शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

आकाशवाणी


विविधभारतीवर कुठलासा फोन-इन कार्यक्रम चालू होता.... एका श्रोत्याचा फोन लागला... ते गृहस्थ निवेदकाशी बोलत होते... अवांतर इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर निवेदकाने विचारलं

"आपल्याला गाणं कोणतं ऐकायला आवडेल?"

श्रोता - "एक गाणं आहे ना त्यात माझ्या बायकोचं नाव येतं, मला तेच गाणं ऐकायचं आहे"

निवेदक - "अरे वा... छान छान... कोणतं गाणं आहे ज्यात त्यांचं नाव येतं "

श्रोता - "धुंडो धुंडो रे साजना "

निवेदक - "छान गाणं आहे, काय नाव आहे तुमच्या पत्नीचं?"

श्रोता - "धोंडाबाई"

 हे ऐकल्या ऐकल्या खरं तर खूप हसायला आलं... पण नंतर वाटलं म्हटलं तर विनोद म्हटलं तर त्या गृहस्थाचा साधेपणा, किंवा हिंदी जास्त माहिती नसल्याने झालेला विनोद...

मला रेडीओ(शक्यतो विविधभारतीच) ऐकायला फार आवडतो माणसाचा वेळ न खाता पूर्ण होऊ शकेल असा छंद आहे हा.... स्वत:हून गाणी निवडून ऐकण्यापेक्षा रेडीओवर गाणी ऐकण्यात काही और मजा आहे. पुढे कोणतं गाणं येईल हे आपल्याला माहिती नसतं आणि अचानक छान; आपल्या आवडीचं गाणं लागलं की होणारा आनंद स्वत: गाणी निवडून ऐकण्यात नाही... 

टी.व्ही. पुढे रेडीओचा टीकाव लागेल की नाही असा एक काळ होता... पण मला तरी या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी वाटतात. रेडीओवर आपण फक्त ऐकतो त्यामुळे आपण स्वत: विचार करून एखाद्या गोष्टीचं चित्र आपल्या मनाप्रमाणे उभं करतो. किती तरी वेळा असं झालंय की एखाद्या गाण्याचं ऐकून माझ्या डोळ्यांपुढे एक चित्र निर्माण झालं आणि प्रत्यक्षात त्याचं चित्रीकरण म्हणजे अगदीच विरोधाभास होता....

वरच्या प्रसंगासारखे फोन-इन कार्यक्रमसुद्धा छान असतात. एकट्याने प्रवास करताना सोबतही करतात आणि करमणूकही.... आणि इतर रेडीओ स्टेशन्स पेक्षा आपले वाटतात... अर्थात प्रत्येकाची आवड भिन्न असते... विविधभारतीवर सगळेच कार्यक्रम आणि त्यांचे सगळेच उपक्रम स्तुत्य असतात पण विविधभारतीची मराठी माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे गीतरामायण... त्यासाठी तरी आपण विविधभारतीचे नेहमीच ऋणी राहू ...


२७ टिप्पण्या:

  1. हो... अभिरुची संपन्न श्रोत्यांबरोबर साध्या भोळया श्रोत्यांनाही न दुखावता आपलंसं करणारी........

    धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  2. 'रेडीओवर आपण फक्त ऐकतो त्यामुळे आपण स्वत: विचार करून एखाद्या गोष्टीचं चित्र आपल्या मनाप्रमाणे उभं करतो. किती तरी वेळा असं झालंय की एखाद्या गाण्याचं ऐकून माझ्या डोळ्यांपुढे एक चित्र निर्माण झालं आणि प्रत्यक्षात त्याचं चित्रीकरण म्हणजे अगदीच विरोधाभास होता....'
    अगदी पटलं ! :)

    उत्तर द्याहटवा
  3. रेडिओ खरच छान होता. सोज्वळ, उच्च दर्जाचं मनोरंजन आणि टीव्ही सारख addict होण्याचा धोकाही नाही. शिवाय त्याच्या समोरच बसून राहण्याची गरज नाही, आपलं काम करता करताही ऐकता यायचा.

    उत्तर द्याहटवा
  4. I like to listen to radio even today. The surprise of listening to a song when you were thinking about it, is just joyful. I have so many memories of the radio. every song relates to some incident. Nice post. :)

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान लिहिले आहेस.लहानपणापासून मला देखील रेडीओ वरील कार्यक्रम जास्त आवडले.दूरदर्शन वरील काही मोजके कार्यक्रम सोडले तर मी जास्त रेडीओ ऐकते.त्यात गाणी आणि ती पण आपकी फरमाईश ..:)

    उत्तर द्याहटवा
  6. 'रेडीओवर आपण फक्त ऐकतो त्यामुळे आपण स्वत: विचार करून एखाद्या गोष्टीचं चित्र आपल्या मनाप्रमाणे उभं करतो. किती तरी वेळा असं झालंय की एखाद्या गाण्याचं ऐकून माझ्या डोळ्यांपुढे एक चित्र निर्माण झालं आणि प्रत्यक्षात त्याचं चित्रीकरण म्हणजे अगदीच विरोधाभास होता....'

    +100000000000000

    उत्तर द्याहटवा
  7. विविधभारती - आवडतं स्टेशन! मी संधी मिळेल तेव्हा तेच ऐकते. पण फोन इन कार्यक्रमातले संवाद मात्र अनेकदा हास्यास्पद असतात. विविधभरतीचे लोक बिचारे प्रयत्न करतात आल्या संवादाला नीट सजवण्याचा .. इथं निवेदकाची वटवट कमी असते आणि जुनी गाणी ऐकायला मिळतात हे दोन मोठे फायदे आहेत माझ्यासाठी.

    उत्तर द्याहटवा
  8. आजही रेडीओ चे अट्रॅक्शन काही कमी झालेले नाही. मोबाईल वर आल्यापासून आणि एफ एम मुळे खूप चांगले दिवस आले आहेत पुन्हा. मध्यंतरी काही काळ सोडला तर रेडीओ अगदी नामशेष झाल्यासारखा होता, पण एफ एम सुरु झाले आणि सगळं चित्रंच पालटलं. ल

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान वाटलं रेडिओबद्दल वाचून. मी अमेरिकेत येण्यापूर्वी सहा वर्ष आकाशवाणीवर निवेदक होते त्यामुळे रेडिओ माध्यम खूप जिव्हाळ्याचं :-).

    उत्तर द्याहटवा
  10. इथे बऱ्याच जणांनी रेडिओच्या आठवणींबद्दल लिहिले आहे. त्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या आठवणी शब्दबध्द कराव्यात. गुगलवर शोधल्यास जुन्या दूरदर्शन मालिका आणि जाहिरातींबद्दल वाचायला/बघायला मिळते. पण जुने मराठी/हिंदी रेडिओ कार्यक्रम, निवेदक यांच्याबद्दल क्वचितच माहिती मिळते. आधीच्या काही निवेदकांचे आवाज, उच्चार खूप छान होते. कदाचित काही वर्षांनी यांच्याबद्दल सांगणारे कोणीच नसेल.

    उत्तर द्याहटवा
  11. खूप धन्यवाद अनघाताई :)

    मागे तुमच्या पोस्टमध्ये पुस्तक वाचताना आणि सिनेमा पाहताना असा उल्लेख होता. हे ही तसंच काहीसं वाटलं मला...

    उत्तर द्याहटवा
  12. अगदी खरं Anonymous १ :)

    रेडीओ आपल्याला हातचं काम सोडून समोर बसायला लावत नाही, आणि addict झालो तरी तोटा तर काहीच नाही....
    अनेक धन्यवाद....

    उत्तर द्याहटवा

  13. Thank you so much for the comment Vidyaji...

    Me too listen to the radio even today. Listening old melody songs at night time is really makes me feel blissful.... :)

    उत्तर द्याहटवा
  14. खूप धन्यवाद श्रिया ताई... :)

    रेडीओ वरचे सर्वच कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या वयोगटासाठी खास आहेत... मला बुधवारी संध्याकाळी लागणारं "आपली आवड", "मेहक", "सखी सहेली", "बेला के फूल" हे कार्यक्रम खूप आवडतात. हल्ली एक नवीन कार्यक्रम सुरु झाला आहे, फोन-इन आहे, त्यात काहीतरी संदेश द्यायचा असतो.. तोही चांगला आहे....

    उत्तर द्याहटवा

  15. प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद श्रद्धाजी :)

    उत्तर द्याहटवा
  16. खूप धन्यवाद सविताताई :)

    >>पण फोन इन कार्यक्रमातले संवाद मात्र अनेकदा हास्यास्पद असतात
    अगदी अगदी... निवेदकाचं खरंच कौशल्य आहे की ते सर्वांना सांभाळून घेतात...
    विविधभारती वर जाहिराती सुद्धा कंमी आहेत...

    उत्तर द्याहटवा
  17. प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद महेंद्रजी....

    खरंच मोबाईलवर आल्यापासून रेडीओ कुठेही ऐकता येऊ लागला आहे, मीही त्यामुळेच प्रवासात रेडीओ ऐकू शकते.... पण घरी असताना पूर्वी आमच्या घरी एका कोपऱ्यात रेडीओ ठेवण्याची जागा होती, तिथूनच तो ऐकावासा वाटतो....
    एफ एम वरचे काही कार्यक्रम चांगले असतात....

    ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत.... :)

    उत्तर द्याहटवा
  18. @gaur mha
    तुम्हाला लिहिलेलं आवडलं याबद्दल तुमचे आभार.... :)

    उत्तर द्याहटवा

  19. अनेक आभार मोहनाताई :)

    तुम्ही निवेदक होतात हे ऐकून एकदम भारी वाटलं.... मला रेडीओवरच्या निवेदाकांबद्दल अतिशय कुतूहल आणि आदर आहे...
    बोलण्यातल्या भावभावना फक्त आवाजाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायच्या आणि उत्स्फूर्त बोलायचं खरच अवघड काम आहे....

    उत्तर द्याहटवा
  20. @Anonymous २
    प्रतिक्रियेसाठी अनेक आभार... तुमची विनंती मलाही रास्तच वाटत आहे....

    उत्तर द्याहटवा
  21. >विविधभारतीची मराठी माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे गीतरामायण...+++
    मला मात्र रेडिओ अजूनही आवडतो ... कदाचित लहानपणी फारसा ऐकला नाही त्यामूळे माझ्यासाठी उलट ते नवं माध्यम ठरतं !! माझ्याइतकंच माझ्या मुलालाही रेडिओची ओढ आहे कारण आजकाल सगळं इतकं सहज साध्य झालं असताना, रेडिओवर मात्र पुढचं गाणं कोणतं असा प्रश्न पडतो म्हणून त्याला नवलाई वाटत असावी !! :)

    उत्तर द्याहटवा
  22. खूप धन्यवाद तन्वीताई...

    मी लहानपणीही रेडीओ ऐकला आहे, आणि अजूनही आवडतो... :)
    नवीन पिढीलाही रेडीओ आवडतोय हे पाहून छान वाटलं ... तुम्ही म्हणताय ते कारण नक्कीच असेल....

    उत्तर द्याहटवा
  23. मोसम - आकाशवाणी - http://mohanaprabhudesai.blogspot.in/2013/02/blog-post_19.html

    उत्तर द्याहटवा