शनिवार, ७ मे, २०११

बालगंधर्व

          चित्रपटाबद्दल आधीच खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, आणि प्रेक्षागृह "house full" सुद्धा होते. अगदी जन्मापासूनची कथा नसली तरी "अरे हा तर बालगंधर्व" या सुंदर वाक्याने पहिला प्रसंग संपतो. आणि मग सुबोध भावेची  एन्ट्री! या एन्ट्रीला चित्रपटातल्या प्रेक्षागृहाबरोबरच प्रत्यक्ष प्रेक्षगृहातही टाळ्या येतात.

         तो काळ, तेव्हाचे नाटक कंपन्यांचे वातावरण अगदी हुबेहूब सादर झाले आहे. (हे मला मागच्या सीटवर एक ऐंशी-नव्वदीचे आजोबा बसले होते त्यांच्याकडून समजले, त्यांनी बालगंधर्वांचे प्रत्यक्ष नाटक पाहिले होते). एक मनस्वी कलाकार किंवा एक कलाकार मनस्वी कसा असतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे "नारायण श्रीपाद राजहंस"! आणि तो मनस्वीपणा चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचतो. सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनीत असणारे बालगंधर्व नंतर काही मतभेदाने आणि पंडितच्या मध्यस्तीने स्वत:ची गंधर्व कंपनी सुरु करतात. नंतर या कंपनीने पाहिलेले वैभव, रसिकांवर गाजवलेले अधिराज्य, आणि बालगंधर्वांची नेहमीच "रसिका तुझ्याचसाठी" ही भूमिका... आणि बोलपट आल्यानंतरची कंपनीला लागलेली उतरती कळा, सर्वच अप्रतिम साकार झालंय.

         भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा यांच्या पदांसाठी रंगमंचावर येताना उजवा हात पुढे करून, मान जराशी तिरकी ठेवून, झरझर चालत, आलाप घेत रंगमंचावर येणे सुबोधने हुबेहूब साकारले आहे. आणि आलाप गाताना जिभेची सुद्धा होणारी हालचाल दाखवण्याइतकं डीटेलिंग! "नाही मी बोलत नाथा" च्या वेळी हृदय हेलावून जाते. रसिक देऊ करत असलेल्या मदतीला नकार देणारा प्रसंगही तसाच! द्रौपदीची मयसभा आणि संवाद अप्रतिम! "चीन्मया सकलहृदया" च्या वेळी अथांग जलाशय आणि विस्तीर्ण आकाश यांनी त्यांचे श्रोता आणि प्रेक्षक होणं मनाचा ठाव घेतं!

         सुबोध भावेला विभावरी देशपांडे, किशोर कदम, अविनाश नारकर, अभिजित केळकर, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर सर्वांचीच मिळालेली उत्तम साथ! राहुल देशपांडेचा एकच पण उठावदार प्रसंग. कौशल इनामदार, स्वानंद किरकिरे आणि आनंद भाटे यांनी संगीत आणि पदे अक्षरशः जिवंत केली आहेत. आणि (cherry on the pie च्या ऐवजी) पुरण पोळी आणि आमरसावरचं साजूक तूप म्हणजे उभारलेला सेट. (नितीन चंद्रकांत देसाई नावातच सर्व काही आहे)

         एकदा तरी आणि चित्रपटगृहात जाऊनच पाहावा असा अप्रतिम चित्रपट आहे. प्रेक्षागृह सोडताना जितक्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्याहून कितीतरी सुंदर कलाकृती पाहिल्याची अनुभूती, "हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे...." ते वाक्य आणि चित्रपटाचे संगीत व नाट्यपदे कानात घुमत राहतात.....
                                                                                                    छायाचित्रे आंतरजालावरून
हे ही पहा
http://www.balgandharvathefilm.com/balgandharva.php
http://chandrakantproductions.com/balgandharva-main.php

२३ टिप्पण्या:

 1. धन्यु ग प्रीती... नक्की पहा, खूप छान चित्रपट आहे... :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. सुंदर वर्णन केले आहे आणि चित्रपटाबद्दल वाचून आता तो जास्तच पहावासा वाटू लागला आहे.....धन्यवाद!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. खूप धन्यवाद श्रिया, आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत... :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. चांगलं लिहिलंय.. इथं पहायला मिळण्याची शक्यता नाहीये.. मिळालं तर नक्की बघेन...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद आनंद, हो संधी मिळाल्यास नक्की पहा :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. स्पंदन, खूप छान चित्रपट आहे, चुकवू नकोस...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. छान लिहिलं आहे... बघायची बरीच इच्छा आहे सिनेमा! पाहू कधी योग येतो!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. सुबोध भावे आता National Award साठी तयार रहा ....!

  नितीन देसाई धन्यवाद अप्रतिम चित्रपट बनवल्याबद्दल .....!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 9. Prashanth धन्यवाद, आणि ब्लोगवर स्वागत... National Award तर नक्कीच मिळणार.. कान्स मध्येही प्रदर्शित झालाय चित्रपट...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 10. काल बघितला, एकदम अप्रतिम आहे. अजून मोठा असला असता तरी हरकत नव्हती. मस्त लिहिलंयस !!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 11. खरंय सुहास, चित्रपट अप्रतिम आहेच, त्यांचा भरभराटीचा काळ अजून दाखवायला हरकत नव्हती.
  धन्यवाद :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 12. मला ही प्रचंड आवडला चित्रपट...सुबोध भावेचा अभिनय, नितीन चंद्रकांत देसाई यांची कला, आनंद भाटे यांची पदे सारे काही विलक्षण आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 13. हो, बालगंधर्व चित्रपट - मराठी चित्रपटांचा मानबिंदू.....

  प्रत्युत्तर द्याहटवा