बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

फसवणूक...


            माझ्या आजीला मागे अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हाची गोष्ट. साधारण २०००-२००१ मधली. डॉक्टर-दवाखाना तर चालूच होता, पण 'इतर'ही उपाय सांगणारे बरेच जण होते. त्या सर्वांना फक्त हो-हो म्हणायचं इतकंच आमचं काम होतं. इतर काहीही न करण्याची इतकी खबरदारी घेऊन सुद्धा एक घटना घडली ती पुढीलप्रमाणे.

            साधारण दुपारच्या वेळी एक इसम घरी आला. तो म्हणाला रविवार पेठेत तुमचे नातेवाईक राहतात ना(नावही बरोबर सांगितलं), त्यांनी मला पाठवलं आहे. मी डॉक्टर आहे. तुमच्या आजींना अर्धांगवायू झालेला आहे, माझ्याकडे आयुर्वेदिक औषध आहे. त्याच्याकडे एका बाटलीत एक काळसर दिसणारं औषध होतं. ते औषध तव्यावर अंड्याच्या बल्कबरोबर गरम करून पायाला लावायचं. एक लिटरची बाटली असेल, एका बाटलीचे हजार रुपये. म्हटलं तर मोठी रक्कम, म्हटलं तर इतके पैसे औषधावर खर्च होतच आहेत, त्यात हजार रुपये काय?

            त्यानंतर आम्ही त्याला काही प्रश्न विचारले 

            आम्ही: तुम्ही कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहात?
            तो:   मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.
(कपडे बरे घातले होते, पण बोलण्यावरून आणि एकंदरच डॉक्टर वगैरे वाटत नव्हता)
           आम्ही: तुमच्याकडे डॉक्टर असल्याचं काही प्रमाणपत्र?
           तो:    मी कोल्हापूरहून आलेलो आहे. आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे. 
           आम्ही: तुम्ही डॉक्टर आहात तर असे घरोघर का फिरता?
           तो:   सांगितलं ना हा पिढीजात व्यवसाय आहे. मी हे समाजसेवा म्हणून करतो.
           आम्ही: तरीही हजार रुपये द्यायचे म्हटल्यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा?
           तो:   (त्याची डाळ शिजत नाही हे पाहून रागाने) मला त्या (रविवार पेठेतील) वहिनींनी सांगितलं म्हणून मी इतक्या लांब आलो, रुग्णसेवा आमच्या रक्तात आहे. कोणीही आजारात खितपत पडू नये असं आम्हाला वाटतं........ (बरंच काही बोलला आणि...) पण एकंदरच त्याची बोलण्याची पद्धत कन्विन्सिंग होती. 

               आजीला एव्हाना एकदा घेऊन पाहायला काय हरकत आहे असं वाटलं आणि ती हट्टच धरून बसली. ती म्हणू लागली नुसतं लावायचं तर आहे पायाला, घेऊन बघुयात, कधी देव कोणाच्या रुपात येईल सांगता येत नाही (यांच्या काहीही जुन्या समजुती) कशाने बरं वाटेल आपल्याला काय माहिती. आजीच्या हट्टाखातर ते घेतलं. आणि त्याचा पुढे काहीही उपयोग नव्हता हे वेगळं सांगायलाच नको. महिन्याने हा कोर्स झाल्यावर पुन्हा दुसरा कोर्स सुरु करू असं तो म्हणाला होता . एक महिना झाला, आजी नियमाने औषध लावत होती, त्या निमित्ताने आमच्या घरात पहिल्यांदाच अंड आलं होतं. फरक तर काहीच नव्हता. तो परत ना महिन्याने आला  ना दोन तीन महिन्यांनी. तेव्हा आजीला आमचं म्हणणं पटलं.        

            अशा फसवणुकीच्या कित्येक घटना आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात. चोरी होणे हा ही फसवणुकीचाच प्रकार, फक्त तिथे आपण हजर नसताना फसवणूक झालेली असते. पण आपण हजर असताना झालेली फसवणूक खूप उद्विग्नता देते. मग मनात येतं आपण असे वागलोच का? आपली बुद्धी इतकी भ्रष्ट कशी झाली? सगळं कळत असूनही मी काही केलं का नाही? मला कोणीतरी 'मूर्ख' बनवलं?, असं झालंच कसं वगैरे वगैरे... फसलो गेल्यानंतर नक्की काय वाटतं हे खरं तर सांगता नाही येणार. दु:ख होतं, राग येतो, उद्विग्नता येते, चिडचिड होते, पण काहीच उपयोग नसतो.

            तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तो एका क्षणाचाही विचार न करता तिला सोडून गेला. दुसऱ्या एका त्याला असंच कोण्या तिने दुसऱ्याशीच लग्न करून 'फसवलं'. जगात कोणत्याही दु:खापेक्षा फसवणुकीचं दु:ख सर्वात मोठं आहे. या दु:खानंतर जी असहाय्यतेची भावना मनात निर्माण होते ती सर्वात जास्त दु:खदायक आहे. प्रेमात फसवलं जाण्यावर तर फार नियंत्रण ठेवता येण्यासारखं नाही, कारण प्रेमात पडणाऱ्यांचे डोळे बंदच नसतात तर ते आंधळेच झालेले असतात. पण इतर वेळी डोळे उघडे ठेवून वावरलो तर बऱ्याच फसवणुकीच्या घटना टाळता येतील.