सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

दृष्टीकोन



तुझे आणि माझे अनेकदा वाद व्हायचे.
विषयांची काही कमी नसायची. विषय काहीही पुरायचा आपल्याला.

कधी राजकारण, कधी पैसा, कधी देश, कधी धर्म, कधी कोणती पुस्तकं, कधी चित्रपट तर कधी काही गाणीसुद्धा.... हे तर फारच 'कारणपुरवू' विषय झाले वादांसाठी, पण कधी एखादी व्यक्ती किंवा फेसबुक पोस्ट यांसारख्या साध्या साध्या गोष्टीतही वाद घालायचो आपण...

मला कधीच माझा मुद्दा धडपणे पटवून देता यायचा नाही. आणि तुला कधीच तुझी बाजू खाली पाडता आली नाही.
पण तुला माझा मुद्दा नाही समजला तरी मला तो व्यवस्थित माहित असायचा...
पण तू कधीच "हा विषय वादाचा आहे आणि आपण यावर बोलुयाच नको" असं म्हटल्याचं मला आठवत नाही...
कधी मी तुझं म्हणणं ऐकलं नाही किंवा मला पटलं नाही म्हणून चिडचिड सुद्धा केली नाहीस....

सुरुवात तर माझ्याकडूनच व्हायची नेहमी, तू तुझं साधं मत व्यक्त केलंस तरी मला वाटायचं तू त्याकडे "broader way" ने पाहूच शकत नाहीस म्हणूनच तू असा विचार केलास...
आणि मग त्याच गोष्टीवर माझं आधी काहीच मत नसलं तरी तुझ्या विरोधात एखादं बनवून ते मांडायला आवडायचं मला....

माझं म्हणणं तुला पटलं नाही की माझ्या मनात विचार यायचा, तू माझ्यासारखा विचार का करू शकत नाहीस? कधीच तुला का समजत नाही की मला नक्की काय म्हणायचंय ते?  किती संकुचित दृष्टीकोन आहे तुझा सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा....

आणि असंच वाद घालता घालता, भांडता भांडता नंतर विचार केल्यावर अचानक एक दिवस समजलं की, "संकुचित" तर माझाच तुझ्या विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता...
आणि आता तुझी तक्रार आहे की, मी आता कोणतीही गोष्ट तुला माझ्या दृष्टीकोनातून सांगायला जात नाही....