मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

अडगळ


            अडगळीच्या खोलीत त्या दिवशी काचा-कवड्या, जुने पत्ते, सोंगट्या, सागरगोटे सापडले. आणि विचार आला ही अडगळीची खोली आहे की आठवणींची खोली आहे? काही अचानक भेटणाऱ्या आठवणी… तिथे नकोशा झालेल्या वस्तूंकडे पाहिलं की तिथल्या अंधाराचा आणि धुळीचा त्रास होतो, पण अशा आठवणी भेटल्या की तेच धुलीकण तिथल्या कवडश्यामध्ये फेर धरून नाचू लागतात… 

          प्रत्येकाच्याच घरात एक अडगळीची खोली असते. कधीतरी चार-सहा महिन्यातून आपल्याला त्यात प्रवेश करावाच लागतो. इच्छा असो वा नसो. घराचं ऐश्वर्य किंवा नीटनेटकेपणा जिथे दिसतो त्या खोल्या तर आपण सर्वांनाच दाखवतो. पण अडगळीची खोली ही सर्वांसाठी नसते. तिथे फक्त आपल्याला किंवा आपल्या अगदी विश्वासू लोकांनाच प्रवेश असतो… कोणती गोष्ट कोणत्या क्षणी अडगळ बनेल हे काही सांगता येत नाही. आपण आपल्या स्वार्थाप्रमाणे सोयीची आणि गैरसोयीची वस्तू ठरवणार…

          कित्येक न लागणाऱ्या आणि याची विल्हेवाट लावू म्हणून बाजूला काढून ठेवलेल्या वस्तू. आणि कित्येक प्रिय पण इतर कुठे ठेवायला जागा नाही किंवा अगदीच रोज लागत नाहीत म्हणून तिथे ठेवलेल्या वस्तू... कधी आठवणीत रमावसं वाटलं की इथे खोलीचं दार उघडून आत जाता येतं. आणि पसाऱ्याचा त्रास होऊ लागला तर सरळ दार बंद करून बाहेर येता येतं. प्रिय आणि अप्रिय गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या असल्या तरी त्यांना सहज बाजूलाही काढता येतं. आणि अगदीच काही नाही तर गोड आठवणी अलगद बाजूला काढून ठेवून नको असणारी अडगळ आपल्याला विकून टाकता येते.

             मनाच्या अडगळीचं दारही असंच हवं तेव्हा बंद करता आलं असतं किंवा या अडगळीला विकून टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं…