शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

पनू...

प्रिय पनू,

साधारण अडीच दशकांपूर्वी उद्याच्या दिवशी काळोख्या रात्री अचानक जाग आली. आजूबाजूला पाहिलं तर घरात मी आणि आजी दोघीच होतो. आजी गाढ झोपलेली मग मी पण डोळे घट्ट मिटून घेतले आई-बाबा घरात का नाहीत याचा विचार करत. मग सकाळी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तर आईच्या शेजारी एक छानसं गोंडस बाळ झोपलेलं होतं. मला सगळ्यांनी सांगितलं की ती तुझी लहान बहीण आहे आणि तू तिची ताई आहेस. मला तुला पाहून खूप म्हणजे खूप आनंद झाला.

मी पहिलीत होते तेव्हा तू एक वर्षाची वगैरे होतीस. शाळेत जाताना तुझ्याशी खेळून जायचं आणि शाळेतून आल्यावरही पहिल्यांदा तू काय करत आहेस ते पाहायचं हाच माझा दिनक्रम होता. तू सगळ्यांचीच लाडकी होतीस. बाबांची जरा जास्तच. ते तुला बबडा, म्हमद्या वगैरे बऱ्याच काय काय नावांनी हाक मारायचे. पणजी आजी म्हणायची की हा खरंतर मुलगाच होता पण चुकून शेवटच्या क्षणी मुलगी झाली म्हणून तू मुलांसारखी वागतेस. 

छोटीशी होतीस तेव्हा सगळीकडे माझ्यामागे दुडूदुडू पळत यायचीस. मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत असताना तू असायचीस लिंबूटिंबू म्हणून आणि मला आउट करवून द्यायचीस. कधी लपाछपी खेळताना लपलेलं असताना मध्येच तुला मला काहीतरी मोठ्याने सांगायचं असायचं तर कधी शिवणापाणी खेळताना तू धडपडली की मला लगेच तुला उचलून घ्यायचं असायचं. कधी तुला साडी नेसवायची म्हणून मी साडीचा तुझ्या अंगावर बोंगा करून ठेवायचे तर कधी तुझे केस विंचरायचे म्हणून त्यात अजून गुंता करून ठेवायचे.

दुपारच्या वेळी आई आपल्याला शेजारी घेऊन झोपायची. आपल्याला तर काही झोप आलेली नसायची. मग आई तिची झोपमोड होतेय म्हणून आपल्याला ओरडायची. ती जितकं ओरडेल तितकं आपल्याला अजून कायकाय सुचून हसू यायचं मग आपण फ्रॉकचा बोळा करून तोंडात कोंबून आवाज न करता हसायचो ते आठवतं का तुला? मला लहान झाले म्हणून तू घातलेले माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटायचं आणि आता आपलं माप एकच आहे आणि अजूनही माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटतं. तुझे मशरूमकट वाले मान हलवली की उडणारे दाट केस मला खूप आवडायचे. आणि तुझं गोड हसू आणि काळेभोर डोळेसुद्धा!

तुला सगळे चिडवायचे की तुला वैदिणीकडून अर्ध्या भाकरीवर घेतलंय, म्हणून ताई सगळ्यांची लाडकी आहे आणि तू नाहीस. एकदा सुया-बिब्बे विकणारी बाई बाहेर ओरडत चालली होती तर तुला इतका आनंद झाला आणि तू पळतच घरात येउन सांगू लागलीस की आई ते बघ माझी आई चाललीये. खूप हसलो होतो आम्ही तेव्हा. बाहेर कोणताही फेरीवाला चालला की तू घरात येउन आपल्याला ते घ्यायचय का म्हणून विचारायचीस. एकदा असंच आपल्याला सुकट-बोंबील घ्यायचय का म्हणून विचारत आली होतीस. आणि सगळ्यांनी नाकाला हात लावला होता. "फुलों का तारो का" हे तुझं आवडतं गाणं, त्यातल्या "सारी उमर हमें संग रहना है" मुळे ताईचं  लग्न ठरत नाहीये असं आई गमतीने म्हणायची.

एका दिवाळीत फुलबाज्या उडवताना एक पेटती फुलबाजी तू तुझ्या पायाजवळ टाकलीस आणि तुझ्या फ्रॉकने पेट घेतला. आपण दोघीच होतो तिथे आणि क्षणभर मला समजेनाच काय करावं. मग पटकन तुला बाजूला ओढून मी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि बाबांनी येउन फ्रॉकला लागलेली आग विझवली. खूप घाबरले होते मी तेव्हा, तुला काही झालं असतं तर… तरीपण तुझा उद्योगीपणा चालूच राहिला पुढेही!

मी ताई आहे म्हणून मला इगो आहे मोठं असल्याचा. त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला की सरळ सांगण्याऐवजी मी चिडचिड करत बसते. पण तू कधीही मनावर न घेता काय झालं ते शोधून काढतेस. खूप मनमिळाऊ, समजूतदार आणि परिपक्व विचारांची आहेस तू. लहान असूनही कधीकधी माझी मोठी बहीण होतेस. माझ्या मैत्रिणीदेखील सगळ्या माझ्यापेक्षा तुझ्याच जास्त जवळच्या आहेत. आणि आपल्याला एकमेकींची सगळी सिक्रेट्स माहिती आहेत.

माझं लग्न झाल्यापासून थोडं दूर गेलोय आपण. पण मनाने एकमेकांशी  बांधल्या गेलेल्या आपण कधी दूर आहोत असं मला मुळीच वाटत नाही. "बहीण" हे जगातलं मला सगळ्यात जास्त उमगलेलं, सगळ्यात जास्त प्रेम मिळालेलं आणि मी सगळ्यात जास्त अनुभवलेलं नातं आहे. तुझ्या असण्याने या नात्याला पुरेपूर न्याय मिळाला असं मला वाटतं. कोणाहीपेक्षा जास्त तू मला जवळची आहेस आणि नेहमीच राहशील. खूप काही लिहायचं राहिलं असेल, ते आता पुन्हा कधीतरी… औक्षवंत हो आणि नेहमी सुखी राहा… १२-१२ ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तुझी ताई…

छायाचित्र आंतरजालावरून



गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

पाच वर्ष


पाच वर्षांपूर्वी याच दिवशी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. पाच वर्षांत खरंतर पन्नास पोस्टस देखील झाल्या नाहीयेत. म्हणायला पाच वर्ष फार मोठा आकडा वाटतोय पण असं वाटतं की काल-परवाच तर लिहायला सुरुवात केली मी. लिहिलं ते मनापासून लिहिलं. लिहिण्यापेक्षा वाचनच मला जास्त आवडतं, पण पूर्वी कधीतरी लिहिलेल्या ४-५ कविता डायरीत होत्या म्हणून ब्लॉगवर त्या टाकायला सुरुवात केली. नाहीतर निबंधलेखन सोडलं तर लिहिण्याशी तसा कधी संबंध आलाच नाही.

दिसामाजी काहीतरी ते लिहावे पण इथे दोन-दोन महिन्यानंतरही लिहिलं जात नाही माझ्याकडून. मध्ये दीड वर्षाचा मोठ्ठा ब्रेकही घेऊन झाला. तसं तर फार कोणी अपेक्षेने वाट पहावी असंही काही नाहीये इथे. इथे लिहिण्याचा पाच वर्षांमध्ये मला मिळालेला फायदा म्हणजे जेव्हाही मला अस्वस्थ वाटेल तेव्हा लिहिलं-वाचलं की बरं वाटायचं. बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. खूप छान छान ब्लॉग्स वाचायला मिळाले. सगळ्यांकडून प्रोत्साहन मिळालं. आणि रुटीन सोडून काहीतरी केल्याचं समाधान मिळत गेलं. 

अजूनही खदखदत असतंच बरंच काही मनात, पण सगळ्याच गोष्टी नाही उतरवता येत हव्या तशा! तरीही जमेल तसं प्रामाणिक लिहिण्याचा प्रयत्न करायचाय. तुमची सगळ्यांची अशीच साथ असूद्यात… 





बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

सिनेमा-सिनेमा


"मुंबई-पुणे-मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही बघायचेच होते. तसा प्रेम-रतन…. देखील त्याच दिवशी झाला पण पहायच्या यादीत तो दूर-दूर पर्यंत नाही. अगदी television वर येईल तेव्हाही… 

आधी आवडलेल्या चित्रपटाबद्दल बोलूयात अर्थात कट्यार! चित्रपट त्यातल्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न या सगळ्यासाठीच चित्रपट आवडला. सुबोध भावेचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न असेल असं मुळीच वाटत नाही. तल्लीन होऊन चित्रपट पाहणे म्हणजे काय याचा अनुभव हा चित्रपट पाहताना घेतला. कोणीही प्रत्यक्ष समोर गात नसताना, कोणतंही live संगीत नसतानादेखील आपण नकळत तल्लीन होऊन जातो. असंच बालगंधर्वच्या वेळी देखील झालं होतं. 

सर्वच गाणी/पदे अप्रतिम! थोड्याफार उणीवा नक्कीच आहेत. जसं की सदाशिवचा सांगीतिक संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. घराण्याच्या अभिमानाचं महत्त्व लक्षात येत नाही पण चित्रपटगृह सोडताना आपली प्रतिक्रिया असते वाह, काय सुंदर कलाकृती होती. अर्थात ज्यांना या प्रकारच्या संगीतात अजिबातच रुची नाही त्यांना चित्रपट कंटाळवाणा होऊ शकतो. पण मी तर बुवा पुन्हा एकदा आणि चित्रपटगृहात जाऊनही पुन्हा एकदा पहायला नक्कीच तयार आहे. तुम्हीही नक्की पहा! आणि हो,  महागुरू सचिन यांचं खास अभिनंदन ;) . एकदम भारी चित्रपट… 

आता मुंबई-पुणे-मुंबई २. मनापासून पटण्यासारख्या फार थोड्या गोष्टी चित्रपटात होत्या. एकतर दुसराच सीन वोडकाचा पाहून तिथूनच चित्रपटाशी disconnect व्हायला सुरुवात झाली. हल्ली ही फार common गोष्ट असेलही, पण एखादी मुलगी आधुनिक आहे, तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि ती professionally यशस्वी आहे हे ठसवण्यासाठी तिने दारू कशाला प्यायली पाहिजे? तिचा smartness तिच्या विचारांमधून समजायला हवा जो  मुंबई-पुणे-१ मध्ये दिसला होता. चित्रपटात अशा गोष्टी दाखवून लोकांना प्रोत्साहन द्यावं का हा वादाचा मुद्दा आहे. चित्रपट मनोरंजन करण्यासाठी असतात आणि लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी नाही असाही मतप्रवाह आहे आणि चित्रपटांना सामाजिक भान असायला हवं असं मानणारा देखील एक वर्ग आहे, मी अर्थातच दुसऱ्या वर्गात (कुठल्या जमान्यात राहतेस तू असं म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा!). 

गौरी (मुक्ता बर्वे) उगीचच confused दाखवली आणि त्याचा अतिरेक केलाय. शेवटी शेवटी तर तिच्याशी सहमत होण्यापेक्षा तिच्यावर हसूच येतं. खऱ्या आयुष्यात कोणाच्या बाबतीत same situation आली तर कोणीही कदाचित अर्णवची निवड करेल. पण केवळ आपल्या चित्रपटाचा नायक गौतम असल्याने त्याची निवड तिने केली असं वाटलं. चित्रपटात जाहिराती घुसडण्यासाठी गौतमचं profession बेमालूमपणे बदललं. आणि पिक्चरच्या तिकिटात आम्हांला जाहिरातीही पहाव्या लागल्या. एकंदर एकाही पात्राशी स्वत:ला relate करता आलं नाही. फक्त प्रशांत दामलेंमुळे जरा काहीतरी जान आली.

तमाशा देखील बघायचाय. मला ज्या प्रकारचे सिनेमे आवडतात त्या प्रकारचे सिनेमे न आवडणाऱ्याना हा चित्रपट आवडला नाही म्हणजे मला नक्कीच आवडेल (हुश्श). आपल्या type चा वाटतोय तमाशा, बघू लवकरच!

छायाचित्र आंतरजालावरून