गिफ्ट म्हणून 'वस्तू द्यायची' की 'पैसेच द्यावेत' हा तसा नेहमीच सतावणारा प्रश्न. समोरच्याची आवड-निवड ठाऊक असेल आणि आपला choice त्याला आवडत असेल तर वस्तू घ्यायला छान वाटतं. खरं तर दर वेळेस वेगळं आणि उपयुक्त असं काय घ्यावं हाही प्रश्न असतोच, पण काही लोकांना दुसऱ्याचा choice आजिबात म्हणजे आजिबातच आवडत नाही. त्यांना स्यमंतक जरी आणून दिला तरी म्हणतील निळा का आणला? डाळींबी कित्ती छान दिसला असता. असो!
माझे भाऊ मला कधी वस्तू देतात तर कधी पाकीट. आपल्याला तर बाबा काहीही दिलेलं आवडतं.
choice वगैरे पण फार भानगड नाही म्हणून त्यांनाही कधी टेन्शन येत नाही.
तर 'तो' सुद्धा दर राखी पौर्णिमेला त्याच्या बहिणींना पाकीटात पैसे घालूनच देतो. तसेच या वेळीही देणार होता. नेहमीप्रमाणेच ती आधीच तयार न ठेवता अगदी ऐन वेळी भरणार होता.
पाकिटांचा विषय निघाला म्हणून मी त्याला म्हटलं, या वेळी मलाही हवंय पाकीट.
तर तो म्हणे, अगं काही नाही अगदी साधंच आहे पाकीट, एकदम पांढरं, आपली बँकेची वगैरे कागदपत्रं ज्यात येतात ना तसं.
असे कसे असतात हे नवरे लोक? त्याला खरंच समजलं नाही का, की म्हणजे मलाही पैसे हवेत असं म्हणायचंय? आता इतकं सरळ बोलायला कसं शिकायचं?