Tuesday, April 9, 2013

अडगळ


            अडगळीच्या खोलीत त्या दिवशी काचा-कवड्या, जुने पत्ते, सोंगट्या, सागरगोटे सापडले. आणि विचार आला ही अडगळीची खोली आहे की आठवणींची खोली आहे? काही अचानक भेटणाऱ्या आठवणी… तिथे नकोशा झालेल्या वस्तूंकडे पाहिलं की तिथल्या अंधाराचा आणि धुळीचा त्रास होतो, पण अशा आठवणी भेटल्या की तेच धुलीकण तिथल्या कवडश्यामध्ये फेर धरून नाचू लागतात… 

          प्रत्येकाच्याच घरात एक अडगळीची खोली असते. कधीतरी चार-सहा महिन्यातून आपल्याला त्यात प्रवेश करावाच लागतो. इच्छा असो वा नसो. घराचं ऐश्वर्य किंवा नीटनेटकेपणा जिथे दिसतो त्या खोल्या तर आपण सर्वांनाच दाखवतो. पण अडगळीची खोली ही सर्वांसाठी नसते. तिथे फक्त आपल्याला किंवा आपल्या अगदी विश्वासू लोकांनाच प्रवेश असतो… कोणती गोष्ट कोणत्या क्षणी अडगळ बनेल हे काही सांगता येत नाही. आपण आपल्या स्वार्थाप्रमाणे सोयीची आणि गैरसोयीची वस्तू ठरवणार…

          कित्येक न लागणाऱ्या आणि याची विल्हेवाट लावू म्हणून बाजूला काढून ठेवलेल्या वस्तू. आणि कित्येक प्रिय पण इतर कुठे ठेवायला जागा नाही किंवा अगदीच रोज लागत नाहीत म्हणून तिथे ठेवलेल्या वस्तू... कधी आठवणीत रमावसं वाटलं की इथे खोलीचं दार उघडून आत जाता येतं. आणि पसाऱ्याचा त्रास होऊ लागला तर सरळ दार बंद करून बाहेर येता येतं. प्रिय आणि अप्रिय गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या असल्या तरी त्यांना सहज बाजूलाही काढता येतं. आणि अगदीच काही नाही तर गोड आठवणी अलगद बाजूला काढून ठेवून नको असणारी अडगळ आपल्याला विकून टाकता येते.

             मनाच्या अडगळीचं दारही असंच हवं तेव्हा बंद करता आलं असतं किंवा या अडगळीला विकून टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं… 

            

Monday, February 4, 2013

दृष्टीकोनतुझे आणि माझे अनेकदा वाद व्हायचे.
विषयांची काही कमी नसायची. विषय काहीही पुरायचा आपल्याला.

कधी राजकारण, कधी पैसा, कधी देश, कधी धर्म, कधी कोणती पुस्तकं, कधी चित्रपट तर कधी काही गाणीसुद्धा.... हे तर फारच 'कारणपुरवू' विषय झाले वादांसाठी, पण कधी एखादी व्यक्ती किंवा फेसबुक पोस्ट यांसारख्या साध्या साध्या गोष्टीतही वाद घालायचो आपण...

मला कधीच माझा मुद्दा धडपणे पटवून देता यायचा नाही. आणि तुला कधीच तुझी बाजू खाली पाडता आली नाही.
पण तुला माझा मुद्दा नाही समजला तरी मला तो व्यवस्थित माहित असायचा...
पण तू कधीच "हा विषय वादाचा आहे आणि आपण यावर बोलुयाच नको" असं म्हटल्याचं मला आठवत नाही...
कधी मी तुझं म्हणणं ऐकलं नाही किंवा मला पटलं नाही म्हणून चिडचिड सुद्धा केली नाहीस....

सुरुवात तर माझ्याकडूनच व्हायची नेहमी, तू तुझं साधं मत व्यक्त केलंस तरी मला वाटायचं तू त्याकडे "broader way" ने पाहूच शकत नाहीस म्हणूनच तू असा विचार केलास...
आणि मग त्याच गोष्टीवर माझं आधी काहीच मत नसलं तरी तुझ्या विरोधात एखादं बनवून ते मांडायला आवडायचं मला....

माझं म्हणणं तुला पटलं नाही की माझ्या मनात विचार यायचा, तू माझ्यासारखा विचार का करू शकत नाहीस? कधीच तुला का समजत नाही की मला नक्की काय म्हणायचंय ते?  किती संकुचित दृष्टीकोन आहे तुझा सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा....

आणि असंच वाद घालता घालता, भांडता भांडता नंतर विचार केल्यावर अचानक एक दिवस समजलं की, "संकुचित" तर माझाच तुझ्या विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता...
आणि आता तुझी तक्रार आहे की, मी आता कोणतीही गोष्ट तुला माझ्या दृष्टीकोनातून सांगायला जात नाही....

Thursday, January 24, 2013

कमेंट


            
             आज सकाळी ऑफिसमध्ये पोहोचल्यावरच रोहितने laptop उघडला... आणि काहीतरी विसरल्यासारखं झालं त्याला... त्याने हसून फक्त मान हलवली, आणि स्वत:शीच एवढंच म्हणाला की तृप्ती म्हणते तेच खरं , हल्ली ऑफिस आणि हे काम सोडून दुसरं काही माझ्या लक्षातच राहत नाही, अरे हो आणि एक बरं आठवलं घरी बाबा वापरायचे ते मशिन अजून repair करून घ्यायचंय, आज करतोच call repair center मध्ये... असं मनात ठरवून आज client कडून काय मेल्स आले आहेत हे पाहण्यात तो मग्न होऊन गेला.....
-------------------

                      मुग्धा नेहमीप्रमाणे घरचं सगळं काम आवरून नेट सर्फिंग करायला बसली... पी एच डी साठी थोडा अभ्यास करून झाला आणि तेच तेच वाचून थोडं कंटाळल्यावर महत्त्वाच्या वाटतात त्या लिंक्स तिने सेव्ह करून ठेवल्या. विचार केला थोडा ब्रेक घ्यावा आता. हल्लीच तिने ब्लॉग लिहायला देखील सुरुवात केली होती. ब्लॉगवर गेलं की तिला एकदम फ्रेश वाटायचं. ब्लॉग नवीन नवीन असल्याने कोणाच्या कमेंट्स येतात, किती जण ब्लॉग पाहून जातात याची तिला उत्सुकता असायची. आणि चांगले ब्लॉग्स सापडतील तेवढे वाचत जायची...
--------------------

"तृप्ती.... ए तृप्ती....." रोहितने सकाळीच हाका मारायला सुरुवात केली...

"काय झालं? आग लागल्यासारखा का ओरडतोयेस?" तृप्तीने नाश्ता घेऊन बाहेर येत विचारलं.

"काही नाही ऑफिसला जायला उशीर होतोय. मिटींगची थोडी तयारी करून जावं म्हटलं... अगं तू रात्री काही काम करत बसली होतीस का? तुझा काही unsaved data आहे का यात?" रोहितने घाईघाईने खात विचारलं

"नाही रे, माझा काही data नाहीये... मला तर काल वेळच झाला नाही काही चेक करायला" तृप्ती उत्तरली.

"कमाल आहे..."

"का रे? काय कमाल?"

"काही नाही..." रोहितने शांत होत तो निघतोय म्हणून तृप्तीला सांगितलं....
----------------------

आज मुग्धाला एका नवीन व्यक्तीकडून कमेंट आली होती...
"Anonymous said....
खूप सुंदर आणि पठडीबाहेरचे विचार मांडलेस मुग्धा... तू हे असं प्रत्येक घटनेवर तुझ्या मनातले विचार न घाबरता व्यक्त करतेस ते चालू ठेव... - महेश साळे
March 10, 2010 at 12.05 AM"

महेश साळे.... मुग्धाला त्यांची कमेंट आल्यामुळे खूपच आनंद झाला होता. गेल्या महिनाभरापासूनच तिने त्यांचा ब्लॉग वाचायला सुरुवात केली होती. तिला वाटायचं सुंदर ब्लॉग आहे यांचा. एकदम अभ्यासपूर्ण लिखाण करतात. विषयदेखील माझ्या पी एच डीचाच आहे. थोडीफार मदत सुद्धा होते मला... पण मीच अजून नवीन असल्याने त्यांच्या पोस्ट वाचून पण कमेंट द्यायला जरा कचरतेच... आणि जास्त जुन्या पोस्ट मी तरी कुठे वाचल्या आहेत त्यांच्या... तरी मागच्या पोस्टला फक्त आवडली, अजून खूप लिहित राहा म्हणून तरी लिहिलं मी त्यांना.... मुग्धाने विचार केला.
-----------------------

"तृप्ती, बाबांचं मशिन repair झालंय गं, तुलाही काही वाटलं तर वापरत जा तू..." रोहितने सांगितलं.

"हो रे माहितीये मला... रात्री माझ्यासमोरच तर नाहीस का नीट सगळं चेक करून घेतलंस तू?"

"अरे हो... विसरलोच बघ मी..." रोहितला परत एकदा स्वत:च्या इतक्या विसराळूपणाचं आश्चर्य वाटलं.
------------------------

                     मागच्या चार महिन्यात साळेंच्या ब्लॉगवर बरोबर मुग्धाला सध्या जे निबंध लिहून पूर्ण करायचे आहेत त्याच विषयांवरचं लिखाण मिळाल्याने ती साळे काकांवर एकदम खुश होती... शिवाय लेखात संदर्भ ग्रंथांची नावेही असल्याने सगळं crosscheck करून घ्यायला तिला फारच सोपं पडलं होतं. तिने तसं काकांना सांगितलं सुद्धा होतं, आणि एव्हाना त्या दोघांची चांगली गट्टी देखील जमली होती, पण ब्लॉगच्या कमेंट्स मध्ये होतील तितक्याच काय त्या गप्पा व्हायच्या त्यांच्या, त्याही शक्यतो काकांच्याच पोस्टवर... तिच्याशी बोलल्यानंतर साळे काकांना एकदम मुक्त वाटतं, ती खूप विश्वास ठेवते त्यांच्यावर , असं त्यांनी सांगितलं होतं तिला, आणि असं  वाटलं, की एकही अवांतर शब्द बोलायला ते थांबत नसत. त्यांच्या अशा कधीकधी मध्येच गायब होण्याचं मुग्धाला फार आश्चर्य वाटे.... मुग्धाला आश्चर्य वाटायचं ते आणखी एका गोष्टीचं की हल्ली काकांच्या पोस्ट्सना पूर्वीसारख्या कमेंट्स का येत नाहीत?
------------------------

                    रोहित काल रात्री आठ दिवसांच्या बिझनेस टूर वर गेला होता. तृप्तीला आजिबात करमत नव्हतं. एखादं माणूस रात्रंदिवस डोळ्यांसमोर असलं की आपण त्याच्याशी कसंही वागतो आणि तेच माणूस समोर नसणार म्हटलं की मग मात्र घालमेल होते. दूर गेल्याशिवाय किंमत कळत नाही हेच खरं, तृप्तीने विचार केला... आता घर खायला तर उठलंच होतं. पण अजून बोर व्हायच्या आत तिने घर आवरायला घेतलं... टेबल स्वच्छ करताना तिला मशिन ऑन दिसलं, रोहितला या मशिनवर काय काम पडलं देव जाणे म्हणत तिने ते बंद केलं, आणि बाजूचा फोटो पुसला...
------------------------

खूप दिवसांनी आज मुग्धाला रिकामा वेळ मिळाला होता. तिने आज एक नवीन ब्लॉगपोस्ट टाकली होती. साळे काकांच्या मागच्या पोस्टमध्ये तिला काही मुद्दे पटले नव्हते, असं पहिल्यांदाच झालं होतं आणि ते का आणि कसे पटले नाहीत त्यासाठी तिने नवीन पोस्टच टाकली होती. वर काकांच्या पोस्टची लिंक सुद्धा दिली होती...

पहिलीच कमेंट तिच्या मैत्रिणीची आली, तू दिलेली लिंक open होत नाहीये....
आणि सगळ्यांच्या अशाच कमेंट आल्यावर तिने त्या लिंकवर क्लिक केलं....
लिंक ओपन झाली... आज तसाही तिने timepass च करायचं ठरवलं होतं. पहिल्यांदाच तिने काकांच्या facebook badge वर क्लिक केलं...
काकांचं profile पहिल्यांदाच पहात होती ती...

Mahesh Saale 
Worked at - Self Employed
Lives In - Pune, Maharashtra 

Family
Rohit Saale
Son 
Trupti Saale
Daughter-In-Law

आणि काकांच्या wall वर पहिलीच त्यांच्या मित्राची पोस्ट तिने पाहिली मात्र......... 

पोस्ट होती...

Vikas Thatte -> Mahesh Saale 
March 10, 2009
R.I.P. Mahesh....

मुग्धाच्या प्रबंधाचा विषय होता "मृतात्म्यांचे अस्तित्त्व"

Friday, January 11, 2013

आकाशवाणी


विविधभारतीवर कुठलासा फोन-इन कार्यक्रम चालू होता.... एका श्रोत्याचा फोन लागला... ते गृहस्थ निवेदकाशी बोलत होते... अवांतर इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर निवेदकाने विचारलं

"आपल्याला गाणं कोणतं ऐकायला आवडेल?"

श्रोता - "एक गाणं आहे ना त्यात माझ्या बायकोचं नाव येतं, मला तेच गाणं ऐकायचं आहे"

निवेदक - "अरे वा... छान छान... कोणतं गाणं आहे ज्यात त्यांचं नाव येतं "

श्रोता - "धुंडो धुंडो रे साजना "

निवेदक - "छान गाणं आहे, काय नाव आहे तुमच्या पत्नीचं?"

श्रोता - "धोंडाबाई"

 हे ऐकल्या ऐकल्या खरं तर खूप हसायला आलं... पण नंतर वाटलं म्हटलं तर विनोद म्हटलं तर त्या गृहस्थाचा साधेपणा, किंवा हिंदी जास्त माहिती नसल्याने झालेला विनोद...

मला रेडीओ(शक्यतो विविधभारतीच) ऐकायला फार आवडतो माणसाचा वेळ न खाता पूर्ण होऊ शकेल असा छंद आहे हा.... स्वत:हून गाणी निवडून ऐकण्यापेक्षा रेडीओवर गाणी ऐकण्यात काही और मजा आहे. पुढे कोणतं गाणं येईल हे आपल्याला माहिती नसतं आणि अचानक छान; आपल्या आवडीचं गाणं लागलं की होणारा आनंद स्वत: गाणी निवडून ऐकण्यात नाही... 

टी.व्ही. पुढे रेडीओचा टीकाव लागेल की नाही असा एक काळ होता... पण मला तरी या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी वाटतात. रेडीओवर आपण फक्त ऐकतो त्यामुळे आपण स्वत: विचार करून एखाद्या गोष्टीचं चित्र आपल्या मनाप्रमाणे उभं करतो. किती तरी वेळा असं झालंय की एखाद्या गाण्याचं ऐकून माझ्या डोळ्यांपुढे एक चित्र निर्माण झालं आणि प्रत्यक्षात त्याचं चित्रीकरण म्हणजे अगदीच विरोधाभास होता....

वरच्या प्रसंगासारखे फोन-इन कार्यक्रमसुद्धा छान असतात. एकट्याने प्रवास करताना सोबतही करतात आणि करमणूकही.... आणि इतर रेडीओ स्टेशन्स पेक्षा आपले वाटतात... अर्थात प्रत्येकाची आवड भिन्न असते... विविधभारतीवर सगळेच कार्यक्रम आणि त्यांचे सगळेच उपक्रम स्तुत्य असतात पण विविधभारतीची मराठी माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे गीतरामायण... त्यासाठी तरी आपण विविधभारतीचे नेहमीच ऋणी राहू ...