शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना काही विषयच लागत नाही. आणि सगळेच विषय संपले तर अमक्याच्या घरी असं असं झालं, याचं त्याच्याशी भांडण झालं, या एखाद्याच्या घरातल्या अगदी वैयक्तिक गोष्टीही त्यांना माहिती असतात. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "त्या कल्पनाची मुलगी आहे ना, तिने अमक्या अमक्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तसेही तिच्यावर काही संस्कार आहेत असं कधी वाटतच नव्हतं."
तेव्हा मनात आलं, संस्कार म्हणजे नक्की काय असतं?
पूर्वी म्हणत मुलीच्या जातीने शांत असावं, चार लोकात मोठ्याने हसू नये, अशी मुलगी असली की तिच्यावर चांगले संस्कार आहेत, पण एखादी अशी असली आणि तिचा स्वभावच चांगला नसेल तर फक्त वरवरच्या वागण्याला संस्कार म्हणायचं का? पळून जाऊन किंवा घरच्यांविरुद्ध लग्न केलं तर संस्कार नसतात का? ती जर आयुष्यभर सुखी राहणार असेल तर काय बिघडलंय?
एखादा मुलगा व्यसनाधीन असेल पण कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणार असेल तर त्याच्यावर संस्कार आहेत की नाहीत? संस्कार म्हणजे फक्त बाह्यवर्तन, प्रत्येक गोष्टीचं अवडंबर की माणुसकी म्हणजे संस्कार? की माणुसकी हा संस्कारातला फक्त एक प्रकार?
खोटं बोलू नये हा संस्कार, पण प्रत्येकाला आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खोटं बोलावंच लागतं, मग काय उपयोग या संस्काराचा? मोठ्यांचा आदर करावा, पण ती व्यक्ती आदर करण्यालायक नसेलच तर? अंगी नम्रपणा असावा, पण नम्र लोकांना भित्रे समजतात आजकाल! अरेला कारे बोलला नाही तर कसा तग धरेल? मग आधी उद्धटपणा करायचा आणि जर आयुष्यात काही चांगलं नाव कमावलं, प्रसिद्धी मिळाली तर नंतर नम्र व्हायचं? अजून कितीतरी गोष्टी ज्या आपल्यावर लहानपणापासून बिंबवल्या जातात, पण प्रत्यक्ष जगात तसं वागून चालतच नाही. चाणक्याने सांगितलंय, "सरळ झाडे आधी कापली जातात".
संस्कार आपल्याला "माणूस" बनवतात. आणि आपल्यातला माणूस आपल्याला माहिती असेल तर इतरांनी आपल्या संस्कारांबद्दल काहीही बोलो, काय फरक पडतोय!