एखादी कथा-कादंबरी असो वा नाटक-चित्रपट, तुम्हाला सुखांत पाहायला आवडतो की शोकांतिका? शक्यतो सुखांतच ना? कथा नायक-नायिकेच्या आयुष्यात कितीही हेलकावे आले, त्यांच्यावर अन्याय झाला, पण शेवटी त्यांना न्याय मिळाला की आपल्याला तो सुखांत वाटतो आणि बरं वाटतं. बरं शोकांतिका आपल्याला अगदीच आवडत नाहीत असंही नाही. ते पाहूनही आपण हळहळ व्यक्त करतोच; असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण खरं सांगा, सुखांत असला की ते "नाटक" वाटतं आणि शोकांतिका असली की खरी नसली तरी "that's life" असं वाटतं ना?
आयुष्यात प्रत्येकाचा पदोपदी काही ना काही संघर्ष चालूच असतो, म्हणून तर निदान पडद्यावर, पुस्तकांमध्ये तरी सुखांत वाचून-बघून मनाला कुठेतरी समाधान मिळत असावं. प्रत्येकाचंच मन 'हे काय खोटं आहे' म्हणून तटस्थपणे सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. आपणही त्या कथेतील पात्रांच्या गोष्टीत नकळतपणे गुंतले जातो. कथा-अभिनय-दिग्दर्शन खूपच परिणामकारक असेल तर पाहिलेल्या गोष्टीचा परिणामही पुष्कळ दिवस टिकतो. आणि हे सगळं उथळ असेल तर तेवढ्यापुरतं बघून आपण सोडून देऊ शकतो. आपलं आयुष्यही सुखांतच असावं असं कोणालाही वाटतंच.
पूर्ण आयुष्य तर द्या सोडून; पण जगत असताना कितीतरी छोटे छोटे प्रसंग येतात की ते सुखांतच असावेत अशी कोणाचीही इच्छा असते. शालेय जीवनापासूनच हा खेळ सुरु होतो. परीक्षेचा सुखांत - चांगले गुण मिळवणे, महाविद्यालयाचा सुखांत - चांगली नोकरी मिळणे, नोकरीसाठी मुलाखती दिल्या - चांगलं पॅकेज मिळून नोकरीचा होकार येणे, व्यवसाय करायचा झाला तर नफा होण्यास सुरुवात होणे. घर बांधायला काढलं, किंवा सदनिका खरेदी केली, त्याचं बांधकाम मनासारखं पूर्ण होणे. लग्न करायचं म्हटलं तर प्रेमविवाहात काय किंवा ठरवून केलेल्या विवाहात काय आवडलेल्या जोडीदाराने होकार देणे. गरोदरपणाचा सुखांत - सुदृढ बाळ जन्माला येणे, अचानक काही आजार उद्भवला - त्या आजाराला हरवून पुन्हा उभे राहणे. बापरे अजून खूपच मोठी यादी होईल ही.
खरं सांगू का, सुखांत बघायला आपल्याला आवडतो सगळ्यांना, पण वरच्या या सगळ्या गोष्टी, आणि इतरही अनेक समस्या आयुष्यात असतात की आपल्या मनासारखं नाही होत सगळं. किंबहुना अगदी मूठभर थोड्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. बाकी इतर अनेक गोष्टी "that's life" म्हणून आपल्याला सोडून द्याव्या लागतात. प्रत्येक गोष्ट सुखांत किंवा शोकांतिका यांच्या साच्यात न बसवता, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, याचा अर्थ ती शोकांतिकाच आहे असा नाही. आपल्या मनाने ती गोष्ट कशी स्वीकारली यावर तो सुखांत की ती शोकांतिका हे ठरेल हे बिंबवणं जास्त महत्त्वाचं आहे ना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा