गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

चेहेरा आणि नेहेमी

तसंही मराठी शुद्धलेखनाला काही महत्त्व राहिलेलं नाहीये. आणि भाषा दर काही वर्षांनी बदलतच जाते. तरी पण मराठी मालिकांमध्ये "तू मला मदत करशील का?" च्या ऐवजी "तू माझी मदत करशील का?" हे कानांना खटकतंच! "प्रश्न" ला "प्रष्ण" म्हटलेलं ऐकलं की त्रास होतो. आपण ज्या भाषेसाठी व्यावसायिक लेखन करतो, ते बरोबर आहे की नाही याचा थोडासा अभ्यास करावा इतकी माफक अपेक्षा आहे.

जाहिरातींच्या अनुवादाबद्दल तर न बोललेलंच बरं! उदाहरणच द्यायचं झालं तर "आपण असं नको का करायला?" च्या ऐवजी "तर मग का नाही आपण असं करूयात?" वगैरे काहीही हिंदीतल्या शब्दांचं जसंच्या तसं भाषांतर केलेलं असतं, वाक्यरचना गेली खड्ड्यात!

जालीय लेखनात "मी आले, मी गेले" ला "मी आली, मी गेली" असं लिहिलेलं पण वाचलंय. अजून काही वाचताना खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे "चेहरा आणि नेहमी" ला हल्ली सगळे सर्रास "चेहेरा आणि नेहेमी" लिहितात. हे म्हणजे हिंदीतल्या "बहुत" ला "बहोत" लिहिण्यासारखं आहे. सारखं हे वाचून वाचून आताशा तर माझाच गोंधळ व्हायला लागलाय की चेहेरा आणि नेहेमीच बरोबर आहे की काय?

तूर्तास तरी इतकंच आठवतंय, असो तर माझ्याही लेखनात काही शुद्धलेखनाच्या चुका वाटल्या तर मला आवर्जून सांगा!


५ टिप्पण्या:

  1. आजकाल इतके कोणी विचार करत नाही पण तुम्ही छान अधोरेखत केले आहे आनंद वाटला हे वाचून

    उत्तर द्याहटवा
  2. नवीन चुकीचा शब्द आला आहे आता "जबाबदारी". सर्रास हाच शब्द असतो.

    उत्तर द्याहटवा
  3. अजून एक शब्द अधोरेखीत केल्याबद्दल धन्यवाद Unknown.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. उत्तरदायित्व हा शब्द वापरला तरी समोरच्याला "जबाबदारी" मधून जे अभिप्रेत होतं ते होईल की नाही ही सुद्धा शंकाच आहे.

      हटवा