"इनमिनाती बबलाबू
कर दे रुमाल को पंछी तू..."
"हा हा हा... हे पहा कबुतर...."
आणि असं म्हणून त्याने ते कबुतर आकाशात सोडून दिलं.
एकामागून एक तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या जादू समोर साकार होत होत्या. आणि समोर बसलेली लहान-मोठी मुलं तर सोडाच, पण मोठी माणसंही अचंबित झाल्यासारखी पाहत होती. एकेका जादुनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि भाबड्या डोळ्यांमधून ओसंडणारा आश्चर्यमिश्रीत आनंद.
कार्यक्रम संपला. मुलांसाठी तर सगळं वातावरण भारल्यासारखंच झालं होतं. व्यवस्थापकांनी जाहीर केलं की आता कार्यक्रम संपला, आता जादुगार काका थोड्या वेळाने इथून निघतील. तरीही कोणाला त्यांना भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये या.
"खरंच तू आमच्यासाठी आलास फार बरं वाटलं" व्यवस्थापक म्हणाले, यावर जादूगाराचं उत्तर.. "अरे मित्रासाठी आणि मुलांसाठी इतकंही नाही करणार मी?" असं बोलत बोलत ते ऑफिसकडे वळाले.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
"दीदी, जादुगार काका काहीही करू शकतात का गं?" बबलीने विचारलं.
"हो गं बबली, आपण आता पाहिलं ना, त्यांनी कायकाय जादू केल्या. मला तर वाटतंय की ते काहीही करू शकतात. अगदी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं...." बबलीच्या त्या दीदीने आपल्याला फार समजल्यासारखं तिला सांगितलं.
"होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं?" बबलीने पुन्हा विचारलं.
"नाहीतर काय. हवं तर ऑफिसमध्ये भेटून विचार त्यांना..."
"हो, मी मुळी जाणारच आहे त्यांना भेटायला. मला फार आवडले जादुगार काका"
आणि बबली दीदीचा हात सोडून ऑफिसकडे उड्या मारत पळाली.
ऑफिसमध्ये जादुगार काकांची निघण्याची लगबग चालू होती. बबली जरा घाबरतच त्यांच्याकडे गेली.
थोडा वेळ त्यांच्याकडे पहातच राहीली. जादुगार काकांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पिशवी आवरतच ते बबलीला म्हणाले
"बोल बाळ..."
"जादुगार काका जादुगार काका, तुम्ही काहीही जादू करू शकता?" बबलीने विचारले.
आता काय उत्तर द्यावं ते त्यांना कळेना. पण लहान मुलाची निरागसता राखण्यासाठी ते म्हणाले
"हो बाळ, तुला अजून दुसरी जादू पहायची असेल तर मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा करून दाखवीन हं..."
"काका, पुढच्या वेळेस नको, मला आत्ता करून दाखवाल?" बबलीने धिटाईनं विचारलं.
"आत्ता? बरं तुला काय जादू पहायची ते सांग पाहू..."
"मला इथे येऊन थोडेच दिवस झाले, सगळे म्हणतात माझ्या आई-बाबांना अपघात झाला म्हणून ते देवाघरी गेले, त्यांना देवाच्या घरून परत आमच्या घरी आणाल?......"