मंगळवार, १५ मार्च, २०११

नियती

              एक लालबुड्या बुलबुल बरेच दिवस झाले पारिजातकापाशी  घिरट्या घालत होता. मग दुपारच्या निवांत वेळी हळूहळू काड्या, गवत, कापूस, चिंध्या इत्यादी जमवायला त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात पक्षीणही  त्याच्या बरोबर येऊ लागली. तसं आंब्याचं झाडही होतंच, पण आंब्यावर कावळ्यांनी आधीच ठाण मांडल्याने असेल किंवा उपजतच रसिकतेने असेल, लालबुड्यांनी घरट्यासाठी पारिजातकाचे झाड निवडले. थोड्याच दिवसात लहानसेच पण सुबक  घरटे गुंफून तयार  झाले. आम्हा सर्वांना फारच कौतुक वाटे  घरट्याचे! लालबुडे किलबिल किलबिल करत अंगणभर फिरत असत.
संपूर्ण वातावरणच  बदलून टाकले होते त्या इवल्याशा पक्ष्यांनी. घरट्याचे रोज निरीक्षण चालूच असायचे. थोड्याच दिवसांत त्या घरट्यात चंदेरी आणि काळे ठिपके असलेली अंडी दिसली. कोण आनंद झाला ती पाहून!


                  साधारण तेव्हाच मनीलाही चार पिल्ले झालेली.  ती पिल्ले तर घरभर बागडत होती. त्यांना आवरता आवरता नाकी  नउ  येत. मध्ये मध्ये पक्षी फिरायला गेले कि घरट्याची पाहणीही चालूच होती आमची. आता अंड्यांमधून चिमुकलीशी दोन पिल्ले बाहेर आली होती. मनीची पिल्ले आणि पक्ष्यांची पिल्ले आम्हाला छंदच जडला होता त्यांचे निरीक्षण करण्याचा!


               पण कुठून कोण जाणे एका बोक्याला यांची चाहूल लागली. एक दिवस दुपारी येऊन त्याने मनीचे एक पिल्लू पळवले. आम्ही सावध झालो पण दुसर्या दिवशी तो आल्यावरही 
आम्ही काहीच करू  शकलो नाही, त्याला हुसकावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण आमच्या लक्षात यायच्या आताच त्याने दोन पिल्लांना मारून टाकले होते आणि तिसरे तोंडात घेऊन पळाला तो बोकाधम. पिल्लांसाठी खूप वाईट वाटले. मनी बिचारी एकटीच घरभर त्यांना शोधत फिरत होती.

       
दुसऱ्या दिवशी रात्री बाहेरून झाडाच्या पानांचा आवाज होतोय असे वाटले. बाहेर जाऊन पहिले तर लालबुड्यांच्या घरट्याजवळ तोच बोका.  तेव्हा त्याला हुसकावून लावले. पण त्याने कधी संधी साधली माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरटे अस्ताव्यस्त खाली पडलेले, आणि लालबुड्या एकटाच फिरताना दिसतो अजूनही कधीतरी दुपारच्या वेळी!
               

९ टिप्पण्या:

 1. शेम टू शेम आमच्या घरी घडलेलं.. मला खूप वाईट वाटले होते तेव्हा.. त्या बुलबुलने तीन वर्षे सतत त्याच जागी घरटे बांधले. पण दुर्दैवाने तिची पिल्ले बोका (पहिले आणी तिसरे वर्ष), भारद्वाज(दुसरे वर्ष) यांनी खाल्लीत. मी त्या बुलबुलच्या जोडप्यात इतका गुंतलो होतो की मला माझी हतबलता पाहून खूप वाईट वाटायचे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. हो ना! ती पक्षीण सुद्धा गेली पिल्लानजवळच असल्याने :(
  २ दिवसांत ६ जीव... मी कधीच विसरू शकत नाही ही घटना....

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. BinaryBandya™, दीपक :((

  THE PROPHET खरंच खूप अधम होता तो....

  प्रत्युत्तर द्याहटवा