Thursday, January 12, 2012

विस्मरण...

         काका, माझे पणजोबा माझी सर्वात आवडती अन लाडकी व्यक्ती. ते माझे आदर्श, मार्गदर्शक, मित्र सर्वच काही होते. त्यांचं वय बरंच होतं तरीही त्यांनी तब्येत चांगली ठेवली होती. पण पिकलं पान कधीतरी गळणारच! मी दहावीत असताना ते गेले. तेव्हा वाटलं मी आता कोणाशी इतकं बोलणार. माझे लाड कोण करणार, मला समजावून कोण सांगणार? खूप खूप रडू आलं. काकांची आठवण आली की रडू यायचं. पण हळूहळू ते कमी होत गेलं. अजूनही आठवण येते पण आता परिस्थिती स्वीकारली गेली आहे.

        मानवी मनाला विस्मरण हे मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. एखाद्या दु:खद घटनेची तीव्रता, त्यामुळे होणारा मानसिक त्रास हा कालौघात आपोआप कमी होत जातो, अगदी कितीही मोठा आघात असला तरीही. 
"काळ" हे सर्वात मोठं औषध आहे म्हणतात ते खरंच. हे विस्मरणाचं  वरदान माणसाला मिळालं नसतं तर जगातली किती दु:ख घेऊन त्याला गोंजारत बसावं लागलं असतं. खरं तर जे शरीराचं तेच मनाचं! नंतरही कधीतरी झालेल्या घटना आठवतात पण जखमा जुन्या झाल्याने त्यांची खूण फक्त उरते क्वचित कधी एखादी कोच पडते वा टाक्यांचे व्रण राहतात, पण वेदना कधीच नाहीशा झालेल्या असतात. जे लोक आत्महत्या वगैरे करतात ते तर मला अगदीच आततायी वाटतात. स्वत:ला थोडा वेळ दिला की अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी विसरली जाणार नाही, किंवा जिच्यावर इलाज मिळणार नाही.

         आपल्यापासून दूर जाणाऱ्या माणसांना आपण म्हणतो तू मला विसरशील. किती खरं असतं ते! शाळेमध्ये, होस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कायम बरोबर असणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला किंवा एखाद्या खास मित्र मैत्रिणीलाही त्यांच्यापासून दूर गेल्यावर आपण विसरून जातो. विसरतो म्हणण्यापेक्षा तेव्हा जसं रोजच ते आपल्याला गप्पा मारण्यासाठी हवे असायचे तसे आता नसले तरी चालतात. सुरुवातीला आपण त्यांना दर आठवड्याला फोन करतो, नंतर महिन्यातून एकदा, नंतर तर असंच जमलं तर. आणि त्याहीनंतर नाहीच जमत बऱ्याचदा. विस्मरणच होतं आपल्याला त्यांचं.

        कोणाशी झालेलं भांडण असो, परीक्षेत नापास होणं असो, कोणी कधी विनाकारण केलेला अपमान असो, कोणामुळे होणारा त्रास असो, प्रेमभंग असो की कोणाचा मृत्यू असो यातील एकही गोष्ट अशी नाही की जी आयुष्यभर सल देईल, थोडं स्वत:ला सावरलं तर "विस्मरण" ही मात्रा तिचं काम चोख बजावते. माणसाने जसं काही गोष्टी लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे तसंच काही गोष्टी प्रयत्नपूर्वक विसरायलाही शिकलंच पाहिजे. एक मात्र आहे की विस्मरण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आज घडलेली गोष्ट उद्या तर लगेच विसरता येत नाही, पण काही काळाने का होईना ती येते हेच खूप झालं. तोपर्यंत मनाला कसं समजवायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं!