मंगळवार, २६ एप्रिल, २०११

जाहिराती

          माझ्या लहानपणी आमच्याकडे टी.व्ही. नव्हता. मी आणि माझ्यासारखे बरेच जण शेजाऱ्यांकडे जाऊन टी.व्ही. पाहायचे. तेव्हा ज्यांच्याकडे असायचा त्यांच्याकडेही लाकडी खोक्याचा शटरवाला Black-N-White टी.व्ही. असायचा. शनिवारी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. एखाद्या दिवशी अमिताभ बच्चनचा  चित्रपट असला की सगळे म्हणायचे "आज टी.व्ही. ला छान पिक्चर आहे" मग तो "पिक्चर" पहायची उत्सुकता असायची. पण मला त्याही पेक्षा जास्त उत्सुकता असायची ती त्या चित्रपटाआधी १० मिनिटे लागणाऱ्या जाहिरातींची!

         आमचे शेजारी टी.व्ही. लावून ठेवायचे आणि मी माझ्यासारखे अजून काही जाहिरातवेडे  आवडीने जाहीराती बघत बसलेले असायचे. "दिपिकाजी आयीये आयीये, ये लीजिये आपका सब सामान तय्यार...  ये नाही वो......" काय मजा वाटायची निरमाची ही ad  पाहताना... "धारा धारा शुद्ध धारा" सुरु झाले की आपणही त्याबरोबर गावेसे वाटायचे... "बुलंद भारत कि बुलंद तस्वीर....." लागले की आमचेही मन बुलंद व्हायचे... दूरदर्शनची विविध क्रीडापटू मशाल घेऊन धावायचे ती जाहिरात केवळ अप्रतिम... cadbury  ची "कुछ खास है हम सभीमे" म्हणत क्रिकेट ग्राउंड वर गार्डला न जुमानता एक युवती नाचत धावत यायची... सर्फ ची जुनी जाहिरात आधा किलो सर्फ एक के बराबर म्हणत अगदी बाटल्या भरून वगैरे दाखवणे, "दाम" कम्पेअर करणे आणि जाहिरातीत नसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तींनी गृहिणीशी बोलणे, सगळंच छान वाटायचं..... विको च्या जाहिराती तर अजूनही प्रभातला मराठी चित्रपटाआधी पाहायला मिळतात तेव्हा एकदम Nostalgic व्हायला होतं....  लक्स  च्या जाहिरातीत अजूनही माधुरीलाच पाहावंसं वाटतं... लहानपणी अंघोळीचा साबण म्हणजे बाबांसाठी लाईफबॉय आणि आमच्यासाठी लक्स वाटायचा. चोकलेट म्हणजे cadbury वाटायचे, दंतमंजन म्हणजे विको  आणि टूथपेस्ट म्हणजे कोलगेट वाटायचे, चहा म्हणजे रेड लेबल आणि शाम्पू म्हणजे क्लिनिक प्लस!

          त्या तुलनेत हल्लीच्या जाहिराती म्हणजे नुसताच दंगा वाटतो... त्यातून इतर जाहिरातींचे मराठी भाषांतर म्हणजे तर अगदी धन्यवाद. ओठांची हालचाल जुळवण्यासाठी की यांचं मराठीचं ज्ञानच तेवढं माहिती नाही पण कानांना काहीच्या काही सहन करावं  लागतं. आहेत आताही काही जाहिराती चांगल्या, पण काहींची मजा एकदा पाहिल्यानंतरच निघून जाते. खरंच जुनं ते सोनं हे वाक्य मला जाहिरातींच्या बाबतीत तरी नक्कीच म्हणावसं वाटतं....







शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

आस...(कविता)



छायाचित्र आंतरजालावरून
        
   चैत्राने बघ दिली पालवी
   तरुवर वेलींना...
   नभानेही दिधला मृद्गंध
   या अतुष्ट धरणीला...
   तूही आता
   सोड अबोला
   अन दर्शन दे नयनांस...
   आता तुझीच जीवा रे आस....   


    आम्र मोहरता
    कोकीळ भुलले ...
    मेघ दाटता
    मयूरही फुलले...
    तुलाच कसे ना
    काहीच रीझवे
    करिसी मज का उदास...
    आता तुझीच जीवा रे आस....

                                                       मज विरह का
                                                       चातकापरी...
                                                       सोड रुसवा हा
                                                       कशास  दूरी...
                                                       तव स्पर्शाने
                                                       गंधित वारा
                                                       बिलगु दे अंगास...
                                                       आता तुझीच जीवा रे आस...



शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

उपजत...

          रविवारी सुटीचा दिवस म्हणून माझे दोन छोटे दोस्त साक्षी आणि साई माझ्याबरोबर खेळायला घरी आलेले. ही दोघे चुलत भावंडं. वय साधारण साडेतीन चार वर्षांच्या आसपास असेल दोघांचंही. त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळत नाही. साक्षीकडे गोष्टींचं पुस्तक होतं, त्यात बऱ्याच प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे होती. त्यांच्याशी त्यातल्या गोष्टींबद्दल बोलताना साई म्हणाला,

"आम्ही हे प्राणी पाहायला बागेत जाणारे".

मीही त्याला सहज म्हणाले,
"तुम्ही बागेत जाणार तर मला पण न्या ना..."

साई थोडा विचार करून... 
"अगं पण आमच्याकडे तर दोनच गाड्या आहेत. एका गाडीवर मी, आई आणि बाबा आणि दुसऱ्या गाडीवर साक्षी, काका आणि काकू. मग तू कुठे बसणार? आम्ही नाही नेणार तुला...."

मग मी हाताच्या मुठी वळवून त्या डोळ्यांसमोर फिरवत म्हणाले,
"उं उं उं मला नेणार नाही तुम्ही? मग मी रडणार..."

साईचा इवलासा चेहरा अजूनही विचारातच दिसत होता...

तेवढ्यात साक्षी माझा हात बाजूला करत म्हणाली,
"ताई तू रडू नकोस, मी थोड्याच जागेवर बसेन, मम्माला पण थोड्याच जागेवर बसायला सांगू...  मग तुला बसायला जागा होईल आणि तुला पण नेऊ,  पण तू रडू नकोस...."

तेव्हा वाटलं... उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional  असतात का?