Friday, November 2, 2018

नवं-जुनं

नवीन वर्ष आलं की मी हे करणार, ते करणार. नवीन ठिकाणी नोकरी लागली की मी असं काम करणार. नवीन ठिकाणी फिरायला गेलं की मी अमुक अमुक बघणार. किती नवीन गोष्टी येत असतात ना आयुष्यात? नवीन म्हणजे एखादी गोष्ट एकतर पूर्ण जगासाठीच नवीन असते किंवा आपल्यासाठी नवीन असते. नवीन गोष्टींचं आकर्षण आणि अप्रूप प्रत्येकच सामान्य माणसाला असतं, असं आकर्षण वाटलं नाही तर आपण साधू-संत होऊन जाऊ.

खूप दिवस तेच तेच कपडे वापरले की ते कपडे फाटले, विरले नसले आणि मापात असले तरी नवीन खरेदी करावीशी वाटतेच. जी गोष्ट कपड्यांची तीच नेहमी वापरात असणाऱ्या इतर वस्तूंची देखील! जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवंच असतं. सारखं काय तेच तेच, असं सगळ्यांनाच वाटतं, त्यालाच काहीजण 'चेंज हवाय' असं म्हणतात आणि तेच माणूस असल्याचं लक्षण आहे. कोणाचं कितीही छान चाललं असलं तरी आयुष्यात नवीन काहीतरी घडावं असं सगळ्यांनाच वाटतं. 

प्रत्येक जण आपापल्या अभिरुचीप्रमाणे नवीन गोष्टींची वाट पाहत असतो. नवं पुस्तक, नवा चित्रपट, नवीन टीव्ही सिरीयल, नवं गाणं, नवा प्रवास, नवीन गॅजेट्स यांची ओढ आपल्याला असतेच. कोणाला नवीन माणसांना भेटायला आवडतं, कोणाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडतं, कोणाला नवनवीन खाद्यपदार्थ खायला आवडतात तर कोणाला सारखे स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर टाकायला आवडतात, शिवाय ते टाकले की नव्या कमेंट्स आणि नव्या लाईक्सच्या आपण प्रतीक्षेत असतो.

जुनं जाऊ देऊन नवीन येणं हा निसर्गाचाच नियम आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन असतो, आणि तो आपल्याला जगायला मिळतो हे आपलं भाग्य असतं. केशवसुत देखील म्हणतातच, "जुने जाऊ द्या मरणालागुनी". जुन्या आठवणी कितीही रम्य असल्या तरी फार काळ त्यात नाही ना रमता येत? आताचे क्षण जुने होतील तेव्हा त्यांच्या आठवणी तितक्याच रम्य असतील याची काळजी आपणच घ्यायची असते ना?

आपल्याला कितीही आवड आणि हौस असली तरी असली प्रत्येक वेळी नवीन काही मिळेलंच असं नसतं ना?  अशा वेळी सगळ्यात जास्त समाधान कशात मिळत असेल तर  जुन्याच गोष्टी नव्याने गवसण्यात. जुनी माणसं, जुनी नाती, जुनेच दृष्टिकोन नव्याने सापडतात ना तेव्हा खरी नव्याची आस पूर्ण होते. कारण नवंही कधीतरी जुनं होणारच असतं ना!

Monday, October 8, 2018

चर्चा

चर्चा म्हटलं की त्यापुढे आपोआपच 'निरर्थक' हा शब्द मनात येतो. माझ्यासारख्या फार बोलक्या नसणाऱ्या व्यक्तींना तर कोणत्याही चर्चेचा मनस्वी कंटाळा येतो. सहभागी होणारी सगळीच माणसे जर समजूतदार असतील आणि तर्काला धरून विचार करणारी असतील तर चर्चा करण्यात काहीतरी अर्थ तरी आहे. पण दुसरा कितीही तर्कशुद्ध बोलत असेल तरी माझंच खरं म्हणणाऱ्यांशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे? 

चर्चेचे pros आणि cons काय असावेत? जर काही ज्ञानी लोकांमध्ये एखादा अज्ञानी मनुष्य बसला असेल तर त्यांची चर्चा ऐकून एखाद्याच्या ज्ञानात भर पडू शकते. पण सगळेच ज्ञानी किंवा सगळेच अज्ञानी असतील तर नुसतेच वादविवाद होतात. घरातील मोठ्यांच्या चर्चा लहानांनी ऐकल्या तर काहीतरी विचारधारा तयार व्हायला मदत होते. भले ती घरच्यांच्या बाजूने असेल किंवा विरुद्ध असेल! आपण खरंच निर्णय घेण्यामध्ये कुठे अडकलो असू तर चर्चेने प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. पण येणारी परिस्थिती कशी असेल याचा काहीच अंदाज नसेल तर मात्र त्याबद्दल चर्चा करणं व्यर्थ आहे. हापिसात वगैरे चर्चांचा उपयोग होतो कारण तिथे प्रत्येक विषयात वेगळे तज्ञ असतात, एकाला दुसऱ्याच्या तांत्रिक विषयांमध्ये तितकं ज्ञान असेलंच असं नसतं पण तिथेही कितीतरी वेळा चर्चा भरकटतातच!

आज वेगवेगळ्या बातम्यांच्या वाहिन्यांवर रोज कसल्या ना कसल्या चर्चा चालू असतात. पण त्यातून कोणाला काही ज्ञान मिळण्याऐवजी, कोण आपलीच भूमिका कशा पद्धतीने पुढे रेटतोय हेच पाहायला मिळतं. त्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही पण प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे आणायला सरसावलेला असतो. पटत तर कोणालाच कोणाचंच नाही, दुसऱ्याचं म्हणणं बरोबर असलं तरी खोडून काढणं, इतका एकच या चर्चांचा उद्देश असतो. असल्या चर्चांचा 'वेळ फुकट जाणे' याशिवाय काय उपयोग? सोशल मीडियावरही राजकारण इत्यादी  विषयांवर चर्चा चालू असतात आणि त्या चर्चेचं भांडणात कधी रूपांतर होतं हे कळतही नाही. एका ठराविक वय आणि अनुभवानंतर प्रत्येक जण आपापल्या मतांशी बऱ्यापैकी ठाम झालेला असतो. विरुद्ध विचारधारेतही काही तथ्य असू शकतं हे मान्य करण्याइतकी लवचिकता राहिलेली नसते. 

थोडक्यात काय तर एखाद्याला खरंच एखाद्या बाबतीत दुसऱ्याचं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त माहिती असलेल्या व्यक्तीचं ऐकून काही निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा उपयोगी ठरते, पण आधीच मनात एखादा निर्णय झालेला आहे आणि तोच दुसऱ्यांवर लादायचा आहे असं असेल तर चर्चा निरर्थक ठरते. चर्चेच्या शेवटी काही निर्णय झाला आणि त्यात सगळे खुश असतील असं होण्याची शक्यता फारच कमी असते. राजकारण, बॉलिवूड आणि क्रिकेट इत्यादी मला हमखास "निरर्थक" चर्चेचे विषय वाटतात. या प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी मुरब्बी माणूस सगळे निर्णय घ्यायला बसलेला असतो आणि आम्ही मात्र उगीच आमच्या तोंडाची वाफ दवडतो. तुम्ही चर्चा केलीत म्हणून विराटच्या ऐवजी रोहितला कप्तान करणार आहेत का? किंवा तुम्ही चर्चा केलीत म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का?

तर अशा या चर्चा, चर्वितचर्वणं आणि चऱ्हाटांवर कोणी किती अवलंबून राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण प्रत्येकाला शेवटी स्वत:ची लढाई स्वत:च लढायची असल्याने चर्चांवर विसंबून राहणारा माणूस आयुष्यात फार पुढे जात नसावा, हे माझं वैयक्तिक मत!

Friday, September 7, 2018

बझ नॉस्टॅल्जिया

आज जीमेल मध्ये सहज जुन्या बझकडे लक्ष गेलं.
सहा वर्षे झाली आहेत बझ बंद होऊन!
Bad patch मधून सावरण्यासाठी खूप आधार मिळाला होता बझचा.
बझमुळेच ब्लॉग सुरु केला होता आणि बझवरील प्रतिक्रियांमुळेच लिहिण्यास प्रेरणा मिळायची.
साध्या साध्या बझपोस्ट वरच्या देखील प्रतिक्रिया वाचताना असं वाटतंय की कधी कधी आपण इतकं intelligent आणि हजरजबाबी कसं बोलू शकायचो? आणि तेच कधी एकदमच बावळट!
असो पण बझ मध्ये जी मजा होती ती FB, WA ग्रुप्स, गुगल+ या कशातच नाही, वयाचा परिणाम असेल कदाचित :P