारा प्रसंगही तसाच! द्रौपदीची मयसभा आणि संवाद अप्रतिम! "चीन्मया सकलहृदया" च्या वेळी अथांग जलाशय आणि विस्तीर्ण आकाश यांनी त्यांचे श्रोता आणि प्रेक्षक होणं मनाचा ठाव घेतं!

         सुबोध भावेला विभावरी देशपांडे, किशोर कदम, अविनाश नारकर, अभिजित केळकर, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर सर्वांचीच मिळालेली उत्तम साथ! राहुल देशपांडेचा एकच पण उठावदार प्रसंग. कौशल इनामदार, स्वानंद किरकिरे आणि आनंद भाटे यांनी संगीत आणि पदे अक्षरशः जिवंत केली आहेत. आणि (cherry on the pie च्या ऐवजी) पुरण पोळी आणि आमरसावरचं साजूक तूप म्हणजे उभारलेला सेट. (नितीन चंद्रकांत देसाई नावातच सर्व काही आहे)

         एकदा तरी आणि चित्रपटगृहात जाऊनच पाहावा असा अप्रतिम चित्रपट आहे. प्रेक्षागृह सोडताना जितक्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्याहून कितीतरी सुंदर कलाकृती पाहिल्याची अनुभूती, "हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे...." ते वाक्य आणि चित्रपटाचे संगीत व नाट्यपदे कानात घुमत राहतात.....
                                                                                                    छायाचित्रे आंतरजालावरून
हे ही पहा
http://www.balgandharvathefilm.com/balgandharva.php
http://chandrakantproductions.com/balgandharva-main.php