Friday, October 21, 2011

तेव्हाची दिवाळी...

            आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी... शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव जाणे, पुढच्या वर्षी ते परत घ्यायलाच लागायचे. आणि मग हुर्ये...... सुरु व्हायची दिवाळीची सुटी!

             सुटी सुरु झाली की आईला साफसफाईमध्ये मदत करायला सुरुवात करायची. दोन-तीन वर्षाआड घराला रंग देण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा पसारा आवरायला काढला की त्यात खूप वर्षांपूर्वी हरवलेले पेन, पेन्सिली, कंपास पेट्या असं बरंच काय काय सापडायचं, फराळाचं खायला मिळाल्यावर होणार नाही इतका आनंद त्या जुन्या वस्तू सापडल्यावर व्हायचा! आणि रंग देऊन झाला की घर एकदम नवीन नवीन होऊन जायचं. आणि मग सगळी आवराआवरी, नवीन पडदे, नवीन बेडशीट, तोरणं...

               त्यानंतर लगबग सुरु व्हायची किल्ला बनवायची, जरा लवकरच बनवायचा कारण दिवाळीच्या मुख्य दिवसांपर्यंत धान्य उगवायला पाहिजे ना. किल्ला बनवायचा म्हणजे जाम धमाल यायची, दिवसभर नुसतं चिखलात खेळायचं. दगड, विटा माती, आणि बाडदानं वापरून सुंदरसा किल्ला तयार करायचा. एकीकडे भेटकार्ड करायला घ्यायची! शिक्षकांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी... मी कधी मिकी वगैरेची भेटकार्ड नाही बनवली. एकतर पानंफुलं, टिकल्या-आरसे चिकटवून किंवा जुनी घरी आलेली पणत्या वगैरे यांची चित्र पाहून तशी काढायची. मग आकाशकंदील तयार करायचा, दर वर्षी वेगळ्या डिझाईनचा! आणि घरात एव्हाना फराळाची तयारीही सुरु झालेली असायची. मग तिथे गरम गरम फराळ खायला मिळण्यासाठी मदत करायचं नाटक करून निम्मा फराळ फस्त करायचा. आणि जोडीला आईचं ओरडणं.

"आत्ताच संपवू नका, अजून दिवाळीत खायचंय, चार घरी द्यायचाय..."

पण ऐकतंय कोण. एके दिवशी मग बाबांना वेळ असेल तेव्हा लक्ष्मी रोडला जाऊन कपडे खरेदी करायचे. शक्यतो आईच्याच पसंतीचे. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता, तरी २-४ जण  आपल्या पुढे कपडे खरेदी साठी असतील तर असं वाटायचं किती गर्दी आहे!

              पहिला दिवा आजी एकादशीला लावायची, पण खरी दिवाळी सुरु व्हायची धनत्रयोदशीला. आणि मग तीन चार दिवस छान  छान रांगोळ्या, उटण्याची अंघोळ, रेडिओवर पहाटे पहाटे लागणारं कीर्तन, आणि दुपारच्या वेळी विशेष कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री किल्ल्यावर चित्र मांडायची, पणत्या लावायच्या, पूजा करायची आणि छान छान कपडे घालून फटाके उडवायचे. आणि दिवाळी संपली की मग शाळेत दिलेले सहामाहीचे प्रकल्प करायचे! दिवाळी येऊन गेली की मूड एकदम फ्रेश होऊन जायचा.

              आताही यातल्या काही गोष्टी अजूनही आहेत, पण प्रत्येक गोष्टीत मनाच्या समाधानापेक्षा दिखाऊपणा जास्त वाढलाय असं वाटतं. साधेपणा हरवलाय. फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हते, तरी भेटकार्डामधून पोहोचलेल्या शुभेच्छांची गोडी जास्त वाटायची. असो.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाणारच, आपण मात्र जुन्या आठवणी मनात ठेवून नवीन प्रकारे आनंद लुटायला शिकायचं!  :)Thursday, October 13, 2011

पीएमटी

          पीएमटीच्या नावाने पुण्यातल्या लाखो लोकांपैकी कोणी ना कोणी रोजच शिव्या घालत असतो. पण परवा एकाच दिवसात २-३ प्रसंग असे घडले की मलाही पीएमटीला शिव्या देण्याची मनापासून इच्छा झाली. माझ्या हापिसाच्या प्रवासात मला जाताना दोन आणि येताना दोन अशा चार बस बदलण्याचा योग येतो. त्या दिवशी हापिसातून घरी परतत असतना बराच उशीर झाला होता. एका थांब्यावर बस ड्रायव्हरने बस संथ केली पण न थांबवताच पुढे नेली. त्या थांब्यावर एक अंध जोडपं उभं होतं. त्यांनी बसपर्यंत येऊन कोणती बस आहे हे विचारेपर्यंत बस पुढे निघालीसुद्धा. मान्य केलं ड्रायव्हरने त्यांना पाहिलं नसेल, पण कंडक्टरला तर ते दिसत होते, त्यानेही सिंगल बेल मारण्याचे कष्ट घेतले नाहीत. आणि माझी चूक, मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असल्याने त्यांनी इतक्या दुरून कोणत्या ठिकाणाचे नाव घेतले ते इतरांप्रमाणेच मलाही ऐकू आले नाही. आणि समजा कोणाला ऐकू आलेही असते आणि त्याने त्यांच्यासाठी थांबण्याची विनंती केली असती तरी ड्रायव्हर गाडी थोडीच थांबवणार होता?

           दुसरा प्रसंग, गाडी मनपावरून कोथरूडला निघालेली. पूर्ण रिकामी बस. रात्रीचे १० वाजलेले. बस लागल्याचे प्रवाशांना आधी सांगितलेच गेले नाही. जेव्हा बस हळूहळू पुढे निघाली तेव्हा कोणीतरी विचारल्यावर  तिथल्या  कंडक्टरने सांगितले कोथरूड आहे. झाले, बसथांब्यावरील सगळी गर्दी बसच्या मागे धावू लागली. अबालवृद्ध आपापल्या वेगाने बसकडे धाव घेत होते. म्हातारेकोतारे तीन पायांनी त्यांना जमेल तसे बसकडे धावू लागले. दुर्दैवाने त्यांच्यातही एक अंध प्रवासी होता. जे बसपर्यंत पोहोचले त्यांनी बसवर थापा मारून ती वाजवून बस थांबवण्याची विंनती केली पण व्यर्थ. जे बसपर्यंत पोहोचू शकले नाहीत ते संताप व्यक्त करीत परत थांब्याकडे आले. सर्वात वाईट त्या अंध मुलाचं वाटला. बस नक्की कुठे आहे, थांबलेली आहे की पुढे जातेय, त्याला कुठपर्यंत पुढे जायचं, काहीच माहिती नव्हतं. पुढील बस अर्ध्या तासाने.

             आणि तिसरा प्रसंग. त्या दिवशी मला हवी असणारी बस पुणे स्टेशन वरून निघते, मध्ये मनपाला तिचा थांबा आहे. ती बस दहा वाजून दहा मिनिटांनी भर पावसात मनपाला आली. बसवरील पाटी कोरी, नीट  पाहिल्यावर लक्षात आलं ती वेगळ्याच जागी लावलीये. हे सगळं पाहून बसला हात करेपर्यंत बस थांब्याच्या दहा फूट दुरून सुसाट वेगाने निघून गेली. इतक्या रात्री पुन्हा स्टेशनवरून पुढील बस कधी येणार याची काहीच कल्पना नाही.

            बस वेळेवर न येणे, रिकामी असूनही न थांबवणे; आणि पुढच्या बसला खचाखच गर्दी असणे, सुट्टे पैसे परत न करणे, त्याबद्दल मागणी केल्यास "सुट्टे जवळ ठेवायला काय होतं" म्हणून अंगावर खेकसणे, एखाद्या बसला टीसी आहे हे माहिती असल्यावर मुद्दाम सर्वांची तिकिटे न काढता जागेवरच बसून राहणे, बस बंद पडणे, महिलांच्या सीटवर महिलांना कधीच जागा न मिळणे या बाबी आता पुणेकरांना नवीन नाहीत. उगीच नाही पुण्यात दुचाकींची गर्दी वाढते आहे. पुण्यात स्वत:चे वाहन नसणार्यांना प्रवास करणे म्हणजे खरंच अवघड परिस्थिती आहे. मान्य आहे त्यांचीही काही बाजू असेल पण कोणीतरी या ड्रायव्हर  कंडक्टर लोकांना सौजन्य शिकवा रे.....