Tuesday, December 6, 2011

सुख...

          ययातिला म्हणे त्याचं भविष्य सांगितलं होतं कोणी, की तुला जगातली सगळी सुखं मिळतील पण तरीही तू सुखी होणार नाहीस. लहानपणी हे त्याने ऐकलं तेव्हा त्याचं त्यालाही हसू आलं. सुख मानण्यात आहे म्हणतात. मग सगळेच का सुखी होत नाहीत?

            तोही असाच सुखाच्या शोधात होता. तसा लहानपणापासून ओळखीचा. गरीब पण स्वाभिमानी कुटुंबात जन्मलेला. लहानपणी वडिलांचे बेताल वागणे आणि त्यामुळे आईला होणारा मनस्ताप उघड्या डोळ्यांनी पाहणारा. पैशासाठी कुटुंबाची होणारी वणवण आणि त्याचे चटके सोसलेला. तेव्हाच त्याने ठरवलं, मी माझं कुटुंब याच परिस्थितीत राहू देणार नाही. हे सगळं मी बदलेन. पैसा आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटायचं त्याला! माझ्या आईला मी एक दिवस सुखी करेन. नकळत्या, खेळण्या बागडण्याच्या वयात त्याच्या मनाने दडपण घेतलं. बालपण कोमेजून गेलं. १०-१२ व्या वर्षापासूनच पेपर टाक, दूध लाईन टाक ही कामं त्याने सुरु केली.

             अभ्यासात तर हुशार होताच. दर वर्षी चांगल्या गुणांनी पास व्हायचा. जिद्द अजूनही संपली नव्हती. जे कमवेल ते आईकडे द्यायचा. बसलाही पैसा खर्च होऊ नये म्हणून चालत शाळेत जायचा. काम करत करतच खूप शिकला. चांगली नोकरीही मिळाली. घराला आधार मिळाला. पैशाच्या चिंता तर मिटल्या. त्याला वाटलं आता आपली आई सुखी असेल.

            गरिबीमुळे आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे दूर गेलेले नातेवाईक, लोकांची बोलणी यांचा मारा आपण कणखरपणे सहन केलाय असं तिला वाटायचं पण... पण एव्हाना आईचा स्वभावच बदलला होता.  वागणं संशयी झालं होतं. आधीच रागीट असलेला स्वभाव जास्तच हेकेखोर झाला होता. घरच्यांचा ती सारखा पाणउतारा करू लागली होती. अगदी त्याचासुद्धा. त्याने आईचे हाल पाहिले होते त्यामुळे आईला कधी काही बोलायचं नाही असं त्याने ठरवलेलं. पण आता पाणी डोक्यावरून चाललं होतं. त्याला त्याचं प्रेम असलेल्या मुलीशी लग्न करणंही आईच्या अशा वागण्याने अशक्य होऊन बसलं आहे. आईची लहानसहान गोष्टींवरून चिडचिड, आदळआपट.

              आता पैसा तर भरपूर होता पण घराची शांतता नष्ट झालेली. आईला मानसोपचार तज्ञाची गरज आहे पण हे तिला सांगण्याची ना त्याची हिम्मत ना वडिलांची! घरात लग्न करून तिच्यासाठी सून आणावी तर आई तिच्याशीही पटवून घेणार नाही हे त्याला पक्कं माहितीये. त्याला आईला दु:ख होईल असं काही करायचं नाही कारण मुलाला जन्म देताना आईला किती यातना होतात याची त्याला जाणीव आहे. त्याचा   समजूतदारपणाच  त्याला आता नको झालाय. देव करो आणि तो आधीच्याच खंबीरपणे या सर्वांतूनही लवकर बाहेर येवो.
            

Friday, October 21, 2011

तेव्हाची दिवाळी...

            आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी... शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव जाणे, पुढच्या वर्षी ते परत घ्यायलाच लागायचे. आणि मग हुर्ये...... सुरु व्हायची दिवाळीची सुटी!

             सुटी सुरु झाली की आईला साफसफाईमध्ये मदत करायला सुरुवात करायची. दोन-तीन वर्षाआड घराला रंग देण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा पसारा आवरायला काढला की त्यात खूप वर्षांपूर्वी हरवलेले पेन, पेन्सिली, कंपास पेट्या असं बरंच काय काय सापडायचं, फराळाचं खायला मिळाल्यावर होणार नाही इतका आनंद त्या जुन्या वस्तू सापडल्यावर व्हायचा! आणि रंग देऊन झाला की घर एकदम नवीन नवीन होऊन जायचं. आणि मग सगळी आवराआवरी, नवीन पडदे, नवीन बेडशीट, तोरणं...

               त्यानंतर लगबग सुरु व्हायची किल्ला बनवायची, जरा लवकरच बनवायचा कारण दिवाळीच्या मुख्य दिवसांपर्यंत धान्य उगवायला पाहिजे ना. किल्ला बनवायचा म्हणजे जाम धमाल यायची, दिवसभर नुसतं चिखलात खेळायचं. दगड, विटा माती, आणि बाडदानं वापरून सुंदरसा किल्ला तयार करायचा. एकीकडे भेटकार्ड करायला घ्यायची! शिक्षकांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी... मी कधी मिकी वगैरेची भेटकार्ड नाही बनवली. एकतर पानंफुलं, टिकल्या-आरसे चिकटवून किंवा जुनी घरी आलेली पणत्या वगैरे यांची चित्र पाहून तशी काढायची. मग आकाशकंदील तयार करायचा, दर वर्षी वेगळ्या डिझाईनचा! आणि घरात एव्हाना फराळाची तयारीही सुरु झालेली असायची. मग तिथे गरम गरम फराळ खायला मिळण्यासाठी मदत करायचं नाटक करून निम्मा फराळ फस्त करायचा. आणि जोडीला आईचं ओरडणं.

"आत्ताच संपवू नका, अजून दिवाळीत खायचंय, चार घरी द्यायचाय..."

पण ऐकतंय कोण. एके दिवशी मग बाबांना वेळ असेल तेव्हा लक्ष्मी रोडला जाऊन कपडे खरेदी करायचे. शक्यतो आईच्याच पसंतीचे. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता, तरी २-४ जण  आपल्या पुढे कपडे खरेदी साठी असतील तर असं वाटायचं किती गर्दी आहे!

              पहिला दिवा आजी एकादशीला लावायची, पण खरी दिवाळी सुरु व्हायची धनत्रयोदशीला. आणि मग तीन चार दिवस छान  छान रांगोळ्या, उटण्याची अंघोळ, रेडिओवर पहाटे पहाटे लागणारं कीर्तन, आणि दुपारच्या वेळी विशेष कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री किल्ल्यावर चित्र मांडायची, पणत्या लावायच्या, पूजा करायची आणि छान छान कपडे घालून फटाके उडवायचे. आणि दिवाळी संपली की मग शाळेत दिलेले सहामाहीचे प्रकल्प करायचे! दिवाळी येऊन गेली की मूड एकदम फ्रेश होऊन जायचा.

              आताही यातल्या काही गोष्टी अजूनही आहेत, पण प्रत्येक गोष्टीत मनाच्या समाधानापेक्षा दिखाऊपणा जास्त वाढलाय असं वाटतं. साधेपणा हरवलाय. फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हते, तरी भेटकार्डामधून पोहोचलेल्या शुभेच्छांची गोडी जास्त वाटायची. असो.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाणारच, आपण मात्र जुन्या आठवणी मनात ठेवून नवीन प्रकारे आनंद लुटायला शिकायचं!  :)Thursday, October 13, 2011

पीएमटी

          पीएमटीच्या नावाने पुण्यातल्या लाखो लोकांपैकी कोणी ना कोणी रोजच शिव्या घालत असतो. पण परवा एकाच दिवसात २-३ प्रसंग असे घडले की मलाही पीएमटीला शिव्या देण्याची मनापासून इच्छा झाली. माझ्या हापिसाच्या प्रवासात मला जाताना दोन आणि येताना दोन अशा चार बस बदलण्याचा योग येतो. त्या दिवशी हापिसातून घरी परतत असतना बराच उशीर झाला होता. एका थांब्यावर बस ड्रायव्हरने बस संथ केली पण न थांबवताच पुढे नेली. त्या थांब्यावर एक अंध जोडपं उभं होतं. त्यांनी बसपर्यंत येऊन कोणती बस आहे हे विचारेपर्यंत बस पुढे निघालीसुद्धा. मान्य केलं ड्रायव्हरने त्यांना पाहिलं नसेल, पण कंडक्टरला तर ते दिसत होते, त्यानेही सिंगल बेल मारण्याचे कष्ट घेतले नाहीत. आणि माझी चूक, मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असल्याने त्यांनी इतक्या दुरून कोणत्या ठिकाणाचे नाव घेतले ते इतरांप्रमाणेच मलाही ऐकू आले नाही. आणि समजा कोणाला ऐकू आलेही असते आणि त्याने त्यांच्यासाठी थांबण्याची विनंती केली असती तरी ड्रायव्हर गाडी थोडीच थांबवणार होता?

           दुसरा प्रसंग, गाडी मनपावरून कोथरूडला निघालेली. पूर्ण रिकामी बस. रात्रीचे १० वाजलेले. बस लागल्याचे प्रवाशांना आधी सांगितलेच गेले नाही. जेव्हा बस हळूहळू पुढे निघाली तेव्हा कोणीतरी विचारल्यावर  तिथल्या  कंडक्टरने सांगितले कोथरूड आहे. झाले, बसथांब्यावरील सगळी गर्दी बसच्या मागे धावू लागली. अबालवृद्ध आपापल्या वेगाने बसकडे धाव घेत होते. म्हातारेकोतारे तीन पायांनी त्यांना जमेल तसे बसकडे धावू लागले. दुर्दैवाने त्यांच्यातही एक अंध प्रवासी होता. जे बसपर्यंत पोहोचले त्यांनी बसवर थापा मारून ती वाजवून बस थांबवण्याची विंनती केली पण व्यर्थ. जे बसपर्यंत पोहोचू शकले नाहीत ते संताप व्यक्त करीत परत थांब्याकडे आले. सर्वात वाईट त्या अंध मुलाचं वाटला. बस नक्की कुठे आहे, थांबलेली आहे की पुढे जातेय, त्याला कुठपर्यंत पुढे जायचं, काहीच माहिती नव्हतं. पुढील बस अर्ध्या तासाने.

             आणि तिसरा प्रसंग. त्या दिवशी मला हवी असणारी बस पुणे स्टेशन वरून निघते, मध्ये मनपाला तिचा थांबा आहे. ती बस दहा वाजून दहा मिनिटांनी भर पावसात मनपाला आली. बसवरील पाटी कोरी, नीट  पाहिल्यावर लक्षात आलं ती वेगळ्याच जागी लावलीये. हे सगळं पाहून बसला हात करेपर्यंत बस थांब्याच्या दहा फूट दुरून सुसाट वेगाने निघून गेली. इतक्या रात्री पुन्हा स्टेशनवरून पुढील बस कधी येणार याची काहीच कल्पना नाही.

            बस वेळेवर न येणे, रिकामी असूनही न थांबवणे; आणि पुढच्या बसला खचाखच गर्दी असणे, सुट्टे पैसे परत न करणे, त्याबद्दल मागणी केल्यास "सुट्टे जवळ ठेवायला काय होतं" म्हणून अंगावर खेकसणे, एखाद्या बसला टीसी आहे हे माहिती असल्यावर मुद्दाम सर्वांची तिकिटे न काढता जागेवरच बसून राहणे, बस बंद पडणे, महिलांच्या सीटवर महिलांना कधीच जागा न मिळणे या बाबी आता पुणेकरांना नवीन नाहीत. उगीच नाही पुण्यात दुचाकींची गर्दी वाढते आहे. पुण्यात स्वत:चे वाहन नसणार्यांना प्रवास करणे म्हणजे खरंच अवघड परिस्थिती आहे. मान्य आहे त्यांचीही काही बाजू असेल पण कोणीतरी या ड्रायव्हर  कंडक्टर लोकांना सौजन्य शिकवा रे.....

Wednesday, September 14, 2011

दान...

          रस्त्यात फिरणारे भिकारी, देवाचे फोटो आणि कुंकू घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया, लहान लहान मुले, वारकरी आहोत, रस्ता चुकलो आहोत असं सांगणारे यांच्यावर त्यांच्याकडे पाहून दया येते पण क्षणभरच! बसमध्ये प्रवाशांना "मी मुकबधीर असून उच्च जातीची/चा आहे. पण अशी अशी घटना झाली, कृपया मला मदत करा" अशा आशयाची पत्रके वाटली जातात. किंवा कोणी एखादा इसम येऊन मी अमक्या अमक्या गावातून आलो, माझे नातेवाईक दवाखान्यात आहेत, माझे सामान चोरीला गेले आहे, घरी परत जायला पैसे नाही वगैरे सांगतो. सर्वांना तो "बिचारा" वाटतो, जवळजवळ सगळेच त्याला पैसे काढून देतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा तोच माणूस येऊन तेच सांगू लागतो तेव्हा ज्यांनी त्याला आधीही पाहिलंय त्यांची बोटे तोंडात जातात. कधी एखादी स्त्री रस्त्यात अडवते, सुरुवात अशी असते की, मराठी येतं का हो तुम्हाला? आपण उत्सुकुतेने थांबून हो म्हणावं तर पुढे यांची वरीलप्रमाणेच एखादी बनवलेली स्टोरी सुरु होते. हे ही सुरुवातीला खरंच वाटतं. एकदा तर एक माणूस दुपारच्या वेळी रस्त्यात भेटेल त्यांना इंग्रजीमध्ये तो बेंगलोरहून आलाय. त्याच्याबरोबर अमुक अमुक घटना घडली. आताच्या जेवणापुरते पैसे मिळतील का? अशी याचना करत होता. पण त्याच्याकडे पाहून तर विश्वास ठेवण्याची इच्छा होत नव्हती. आता तो खरंच गरजू होता की वरच्यांच्याच गटात बसणारा हे तो जाणे आणि देव जाणे. हा झाला अडचणी सांगून खोटं बोलणाऱ्यांचा गट.

           एक गट आहे ज्यामध्ये सकाळी आमच्या घरासमोरून पिंगळा गाणी गात जातो. तो कोणाच्याच घरासमोर थांबून काही मागत नाही. त्याला खरंच काही द्यायची इच्छा होते पण इतक्या सकाळी घरातून बाहेर येईपर्यंत तो खूप पुढे निघून जातो. तेव्हा मनात विचार येतो असं हा माणूस कोणाच्याच घरासमोर थांबला नाही आणि यावरच याचं उत्पन्न असेल तर याला किती मिळत असेल? दुसरा आहे वासुदेव! पण आमच्या इथे येणारा वासुदेव सकाळच्या वेळी न येता दुपारी अकरा-बारानंतर येतो. खूप वर्षांपूर्वी आईने त्याला एकदा दोन रुपये दिले तर त्याने ते अंगणात फेकून दिले, तेव्हापासून आम्ही त्याला पैसे देणं बंद केलं. आमच्या घरासमोर पोतराजही येतो. त्याचाही पारंपरिक उत्पन्नाचा मार्ग अजून त्याने सोडला नाहीये. त्याचं तर पूर्ण कुटुंबच त्याच्याबरोबर असतं. त्यालाही पैसे देताना कधी वाईट वाटत नाही.

           असं म्हणतात की जमाना बदलला आहे, कोणी कोणाला मदत करत नाही. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. पण अशातही पुष्कळ लोक असे असतात की ज्यांना इतरांना मदत करण्याची मनापासून इच्छा असते. थोडक्यात दान करण्याची वृत्ती त्यांच्याकडे असते. आपल्याकडे असं मानतात की दान करावं पण ते सत्पात्री असावं. पण आपण करतोय ते दान सत्पात्री आहे की नाही हेच तर ओळखणं अवघड होऊन बसलंय. ज्यांना खरच मदतीची गरज असते अशांचा आवाज मदतकर्त्यांपर्यंत पोहोचतच नाही. अनाथालये, वृद्धाश्रमे किंवा नावाजलेल्या संस्था इथे जाऊन मदत करणे हा तसा सर्वात सोपा उपाय. पण यातील कितीतरी संस्थांना भेट दिल्यावर लक्षात येतं, खरंच आपल्या मदतीची यांना गरज आहे? आपण केलेली मदत योग्य कारणासाठीच वापरली जाईल?

          कोणा गरजू व्यक्तीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा खर्च करणं सर्वात उत्तम वाटतं. पण एका कुटुंबाचं मला माहिती असलेलं उदाहरण आहे. घरामध्ये तीन अपत्ये आणि नवरा बायको. खूप गरिबीची परीस्थिती. त्या बाईच्या तिच्या कामांमुळे बऱ्याच सोशल असामींशी ओळखी. तो माणूस दारू आणि सिगारेटच्या व्यसनाने कॅन्सर होऊन वारला. त्याच्या बायकोने तिच्या ओळखींचा वापर करून त्याच्या मरणोत्तर विविध देवस्थाने, संस्थांकडून रग्गड पैसा कमावला. तिच्यावर आपत्ती आली हे मान्य. पण तो जिवंत असताना त्याच्या व्यसनांना हिनेच पैसा पुरवलेला. मुलाचे शिक्षण या एका कारणाने तिने तीन संस्थांकडून सर्व फी तीन वेळा जमा केली. आणि इतर मदत मिळालेली वेगळीच. वरकरणी पाहता कोणालाही त्यांना गरज आहे हेच वाटेल. मग मदत नक्की करायची तरी कोणाला?

          एक मात्र आहे की जे खरंच गरजू असतात ते स्वाभिमानी असतात. आणि त्यातले काही जण शोधणं खरंच अवघड आहे. नेत्रदान, रक्तदान आणि देहदान तर आहेच. पण अशामध्ये जिवंतपणी जर कोणाला काही मदत झाली, मग ती किती का लहान असेना , पण ती सत्पात्री असावी हीच देवाजवळ प्रार्थना!
छायाचित्र आंतरजालावरून साभार 
           

Monday, August 29, 2011

कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन कडे लक्ष ठेवल्यास कमीत कमी ६ लाख तरी कुठेही जात नाहीत. कसे?

समजा कौन बनेगा करोडपती मध्ये पुढील प्रश्न विचारला

शम्मी कपूर यांचे मूळ नाव काय?
अ.सिकंदर        ब.शमशेर        क.शामराज        ड.समरराज

तर उत्तर दिल्यानंतर बऱ्याचदा ते बरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी अमिताभ बच्चनचीच मदत होते.

समजा स्पर्धकाने उत्तर दिलं   ब.शमशेर तर अमिताभ पटकन विचारेल आप शुअर है? लॉक किया जाय? ओके तो लॉक करते है   ब.शमशेर

समजा स्पर्धकाने चुकीचं उत्तर दिलं आणि सर्व लाईफ लाईन उपलब्ध असतील तर अमिताभ म्हणेल अगर आप शुअर नही है तो लाईफ लाईन का इस्तेमाल किजीये. आपकी सभी लाईफ लाईन्स जीवित है. तेव्हा समजून जावं की दिलेलं उत्तर हमखास चुकीचं आहे.

जर डबल डीप ही एकाच लाईफ लाईन शिल्लक असेल आणि स्पर्धक दिलेल्या पडाव पेक्षा बराच पुढे पोहोचला असेल आणि तो म्हणाला मला अ आणि क मध्ये कन्फ्युजन आहे. तर अमिताभ म्हणेल की आप अभी तक बहोत उमदा खेले है, मै नही चाहता की आप कोई भी गलती करके इतनी  कम रकम लेके जाये.

तेच स्पर्धक म्हणाला मला अ आणि ब मध्ये कन्फ्युजन आहे तर अमिताभ म्हणेल आपके पास अभी भी डबल डीप लाईफ लाईन है. आप चाहे तो उसका इस्तेमाल कर सकते है.

पण जेव्हा वेळेचा बंधन असेल(टिकटिकी ) तेव्हा मात्र ही सगळी मदत मिळेलच याची खात्री नाही. पण जेव्हा अमिताभ काही सुचवू पाहत असेल तेव्हा समझदार को इशारा काफी होता है.

तसंही ही इतकी मदत तर स्पर्धकांना मिळायलाच हवी कारण आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार -


Source - Internet/Email
We all know KBC is Good Business.
But have you ever pondered...
How Good....????

Any guesses? Let's see...

Airtel is charging Rs.6/- per SMS sent for this contest.

Assuming ther
e are only 100 entries from say 10 cities of some 20 districts and 20 states...

6(Rs/SMS) x 100(entries) x 10(cities) x 20(districts) x 20(states) = 6
100 x 10 x 20 x 20 = Rs.24,00,000

24 lakhs in 20 minutes.
(People trying for the 2 lakhs cash prize)

Imagine what if 1000 entries try out from 100 cities?

The figure simply grows by 2 more zeroes and yields a whopping 24 Crores!!!!

And it does not stop there...

In practice it could be another multiple of 100 or a multiple of 1000 on an average.

In that case it is 24 x 100crores earnings in just 20 minutes on every episode!!!

And the prize money: A mere 2 crore..
(and from whose pocket?)

Smart Business By Siddharth Basu!

And the best part of this calculation is just the SMS earning!!

What about the Ad money?

A rough annual profit calculation goes like this:

2400 x 5 x 4) (episode/month) = 60000 crores.

Let even 50% get dissolved in taxes and other payments, still you will be left with (which includes even the meagre 480 crores of prize money i.e.if every episode bags 2 crore prize)!

30000-crores profit !!! (only from SMS)

Simple Question:
"KAUN BANEGA CROREPATI"
and your options are---

A) SONY TV
B) AIRTEL
C) AMITABH BACHAN
D) SIDDHARTH BASU

Computerji iska jawab bataiye....

Ans: All FOUR..!!!! 

Wednesday, June 15, 2011

प्रिय मैत्रिणीस...

          परवा तुझं लग्न झालं. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा तो हळवा क्षण आलाच. निरोप घेण्याचा! तू हे शहरही सोडत होतीस त्यामुळे निरोप जास्तच गहिरा झाला.  तू तुझ्या वैवाहिक आयुष्यात पाऊल टाकलं आहेस. आणि मला माहिती आहे, प्रत्येक नात्याप्रमाणेच तू हे नातंही यशस्वीच करशील. तुझ्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाने तू सर्वांना आपलंसं करशील.

             तुला सासरी आणि नवीन शहरात रुळायला थोडा वेळ लागेल म्हणा, पण एकदा नवरा आणि मुलं-बाळं यांच्यात गुरफटून गेल्यावर तुला कधी माझी आठवण येईल? नाही का येईना... पण तुला कधीही मनातलं काहीही बोलावसं वाटलं तर मी आहे हे मात्र विसरू नकोस. उलट मी तर म्हणेन तू तुझ्या संसारात इतकी गुरफटून जा, की नकोच येऊ दे तुला माझी आठवण. :)

           तुझा निरोप घेताना आपण एकत्र असतानाच्या सगळ्या आठवणी झरझर डोळ्यांसमोरून वाहू लागल्या. एक तपाची मैत्री आहे आपली असं सर्वांना अभिमानाने  सांगायचो आपण, पण दोन मैत्रिणींना कधीतरी दूर जायचंच असतं, आणि स्वत:च्या संसारात रमायचंच  असतं! दोन मित्र एकमेकांचे कायम मित्र राहतात. पण दोन मैत्रिणी? त्यांना ते कधीच शक्य होत नाही. हे सर्व आपल्या दोघींनाही माहिती होतंच की. तरीही आपण मैत्रीला शक्य तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला. नाही पहिल्यासारखं आपण रोज भेटणार, रोज नाही बोलता येणार आपल्याला. पण त्यामुळे मैत्री का तुटते? आधी एकमेकींच्या हाकेसरशी धावून येणाऱ्या आपण, आता प्राधान्यक्रम बदलेल. पण हे तर व्हायचंच ना! पण वरवर मैत्रिणी म्हणणे आणि मनातून हेवेदावे ठेवणे (हो, अशाही मैत्रिणी असतात.) अशा गोष्टी आपल्यात कधीच झाल्या नाहीत याचा मला अभिमान आहे.

             माझं मन सर्वांसमोरच मोकळं नाही करत मी हे तुलाही माहिती आहे. खूप आहे गं अजून बोलायला पण थांबवते आता. (हुश्श केलं असशील तर याद राख ;)). पुन्हा एकदा तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. नेहमी सुखी रहा.

तुझी मैत्रीण,
...
               

Friday, May 27, 2011

राउळी... मंदिरी...

              देऊळ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते एक अशी वास्तू जिथे मनाला शांतता मिळेल, त्या शांततेत ईश्वराशी एकरूप होऊन आपण स्वत:शी संवाद साधू शकू, जिथून आल्यानंतर मन अगदी हलकं असेल. मला आठवतंय आमच्या गावी अशीच मंदिरे असायची त्यातलं एक होतं नदीच्या काठावर. लहानसंच मंदिर, शेजारी चिंचेचं मोठ्ठं झाड, आणि मंदिराच्या आवारात त्या सावलीचा गारवा. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली नदीकडे जाणारी पाउलवाट. काय प्रसन्न वाटायचं तिथे गेलं की. गावात अजून एक मंदिर, हे मंदिर मात्र भरवस्तीत, गावात यात्रा असते त्या ग्रामदेवतेचं! त्यामुळे इथे कायमच कडेकोट बंदोबस्त, आणि देव आत कुलुपात बंद. पुजाऱ्याच्या वेळेत गेलं तरच तिथे देवाचं दर्शन मिळणार.

            हा फरक का?तर गावातला देव श्रीमंत आणि नदीकाठचा गरीब. गावातल्या देवाच्या गाभाऱ्यात चांदीचं मखर, आणि नदीकाठच्या मंदिरात फक्त एक साधी मूर्ती. हल्ली तर सगळेच देव असे श्रीमंत होऊ लागले आहेत. श्रीमंत देवांना भेट देणाऱ्यांच्या रांगाही मोठ्या, भेट देणारेही मोठे, त्यांच्या दिमतीला असणाऱ्यांची संख्याही मोठी अन त्यांना येणाऱ्या भेटवस्तूही भव्य. कोणी यांच्या हुंडीत सोन्याचे, हिऱ्याचे दागिने टाकतो, कोणी पैशांची पुडकीच्या पुडकी टाकतो, कोणी उंची वस्त्रे टाकतो. इथे सामान्य भाविक चार तासांपासून ते दोन-दोन दिवसांच्या रांगेत तिष्ठत थांबतो आणि दर्शनाची वेळ झाली की त्याला डोळाभरून ज्याच्यासाठी आला त्याला पाहताही येत नाही. यातून किती जणांना देवदर्शनाचे समाधान मिळते माहिती नाही, पण मला तर नक्कीच मिळणार नाही. उलट तिथला रांगेच्या लवकरच्या क्रमांकापासून ते अभिषेकापर्यंत आणि देवाला वाहण्याच्या उदबत्तीपासून ते  मिळणाऱ्या प्रसादापर्यंत प्रत्येक गोष्टीतला भ्रष्टाचार पाहून मन विषण्ण होतं.

             अशा मंदिरांना भेट दिली की एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या बाजारात गेल्यासारखंच वाटतं. यापेक्षा एखादं  दुर्लक्षिलं गेलेलं मंदिर असेल तर तिथे जाऊन पाच मिनिटे बसण्यानेसुद्धा खरंच मंदिरात गेल्यासारखं वाटतं. कळत नाही आपण का आपल्याच देवांना आपल्यापासून दूर लोटतोय? आपण का त्यांना VIP बनवतोय? आपलंच देवाला भेटणं आपणच का महाग करतोय? अजून किती देवस्थानांना पंचतारांकित व्हायचे वेध लागणार आहेत माहिती नाही, पण तिथे काहीच समाधान मिळणार नाही हे खरंच.

              नास्तिक लोकांसाठी ही पोस्त नाही, आस्तिक असूनही मूर्तीपूजा न मानणाऱ्यांसाठीही नाही. बरेचसे लोक वास्तुशास्त्राचे नमुने किंवा केवळ मूर्ती पाहण्यासाठीही मंदिरांमध्ये जातात. पण या सर्वांना सुद्धा मंदिराचं वातावरण भारावून टाकतं. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर देवळात जाणे म्हणजे केवळ औपचारिकताच राहील.छायाचित्रे आंतरजालावरून

Saturday, May 7, 2011

बालगंधर्व

          चित्रपटाबद्दल आधीच खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, आणि प्रेक्षागृह "house full" सुद्धा होते. अगदी जन्मापासूनची कथा नसली तरी "अरे हा तर बालगंधर्व" या सुंदर वाक्याने पहिला प्रसंग संपतो. आणि मग सुबोध भावेची  एन्ट्री! या एन्ट्रीला चित्रपटातल्या प्रेक्षागृहाबरोबरच प्रत्यक्ष प्रेक्षगृहातही टाळ्या येतात.

         तो काळ, तेव्हाचे नाटक कंपन्यांचे वातावरण अगदी हुबेहूब सादर झाले आहे. (हे मला मागच्या सीटवर एक ऐंशी-नव्वदीचे आजोबा बसले होते त्यांच्याकडून समजले, त्यांनी बालगंधर्वांचे प्रत्यक्ष नाटक पाहिले होते). एक मनस्वी कलाकार किंवा एक कलाकार मनस्वी कसा असतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे "नारायण श्रीपाद राजहंस"! आणि तो मनस्वीपणा चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचतो. सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनीत असणारे बालगंधर्व नंतर काही मतभेदाने आणि पंडितच्या मध्यस्तीने स्वत:ची गंधर्व कंपनी सुरु करतात. नंतर या कंपनीने पाहिलेले वैभव, रसिकांवर गाजवलेले अधिराज्य, आणि बालगंधर्वांची नेहमीच "रसिका तुझ्याचसाठी" ही भूमिका... आणि बोलपट आल्यानंतरची कंपनीला लागलेली उतरती कळा, सर्वच अप्रतिम साकार झालंय.

         भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा यांच्या पदांसाठी रंगमंचावर येताना उजवा हात पुढे करून, मान जराशी तिरकी ठेवून, झरझर चालत, आलाप घेत रंगमंचावर येणे सुबोधने हुबेहूब साकारले आहे. आणि आलाप गाताना जिभेची सुद्धा होणारी हालचाल दाखवण्याइतकं डीटेलिंग! "नाही मी बोलत नाथा" च्या वेळी हृदय हेलावून जाते. रसिक देऊ करत असलेल्या मदतीला नकार देणारा प्रसंगही तसाच! द्रौपदीची मयसभा आणि संवाद अप्रतिम! "चीन्मया सकलहृदया" च्या वेळी अथांग जलाशय आणि विस्तीर्ण आकाश यांनी त्यांचे श्रोता आणि प्रेक्षक होणं मनाचा ठाव घेतं!

         सुबोध भावेला विभावरी देशपांडे, किशोर कदम, अविनाश नारकर, अभिजित केळकर, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर सर्वांचीच मिळालेली उत्तम साथ! राहुल देशपांडेचा एकच पण उठावदार प्रसंग. कौशल इनामदार, स्वानंद किरकिरे आणि आनंद भाटे यांनी संगीत आणि पदे अक्षरशः जिवंत केली आहेत. आणि (cherry on the pie च्या ऐवजी) पुरण पोळी आणि आमरसावरचं साजूक तूप म्हणजे उभारलेला सेट. (नितीन चंद्रकांत देसाई नावातच सर्व काही आहे)

         एकदा तरी आणि चित्रपटगृहात जाऊनच पाहावा असा अप्रतिम चित्रपट आहे. प्रेक्षागृह सोडताना जितक्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्याहून कितीतरी सुंदर कलाकृती पाहिल्याची अनुभूती, "हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे...." ते वाक्य आणि चित्रपटाचे संगीत व नाट्यपदे कानात घुमत राहतात.....
                                                                                                    छायाचित्रे आंतरजालावरून
हे ही पहा
http://www.balgandharvathefilm.com/balgandharva.php
http://chandrakantproductions.com/balgandharva-main.php

Tuesday, April 26, 2011

जाहिराती

          माझ्या लहानपणी आमच्याकडे टी.व्ही. नव्हता. मी आणि माझ्यासारखे बरेच जण शेजाऱ्यांकडे जाऊन टी.व्ही. पाहायचे. तेव्हा ज्यांच्याकडे असायचा त्यांच्याकडेही लाकडी खोक्याचा शटरवाला Black-N-White टी.व्ही. असायचा. शनिवारी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. एखाद्या दिवशी अमिताभ बच्चनचा  चित्रपट असला की सगळे म्हणायचे "आज टी.व्ही. ला छान पिक्चर आहे" मग तो "पिक्चर" पहायची उत्सुकता असायची. पण मला त्याही पेक्षा जास्त उत्सुकता असायची ती त्या चित्रपटाआधी १० मिनिटे लागणाऱ्या जाहिरातींची!

         आमचे शेजारी टी.व्ही. लावून ठेवायचे आणि मी माझ्यासारखे अजून काही जाहिरातवेडे  आवडीने जाहीराती बघत बसलेले असायचे. "दिपिकाजी आयीये आयीये, ये लीजिये आपका सब सामान तय्यार...  ये नाही वो......" काय मजा वाटायची निरमाची ही ad  पाहताना... "धारा धारा शुद्ध धारा" सुरु झाले की आपणही त्याबरोबर गावेसे वाटायचे... "बुलंद भारत कि बुलंद तस्वीर....." लागले की आमचेही मन बुलंद व्हायचे... दूरदर्शनची विविध क्रीडापटू मशाल घेऊन धावायचे ती जाहिरात केवळ अप्रतिम... cadbury  ची "कुछ खास है हम सभीमे" म्हणत क्रिकेट ग्राउंड वर गार्डला न जुमानता एक युवती नाचत धावत यायची... सर्फ ची जुनी जाहिरात आधा किलो सर्फ एक के बराबर म्हणत अगदी बाटल्या भरून वगैरे दाखवणे, "दाम" कम्पेअर करणे आणि जाहिरातीत नसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तींनी गृहिणीशी बोलणे, सगळंच छान वाटायचं..... विको च्या जाहिराती तर अजूनही प्रभातला मराठी चित्रपटाआधी पाहायला मिळतात तेव्हा एकदम Nostalgic व्हायला होतं....  लक्स  च्या जाहिरातीत अजूनही माधुरीलाच पाहावंसं वाटतं... लहानपणी अंघोळीचा साबण म्हणजे बाबांसाठी लाईफबॉय आणि आमच्यासाठी लक्स वाटायचा. चोकलेट म्हणजे cadbury वाटायचे, दंतमंजन म्हणजे विको  आणि टूथपेस्ट म्हणजे कोलगेट वाटायचे, चहा म्हणजे रेड लेबल आणि शाम्पू म्हणजे क्लिनिक प्लस!

          त्या तुलनेत हल्लीच्या जाहिराती म्हणजे नुसताच दंगा वाटतो... त्यातून इतर जाहिरातींचे मराठी भाषांतर म्हणजे तर अगदी धन्यवाद. ओठांची हालचाल जुळवण्यासाठी की यांचं मराठीचं ज्ञानच तेवढं माहिती नाही पण कानांना काहीच्या काही सहन करावं  लागतं. आहेत आताही काही जाहिराती चांगल्या, पण काहींची मजा एकदा पाहिल्यानंतरच निघून जाते. खरंच जुनं ते सोनं हे वाक्य मला जाहिरातींच्या बाबतीत तरी नक्कीच म्हणावसं वाटतं....


Friday, April 15, 2011

आस...(कविता)छायाचित्र आंतरजालावरून
        
   चैत्राने बघ दिली पालवी
   तरुवर वेलींना...
   नभानेही दिधला मृद्गंध
   या अतुष्ट धरणीला...
   तूही आता
   सोड अबोला
   अन दर्शन दे नयनांस...
   आता तुझीच जीवा रे आस....   


    आम्र मोहरता
    कोकीळ भुलले ...
    मेघ दाटता
    मयूरही फुलले...
    तुलाच कसे ना
    काहीच रीझवे
    करिसी मज का उदास...
    आता तुझीच जीवा रे आस....

                                                       मज विरह का
                                                       चातकापरी...
                                                       सोड रुसवा हा
                                                       कशास  दूरी...
                                                       तव स्पर्शाने
                                                       गंधित वारा
                                                       बिलगु दे अंगास...
                                                       आता तुझीच जीवा रे आस...


Friday, April 8, 2011

उपजत...

          रविवारी सुटीचा दिवस म्हणून माझे दोन छोटे दोस्त साक्षी आणि साई माझ्याबरोबर खेळायला घरी आलेले. ही दोघे चुलत भावंडं. वय साधारण साडेतीन चार वर्षांच्या आसपास असेल दोघांचंही. त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळत नाही. साक्षीकडे गोष्टींचं पुस्तक होतं, त्यात बऱ्याच प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे होती. त्यांच्याशी त्यातल्या गोष्टींबद्दल बोलताना साई म्हणाला,

"आम्ही हे प्राणी पाहायला बागेत जाणारे".

मीही त्याला सहज म्हणाले,
"तुम्ही बागेत जाणार तर मला पण न्या ना..."

साई थोडा विचार करून... 
"अगं पण आमच्याकडे तर दोनच गाड्या आहेत. एका गाडीवर मी, आई आणि बाबा आणि दुसऱ्या गाडीवर साक्षी, काका आणि काकू. मग तू कुठे बसणार? आम्ही नाही नेणार तुला...."

मग मी हाताच्या मुठी वळवून त्या डोळ्यांसमोर फिरवत म्हणाले,
"उं उं उं मला नेणार नाही तुम्ही? मग मी रडणार..."

साईचा इवलासा चेहरा अजूनही विचारातच दिसत होता...

तेवढ्यात साक्षी माझा हात बाजूला करत म्हणाली,
"ताई तू रडू नकोस, मी थोड्याच जागेवर बसेन, मम्माला पण थोड्याच जागेवर बसायला सांगू...  मग तुला बसायला जागा होईल आणि तुला पण नेऊ,  पण तू रडू नकोस...."

तेव्हा वाटलं... उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional  असतात का? 

Tuesday, March 22, 2011

शिवरायांचा सांगावा... (कविता)

Image Courtesy: Internet

काल चक्क स्वप्नात
महाराज आले,
अन चौफेर नजर फिरवून
मग म्हणाले...

सह्याद्री तर अजूनही तोच,
या देशाची हद्द
कुठे गेली पण आज इथल्या
गड्यातली जिद्द

पहा तिकडे चौको-चौकी
सज्ज जयंतीचे मांडव
मनातुनी परी सर्व कोरडे,
ईर्ष्या घालतसे तांडव

आमचे नाव म्हणजे राहिले आहे
निव्वळ राजकारण
पैशासाठी सेनापती ठेवती
देशासही तारण...

आमच्या मिरवणुकीत नाचे
ही मद्यधुंद तरुणाई
कुठे आहे तानाजींची उर्मी
अन बाजींची नवलाई?
                                                              
आमच्या नावे इथे
या संघटना मिरविती
ग्रंथ इथले तुडविती हे,
जनास अन भिवविती

आम्ही जोपासले अठरापगड इथे,
नांदले गुण्या-गोविंदाने
आज काही म्हणती 'शिवबा आमचा',
का गर्जती ही विधाने?
                                                         
बहुत दु:खेदेखील इथे
दिसते आहे एक आस..
इथला सामान्यच  पुन्हा घडवेल
महाराष्ट्राचा इतिहास...

जगदंब जगदंब, श्रींच्या मनी
आज पुन्हा तीच इच्छा येवो,
अन सच्च्या मराठी मनाचे आज
इथे 'स्वराज्य' होवो...


Tuesday, March 15, 2011

नियती

              एक लालबुड्या बुलबुल बरेच दिवस झाले पारिजातकापाशी  घिरट्या घालत होता. मग दुपारच्या निवांत वेळी हळूहळू काड्या, गवत, कापूस, चिंध्या इत्यादी जमवायला त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात पक्षीणही  त्याच्या बरोबर येऊ लागली. तसं आंब्याचं झाडही होतंच, पण आंब्यावर कावळ्यांनी आधीच ठाण मांडल्याने असेल किंवा उपजतच रसिकतेने असेल, लालबुड्यांनी घरट्यासाठी पारिजातकाचे झाड निवडले. थोड्याच दिवसात लहानसेच पण सुबक  घरटे गुंफून तयार  झाले. आम्हा सर्वांना फारच कौतुक वाटे  घरट्याचे! लालबुडे किलबिल किलबिल करत अंगणभर फिरत असत.
संपूर्ण वातावरणच  बदलून टाकले होते त्या इवल्याशा पक्ष्यांनी. घरट्याचे रोज निरीक्षण चालूच असायचे. थोड्याच दिवसांत त्या घरट्यात चंदेरी आणि काळे ठिपके असलेली अंडी दिसली. कोण आनंद झाला ती पाहून!


                  साधारण तेव्हाच मनीलाही चार पिल्ले झालेली.  ती पिल्ले तर घरभर बागडत होती. त्यांना आवरता आवरता नाकी  नउ  येत. मध्ये मध्ये पक्षी फिरायला गेले कि घरट्याची पाहणीही चालूच होती आमची. आता अंड्यांमधून चिमुकलीशी दोन पिल्ले बाहेर आली होती. मनीची पिल्ले आणि पक्ष्यांची पिल्ले आम्हाला छंदच जडला होता त्यांचे निरीक्षण करण्याचा!


               पण कुठून कोण जाणे एका बोक्याला यांची चाहूल लागली. एक दिवस दुपारी येऊन त्याने मनीचे एक पिल्लू पळवले. आम्ही सावध झालो पण दुसर्या दिवशी तो आल्यावरही 
आम्ही काहीच करू  शकलो नाही, त्याला हुसकावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण आमच्या लक्षात यायच्या आताच त्याने दोन पिल्लांना मारून टाकले होते आणि तिसरे तोंडात घेऊन पळाला तो बोकाधम. पिल्लांसाठी खूप वाईट वाटले. मनी बिचारी एकटीच घरभर त्यांना शोधत फिरत होती.

       
दुसऱ्या दिवशी रात्री बाहेरून झाडाच्या पानांचा आवाज होतोय असे वाटले. बाहेर जाऊन पहिले तर लालबुड्यांच्या घरट्याजवळ तोच बोका.  तेव्हा त्याला हुसकावून लावले. पण त्याने कधी संधी साधली माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरटे अस्ताव्यस्त खाली पडलेले, आणि लालबुड्या एकटाच फिरताना दिसतो अजूनही कधीतरी दुपारच्या वेळी!
               

Thursday, March 10, 2011

स्त्रीस (कविता)

आज एकविसाव्या शतकात
          स्वत:च्या सौंदर्याचा बाजार मांडलायस  तू
          फक्त दिखाव्याच्या जगात अडकलीयेस तू
मिस वर्ल्ड होण्याची स्वप्ने तू पाहतेस
त्यासाठी संस्कारांनाही पाने पुसतेस

         तुझी काया पूर्वी असायची झाकण्यासाठी
         आता धडपडतेस  तू तीच दाखवण्यासाठी
स्त्री-मुक्तीच्या लढ्याची सोंगं करतेस
पण तू तर स्वच्छंदी मुक्ताच आहेस
         आधीही होतीस आणि पुढेही राहशील!

तुझ्याचमुळे रामायण घडलं  नि महाभारतही तुझ्याचमुळे!
        तेव्हापासून तुझं महत्त्व आहे,  तरी म्हणतेस मी बंधनात आहे!
स्वत:लाच इतकं स्वस्त केलंयेस तू
        की shaving क्रीमच्या add मध्येही दिसलीच पाहिजेस  तू
असलंच स्वातंत्र्य हवा होतं का तुला?

बुद्धी शक्तीच्या च्या जोरावर कितीही पुढे जा
पण तुझ्या शालीनतेला विसरू नकोस
समजूतदार होऊन नाती जोड, ती तोडू नकोस
तुझ्या उत्कर्षाआड  येण्याची कोणाचीही हिंमत नाही
पण तूच स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नको

तुला देणगी आहे जिजाऊ बनण्याची,
राणी लक्ष्मी नि देवकी होण्याची
         स्वत:ला घडवतानाच दुसऱ्यांना घडव
         प्रेमाने सगळ्यांशी नातं जडव
तू आहेस म्हणूनच तर विश्व आहे
'आई' ही हाक ऐकण्याची संधी फक्त तुलाच आहे....


Wednesday, March 2, 2011

स्वप्नातलं मन (कविता)

स्वप्नात रमणारं  मन आपलंच असतं
देहाला निश्चल ठेवून सूप्तरूपाने   फिरून येतं..
वास्तवापेक्षा तेच जग अधिक प्रिय वाटतं त्याला
इथं जे मिळत नाही त्याचा तिथे शोध घेतं...
स्वप्नात सगळं मनाचंच  राज्य असतं
तरी तिथेही काहीबाही विचार करतं
प्रत्यक्षात तर आहेच मन मारणं...
तिथं तरी मुक्त व्हायला याचं काय जातं...
कधी कधी तर जागेपणीही   स्वप्नं पाहतं
पण त्यांना आवर घालायला हे तयार   नसतं..
उगीचच एक वेगळं जग निर्माण करून
स्वप्नांच्या दुनियेत पुन्हा स्वप्न पाहू लागतं...
स्वप्नातल्या स्वप्नातही याला कळत नाही
की हे काही आपलं खरं जग नाही ...
या स्वप्नाळूपणाचा  अंतच नाही?
कुठून तरी आनंद मिळवायचा इतकंच याला कळतं...
स्वप्नात रमणारं  मन आपलंच असतं...


Thursday, February 10, 2011

ऋणानुबंध

            मध्यंतरी   एक सुंदर  वाक्य  वाचण्यात  आले  "ज्याच्याशी   आपला  जितका  ऋणानुबंध आहे  तितके  दिवसच   आपण   त्याच्याबरोबर  राहतो" आणि  मला  हे  वाक्य  मनापासून  पटले.

               काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. शाळेतल्या काही मित्र-मैत्रिणी शाळा संपल्यानंतर संपर्कातही नसतात, जी   नसतात त्यांच्याशी ऋणानुबंध संपलेला असतो, आणि  जे त्यानंतरही आपलेच राहतात त्यांच्याशी ऋणानुबंध शिल्लक असतो.  तीच गोष्ट महाविद्यालयीन आणि कार्यालयीन  मित्रांची!  अशी कितीतरी माणसे आपल्याच स्मृतींमध्ये असतील जे आता संपर्कात नाहीत. काही संपर्कात असूनही फारसे बोलणे नाही,  शोधायला गेलो तर काही विशेष कारणही सापडणार नाही, पण आता आपण पूर्वीइतकेच  त्यांच्या जवळ नसतो हे मात्र खरं! असे नसेल तर सहवासात  दुरावा का येतो? प्रेमभंग का होतात? काही लोकांशी एकमेकांचे तोंडही न पाहण्या इतके  वितुष्ट का निर्माण होते?

                ऋणानुबंध दोन अर्थाने संपुष्टात येतात, ती व्यक्ती एकतर आपल्याबरोबर नसते किंवा ती व्यक्ती या जगातच नसते. काहींशी फार लळा नसताना ऋणानुबंध संपतात, तर काहींशी खूप जिव्हाळा असूनही ते संपू शकतात, काहींशी संपलेले बंध पुन्हा निर्माण होतात आणि कारणे नियती ठरवते!  आपण मात्र जुळलेले ऋणानुबंध जपण्याचा मनापासून  प्रयत्न  करायचा.......
      

Thursday, January 27, 2011

नेट भेट ते थेट भेट

      भेट म्हटलं कि पूर्वी व्हायची ती प्रत्यक्ष भेट, किंवा पत्र भेट नाहीतर तिकडे जाणारी माणसे शोधून निरोपांची देवाण घेवाण.. आपल्या माणसांशी बोलण्यासाठी दिवसोंदिवसांची प्रतीक्षा...नंतर दूरध्वनी आले आणि भेट जरा सोपी झाली. पण हा दूरध्वनी सर्वांनाच परवडेबल नसल्याने शेजारी पाजारी निरोप ठेवणेही आलेच. त्वरित संपर्कासाठी हि सोय फारच छान होती... आणि असाच अचानक तंत्रज्ञानाने सर्वांच्याच आयुष्यात प्रवेश केला आणि होऊ लागली भ्रमण भेट व नेट भेट.....

     नेट भेटीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नवीन माणसे जोडली जाणे. अनेकांशी एकाच वेळी संपर्क होऊनही   इकडच्या कानाची तिकडच्या कानाला खबर नाही, आणि मुद्दामहून खबर होऊ द्यायची असेल तर ग्रुप चाट आहेच. ग्रुप चाटचा फायदा म्हणाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार :) प्रत्यक्ष बोलताना एक वेळ तुमचे म्हणणे कदाचित दुर्लक्षले जाईल. पण ग्रुप मधल्या कॉमेंट्स या वाचल्या जातातच, शिवाय तुम्ही विचार करूनही बोलू शकता, आणि बोललेले बदलूही शकता (वाह हे तर फारच छान.....). इथे तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा तुमच्या लिखाणाची ताकद जास्त असते. शिवाय समोरच्याच्या  बोलण्याची  लकब, आवाज हे काहीच माहिती नसल्याने आपण त्याने बोललेले वाक्य आपल्या मनाने ऐकतो. त्यामुळे सगळेच फार जवळचे वाटतात (काही अगदीच उद्धट लोक सोडून...)

      पण कितीही झाले तरी प्रत्यक्ष भेटीची सर नेट भेटीला नाही. नेटवर कितीही दिवसांपासून ओळखीची असणारी काही माणसे समोर आल्यावर परकी वाटू शकतात.. तर प्रत्यक्ष भेटणारी बसमधील ५ मिनिटांची ओळख असली तरी गाढ मैत्री होऊ शकते.

     आम्हा बझ्झकर्यांचीही काल २६ जानेवारीला समोरासमोर भेट झाली, अन इतके दिवस टिप्पण्यानमधून  बोलणारे आम्ही खरंच भेटलो. भेटीचा अनुभव तर छान होताच, पण जी गोष्ट नेटवर कळत नाही ते म्हणजे वागणे... सर्वांचे वागणे समजले, आणि नेटभेटीवरचे भेटणे प्रत्यक्षात परके वाटते हा समज दूर झाला...

मग तुमचा काही वेगळा अनुभव नेटवरील भेटीच्या थेट भेटीनंतर?Monday, January 3, 2011

शब्द (कविता)

मधुर शब्द, कटू शब्द,
अर्थपूर्ण शब्द नि निरर्थक शब्द
अमृतात ओथंबलेले  शब्द
तर काही अगदीच कोरडे शब्द
आतून आलेले शब्द
नि वरवरचे शब्द
                                                            प्रत्येक शब्द वेगळा
                                                            स्वत:चं अस्तित्व जपणारा!
                                                            काही शब्द निरर्थक वाटतात
                                                            पण तरीही ते गूढ असतात..
                                                            शब्दांच्या खेळात फक्त शब्दच असतात...
                                                            स्पर्धीही तेच अन प्रतिस्पर्धीही तेच
                                                            एकमेकांशी द्वंद्व करता करता 
                                                            माणसाच्या जीवणीवर नाचत असतात..


कधी कधी मात्र शब्दांच्या पलीकडले
      शब्दही बोलू शकत नाहीत...
नजरच न बोलता सर्व बोलते
      आणि शब्द मध्ये पडत नाहीत....