"अच्छा ९३ ? ठीक आहे मग."
ठीक आहे? एखादी व्यक्ती या जगातून गेली तर ते ठीक असतं का, तिचं वय ९३ आहे म्हणून?
काही वर्षांपूर्वी आजी गेल्यानंतर विचारपूस करताना बाहेर कोणाशीतरी झालेलं हे संभाषण चांगलंच डोक्यात बसलंय. आणि ती आजी नसून खरं तर माझी पणजी आजी होती हे समजलं असतं तर अजूनच जास्त ठीक होतं ना. मला खरं तर तिच्या आठवणीने हुंदका अनावर होत होता, पण समोरून अशी प्रतिक्रिया आल्यावर काय पुढे बोलणार?
किती तरी वेळा 'गेलेल्या' व्यक्तीशी आपलं काय नातं आहे यावर पण सांत्वन अवलंबून असतं. नात्याने ती व्यक्ती समजा लांबची कोणी असेल पण आपल्या आयुष्यावर तिचा खूप प्रभाव असेल, किंवा रोजची उठबस, मानसिक जवळीक असेल तर त्या व्यक्तीशी 'जवळचं नातं नाही' म्हणून आपल्याला ती गेल्याचं वाईट नाही वाटणार? पण हे तुम्ही कोणाला सांगायला गेलात तर ते नक्कीच म्हणतील, अच्छा मावस आजोबा किंवा चुलत आजी काय, मग 'ठीक' आहे. हाच अनुभव आजेसासूबाई गेल्या तेव्हा आला. एकांनी विचारलं अच्छा नवऱ्याची आजी का, मग तो ओके आहे ना आता? हो त्याला नक्कीच दु:ख झालं पण माझीही त्यांच्याशी तेवढीच जवळीक होती. त्याच्यानंतर तरी विचारा की मी पण ओके आहे का?
घरातला सगळ्यात पहिला मृत्यू पाहिला तेव्हा मी आठवी-नववीला असेन. तसं तर अगदी न कळतं वय नव्हतं पण मनाच्या हळवेपणाचं वय खूप लहान होतं. एखादी व्यक्ती अचानक आता आपल्यामध्ये नसणार आणि ते आपण प्रत्यक्ष अनुभवायचं हा विचारही नकोसा झाला होता. पहिले दहापेक्षाही जास्त दिवस मी फक्त रडूनच काढले. शाळेच्या सुट्ट्या चालू होत्या. घरातली मोठी माणसं रडत नाहीयेत, त्यांना माझ्यासारखी, माझ्याइतकी आठवण येत नाहीये, किंवा ते ती दाखवत नाहीयेत म्हणजे त्यांना माझ्याइतकं दु:ख झालंच नाहीये असं वाटायचं.
नंतर काही वर्षांनी 'विहीर' चित्रपट आला, आणि वाटलं हेच ते! हीच माझी भावना कोणाला तरी समजली आहे. आणि माझ्यासारखे असे अनेक असणार जगामध्ये, म्हणून तर त्या विषयावर चित्रपट निघाला ना! खरं सांगू का गेलेल्या व्यक्तींचं दुःख तर असतेच पण आपली भावना कोणाला तरी समजली यामुळे तो चित्रपट पाहून खरंच खूप समाधान वाटलं होतं तेव्हा! लहान वयात, किंवा हळवं असण्याच्या वयात आपल्या जवळचं कोणी जग सोडून जाऊ नये हेच खरं.
आता विहीर पाहून पण बरीच वर्षे झाली आणि मनाच्या हळवेपणाचं वयही वाढलं आहे. त्यानंतर दोन व्यक्ती गेल्या जवळच्या. आणि मला सतत दहा-बारा दिवस नाही रडू आलं. आठवण येतच होती. पण त्यापुढे काहीतरी होतं, इतर कामं, इतर व्याप पुढे आणि आठवण त्यांच्या मागच्या थराला होती. काहींना खूप लहान वयात हे जमतं काहींना बरंच मोठं व्हावं लागतं आणि काहींना कधीच जमत नाही. कधीच न जमण्यापेक्षा सध्याची स्थिती बरी आहे, नाहीतरी रामदास स्वामी म्हणूनच गेले आहेत "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे।।"
आपल्या जवळचं कोणी गेलं तर समोरच्याने कशी प्रतिक्रिया द्यावी हे आपल्या हातात नसतं पण आपण किती लवकर सावरावं हे मात्र आपल्याच हातात असतं. जितकं लवकर इतर कामांना लागू तितकं जास्त चांगलं, म्हणून कधी कधी वाटतं वर दिली तशी प्रतिक्रिया देणारीच माणसं जास्त भेटली पाहिजेत.
विहीर नाही पाहिलेला पण सात्वंनाला येणाऱ्यांची मजल कुठपर्यंत जाऊ शकते त्याचा अनुभव घेतला आहे...
उत्तर द्याहटवाअगदी खरंय मोहनाताई !
हटवाही पोस्ट लिहीत असतानाच डॉ. भैरप्पांची बातमी समजली, आणि अचानक डोळे पाणावले.
तुम्हाला वेळ मिळाल्यास, शक्य झाल्यास विहीर नक्की बघा, तुमच्यासारख्या अनुभवसंपन्न लेखिकेला तर नक्कीच आवडेल. पोस्टची दखल घेऊन प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार :)