Monday, March 5, 2018

बोली मराठी भाषा

"शास्त्री रस्त्याला लागल्यावर जो पहिला थांबा येतो ना तिथे उतरायचं आहे. " मी वाहकाला सांगितलं. 

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस होता. तसं मी नेहमी मराठीतच बोलते, मारवाडी दुकानदार आणि बिहारी भाजीवाल्यांशीसुद्धा! पण म्हटलं आज इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठी बोलून पहावं. 

तर पुमपमलि च्या बसने चालले होते. जिथे उतरायचं ते ठिकाण माहिती होतं पण थांब्याचं नाव माहिती नव्हतं. मी शास्त्री 'रोड' न म्हणता 'रस्ता' म्हणाल्याने आणि 'स्टॉप' न म्हणता 'थांबा' म्हणाल्याने फार फरक पडलाय असं मला आजिबात वाटलं नव्हतं. तरी त्याने दोन सेकंद थोडं स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहिलं. बसला गर्दी नसल्याने तो पण निवांत होता. त्याने मला विचारलं तुम्ही संस्कृत "टीचर" आहात का? 

म्हणजे आता शुद्ध मराठी बोललं तरी संस्कृत वाटायला लागलंय तर!

तळटीप: बस आणि तिकीट यासाठी मराठी शब्द मला माहिती नाहीत. शक्य तितकं मराठी बोललं तरी इंग्रजी शब्द अजिबातच नकोत हे होणं शक्य नाही. बोलणं सहज वाटण्यासाठी ते आवश्यक आहे, टेबलाला मेज म्हणणं वगैरे बोली भाषेत शक्य होईल असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? 

2 comments:

  1. भारीच एकदम. असं रोज बोलता आलं पाहिजे (आम्हाला)

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब :)
    खरी गंमत तर लिहायचीच राहिली. मला जिथे उतरायचं होतं तो थांबा आल्यावर बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी झालेली असतानाही वाहकाने येऊन अतिशय आदराने "तुम्हाला इथेच उतरायचंय ना?" म्हणून विचारणा केली. इतक्या सौजन्याने बोलणारा आणि सहकार्य करणारा कंडक्टर बघून डोळे भरून आले, शुद्ध मराठीचा असाही परिणाम :D

    ReplyDelete