शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन

नवीन वर्ष आलं की मी हे करणार, ते करणार. नवीन ठिकाणी नोकरी लागली की मी असं काम करणार. नवीन ठिकाणी फिरायला गेलं की मी अमुक अमुक बघणार. किती नवीन गोष्टी येत असतात ना आयुष्यात? नवीन म्हणजे एखादी गोष्ट एकतर पूर्ण जगासाठीच नवीन असते किंवा आपल्यासाठी नवीन असते. नवीन गोष्टींचं आकर्षण आणि अप्रूप प्रत्येकच सामान्य माणसाला असतं, असं आकर्षण वाटलं नाही तर आपण साधू-संत होऊन जाऊ.

खूप दिवस तेच तेच कपडे वापरले की ते कपडे फाटले, विरले नसले आणि मापात असले तरी नवीन खरेदी करावीशी वाटतेच. जी गोष्ट कपड्यांची तीच नेहमी वापरात असणाऱ्या इतर वस्तूंची देखील! जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवंच असतं. सारखं काय तेच तेच, असं सगळ्यांनाच वाटतं, आणि तेच माणूस असल्याचं लक्षण आहे. कोणाचं कितीही छान चाललं असलं तरी आयुष्यात नवीन काहीतरी घडावं असं सगळ्यांनाच वाटतं. 

प्रत्येक जण आपापल्या अभिरुचीप्रमाणे नवीन गोष्टींची वाट पाहत असतो. नवं पुस्तक, नवा चित्रपट, नवीन टीव्ही सिरीयल, नवं गाणं, नवा प्रवास, नवीन गॅजेट्स यांची ओढ आपल्याला असतेच. कोणाला नवीन माणसांना भेटायला आवडतं, कोणाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडतं, कोणाला नवनवीन खाद्यपदार्थ खायला आवडतात तर कोणाला सारखे स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर टाकायला आवडतात, शिवाय ते टाकले की नव्या कमेंट्स आणि नव्या लाईक्सच्या आपण प्रतीक्षेत असतो.

जुनं जाऊ देऊन नवीन येणं हा निसर्गाचाच नियम आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन असतो, आणि तो आपल्याला जगायला मिळतो हे आपलं भाग्य असतं. केशवसुत देखील म्हणतातच, "जुने जाऊ द्या मरणालागुनी". जुन्या आठवणी कितीही रम्य असल्या तरी फार काळ त्यात नाही ना रमता येत? आताचे क्षण जुने होतील तेव्हा त्यांच्या आठवणी तितक्याच रम्य असतील याची काळजी आपणच घ्यायची असते ना?

आपल्याला कितीही आवड आणि हौस असली तरी असली प्रत्येक वेळी नवीन काही मिळेलंच असं नसतं ना?  अशा वेळी सगळ्यात जास्त समाधान कशात मिळत असेल तर जुन्याच गोष्टी नव्याने गवसण्यात. जुनी माणसं, जुनी नाती, जुनेच दृष्टिकोन नव्याने सापडतात ना तेव्हा खरी नव्याची आस पूर्ण होते. कारण नवंही कधीतरी जुनं होणारच असतं ना!

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..