गुरुवार, २७ जानेवारी, २०११

नेट भेट ते थेट भेट

      भेट म्हटलं कि पूर्वी व्हायची ती प्रत्यक्ष भेट, किंवा पत्र भेट नाहीतर तिकडे जाणारी माणसे शोधून निरोपांची देवाण घेवाण.. आपल्या माणसांशी बोलण्यासाठी दिवसोंदिवसांची प्रतीक्षा...नंतर दूरध्वनी आले आणि भेट जरा सोपी झाली. पण हा दूरध्वनी सर्वांनाच परवडेबल नसल्याने शेजारी पाजारी निरोप ठेवणेही आलेच. त्वरित संपर्कासाठी हि सोय फारच छान होती... आणि असाच अचानक तंत्रज्ञानाने सर्वांच्याच आयुष्यात प्रवेश केला आणि होऊ लागली भ्रमण भेट व नेट भेट.....

     नेट भेटीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नवीन माणसे जोडली जाणे. अनेकांशी एकाच वेळी संपर्क होऊनही   इकडच्या कानाची तिकडच्या कानाला खबर नाही, आणि मुद्दामहून खबर होऊ द्यायची असेल तर ग्रुप चाट आहेच. ग्रुप चाटचा फायदा म्हणाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार :) प्रत्यक्ष बोलताना एक वेळ तुमचे म्हणणे कदाचित दुर्लक्षले जाईल. पण ग्रुप मधल्या कॉमेंट्स या वाचल्या जातातच, शिवाय तुम्ही विचार करूनही बोलू शकता, आणि बोललेले बदलूही शकता (वाह हे तर फारच छान.....). इथे तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा तुमच्या लिखाणाची ताकद जास्त असते. शिवाय समोरच्याच्या  बोलण्याची  लकब, आवाज हे काहीच माहिती नसल्याने आपण त्याने बोललेले वाक्य आपल्या मनाने ऐकतो. त्यामुळे सगळेच फार जवळचे वाटतात (काही अगदीच उद्धट लोक सोडून...)

      पण कितीही झाले तरी प्रत्यक्ष भेटीची सर नेट भेटीला नाही. नेटवर कितीही दिवसांपासून ओळखीची असणारी काही माणसे समोर आल्यावर परकी वाटू शकतात.. तर प्रत्यक्ष भेटणारी बसमधील ५ मिनिटांची ओळख असली तरी गाढ मैत्री होऊ शकते.

     आम्हा बझ्झकर्यांचीही काल २६ जानेवारीला समोरासमोर भेट झाली, अन इतके दिवस टिप्पण्यानमधून  बोलणारे आम्ही खरंच भेटलो. भेटीचा अनुभव तर छान होताच, पण जी गोष्ट नेटवर कळत नाही ते म्हणजे वागणे... सर्वांचे वागणे समजले, आणि नेटभेटीवरचे भेटणे प्रत्यक्षात परके वाटते हा समज दूर झाला...

मग तुमचा काही वेगळा अनुभव नेटवरील भेटीच्या थेट भेटीनंतर?




सोमवार, ३ जानेवारी, २०११

शब्द (कविता)

मधुर शब्द, कटू शब्द,
अर्थपूर्ण शब्द नि निरर्थक शब्द
अमृतात ओथंबलेले  शब्द
तर काही अगदीच कोरडे शब्द
आतून आलेले शब्द
नि वरवरचे शब्द
                                                            प्रत्येक शब्द वेगळा
                                                            स्वत:चं अस्तित्व जपणारा!
                                                            काही शब्द निरर्थक वाटतात
                                                            पण तरीही ते गूढ असतात..
                                                            शब्दांच्या खेळात फक्त शब्दच असतात...
                                                            स्पर्धीही तेच अन प्रतिस्पर्धीही तेच
                                                            एकमेकांशी द्वंद्व करता करता 
                                                            माणसाच्या जीवणीवर नाचत असतात..


कधी कधी मात्र शब्दांच्या पलीकडले
      शब्दही बोलू शकत नाहीत...
नजरच न बोलता सर्व बोलते
      आणि शब्द मध्ये पडत नाहीत....