आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी... शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव जाणे, पुढच्या वर्षी ते परत घ्यायलाच लागायचे. आणि मग हुर्ये...... सुरु व्हायची दिवाळीची सुटी!
सुटी सुरु झाली की आईला साफसफाईमध्ये मदत करायला सुरुवात करायची. दोन-तीन वर्षाआड घराला रंग देण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा पसारा आवरायला काढला की त्यात खूप वर्षांपूर्वी हरवलेले पेन, पेन्सिली, कंपास पेट्या असं बरंच काय काय सापडायचं, फराळाचं खायला मिळाल्यावर होणार नाही इतका आनंद त्या जुन्या वस्तू सापडल्यावर व्हायचा! आणि रंग देऊन झाला की घर एकदम नवीन नवीन होऊन जायचं. आणि मग सगळी आवराआवरी, नवीन पडदे, नवीन बेडशीट, तोरणं...
त्यानंतर लगबग सुरु व्हायची किल्ला बनवायची, जरा लवकरच बनवायचा कारण दिवाळीच्या मुख्य दिवसांपर्यंत धान्य उगवायला पाहिजे ना. किल्ला बनवायचा म्हणजे जाम धमाल यायची, दिवसभर नुसतं चिखलात खेळायचं. दगड, विटा माती, आणि बाडदानं वापरून सुंदरसा किल्ला तयार करायचा. एकीकडे भेटकार्ड करायला घ्यायची! शिक्षकांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी... मी कधी मिकी वगैरेची भेटकार्ड नाही बनवली. एकतर पानंफुलं, टिकल्या-आरसे चिकटवून किंवा जुनी घरी आलेली पणत्या वगैरे यांची चित्र पाहून तशी काढायची. मग आकाशकंदील तयार करायचा, दर वर्षी वेगळ्या डिझाईनचा! आणि घरात एव्हाना फराळाची तयारीही सुरु झालेली असायची. मग तिथे गरम गरम फराळ खायला मिळण्यासाठी मदत करायचं नाटक करून निम्मा फराळ फस्त करायचा. आणि जोडीला आईचं ओरडणं.
"आत्ताच संपवू नका, अजून दिवाळीत खायचंय, चार घरी द्यायचाय..."
पण ऐकतंय कोण. एके दिवशी मग बाबांना वेळ असेल तेव्हा लक्ष्मी रोडला जाऊन कपडे खरेदी करायचे. शक्यतो आईच्याच पसंतीचे. आतासारखा लक्ष्मी रोड तेव्हा गर्दीने तुडुंब वाहत नव्हता, तरी २-४ जण आपल्या पुढे कपडे खरेदी साठी असतील तर असं वाटायचं किती गर्दी आहे!
पहिला दिवा आजी एकादशीला लावायची, पण खरी दिवाळी सुरु व्हायची धनत्रयोदशीला. आणि मग तीन चार दिवस छान छान रांगोळ्या, उटण्याची अंघोळ, रेडिओवर पहाटे पहाटे लागणारं कीर्तन, आणि दुपारच्या वेळी विशेष कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री किल्ल्यावर चित्र मांडायची, पणत्या लावायच्या, पूजा करायची आणि छान छान कपडे घालून फटाके उडवायचे. आणि दिवाळी संपली की मग शाळेत दिलेले सहामाहीचे प्रकल्प करायचे! दिवाळी येऊन गेली की मूड एकदम फ्रेश होऊन जायचा.
आताही यातल्या काही गोष्टी अजूनही आहेत, पण प्रत्येक गोष्टीत मनाच्या समाधानापेक्षा दिखाऊपणा जास्त वाढलाय असं वाटतं. साधेपणा हरवलाय. फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हते, तरी भेटकार्डामधून पोहोचलेल्या शुभेच्छांची गोडी जास्त वाटायची. असो.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाणारच, आपण मात्र जुन्या आठवणी मनात ठेवून नवीन प्रकारे आनंद लुटायला शिकायचं! :)