Friday, 21 October 2011

तेव्हाची दिवाळी...

            आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी... शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव जाणे, पुढच्या वर्षी ते परत घ्यायलाच लागायचे. आणि मग हुर्ये...... सुरु व्हायची दिवाळीची सुटी!

             सुटी सुरु झाली की आईला साफसफाईमध्ये मदत करायला सुरुवात करायची. दोन-तीन वर्षाआड घराला रंग देण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा पसारा आवरायला काढला की त्यात खूप वर्षांपूर्वी हरवलेले पेन, पेन्सिली, कंपास पेट्या असं बरंच काय काय सापडायचं, फराळाचं खायला मिळाल्यावर होणार नाही इतका आनंद त्या जुन्या वस्तू सापडल्यावर व्हायचा! आणि रंग देऊन झाला की घर एकदम नवीन नवीन होऊन जायचं. आणि मग सगळी आवराआवरी, नवीन पडदे, नवीन बेडशीट, तोरणं...

               त्यानंतर लगबग सुरु व्हायची किल्ला बनवायची, जरा लवकरच बनवायचा कारण दिवाळीच्या मुख्य दिवसांपर्यंत धान्य उगवायला पाहिजे ना. किल्ला बनवायचा म्हणजे जाम धमाल यायची, दिवसभर नुसतं चिखलात खेळायचं. दगड, विटा माती, आणि बाडदानं वापरून सुंदरसा किल्ला तयार करायचा. एकीकडे भेटकार्ड करायला घ्यायची! शिक्षकांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी... मी कधी मिकी वगैरेची भेटकार्ड नाही बनवली. एकतर पानंफुलं, टिकल्या-आरसे चिकटवून किंवा जुनी घरी आलेली पणत्या वगैरे यांची चित्र पाहून तशी काढायची. मग आकाशकंदील तयार करायचा, दर वर्षी वेगळ्या डिझाईनचा! आणि घरात एव्हाना फराळाची तयारीही सुरु झालेली असायची. मग तिथे गरम गरम फराळ खायला मिळण्यासाठी मदत करायचं नाटक करून निम्मा फराळ फस्त करायचा. आणि जोडीला आईचं ओरडणं.

"आत्ताच संपवू नका, अजून दिवाळीत खायचंय, चार घरी द्यायचाय..."

पण ऐकतंय कोण. एके दिवशी मग बाबांना वेळ असेल तेव्हा लक्ष्मी रोडला जाऊन कपडे खरेदी करायचे. शक्यतो आईच्याच पसंतीचे. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता, तरी २-४ जण  आपल्या पुढे कपडे खरेदी साठी असतील तर असं वाटायचं किती गर्दी आहे!

              पहिला दिवा आजी एकादशीला लावायची, पण खरी दिवाळी सुरु व्हायची धनत्रयोदशीला. आणि मग तीन चार दिवस छान  छान रांगोळ्या, उटण्याची अंघोळ, रेडिओवर पहाटे पहाटे लागणारं कीर्तन, आणि दुपारच्या वेळी विशेष कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री किल्ल्यावर चित्र मांडायची, पणत्या लावायच्या, पूजा करायची आणि छान छान कपडे घालून फटाके उडवायचे. आणि दिवाळी संपली की मग शाळेत दिलेले सहामाहीचे प्रकल्प करायचे! दिवाळी येऊन गेली की मूड एकदम फ्रेश होऊन जायचा.

              आताही यातल्या काही गोष्टी अजूनही आहेत, पण प्रत्येक गोष्टीत मनाच्या समाधानापेक्षा दिखाऊपणा जास्त वाढलाय असं वाटतं. साधेपणा हरवलाय. फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हते, तरी भेटकार्डामधून पोहोचलेल्या शुभेच्छांची गोडी जास्त वाटायची. असो.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाणारच, आपण मात्र जुन्या आठवणी मनात ठेवून नवीन प्रकारे आनंद लुटायला शिकायचं!  :)15 comments:

 1. धन्यवाद सखी :)
  अजूनही बऱ्याच आठवणी आहेत...

  ReplyDelete
 2. Thank you striker.... :)
  Thanks a lot Shailesh :)

  ReplyDelete
 3. Very Nice... :)

  Snehal Dange

  ReplyDelete
 4. Hey Thank you So much Snehal :)
  and welcome to my blog...

  ReplyDelete
 5. दोन लायनी वाचायला म्हणून आलो आणि पार कमेंट लिहूनच थांबतोय...
  परत एकदा वाचू का? मन रडत ग, त्या आठवणी आणि आजचा दिखावा पाहून... पण मी तोच आहे आणि दिवाळी माझी आहे... आजही त्या गुरुजनांना एखाद भेटकार्ड पोचलं तर! :)
  लेखात गम्मत आहे, परत वाचण्याची! देव करो आणि एका दिवाळीत माझा किल्लापण होवो! :)
  दिन दिन दिवाळी,
  गाई म्हशी ओवाळी
  गाई म्हशी कोणाच्या?
  लक्ष्मणाच्या
  लक्ष्मण कोणाचा?
  आई बापांचा
  दे माय खोबर्‍याची वाटी
  वाघाच्या पाठीत,
  घालीन काठी

  (कवी माहीत नाही)

  ReplyDelete
 6. खूप खूप धन्स अभिषेक :)
  जाने कहा गये वो दिन असं होतं कधीकधी माझं.
  आता दिवाळीची मोठी सुटी नसते, घरी दिवाळीची लगबग फक्त आईचीच सुरु असते, आम्ही आपलं "वीकेंड"ला तिला मदत करणार फक्त...

  ReplyDelete
 7. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता -- Are you writing about Diwali in 1857? Because Laxmi Road has always been very crowded during Diwali season at least since 1950.

  ReplyDelete
 8. मस्तच लिहल आहेस...अगदी बालपणात घेऊन गेलीस ..अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...धन्स...!!!

  ReplyDelete
 9. @Anonymous, Its not 1857, in 1990-1995 also crowd was there, but it was not flooded as per my memory, if u have seen flooded then I might be luckier than you...
  Thank you for comment n welcome to blog :)

  ReplyDelete
 10. खूप धन्यवाद दवबिंदू :)
  आठवणी आठवताना खरंच खूप मजा येते...

  ReplyDelete
 11. छान आठवण ..:)

  मी मुळचा नासिक चा.. दिवाळीतला तेव्हाच नासिक आणि आताच नासिक ह्यात आता जमीन अस्मानाचा फरक..आता सगळं नकली-नकली वाटत...त्या वेळीचा उत्साह जसा असायचा तसा नाही वाटत .. आताचा उत्साह म्हणजे विकत घेतलेल्या फराळासारखा झाला आहे ..

  ReplyDelete
 12. अगदी खरंय विजय, नासिक असो वा पुणे, दिवाळी सगळीकड्चीच बदललीये आता...
  ब्लॉगवर तुमचं स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद :)

  ReplyDelete