Wednesday, 14 September 2011

दान...

          रस्त्यात फिरणारे भिकारी, देवाचे फोटो आणि कुंकू घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया, लहान लहान मुले, वारकरी आहोत, रस्ता चुकलो आहोत असं सांगणारे यांच्यावर त्यांच्याकडे पाहून दया येते पण क्षणभरच! बसमध्ये प्रवाशांना "मी मुकबधीर असून उच्च जातीची/चा आहे. पण अशी अशी घटना झाली, कृपया मला मदत करा" अशा आशयाची पत्रके वाटली जातात. किंवा कोणी एखादा इसम येऊन मी अमक्या अमक्या गावातून आलो, माझे नातेवाईक दवाखान्यात आहेत, माझे सामान चोरीला गेले आहे, घरी परत जायला पैसे नाही वगैरे सांगतो. सर्वांना तो "बिचारा" वाटतो, जवळजवळ सगळेच त्याला पैसे काढून देतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा तोच माणूस येऊन तेच सांगू लागतो तेव्हा ज्यांनी त्याला आधीही पाहिलंय त्यांची बोटे तोंडात जातात. कधी एखादी स्त्री रस्त्यात अडवते, सुरुवात अशी असते की, मराठी येतं का हो तुम्हाला? आपण उत्सुकुतेने थांबून हो म्हणावं तर पुढे यांची वरीलप्रमाणेच एखादी बनवलेली स्टोरी सुरु होते. हे ही सुरुवातीला खरंच वाटतं. एकदा तर एक माणूस दुपारच्या वेळी रस्त्यात भेटेल त्यांना इंग्रजीमध्ये तो बेंगलोरहून आलाय. त्याच्याबरोबर अमुक अमुक घटना घडली. आताच्या जेवणापुरते पैसे मिळतील का? अशी याचना करत होता. पण त्याच्याकडे पाहून तर विश्वास ठेवण्याची इच्छा होत नव्हती. आता तो खरंच गरजू होता की वरच्यांच्याच गटात बसणारा हे तो जाणे आणि देव जाणे. हा झाला अडचणी सांगून खोटं बोलणाऱ्यांचा गट.

           एक गट आहे ज्यामध्ये सकाळी आमच्या घरासमोरून पिंगळा गाणी गात जातो. तो कोणाच्याच घरासमोर थांबून काही मागत नाही. त्याला खरंच काही द्यायची इच्छा होते पण इतक्या सकाळी घरातून बाहेर येईपर्यंत तो खूप पुढे निघून जातो. तेव्हा मनात विचार येतो असं हा माणूस कोणाच्याच घरासमोर थांबला नाही आणि यावरच याचं उत्पन्न असेल तर याला किती मिळत असेल? दुसरा आहे वासुदेव! पण आमच्या इथे येणारा वासुदेव सकाळच्या वेळी न येता दुपारी अकरा-बारानंतर येतो. खूप वर्षांपूर्वी आईने त्याला एकदा दोन रुपये दिले तर त्याने ते अंगणात फेकून दिले, तेव्हापासून आम्ही त्याला पैसे देणं बंद केलं. आमच्या घरासमोर पोतराजही येतो. त्याचाही पारंपरिक उत्पन्नाचा मार्ग अजून त्याने सोडला नाहीये. त्याचं तर पूर्ण कुटुंबच त्याच्याबरोबर असतं. त्यालाही पैसे देताना कधी वाईट वाटत नाही.

           असं म्हणतात की जमाना बदलला आहे, कोणी कोणाला मदत करत नाही. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. पण अशातही पुष्कळ लोक असे असतात की ज्यांना इतरांना मदत करण्याची मनापासून इच्छा असते. थोडक्यात दान करण्याची वृत्ती त्यांच्याकडे असते. आपल्याकडे असं मानतात की दान करावं पण ते सत्पात्री असावं. पण आपण करतोय ते दान सत्पात्री आहे की नाही हेच तर ओळखणं अवघड होऊन बसलंय. ज्यांना खरच मदतीची गरज असते अशांचा आवाज मदतकर्त्यांपर्यंत पोहोचतच नाही. अनाथालये, वृद्धाश्रमे किंवा नावाजलेल्या संस्था इथे जाऊन मदत करणे हा तसा सर्वात सोपा उपाय. पण यातील कितीतरी संस्थांना भेट दिल्यावर लक्षात येतं, खरंच आपल्या मदतीची यांना गरज आहे? आपण केलेली मदत योग्य कारणासाठीच वापरली जाईल?

          कोणा गरजू व्यक्तीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा खर्च करणं सर्वात उत्तम वाटतं. पण एका कुटुंबाचं मला माहिती असलेलं उदाहरण आहे. घरामध्ये तीन अपत्ये आणि नवरा बायको. खूप गरिबीची परीस्थिती. त्या बाईच्या तिच्या कामांमुळे बऱ्याच सोशल असामींशी ओळखी. तो माणूस दारू आणि सिगारेटच्या व्यसनाने कॅन्सर होऊन वारला. त्याच्या बायकोने तिच्या ओळखींचा वापर करून त्याच्या मरणोत्तर विविध देवस्थाने, संस्थांकडून रग्गड पैसा कमावला. तिच्यावर आपत्ती आली हे मान्य. पण तो जिवंत असताना त्याच्या व्यसनांना हिनेच पैसा पुरवलेला. मुलाचे शिक्षण या एका कारणाने तिने तीन संस्थांकडून सर्व फी तीन वेळा जमा केली. आणि इतर मदत मिळालेली वेगळीच. वरकरणी पाहता कोणालाही त्यांना गरज आहे हेच वाटेल. मग मदत नक्की करायची तरी कोणाला?

          एक मात्र आहे की जे खरंच गरजू असतात ते स्वाभिमानी असतात. आणि त्यातले काही जण शोधणं खरंच अवघड आहे. नेत्रदान, रक्तदान आणि देहदान तर आहेच. पण अशामध्ये जिवंतपणी जर कोणाला काही मदत झाली, मग ती किती का लहान असेना , पण ती सत्पात्री असावी हीच देवाजवळ प्रार्थना!
छायाचित्र आंतरजालावरून साभार 
           

8 comments:

 1. 'दे दान सुटे गिरान' ... दान दिल्यावरच गिरान सुटेल काय! हा प्रश्न तेंव्हाही आणि आणि आजही पडतो... आणि मग दान हातातच राहून जात (म्हणजे कुठेच जात नाही)! लेख समर्पक आहे.. अशी उदाहरण असतातच... बऱ्याच वेळा असही होत की ज्याला मदत करतो तो अगदी आवर्जून लक्षात ठेवतो आणि आपण विसरलेले असतो.. आणि अचानक एक दिवस तो भावड्या अगदी आनंदाने भेटतो.. त्यावेळेसची आठवण करून देतो.. :) भारी क्षण असतो ... कारण आपण अगदी खुलेपणाने मदत करतो, जी की तितक्याच सहज विसरूनही जातो. आणि उलट असत, अगदी सख्ख्या वाटणाऱ्या ला सुद्धा जाणीवपूर्वक मदत करावी आणि तो त्याची काहीच पावती देत नाही ह्याची रुखरुख राहावी अस होत. ह्यात सख्ख्या-पराया चा दोष नाही दाखवायचा, ते फक्त उदाहरणा दाखल.
  कधी कधी वाटत दान आपल्याला आपण काय आहोत ते दाखवत, आरशासारखं! वरची पिंगळा (हे काय असत?), वासुदेव, पोतराज हि उदाहरण विरळाच आहेत ... आणि म्हणूनच आपण म्हणतो 'दुनिया बहुत बदल गयी है भाई'

  ReplyDelete
 2. अभिषेक, मदतीचं तू सांगितलेला उदाहरण अगदी बरोबर. आणि आपल्याला गरज असेल तेव्हा अपेक्षित मदत मिळेलच असंही नाही. बाकी ओळखीच्यांना तर शक्य तेवढी मदत आपण करू शकतोच. पिंगळा सकाळी डमरू सारखं एक वाद्य असतं ते वाजवत जात गाणी म्हणतो. आजीने सांगितलं की त्याला धान्य वगैरे द्यायचं असतं. आम्ही चाळवजा बैठ्या घरात राहत असल्याने हे सगळे तिथे अजूनही येतात. आणि हो, जोगवा मागणाऱ्या स्त्रियाही येतात. त्याशिवाय अमकी साईबाबांची पालखी आलीये, दत्तगुरूंची पालखी आलीये इत्यादी इत्यादीही येतात.

  ReplyDelete
 3. छान वाटले तुझा लेख वाचून इंदधनू .....वर तू म्हणल्या प्रमाणे खरे याचक कोण आहे हे सांगणे कठीण झाले आहे आजकाल.पण मला वाटते अश्यांची पण काही गरज असू शकते.हि मंडळी अशी का बरे करू लागली?काम करून कष्ट करून हाती पायी धड असताना पैसे का मागावे लागताहेत ह्यांना? मनाची त्यांच्या इतकी कुवत नाही कि आपण जे करतो आहोत ते चूक हे समजून घेणे जमत नाहीये त्यांना.सहज मिळते आहे ते लोकांना फसवून शब्दांमध्ये गुंतवून मिळवले...आता लोक देतात ते दान त्यामुळे ते एकदा दिले गेले परत जेव्हां हीच व्यक्ती असे सांगताना सापडली तेव्हां मनातून वाईट पण वाटले आणि राग पण आला..पण हे आपण बदलू शकणार नाही...काही जण जसा आपला वासुदेव ह्यांचा वावर आणि त्यांना जे झोळीत टाकू ते मान्य असायचे हे तर फसवं न्हवता त्यामुळे ते एक समाधान.

  मला एक वाटते कि दान करताना मोकळ्या मनाने मनात किंतु न ठेवता भले पुढे आपणाला जर अशी याचक व्यक्ती खोटारडी आहे जाणवले तरीही आपण दान केले होते हे ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे.आपल्याला वाईट वाटू न देणे आणि आपल्यात बदल होऊ न देणे हे योग्य ठरेल.दान करताना आपण पुढे काय अनुभवास येईल (हा याचक उद्या कदाचित एखाद्या छानश्या गाडीतून जाताना पण दिसायचा सांगणे कठीण!) ह्याचा विचार आजकालच्या जमान्यात न केलेला बरा!

  ReplyDelete
 4. इंद्रधनू तू म्हणते तस जेंव्हा पाहिजे तेंव्हा मदत नाही मिळत ... पण अगदी वेळ पडली तर अगदी अनोळखी लोकही मदत करतात... आणि अवचित अशा मदतीत मनात फार खोलवर बिंबतात. एकदा वाचनात आलं, की एक दुचाकी अगदी निर्मनुष्य ठिकाणी बंद पडली, बऱ्याच वेळाने जवळून जाणाऱ्या राकट दिसणाऱ्या बुलेटवाल्याने अगदी आवर्जून मदत केली. पेट्रोल दिल. गाडी चालू करून दिली. ज्यांना अडचण झाली होती, त्यांनी बुलेटवाल्यास धन्यावाद्द म्हणून पैसे देऊ केले. पण बुलेट वाला तो मनुष्य म्हणाला, आज जशी मी तुम्हाला मदत केली तशीच मदत तुम्हाला कोणी सापडलं की त्यांना करा!
  सायकोलोजी मधे एक मत आहे, जे ह्या लिंक वर सापडेल.
  http://en.wikipedia.org/wiki/Bystander_effect
  लेखापेक्षा थोडा हटके आहे, पण माहित असण्यास उत्तम!
  आपल्या सगळ्यांच्या कमेंट मिळून लेखाइतकं लिखाण झाल!
  श्रिया ने हि छान लिहील, त्यात एडिशन म्हणून म्हणेल की आपली एकाला मदत चुकली म्हणून थांबू नये... त्यात कधी कधी योग्य व्यक्तीलाही मदत होतेच, आणि चुकांमधून आपणही अनुभव घेतो! जस की वर सांगितलं ग्रहणात, दान (ते करणारा मी कोण म्हणा, खूप मोठा शब्द आहे, पण दुसरा नाही सापडला) होत नाही, कारण अनुभव ज्ञानाने ती गोष्ट पटत नाही, पण मग एखाद्या आंधळ्यास्, वृद्धास (त्यांना रस्ता क्रॉस करायचा नसतानाही!) आपण रस्ता क्रॉस करून देऊ शकतोच ना! so lets keep helping one or either way. :)

  ReplyDelete
 5. @श्रिया,
  >> आपणाला जर अशी याचक व्यक्ती खोटारडी आहे जाणवले तरीही आपण दान केले होते हे ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे.
  धन्यवाद श्रिया, खूप छान सांगितलत. हे मी लक्षात ठेवीन म्हणजे वाईट वाटणार नाही. खरच हल्ली एकदा दिल्यानंतर विचार न केलेलाच बरा.

  ReplyDelete
 6. @अभिषेक,
  Bystander effect बद्दल वाचून ते पटलं, त्याबद्दल आधी एकदा
  http://esakal.com/esakal/20110814/5716956292398022059.htm इथेही वाचलंय. आणि तू म्हणतोस तसं मदत आपण इतर रूपातही करू शकतोच. फक्त कोणाला आर्थिक मदत केली म्हणजेच ती मदत असं नव्हे. :)

  ReplyDelete
 7. खूप धन्यवाद मंदार, आणि ब्लॉगवर स्वागत :)

  ReplyDelete