रस्त्यात फिरणारे भिकारी, देवाचे फोटो आणि कुंकू घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया, लहान लहान मुले, वारकरी आहोत, रस्ता चुकलो आहोत असं सांगणारे यांच्यावर त्यांच्याकडे पाहून दया येते पण क्षणभरच! बसमध्ये प्रवाशांना "मी मुकबधीर असून उच्च जातीची/चा आहे. पण अशी अशी घटना झाली, कृपया मला मदत करा" अशा आशयाची पत्रके वाटली जातात. किंवा कोणी एखादा इसम येऊन मी अमक्या अमक्या गावातून आलो, माझे नातेवाईक दवाखान्यात आहेत, माझे सामान चोरीला गेले आहे, घरी परत जायला पैसे नाही वगैरे सांगतो. सर्वांना तो "बिचारा" वाटतो, जवळजवळ सगळेच त्याला पैसे काढून देतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा तोच माणूस येऊन तेच सांगू लागतो तेव्हा ज्यांनी त्याला आधीही पाहिलंय त्यांची बोटे तोंडात जातात. कधी एखादी स्त्री रस्त्यात अडवते, सुरुवात अशी असते की, मराठी येतं का हो तुम्हाला? आपण उत्सुकुतेने थांबून हो म्हणावं तर पुढे यांची वरीलप्रमाणेच एखादी बनवलेली स्टोरी सुरु होते. हे ही सुरुवातीला खरंच वाटतं. एकदा तर एक माणूस दुपारच्या वेळी रस्त्यात भेटेल त्यांना इंग्रजीमध्ये तो बेंगलोरहून आलाय. त्याच्याबरोबर अमुक अमुक घटना घडली. आताच्या जेवणापुरते पैसे मिळतील का? अशी याचना करत होता. पण त्याच्याकडे पाहून तर विश्वास ठेवण्याची इच्छा होत नव्हती. आता तो खरंच गरजू होता की वरच्यांच्याच गटात बसणारा हे तो जाणे आणि देव जाणे. हा झाला अडचणी सांगून खोटं बोलणाऱ्यांचा गट.
एक गट आहे ज्यामध्ये सकाळी आमच्या घरासमोरून पिंगळा गाणी गात जातो. तो कोणाच्याच घरासमोर थांबून काही मागत नाही. त्याला खरंच काही द्यायची इच्छा होते पण इतक्या सकाळी घरातून बाहेर येईपर्यंत तो खूप पुढे निघून जातो. तेव्हा मनात विचार येतो असं हा माणूस कोणाच्याच घरासमोर थांबला नाही आणि यावरच याचं उत्पन्न असेल तर याला किती मिळत असेल? दुसरा आहे वासुदेव! पण आमच्या इथे येणारा वासुदेव सकाळच्या वेळी न येता दुपारी अकरा-बारानंतर येतो. खूप वर्षांपूर्वी आईने त्याला एकदा दोन रुपये दिले तर त्याने ते अंगणात फेकून दिले, तेव्हापासून आम्ही त्याला पैसे देणं बंद केलं. आमच्या घरासमोर पोतराजही येतो. त्याचाही पारंपरिक उत्पन्नाचा मार्ग अजून त्याने सोडला नाहीये. त्याचं तर पूर्ण कुटुंबच त्याच्याबरोबर असतं. त्यालाही पैसे देताना कधी वाईट वाटत नाही.
असं म्हणतात की जमाना बदलला आहे, कोणी कोणाला मदत करत नाही. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. पण अशातही पुष्कळ लोक असे असतात की ज्यांना इतरांना मदत करण्याची मनापासून इच्छा असते. थोडक्यात दान करण्याची वृत्ती त्यांच्याकडे असते. आपल्याकडे असं मानतात की दान करावं पण ते सत्पात्री असावं. पण आपण करतोय ते दान सत्पात्री आहे की नाही हेच तर ओळखणं अवघड होऊन बसलंय. ज्यांना खरच मदतीची गरज असते अशांचा आवाज मदतकर्त्यांपर्यंत पोहोचतच नाही. अनाथालये, वृद्धाश्रमे किंवा नावाजलेल्या संस्था इथे जाऊन मदत करणे हा तसा सर्वात सोपा उपाय. पण यातील कितीतरी संस्थांना भेट दिल्यावर लक्षात येतं, खरंच आपल्या मदतीची यांना गरज आहे? आपण केलेली मदत योग्य कारणासाठीच वापरली जाईल?
कोणा गरजू व्यक्तीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा खर्च करणं सर्वात उत्तम वाटतं. पण एका कुटुंबाचं मला माहिती असलेलं उदाहरण आहे. घरामध्ये तीन अपत्ये आणि नवरा बायको. खूप गरिबीची परीस्थिती. त्या बाईच्या तिच्या कामांमुळे बऱ्याच सोशल असामींशी ओळखी. तो माणूस दारू आणि सिगारेटच्या व्यसनाने कॅन्सर होऊन वारला. त्याच्या बायकोने तिच्या ओळखींचा वापर करून त्याच्या मरणोत्तर विविध देवस्थाने, संस्थांकडून रग्गड पैसा कमावला. तिच्यावर आपत्ती आली हे मान्य. पण तो जिवंत असताना त्याच्या व्यसनांना हिनेच पैसा पुरवलेला. मुलाचे शिक्षण या एका कारणाने तिने तीन संस्थांकडून सर्व फी तीन वेळा जमा केली. आणि इतर मदत मिळालेली वेगळीच. वरकरणी पाहता कोणालाही त्यांना गरज आहे हेच वाटेल. मग मदत नक्की करायची तरी कोणाला?
एक मात्र आहे की जे खरंच गरजू असतात ते स्वाभिमानी असतात. आणि त्यातले काही जण शोधणं खरंच अवघड आहे. नेत्रदान, रक्तदान आणि देहदान तर आहेच. पण अशामध्ये जिवंतपणी जर कोणाला काही मदत झाली, मग ती किती का लहान असेना , पण ती सत्पात्री असावी हीच देवाजवळ प्रार्थना!